महाराष्ट्राचे पोलीस गेली काही वर्षे कोणत्याही मर्दुमकीसाठी ओळखले जात नाहीत. पुण्याजवळ महामार्गावर जमलेल्या शेतकऱ्यांवर गोळीबार करणे, आंदोलनकर्त्यां शेतकऱ्यांना बदडून काढणे ही त्यांची अलीकडची काही नामांकित कामे. त्यात आता एकाची भर पडण्यास हरकत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पालघर येथील शहीन धाडा या तरुणीने तिच्या फेसबुक पेजवर काही मते नोंदवली. त्यात रागावण्यासारखे काही नव्हते आणि आक्षेपार्ह तर काही नव्हतेच नव्हते. तिचे म्हणणे इतकेच की एका व्यक्तीच्या निधनामुळे इतका सारा बंद वगैरे पाळायचे काही कारण आहे का आणि भगतसिंग, सुखदेव आदी स्वातंत्र्यवीरांसाठी आपण वर्षांतून दोन मिनिटे तरी शांतता पाळून श्रद्धांजली वाहतो का? या प्रश्नात वास्तविक आक्षेपार्ह असे काय आहे? परंतु भरदिवसा दहशतवादी हल्ला करणारे, माहिती अधिकारांतर्गत बडय़ांना उघडे पाडणाऱ्यांना मारणारे हे ज्यांना दिसत नाहीत त्या पोलिसांना शहीनच्या फेसबुकवरील मतांतून धार्मिक भावना दुखावणार असल्याचा साक्षात्कार झाला. यावर जनसामान्यांना न दिसणाऱ्या या गोष्टी पोलिसांच्या चित्तचक्षूस दिसू शकतात याबद्दल महाराष्ट्र पोलिसांचे कौतुक करावे की आपल्या कर्मास रडावे असा प्रश्न राज्यातील जनतेस पडला असल्यास काही गैर नाही. ही तरुणी पुढे असेही म्हणाली की मान हा मिळवायचा असतो, मागायचा नसतो आणि दहशतीच्या जोरावर तो मुळीच घ्यायचा नसतो. या मतांतही गैर ते काय? परंतु पोलिसांना हेही झेपले नाही आणि त्यांनी आपल्या अफाट कार्यक्षमतेचे दर्शन घडवीत
या तरुणीस अटक केली. कदाचित केवळ वर्दी आहे म्हणून मान मिळवायची सवय झालेल्या पोलिसांना या तरुणीचे विधान दहशतवाद्यांच्या बॉम्बपेक्षाही स्फोटक वाटले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु तरीही तिला जाऊन अटक करावी, असे यात काय होते? शिवाय पोलिसांची दुसरी कर्तबगारी ही की तिच्या मतांचा राग आलेल्यांपैकी काहींनी तिच्या काकाच्या रुग्णालयावर हल्ला केला आणि रुग्णालयाची मोडतोड केली. वास्तविक या रुग्णालयात संबंधितांचा कोणी नेता होता आणि त्याच्या उपचारात हयगय झाल्याचा राग या मंडळींना आला, असेही घडलेले नाही. तशी परंपरा या राज्यात आता तयार होऊ लागली आहे. परंतु तसेही काही घडलेले नव्हते. तरीही या रुग्णालयावर हल्ला झाला. तो अर्थातच राजकीय हेतूने प्रेरित होता. त्यातील नऊजणांना पोलिसांनी संशयित म्हणून पकडले, ते २४ तासांनंतर. पण काही किरकोळ मते व्यक्त केली म्हणून दोन तरुणींना तक्रारीनंतर विनाविलंब अटक करण्याची शूर कामगिरी या पोलिसांनी करून दाखवली. त्यातही या पोलिसांच्या शिरपेचात तुरा रोवता येईल असा प्रसंग म्हणजे शहीनने व्यक्त केलेल्या मतांशी सहमती दाखवली म्हणून रिनी o्रीनिवासन या तिच्या मैत्रिणीसही अटक करण्यात पोलिसांनी हयगय केली नाही. या सगळय़ासाठी पालघरच्या कोण नेत्याने पोलिसांकडे तक्रार केली होती. नेत्यांच्या तक्रारी पडत्या फळाच्या आज्ञेप्रमाणे जपण्याची सवय झालेल्या पोलिसांनी इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा असे म्हणत शहीन आणि तिच्या मैत्रिणीसही कायद्याचा बडगा दाखवला. याला म्हणतात बहादुरी. तेव्हा या महान कामगिरीबद्दल महाराष्ट्राचे लाडके गृहमंत्री आर आर आबा पाटील यांनी या पोलिसांची शिफारस राष्ट्रपतीपदक वा शौर्य पुरस्कारासाठी केल्यास महाराष्ट्रातील जनतेने आश्चर्य मानून घेऊ नये. पुण्यातील बॉम्बस्फोट असोत वा अन्य कोणता महत्त्वाचा दहशतवादी हल्ला. त्यातील गुन्हेगारांना पकडणे राज्यातील पोलिसांना जमलेले नाही. परंतु त्या आघाडीवर होणारे नुकसान त्यांनी शहीन या तरुणीस अटक करून भरून काढले याबद्दल हे पोलीस नक्कीच अभिनंदनास पात्र आहेत. या संदर्भात महाराष्ट्रातील पोलिसांची तुलना वा बरोबरी वंगदेशीय पोलिसांशी नक्कीच होऊ शकेल. पश्चिम बंगालमधील