15 August 2020

News Flash

करविली तैसी केली कटकट..

संतविचाराचा आणि आजच्या जगण्याचा नेमका संबंध काय, संतांच्या विचारविश्वातील कोणत्या गोष्टी आम्ही आज आमच्या जगण्यात आणू शकतो, यांसारखे प्रश्न आपल्याला पडतात ते त्या विचारातील प्रबळ

| December 21, 2012 12:23 pm

संतविचाराचा आणि आजच्या जगण्याचा नेमका संबंध काय, संतांच्या विचारविश्वातील कोणत्या गोष्टी आम्ही आज आमच्या जगण्यात आणू शकतो, यांसारखे प्रश्न आपल्याला पडतात ते त्या विचारातील प्रबळ अशी आद्य प्रेरणा आणि त्या विचाराचे सवरेदार, सर्वसमावेशक आवाहन आपल्या सगळय़ांच्याच आकलनाच्या चिमटीतून सतत सुटत चालल्यामुळेच..
संतमंडळाने या मराठी मुलुखात १३व्या शतकाच्या आगेमागे ज्या कार्याचा मुळारंभ केला, त्या साऱ्या खटाटोपाचा निर्देश ‘चळवळ’ या शब्दाने केला जातो. अर्थात, त्यात चुकीचे अथवा अ-यथार्थ असे काहीच नाही. परंतु अगदी निर्लेपपणे सांगायचे तर मराठी संतमंडळाने त्या काळात तो जो उद्योग आरंभलेला होता त्याचे सम्यक  वर्णन करण्यास ‘चळवळ’ हा आजचा शब्द अंमळ थिटा वाटतो. वास्तवात संतांनी हात घातला होता तो अत्यंत मूलभूत अशा वैचारिक मन्वंतराला. त्या काळात ते कार्य किती कठीण होते याची पुरेशी कल्पनादेखील आपल्याला आज करता येणार नाही. निखळ निवृत्तिपर, परलोकप्रधान विचारव्यूहाचा प्रगाढ असा केवळ वैचारिक नव्हे तर धार्मिक, सामाजिक आणि मुख्यत: व्यावहारिक पगडा शतकानुशतके नांदणाऱ्या जीवनव्यवहारात विशुद्ध इहवादी प्रवृत्तिपर आणि नीतिमय अशा निकोप ऐहिक जीवनदृष्टीचा परिपोष करणाऱ्या पर्यायी विचारव्यूहाचे बीजारोपण करणे हे खायचे काम नव्हे! संतांनी ते आव्हान स्वीकारले. त्यासाठी ऐहिक जीवनरहाटीची स्वयंसिद्ध प्रतिष्ठा शिरोधार्य मानणाऱ्या शैवागमासारख्या पर्यायी दर्शनाची कास ज्ञानदेवादी प्रभृतींनी धरली आणि पंच ज्ञानेंद्रियांना गोचर असणाऱ्या या जगाकडे बघण्याची सर्वसामान्यांची जीवनदृष्टीच मुळापासून बदलण्याचा वसा घेतला. ज्या जगामध्ये आपण जगतो, वाढतो, प्रत्येक श्वास घेतो त्या जगाबाबतची, जगण्याबाबतची आपली दृष्टी निकोप बनवणे हे संतांपुढील पहिले काम होते. पूर्वजन्मातील पापांचा निचरा घडवून आणण्यासाठी ज्या या जगात जीवाला जन्म घ्यावा लागतो ते हे जगच मुळात असत्य आहे; या जगातून ‘सुटण्या’तच पुरुषार्थ आहे, या पूर्वापार जीवनदृष्टीला संतविचाराने सुभग पर्याय दिला.
भागवतधर्मरूपी मंदिराची उभारणी होत असताना, या भूमीतील विठ्ठलभक्तीच्या झऱ्यात ज्ञानदेवांकडून आलेल्या शैवागमाचा प्रवाह एकरूप होऊन त्या जोडप्रवाहातून त्या मंदिराचा पाया रचला गेला. या संगमाद्वारे ‘भक्ती’ या एका मूलभूत संकल्पनेची एक आगळीच व्याख्या इथे साकारली. अनुभवाला येणारे उभे जग म्हणजे एकाच ‘शिव’ तत्त्वाचा आविष्कार असल्याने ते शिवाइतकेच सत्य आहे, हा शैवागमाचा गाभा. साहजिकच, जगातील प्रत्येक पदार्थ हा स्वरूपत: त्या शिवापासून विभक्त