एकापाठोपाठ पराभवांची मालिका घडत असताना काँग्रेस पक्ष त्यातून काहीही बोध घेताना दिसत नाही. गांधी घराण्याशी निष्ठा, हा आजदेखील या पक्षातला सर्वहारा मंत्र राहिला आहे. अशा निष्ठावंतांबरोबर केलेल्या चिंतनातून राहुल गांधी मत बनवणार, त्यानंतर निर्णय घेणार, मग समस्त काँग्रेसजन तो अमलात आणणार, याला पक्षाचे पुनरुज्जीवन मानले जात आहे.
लोकसभेनंतर महाराष्ट्र व हरयाणा विधानसभा निवडणुकींचा ज्वर ओसरला आहे. काँग्रेसला आता प्रतीक्षा आहे ती जम्मू-काश्मीर व झारखंड विधानसभा निवडणुकींतील पराभवाची! अर्थात आत्ता कुठे या दोन्ही राज्यांमध्ये निवडणुकीची अधिसूचना निघाली आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत दोन्ही राज्यांमध्ये सत्तेत सहभागी असलेला काँग्रेस पक्ष या निवडणुकीत पराभूत होईल, असे या क्षणी म्हणणे धाडसाचे असले तरी, सध्या तरी काँग्रेसची वाटचाल त्याच दिशेने सुरू आहे.
पक्षांतर्गत शिस्त काँग्रेसमध्ये कधीकाळी होती. पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांविरोधात एखाददुसऱ्या नेत्याचा का होईना, आवाज बुलंद होत होता. आता काँग्रेसमध्ये नेत्यांपेक्षा हुजऱ्यांची संख्या जास्त आहे. अशा हुजऱ्यांमध्ये राहुल गांधी यांचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची चढाओढ सुरू आहे. आपापली सुभेदारी सांभाळण्यासाठी प्रत्येक नेता झटत असतो. काँग्रेसमध्ये सध्या (गांधीनिष्ठ) नेत्यांची चलती आहे. सामान्य कार्यकर्त्यांना काँग्रेसमध्ये महत्त्वाचे स्थान नाही. प्रत्येक राज्यामध्ये एक नेता व नेत्याभोवती हुजरे, अशी सध्याची काँग्रेसची परिस्थिती आहे.
काँग्रेसने आयुष्यात अनेक त्सुनामी, निलोफर, हुदहुद पाहिले आहेत. त्यामुळे मोदी-लाट वगैरेची आम्हाला भीती नाही, या काँग्रेस नेत्यांच्या आशावादाचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. इतके आशावादी असायला धाडस लागते. मतांच्या टक्केवारीची आकडेमोड करून काँग्रेसचा जनाधार कसा कायम आहे, याची मांडणी राहुल गांधी यांच्याकडे करणाऱ्या काँग्रेसच्या समाधानी नेत्यांचा खरोखरच कुणालाही हेवा वाटेल. पराभवाची मीमांसा करून आक्रमकपणे संघटनात्मक  बदल होणे तर दूरच, काँग्रेसमध्ये अजूनही ‘चिंतन’ बैठकांचे पर्व सुरू आहे. एक मात्र नक्की, काँग्रेसमध्ये नेत्या-कार्यकर्त्यांमध्ये संघर्षांची सुप्त सुरुवात झाली आहे.
दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतीनिमित्त त्यांच्या शक्तिस्थळ या समाधीस्थळावर ३१ ऑक्टोबरला सकाळी काँग्रेसचे सर्व नेते श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जमले होते. सोनिया तसेच राहुल गांधी यांच्याशिवाय त्यांच्या अवतीभवती वावरणारे नेते उपस्थित होते. कधीकाळी या नेत्यांना भेटण्यासाठी वेटिंग लिस्ट असे. आता या नेत्यांना वेळच वेळ असतो. अहमद पटेल यांच्याभोवतीचे गूढ वलय आजही कायम आहे. चालता चालता एखाद्याशी बोलणे व बोलता बोलता निर्णय घेणारे अहमद पटेल इंदिराजींच्या स्मृतिस्थळी सामान्य नेत्या-कार्यकर्त्यांशी बोलत होते. साधारण वर्षभरापूर्वी याच अहमदभाईंशी बोलण्यासाठी महाराष्ट्राच्या माजी शीर्ष नेत्याच्या कौटुंबिक कार्यक्रमात कित्येक नेते ताटकळत, तेही न जेवता उभे होते. उभे असलेल्या एकाही नेत्याला अहमद पटेल यांच्याशी बोलण्याची संधी मिळणार नाही, यासाठी अगदी त्यांच्या शेजारीच जेवायला बसलेले माजी केंद्रीय मंत्री राजीव शुक्ला सतत एकेक विषय काढून चर्चा सुरू ठेवत होते. महाराष्ट्रातील काही खासदारही अहमद पटेल यांच्याशी बोलण्यास इच्छुक असलेल्यांच्या रांगेत उभे होते. असे हे अहमद पटेल. आता त्यांच्याभोवतीच्या गूढ वलयास गांधी परिवाराच्या काळजीने व्यापले आहे.
