17 February 2019

News Flash

१३५. बोधाग्नि

प्रारब्धाचा सिद्धान्त लक्षात आला आणि मग खरं पीक कोणतं, खरं कसायचं कोणासाठी, हे लक्षात आलं तरी हा जीवनाचा पसारा एका भक्तीनंच व्यापला जाईल,

| July 10, 2015 01:01 am

प्रारब्धाचा सिद्धान्त लक्षात आला आणि मग खरं पीक कोणतं, खरं कसायचं कोणासाठी, हे लक्षात आलं तरी हा जीवनाचा पसारा एका भक्तीनंच व्यापला जाईल, असं ‘मोट नाडा विहीर दोर’च्या संदर्भात बुवा म्हणाले तरी हृदयेंद्र विचार तंद्रीतच हरवला होता. बुवा त्याच्याकडे प्रश्नार्थक चेहऱ्यानं पाहू लागले तेव्हा तो उद्गारला..
हृदयेंद्र – साधनेसाठी आणि साधकासाठी म्हणून काही अर्थ असला पाहिजे, असं मला अजून वाटतं. आणि त्या अंगानंच मी विचार करीत आहे.. मला अभंगाचे दोन भाग दिसतात.. पहिला आहे तो ‘कांदा ते कोथिंबीर’ हा आणि दुसरा ‘मोट ते दोरी’ हा.. शेतकरी शेत पिकवतो. त्याच्यावर त्याचं पोट दोन्ही अर्थानं विसंबून असतं.. त्यातून पैसा मिळतो, चरितार्थ चालतो आणि त्या पिकं, भाज्यांनीही त्या घराचा स्वयंपाक रांधला जातो.. मोट ते दोरी हा तुम्ही म्हणता तसा त्या चरितार्थासाठीच्या साधनांचा पसारा आहे तर हा चरितार्थ आणि त्यासाठीचे प्रयत्न म्हणजे प्रपंच आणि त्यासाठीचे प्रयत्न हे भगवंताच्या चिंतनानं व्यापले तर जीवनाचा मळा फुलत असतानाही गळा विठ्ठलाच्या पायी गोवलेला असेल!
कर्मेद्र – आता हे गळा गोवणं काय असावं?
हृदयेंद्र – ते नामस्मरण आहेच, पण हा गळा दोन गोष्टींत प्रामुख्यानं कार्यरत असतो.. बोलणं आणि खाणं. वाणी आणि रचनेचं कार्य या भागातून कार्यान्वित होत असतं.. तर हा आहार आणि अभिव्यक्ती यात भगवंताचा विसर नाही! समतोल आहे.. आणि बुवा तुम्ही सांगितलेल्या अर्थच्छटांचा विचार करताना त्या रूपकांचा वेगळाही अर्थ जाणवतो बरं का..
बुवा- वा! सांगा मग..
हृदयेंद्र – विहीर हे पाण्याच्या स्रोताचं रूपक आहे. सद्गुरूंचा बोध ही जणू ती विहीर आहे. सद्गुरूंचं प्रेममय आणि ज्ञानमय जीवन ही विहीर आहे. त्या जीवनातून, त्या बोधातून मी वारंवार शिकलं पाहिजे. मोटेनं जसं पाणी उपसतात आणि शेतात घालतात ना? तसं माझ्या क्षमतेनुसार मी त्या बोधाचं चिंतन, मनन केलं पाहिजे.. माझ्या शेतात म्हणजे प्रत्यक्ष जीवनात त्याचं सिंचन केलं पाहिजे.. हे पाणी उपसताना दोरखंड आणि दोरा ही दोन साधनं आहेतच. ‘नाडा’चा अर्थ पसारा आणि जाड दोरखंड असा तुम्ही सांगितलात. त्याचबरोबर ‘मंतरलेला दोरा’ हाही अर्थ फार सूचक आहे.. म्हणजेच हा बोध त्यांच्या जीवन चरित्रातून भावनेच्या मोटेनं उपसताना उपासनेचा दोरखंड हाती हवा! आणि आता जो ‘दोरा’ म्हणजे ‘संबंध’ म्हणालात ना? तर हे सर्व करताना ‘मी केवळ त्यांचा आहे’ या शुद्ध सूक्ष्म भावाचा रेशीमदोरा अखंड हवा.. हे साधलं तर जीवनाचा मळा खऱ्या अर्थानं फुलेल!
बुवा – वा! फार सुरेख! पण खरी गोम इथेच आहे की त्यांचा बोध आपण ग्रहण करून तो जगण्यात आणत नाही..
हृदयेंद्र – सद्गुरू जर जीवनसत्यच सांगत असतील तर ते तात्काळ का पटू नये?
बुवा – अहो माणूस सत्याच्याच शोधात असल्याची सतत बतावणी करतो, पण त्याचे सर्व प्रयत्न सत्य दडपण्याचे आणि टाळण्याचेच असतात.. उपासनेशिवाय कशालाही अर्थ नाही, हे पटतं ना? मग ती होत का नाही? आपल्या ‘मी’ला खरं अस्तित्वच नाही, हे सत्य स्वीकारता कुठे येतं? सत्याची चर्चा करताना गोडी वाटते, पण ते जीवनात उतरवताना भीती वाटते.. ‘। बोल बोलता वाटे सोपे। करणी करता टीर कांपे।’ म्हणतात ना? मग काय विहीरही आहे, मोटही आहे, नाडा-दोराही आहे, पण शेतात पीक कोणतं घ्यायचं, हे कळतं का? सद्गुरूंचा आधार भौतिकाच्या शेतीपुरता वापरला जात असला तर भौतिकाच्याच पायी गळा गोवला जाईल ना?
योगेंद्र – सद्गुरूंचा बोध हा जणू अग्निसारखाच.. अज्ञान जाळून टाकणारा.. म्हणून योग्यांमध्ये धुनीचं महत्त्व आहे.. ती जणू या ज्ञानाग्निचं प्रतीकच आहे.. जे जे मलीन आहे ते ते जाळून टाका.. शेतातलं तृणही आधी जाळून टाकलं जातं ना? तसं अंतर्मनातल्या क्षुद्र, संकुचित इच्छा, अपेक्षांचं तृण जाळून टाकलं तरच मळा फुलेल ना?
कर्मेद्र – चला तुमच्या या वैचारिक भराऱ्या आवरत्या घ्या आणि.. (तोच मोबाइलकडे लक्ष जातं.! तो कानाला लावून उद्गारतो) ओ हो! डॉक्टरसाहेबांचा फोन वाजतोय तरी.. देवा! त्यांनीच फोन उचलू दे..
चैतन्य प्रेम

First Published on July 10, 2015 1:01 am

Web Title: farmers need to change
टॅग Diet,Farmers,Food,God