अंबिकेश महापात्र या निवृत्त प्राध्यापकाने गंमत म्हणून त्या राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे व्यंगचित्र काढले आणि ते ई-मेलवरून आपल्या मित्रास पाठवले, तर भावना दुखावल्या म्हणून पोलिसांनी त्यास तुरुंगात डांबले. तेव्हा त्या प्राध्यापकास अटक करण्याच्या पश्चिम बंगालच्या शौर्याची तुलना शहीनला अटक करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांशी नक्कीच होऊ शकेल. एरवीही तसे मराठी आणि बंगाली मानसिकता बऱ्याच प्रमाणात साम्य आहे, असे म्हणतात. तेव्हा जे झाले ते त्या साम्यास साजेसेच झाले. अर्थात एकेकाळी स्कॉटलंड यार्डशी तुलना करून घेणाऱ्या मुंबई पोलिसांची बरोबरी आता पश्चिम बंगाल पोलिसांशी होत असेल तर काहींना वाईटही वाटू शकेल. पण हे असे वाईट वाटून घेणारे मूठभर सोडले तर नव्या दमाच्या मराठी जनांना महाराष्ट्र पोलिसांचा अभिमानच वाटेल यात शंका नाही. परंतु साध्या व्यंगचित्रावरून तितक्याच साध्या प्राध्यापकाला तुरुंगात टाकणाऱ्या सरकारच्या राज्यात बाळासाहेब ठाकरे जन्माला आले असते तर, ममताबाईंची प्रतिक्रिया काय असती आणि त्यांच्या प्रतिक्रियेवर बाळासाहेबांच्या अनुयायांची काय प्रतिक्रिया झाली असती याचा विचार केला तरी शहाण्यांस भीती वाटू शकेल. शहाण्यांना विनोदाचे नेहमीच वावडे असते असे म्हणतात. याही आधी असीम त्रिवेदी या अगदी टाकाऊ व्यंगचित्रकारांच्या अतिटाकाऊ व्यंगचित्रावरही पोलिसांनी आक्षेप घेतला होता. त्याला तर
थेट राजद्रोहाच्या आरोपाखालीच आत डांबण्यात आले. त्या मानाने शहीन भाग्यवान म्हणावयास हवी. केवळ धार्मिक भावना दुखावल्याचेच बालंट तिच्यावर आले. ती मुंबईत नसल्याने वाचली असे म्हणावयास हवे. मुंबई पोलिसांना तिच्यावर कारवाईची संधी मिळाली असती तर असीमप्रमाणे शहीनवरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला असता, असे मानण्यास जागा आहे. शहीनला समर्थन देणाऱ्यांचीही काही खर त्यामुळे नाही असे म्हटल्यास वावगे ठरू नये. बाळासाहेब ठाकरे हे स्पष्टवक्तेम्हणून प्रसिद्ध होते,
तेव्हा इतरांच्या स्पष्टवक्तेपणाला आक्षेप घ्यायचे काय कारण, असा सवाल सध्या फेसबुक आणि ट्विटर माध्यमांतून माहिती महाजालात फिरत आहे. राज्याच्या पोलिसांना याचा सुगावा अद्याप लागलेला दिसत नाही. याचे कारण असे की, तो व्यक्त करणाऱ्या प्रत्येकावर कारवाईस त्यांनी अजून तरी सुरुवात केलेली नाही. जगभरातून जेथून अशा स्वरूपाचे विचार व्यक्त होतील तेथे तेथे जाऊन संबंधितांना अटक करण्यास राज्य पोलीस लवकरच सुरुवात करतील, असे मानण्यास जागा आहे. अडीच लाख कोटी रुपये कर्जाचे ओझे डोक्यावर असणारे महाराष्ट्र सरकार या कारवाईसाठी पोलिसांना जगभर प्रवासाची अनुमती देईल याहीबद्दल आमच्या मनात तीळमात्र शंका नाही. या सगळय़ांची सुरुवात पोलिसांनी मरकडेय काट्जू यांच्या अटकेने करावी अशी आमची सूचना आहे. प्रेस कौन्सिल या तशा निरुपद्रवी आणि निरुपयोगी संस्थेचे प्रमुख आहेत. इतक्या निरुद्देशी संस्थेच्या प्रमुखाने पोलिसांच्या शहीनवरील कारवाईवर टीका करीत
थेट मुख्यमंत्र्यांचाच राजीनामा मागावा किंवा शहीनला अटक करणाऱ्या पोलिसांवर कारवाईची मागणी करावी म्हणजे काय? तेव्हा महाराष्ट्र पोलिसांनी अजिबात अवमान करू नये आणि काट्जू यांना अटक करून आपली धडाडी बेलाशक दाखवावी.
जाता जाता सुचवायचे ते एवढेच की हे सर्व होत असताना राकट देशा, कणखर देशा.. असे म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्राने स्वत:स चापलुसांच्या देशा असेही म्हणावयास सुरुवात करावी. ही चापलुसी म्हणजे काय हे त्यांना समजून घ्यायचे असेल तर मनोहर जोशी यांची कोहिनूर शिकवणी त्यांनी लावावी. त्यासाठी वेळ पडल्यास स्वत: जोशी आर आर आबांचे साहेब शरद पवार यांना सांगून अर्थसंकल्पात खास तरतूद करवून घेऊ शकतील, याची त्यांनी खात्री बाळगावी.