राहुल गांधी यांच्या क्षमतांविषयी काँग्रेसच्या एकाही नेत्याच्या मनात ‘शंका’ नाही; पण उघडपणे राहुल यांच्याविषयीची भावना व्यक्त करण्याची धमक एकाही नेत्यामध्ये नाही. गेल्या आठवडाभरापासून राहुल गांधी सतत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी संवाद साधत आहेत. दिग्विजय सिंह यांनी राहुल गांधी यांना पक्षाची सारी सूत्रे घेण्यासाठी केलेले आवाहन या संवादाची परतफेड आहे. राहुल गांधी यांच्याशी संवाद म्हणजे एक चमत्कारिक अनुभव असतो म्हणे! म्हणजे आपला इतिहास-भूगोल माहिती नसलेल्याशी बोलल्यानंतर जशी अनुभूती येईल ना, अगदी तस्साच अनुभव! लहरी राहुल गांधी यांना पक्षाचे पुनरुज्जीवन करायचे आहे. पुनरुज्जीवन म्हणजे ज्या-ज्या राज्यात काँग्रेस पक्ष सहकारी पक्षासमवेत सत्तेत आहे, तेथे स्वबळावर निवडणूक लढायची. महाराष्ट्रात युती तुटण्याचा निर्णय झाल्याशिवाय आपण आघाडी तोडायची नाही, असा सल्ला राहुल गांधी यांच्या प्रभारी सल्लागारांनी त्यांना दिला होता. काँग्रेसमध्ये सध्या जसे हुजरे आहेत, तसेच सल्लागारदेखील आहेत. अशांसाठी काँग्रेस पक्ष म्हणजे रोजगार हमी केंद्र आहे. नेत्यांना आपापल्या चिरंजीवांना राजकारणात सक्रिय करण्याची घाई झाली आहे. महाराष्ट्रात तेच झाले. आता झारखंडमध्येही हेच होऊ घातले आहे. झारखंडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रदीप बालमुचू यांनी घाटचिला मतदारसंघातून स्वत:च्या कन्येला उमेदवारी देण्याचा तगादा लावला. त्यांची कन्या काँग्रेसची सक्रिय सदस्य नाही. पित्याच्या राजकीय पुण्याईवर स्वत:च्या राजकीय महत्त्वाकांक्षेची पोळी भाजण्यासाठी बालमुचू यांनी झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाशी युती तोडण्याचा सल्ला पक्षश्रेष्ठींना दिला. त्यांच्या जोडीला ऑस्कर फर्नाडिस होतेच.
राहुल गांधी यांच्याशी चर्चा करणाऱ्यांमध्ये गिरिजा व्यास, अजय माकन, सुशीलकुमार शिंदे, मुकुल वासनिक, जनार्दन द्विवेदी, सचिन पायलट आदी निष्ठावंतांचा भरणा आहे.  या नेत्यांचे समान वैशिष्टय़ म्हणजे यांच्यापैकी एकाचाही लोकसभा निवडणुकीत मोदीलाटेत टिकाव लागला नाही. हे असे राहुल गांधी यांचे सल्लागार! यांच्या चिंतनातून राहुल गांधी मत बनवणार, त्यानंतर निर्णय घेणार, मग समस्त काँग्रेसजन तो अमलात आणणार. गंमत म्हणजे लोकसभेत राहुल यांच्यापेक्षा काँग्रेसच्या खासदारांना ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी चर्चेत जास्त रस असतो; पण राहुल गांधी यांना पक्षाच्या पुनरुज्जीवनासाठी शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात स्वारस्य नाही.
