तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे जयललिता यांना गजाआड जावे लागल्यामुळे त्यांच्या समर्थकांना धक्का बसणे स्वाभाविकच आहे. जयललिता, ज्यांना आपण सद्गुणाची पुतळी समजत होतो, त्यांनी आर्थिक गरव्यवहार करून आपल्या तुंबडय़ा भरल्या याचा हा धक्का असणे स्वाभाविक ठरले असते. जयललिता, ज्यांना आपण अम्मा म्हणतो, त्यांनीच राज्याला लुटून खाल्ले याचा हा धक्का असता तर साहजिक होते. त्यांच्या मालमत्तेची, त्यांच्या साडय़ा, दागिने, चपला यांची गणती नाही. किती खाल्ले याला सीमा नाही. १९९१ मध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी त्यांची मालमत्ता होती तीन कोटींची. कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर ती झाली ६५ कोटी ८६ लाख. या काळात त्या सरकारी मानधन घेत होत्या फक्त एक रुपया. मग हे पसे आले कोठून, याचा धक्का बसावयास हवा होता. आपण ज्याची मतपूजा केली त्या नेत्याच्या मालमत्तेत पाच वर्षांत अशी अनसíगक वाढ होत असेल, तर त्याला भ्रष्टशिरोमणी म्हणत लोकांनीच धक्का देणेही ठीकच ठरले असते; परंतु येथे तामिळनाडूतील जनतेला धक्का बसला तो वेगळ्याच कारणासाठी. आपल्या पुराची थलवीला – क्रांतिकारी नेत्याला – तुरुंगात जावे लागते म्हणजे केवढा मोठा अन्याय! आपल्या सद्गुणमूर्ती देवतेवर असा अन्याय ज्या जगात होतो, त्या जगात राहायचे तरी कशाला, असा प्रश्न तामिळनाडूतील अनेकांना पडला आणि त्यांपकी सहा जणांनी खरोखरच आत्महत्या केल्या. कोणी स्वत:ला फाशी घेतली, कोणी जाळून घेतले, तर कोणी धावत्या बसखाली उडी घेऊन जीव दिला. हे तर काहीच नाही. काही जणांच्या कोमल हृदयाला हा धक्काही सहन झाला नाही, त्यांनी काही ठरवायच्या आधीच त्यांचे हृदय बंद पडले. अशा किमान दहा जणांची नोंद आतापर्यंत झाली आहे. या लोकांना काय म्हणायचे? भारतीय संस्कृती मूर्तिपूजकांची आहे. व्यक्तिपूजा हे येथे मूल्य मानले जाते; पण त्याचा एवढा अतिरेक? नेत्यावर, अभिनेत्यावर जीव ओवाळून टाकणे वेगळे. तशी वेडी माणसे भारतात सर्वत्र आढळतात; परंतु उत्तर भारतात जीव ओवाळणे हे सहसा भावार्थाने घेतले जाते. दक्षिण भारतात लोक त्याचा वाच्यार्थ का घेतात? भक्तीचा हा कोणता स्तर म्हणायचा? रावणाची एक कथा आहे. शंकराला त्याने शिरकमल अर्पण केले होते. भक्ती, श्रद्धा, निष्ठा हवी ती अशीच टोकाची? पिढय़ान्पिढय़ा झालेल्या अशा कर्मठ संस्कारांनी तेथील लोकांना आता घालीन लोटांगण, वंदीन चरण यापलीकडे काही दिसतच नाही? ही जीवघेणी व्यक्तिपूजा केवळ नेत्यांच्याच बाबतीतच दिसते असे नव्हे. ती चित्रपट कलाकारांच्या बाबतीतही दिसते. बाबा-बापूंच्या बाबतीतही दिसते. त्यांना ती हवीच असते. लोकांनी असे अंधश्रद्धाळू राहावे, यातच त्या अनेकांचे हित आणि सौख्य सामावलेले असते. लोकांच्या बुद्धिमत्तेवर कधी धर्माचे, कधी राजकारणाचे इंद्रजाल टाकायचे. कधी त्याला इतिहासाचे दाखले देत शिवबंधनात अडकवायचे. कधी जाहिरातींसारख्या घोषणा देत त्याला मोहवून टाकायचे. एकदा त्यांची बुद्धी कह्य़ात आली की काम फत्ते. मग एखादा बापू बलात्कार करूनही परमपूज्यच राहतो. एखादा नेता भ्रष्टाचार करूनही लोकनेताच राहतो. चित्रपट कलावंतांची तर, त्यांचे सगळे नखरे, चाळे नजरेआड करून मंदिरे बांधली जातात. त्यांच्या पोस्टरांना पंचामृतांचे स्नान घातले जाते. याला अन्य संस्कृतींत वेडेचाळेच म्हटले असते. आपल्याकडे त्याचेही कौतुक केले जाते. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्या व्याख्या करून त्यावरून भांडणारा आपला समाज श्रद्धेमध्ये पहिला बळी जातो तो तर्कबुद्धीचा हेच विसरला आहे. अशा समाजामध्ये असे जीव जाणारच. आपल्याकडील निर्बुद्धपणाच्या साथीचे ते बळी आहेत. अशा श्रद्धाळूंनाही अखेर आपण श्रद्धांजलीच अर्पण करू.