नामदेव महाराजांच्या चारही ‘पोरां’चं जगावेगळ्या मालमत्तेसाठी चाललेलं भांडणं हृदयेंद्रच्या तोंडून ऐकताना तिघंही मित्रं त्यांच्या त्यांच्या परीनं विचारमग्न झाले खरे.. त्यांच्याकडे एकवार नजर टाकत हृदयेंद्र कपाटापाशी गेला. कपाटाच्या एका खणात कपडे होते आणि बाकीचं अख्खं कपाट पुस्तकांनी भरलं होतं. त्यातून तुकाराम महाराजांच्या अभंगाची गाथा काढून तो म्हणाला..
हृदयेंद्र – तुकाराम महाराजांनीही अशाच वारशाचा उल्लेख केला आहे.. बहुदा आशा भोसले यांनी हा अभंग गायलाही आहे.. हं हा पहा अभंग क्रमांक एकवीसशे ऐक्याण्णव.. वाचतो ऐका हं.. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा। तुझी चरणसेवा पांडुरंगा।। उपवास पारणीं राखिला दारवंटा। केला भोगवटा आम्हांलागीं।। वंशपरंपरा दास मी अंकिता। तुका मोकलितां लाज कोणा।। अर्थ दिलाय तो असा..
योगेंद्र – एकदम सगळा अर्थ वाचू नकोस.. एक एक ओळ वाच मग अर्थ सांग, म्हणजे त्यावर वाटलं तर चर्चा करता येईल..
हृदयेंद्र – बरं चालेल.. तर अभंगाचा पहिला चरण असा की, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा। तुझी चरणसेवा पांडुरंगा।। हे विठ्ठला तुझी चरणसेवा ही माझ्या वडिलांची मिरास आहे.. इथे मिरासचा अर्थ वतनदारी असा दिला आहे..
योगेंद्र – म्हणजे तुकाराम महाराजांच्या घराण्यात विठ्ठलभक्तीची परंपरा होती काय?
हृदयेंद्र – असली पाहिजे.. पण मला नेमकी माहिती आत्ताच सांगता येणार नाही..
कर्मेद्र – का नाही? लॅपटॉपाय प्रसन्न! पहा तुमच्या माहितीतला कच्चेपणा ओळखून मी आधीच शोध सुरू केलाय आणि ही माहिती मिळाली पहा.. ऐका.. तुकाराम महाराजांपासून सुमारे तीनशे वर्षांपूर्वी त्यांचे पूर्वज विश्वंभरबाबा हे देहू गावी राहात होते. या घराण्याचे कुलदैवतच विठोबा होते. घराण्यात आषाढी-कार्तिकीची वारी विश्वंभरबाबांच्या वाडवडिलांपासून चालत आली होती. बाबांनी ती प्रथा तितक्याच भावभक्तीनं पुढे चालू ठेवली होती.. आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी देवानं विश्वंभरबाबांना स्वप्नात दृष्टांत दिला आणि मी तुमच्या गावी आलो असून आंब्याच्या वनात विश्रांती घेत असल्याचे सांगितले. सकाळी बाबा गावकऱ्यांबरोबर वनात गेले तर तेथे विठ्ठल रखुमाईच्या स्वयंभू मूर्ती मिळाल्या. त्यांची स्थापना त्यांनी वाडय़ातील देवघरात केली. देहूत विठ्ठलभक्तीचा पूर होता. विश्वंभर बाबांनंतर त्यांचे दोन्ही पुत्र हरी आणि मुकुंद हे देवाची सेवा सोडून मूळच्या क्षात्र वृत्तीकडे वळले आणि राजाश्रयास गेले. त्यांना सैन्यात मानाच्या जागा मिळाल्या. त्यांचे हे कृत्य त्यांच्या मातोश्री आमाबाई यांना आवडले नाही. देहूत परतून देवसेवेसाठी त्या त्यांचे मन वळवू लागल्या. तरी काही उपयोग झाला नाही. पुढे लढाईत दोघांना वीरमरण आले. मुकुंदाच्या पत्नीचेही निर्वाण झाले, हरीची पत्नी गर्भवती होती. तिला घेऊन आमाबाई देहूस परतल्या. हरिच्या पत्नीला मुलगा झाला. त्याचे नाव विठ्ठल ठेवले. विठ्ठलाचा पुत्र पदाजी, पदाजीचा शंकर, शंकरचा पुत्र कान्होबा आणि कान्होबाचे बोल्होबा. बोल्होबांच्या तीन पुत्रांतले एक म्हणजे तुकाराम महाराज! तर अशी ही वाडवडिलांची मिरास..
हृदयेंद्र – इंटरनेटवर भरपूर माहिती मिळते खरी, आणि तू वाचलेली माहिती अचूकही असावी, पण पूर्वी जे काही छापून येई त्यावर लोकांचा पटकन विश्वास बसत असे. तीच गत आज इंटरनेटची झाली आहे. सर्वच संकेतस्थळांवरची सगळीच माहिती बरोबर असते, याचा काही भंरवसा नसतो.. पण असो, कर्मू तुझ्या प्रयत्नांबद्दल धन्यवाद.. तर या घराण्यासाठी पंढरीचा विठ्ठल देहूस आला आणि तुकाराम महाराजही सांगतात की त्यांच्या वाडवडिलांनी उपासतापास, व्रते उद्यापने वगैरे मार्गानं विठ्ठल भक्ती जोपासली. उपवास पारणीं राखिला दारवंटा। केला भोगवटा आम्हांलागीं।। वाडवडिलांनी विठ्ठलभक्तीचा चरणसेवेचा हा वाटा आम्हाला भोगण्याकरता ठेवला आहे..
कर्मेद्र – ‘राखिला दारवंटा’ म्हणजे काय?
हृदयेंद्र – दारवंटा म्हणजे उंबरठा.. घराचा उंबरठा राखणं म्हणजे घर, घराची प्रतिष्ठा राखणं.. तसं तुझ्या चरणसेवेचा उंबरठा माझ्या वाडवडिलांनी व्रतं, उपास तापास करून राखला आहे, असं महाराज सांगताहेत..
चैतन्य प्रेम
संग्रहित लेख, दिनांक 19th Aug 2015 रोजी प्रकाशित
१६३. माझ्या वडिलांची मिरासी..
नामदेव महाराजांच्या चारही ‘पोरां’चं जगावेगळ्या मालमत्तेसाठी चाललेलं भांडणं हृदयेंद्रच्या तोंडून ऐकताना तिघंही मित्रं त्यांच्या त्यांच्या परीनं विचारमग्न झाले खरे..
First published on: 19-08-2015 at 04:02 IST
मराठीतील सर्व अभंगधारा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fathers