राहुल गांधी यांना सामान्य कार्यकर्त्यांशी बोलण्यात रस नसतो. सध्या काँग्रेसमधून निलंबित असलेले मुंबईचे एक ‘आम आदमी’ नेते राहुल गांधी यांना भेटायला गेले. मुंबईचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात ते राहुल गांधी यांना एकेक प्रकरण सांगू लागले. तेव्हा राहुल गांधी यांनी त्यांचे किमान ऐकून घेण्याऐवजी- तुम्ही तुम्हाला दिलेल्या वेळेपेक्षा जास्त बोललात. मला अजून एके ठिकाणी जायचे आहे, असे सुनावले. तर याच ‘आम आदमी’ नेत्याची काँग्रेसच्या सी. पी. जोशी यांनी- आम्हाला अभ्यासू नेत्यांपेक्षा निवडून येण्याची लायकी असलेल्यांची जास्त गरज असल्याचे सांगून बोळवण केली होती. अभ्यासू, विद्वान ही काँग्रेसमध्ये नेतेपदासाठी गुणवत्ता असू शकत नाही.
शनिवारी भारतीय जनता पक्षाचे हायटेक नोंदणी अभियान सुरू झाले. मोबाइल वा इंटरनेटद्वारे भाजपचे सदस्य होता येईल. काँग्रेसमध्ये टेक्नोसेव्ही अभियानाला पक्षांतर्गत विरोध आहे, कारण त्यामुळे कार्यकर्ता व पक्ष यातील मध्यस्थाची भूमिका संपते. काँग्रेसच्या नेत्यांना ते नको आहे. असो. तर भाजपचे हायटेक नोंदणी अभियान. त्यानिमित्ताने नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या कार्यक्रमासाठी (पक्ष बैठकीव्यतिरिक्त) म्हणून किमान पाचव्यांदा भाजप मुख्यालयात आले होते. ज्यामुळे सत्ता मिळाली त्या पक्षाला मोदी अजून विसरलेले नाहीत. आपल्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत डॉ. मनमोहन सिंग किती वेळा पक्ष मुख्यालयात गेले? अथवा वार्षिक अधिवेशनाचा अपवाद वगळता किती वेळा कार्यकर्त्यांसाठी काँग्रेस नेतृत्वाकडून एखादा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यकर्त्यांचे सोडाच, राहुल गांधी यांना भेटण्यासाठी संपुआ सरकारमधील केंद्रीय मंत्र्यांना ताटकळत थांबावे लागत असे. काँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्रीदेखील आतुरतेने राहुल गांधी यांच्या बोलावण्याची वाट पाहत असत.
माजी केंद्रीय कोळसामंत्री सुबोधकांत सहाय यांना झारखंडमधून विधानसभा निवडणूक लढवायची आहे. त्यासाठी त्यांनी स्वत:ची प्रतिष्ठा पणाला लावली आहे. अशांवर राहुल गांधी यांचा अंकुश नाही. काँग्रेस म्हणजे जणू संत्र्याचे फळ. बाहेरून एकसंध दिसत असले तरी आतून प्रत्येक फोड वेगळी! प्रत्येक नेता स्वत:च्या कुटुंबातील सदस्यांसाठीच राजकारण करतो.
आता तर राज्यात भाजपचे सरकार आले आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने स्वत:ची तजवीज निकालाच्या दिवशीच करून घेतली. ती काँग्रेसमध्ये असल्याने आपल्याला करता आली नाही, या दु:खाची जाणीव झालेल्यांनी आता भाजपवर  ‘राधाकृष्णा’सारखे प्रेम करण्यास सुरुवात केली आहे. पक्षनेतृत्वाविषयी कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम असताना पक्षांतर्गत निवडणुका अलीकडेच होत आहेत. या निवडणुकीत स्वत:ऐवजी पक्षाशी एकनिष्ठ असलेल्यांच्या पदरी काय येते, हे महत्त्वाचे असेल. अर्थात आत्ममग्नतेपुढे पक्षनिष्ठा-वैचारिक निष्ठा अशा फुटकळ गोष्टींना फारशी किंमत नसते.