कधीच नसतो. पर्यायाने, या जगातला एकूण एक जीवमात्र शिवतत्त्वाशी ‘भक्त’ म्हणजेच जोडला गेलेला आहे, ही तार्किक उपपत्ती सिद्ध होते. त्यामुळे ‘भक्ती’ ही ज्ञानदेवांच्या लेखी साध्य अथवा साधन न उरता ती ठरते एक अवस्था! याचाच अर्थ, या जगामध्ये प्रत्येकाला ‘भक्ती’ ही अवस्था जन्मजात प्राप्तच असते. मग या जगात जन्माला आल्यानंतर माणसाने साध्य काय ठेवायचे, असा प्रश्न आला तर शैवागमानुसार त्याचे तर्कशुद्ध उत्तर येते- नीती! संतविचारानुसार भक्ती जन्मसिद्ध आहे, तर नीती हे साध्य आहे. त्यामुळे, आमचा संपूर्ण संतविचार हा स्वरूपत: नीतिप्रधान आहे. संतप्रणीत भक्तीला नीतीचे अस्तर आहे ते त्यामुळेच. किंबहुना, जो नीतिवान असतो तोच भक्तिवान म्हणावा, असा ज्ञानदेवांचा स्पष्ट संकेतच आहे मुळी!
संतविचाराच्या गाभास्थानी असलेल्या ऐहिक जीवनदृष्टीशी आणि त्या जीवनदृष्टीच्या मुळाशी असणाऱ्या ऐहिक जीवनप्रधान तत्त्वज्ञानाशी नीतीचा हा असा संतप्रणीत पुरस्कार विलक्षण सुसंवादी आहे. ऐहिक जीवन सुरळीत, निरामय, संतुलित आणि शांततापूर्ण बनायचे असेल तर प्रत्येकच जीवनव्यवहाराला किमान नीतिमूल्यांची चौकट ही असलीच पाहिजे. अनैतिक वागण्याकडे माणसाला प्रवृत्त करणाऱ्या यच्चयावत भावना-प्रेरणांचा कल्लोळ प्रथम व्यक्तिगत जीवनात आणि पर्यायाने यथावकाश सामाजिक जीवनामध्ये माजू नये, याचसाठी संतविचार अंत:करणशुद्धीवर भर देतो. ‘जे खळांची व्यंकटी सांडो’ हा संपूर्ण ‘पसायदाना’चा मेरुदंड आहे. इहलोकातील जीवन सात्त्विक, संपन्न बनविणाऱ्या नीतितत्त्वाला व्यवहारात पुष्टी देणाऱ्या समता, प्रेम, करुणा, परोपकार, भूतदया, बंधुता, क्षमा यांसारख्या गुण-मूल्यांचा उच्चार संतविचारात म्हणूनच वारंवार केलेला आढळतो. तत्कालीन समाजव्यवहारातील जातिभेद, त्या जातिभेदामधून प्रसवणारी विषमता आणि त्या विषमतेमधून लोकरहाटीमध्ये निपजणारी पिळवणूक संतांच्या टीकेचा, संतापाचा विषय ठरते कारण जातिभेद कुऱ्हाड चालवतो ती समतेच्या आदितत्त्वावरच. संतहृदय म्हणून कळवळते. ऐहिक जीवन नासवणारे जे जे आहे ते ते सारे संतविचाराला त्याज्य आहे.
दुर्दैवाची आणि खेदाची बाब अशी की, संतविचारातील एवढी निखळ आणि सशक्त ऐहिकता आपल्याला आजही प्रकर्षांने भावलेलीच नाही. ऐहिक जीवन सुखशांतिमय बनावे यासाठी संतांनी शिरीमस्तकी धरलेला चित्तशुद्धीचा आग्रह आम्ही पारलौकिक साधनेच्या दावणीला बांधला. संतविचार हा मुळात एक स्वायत्त विचार आहे, त्याच्या मुळाशी एक वेगळे जीवनविषयक तत्त्वज्ञान आहे, त्या तत्त्वज्ञानाच्या चौकटीतच संतविचाराचे मर्म आपण समजून घ्यायला हवे, याचे तर भानही आता विरळ होत चाललेले दिसते. एखाद्या प्रचलित तत्त्वविचाराच्या चौकटीत आपल्याला सोयीचे असणारे संतविचार कोंबून आपला ‘अजेंडा’ राबवण्यासाठी संतविचाराला सरसहा वेठीस धरण्याची प्रवृत्ती आताशा सर्वत्रच बळजोर होते आहे. त्यामुळे, संतविचाराचा प्रांजळ, पायाशुद्ध, अभिनिवेशरहित अभ्यास होण्याच्या शक्यता अलीकडे अंधूक होत चालल्या आहेत. मुळात, संतसाहित्य आणि संतविचार यांच्याकडे मुख्यत: तीन प्रांतांतील अभ्यासक वा जिज्ञासू आजवर वळत आलेले आहेत. साहित्यिक, सांप्रदायिक आणि चळवळींच्या क्षेत्रातील काही अग्रगण्य यांनीच संतसाहित्याच्या अंतरंगाकडे वळण्यात अलीकडील काळात रस दाखविलेला दिसतो. पण तिथेही पुन्हा गंमत आहे. साहित्यिकांना मुख्यत: मोहिनी पडली ती संतांच्या शब्दकळेची आणि संतसाहित्यातील सौंदर्यादी साहित्यिक मूल्यविचारांची. सांप्रदायिकांच्या लेखी संतविचाराचे मोल पारलौकिक श्रेयसाच्या प्राप्तीचे साधन म्हणूनच मुख्यत: राहिलेले आहे. तर चळवळीतल्या लोकाग्रणींना भावला संतविचारातील विद्रोह. त्यामुळे या प्रत्येक गटाचे संतविचाराचे आकलन-चिंतन हेतुबद्ध आणि त्यामुळे निवडक ठरते. संतविचारातील र्सवकष, सर्वस्पर्शी ऐहिकता, इहलोकातील समग्र जीवन निरामय आणि मुख्य म्हणजे नीतिमान बनवण्याची त्या विचारातील प्रबळ अशी आद्य प्रेरणा आणि त्या विचाराचे सवरेदार, सर्वसमावेशक आवाहन आपल्या सगळय़ांच्याच आकलनाच्या चिमटीतून आजवर सतत सुटत आलेले आहे.
संतविचाराचा आणि आमच्या आजच्या जगण्याचा नेमका संबंध काय, संतविचाराची सध्याच्या प्रचलित सार्वजनिक तसेच व्यक्तिगत जीवनातील प्रस्तुतता काय, संतांच्या विचारविश्वातील कोणत्या गोष्टी आम्ही आज आमच्या जगण्यात आणू शकतो, यांसारखे प्रश्न आपल्याला पडतात ते बहुधा त्यामुळेच. ‘संतांचे विचार आज उपयुक्त ठरतात का?’ असा सवाल जेव्हा आपण विचारतो त्याच वेळी, खरे पाहता, ‘कोणाला?’ हा जोडप्रश्नही आपण स्वत:लाच विचारायला हवा. संतांचे विचार आजच्या युगात आपल्याला उपयोगी आहेत का, हा खरा प्रश्न प्रत्येकानेच स्वत:ला विचारायला हवा. त्याचे उत्तरही आपण आपलेच शोधायला हवे. शेजारच्या घरात स्वयंपाक झाल्याने आपले पोट आपोआप भरत नसते. त्यामुळे, इतर कोणाला संतविचाराचा आधार अथवा उपयोजन उपयुक्त वाटत असले तरी आपला आणि संतविचाराचा सांधा कधी, कसा, कितपत जुळतो याचा शोध आपला आपणच घ्यायला हवा. आपली क्षुधाशांती व्हायची असेल तर त्यासाठी आपले अन्न आपणच शिजवायला हवे. त्या शोधाच्या काही ढोबळ दिशा निरखण्याचा प्रयत्न आजवर या ठिकाणी आपण केला. वास्तवात हा शोध प्रत्येकाने स्वत:च्या ठायी सतत घ्यायला हवा. संतकार्याचा आणि संतविचाराचा एवढा मोठा वारसा आपण मोठय़ा गौरवाने मिरवतो आणि दाटल्या कंठाने वेळोवेळी गातो. त्या वारशाचे आपण डोळस उपयोजन करणार नसू, तर त्याचा फुकाचा अभिमान काय कामाचा? संतांच्या समृद्ध विचारधनाचे आपण वारसदार आहोत की निव्वळ भारवाहक?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2012 12:23 pm

Web Title: haggling done as directed
Next Stories
1 ..नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे
2 प्राकृत काय चोरापासोनि जाली?
3 पसाय-धन : .. अपेक्षित तें स्वीकारिती शाश्वत जें
Just Now!
X