News Flash

सुमारसद्दीचा शेवट राजकीयच?

‘सुमारसद्दीची सुरुवात’ या अग्रलेखाने (३ ऑगस्ट) काही वेगळे आणि महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. गजेंद्र चौहान आणि मंडळींच्या पात्रतेबद्दल जसा मुद्दा आहे,

| August 4, 2015 04:59 am

‘सुमारसद्दीची सुरुवात’ या अग्रलेखाने (३ ऑगस्ट) काही वेगळे आणि महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. गजेंद्र चौहान आणि मंडळींच्या पात्रतेबद्दल जसा मुद्दा आहे, तसा विद्यार्थ्यांनी आपल्या संस्थेचे नियामक मंडळ ठरवावे का, असाही महत्त्वाचा मुद्दा आहेच. या निमित्ताने एकदा जर असे तत्त्व म्हणून स्वीकारले गेले आणि उद्या इतर महत्त्वाच्या (आयआयटी, आयआयएम वगरे) संस्थांवर कोण हवे हे विद्यार्थ्यांचे ऐकून घेऊन ठरवायचे झाले तर ही भविष्यात खूप मोठी डोकेदुखी होऊन बसणार हे नक्की. सरकारने जरी उत्तमात उत्तम अशा व्यक्तींची नेमणूक पूर्णपणे तळमळीने केली तरीही त्याला राजकीय पक्षांचाच भाग असलेल्या काही विद्यार्थी संघटनांचा विरोध असू शकतो. अशा वेळी राजकीय हितसंबंध बाजूला ठेवूनही विद्यार्थ्यांत एकवाक्यता नाही झाली तर?
‘अशा संस्थांतच नव्हे तर इतर महत्त्वाच्या नियुक्त्याही आपले होयबा नेमून करायची परंपराच काँग्रेसने निर्माण केली’ आणि ‘खरे गुणवान हे होयबाच राहतील याची खात्री नसल्यानेच अशा नेमणुका होतात’  हे म्हणणेही अगदी सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे. अग्रलेखात याची अत्यंत समर्पक उदाहरणे आहेत. करायचीच झाली तर ही यादी अजूनही मोठी होऊ शकेल. त्यामुळेच राहुल गांधींनी यावर विचार करून स्वत:च्या पक्षास किंवा भाजपला जाब विचारण्याची आपली अपेक्षा पूर्ण होण्याची मुळीच शक्यता नाही. राहुल गांधींची भेट ही केवळ आयत्या मिळालेल्या भाजपविरोधी मुद्दय़ाचा राजकीय लाभ घेण्याच्या उद्देशानेच होती. इतर राजकीय पक्ष आणि संघटनासुद्धा राजकीय हेतूनेच यात उतरल्या आहेत. त्यामुळे खरे मुद्दे बाजूलाच राहून हा विषय आता पूर्णपणे राजकारणाचा मुद्दा बनला आहे. फिल्म इन्स्टिटय़ूटच्या या लढय़ाचा समारोपही राजकीय उत्तरानेच होणार की काय?
दीपक गोखले, कोथरूड, पुणे.

रुग्णाच्या प्राणापेक्षा ‘ब्रॅण्ड’कडेच लक्ष..
‘प्रश्न दर्जाचा आहे..’ हा जेनेरिक औषधांविषयीचा अन्वयार्थ (३१ जुलै) वाचला. आपल्याकडे प्रत्येक गोष्ट  समस्येत रूपांतरित झाल्याशिवाय, न्यायालयाने किंवा केंद्र सरकारने हस्तक्षेप केल्याशिवाय प्रश्नाची उकल किंवा उत्तर शोधण्याची प्रक्रियादेखील सुरू होत नाही. जेनेरिक औषधे त्याला कशी अपवाद असणार?
प्रश्न जेनेरिक औषधांच्या उपलब्धतेचावा डॉक्टरांच्या सहकार्याचा नाही. पण ज्या देशात बालकांसाठी ‘चिक्की’मध्ये माती, वाळू मिसळली जाते, ज्या देशात विशिष्ट भागात तयार होणाऱ्या (औषधासह) कोणत्याही गोष्टीच्या गुणवत्तेबाबत हमखास शंका घेण्यास जागा असते. ज्या देशात पशासाठी, धर्मासाठी नीतिमत्ताच काय देशभक्तीही पणाला लावली जाते, त्या देशातील डॉक्टर लोकांनी गुणवत्तेची खात्री असलेल्या ब्रॅण्डेड औषधांची शिफारस करणे (अवास्तव किमती, डॉक्टर व एमआरची कमाई) आज तरी रुग्णाचे प्राण पणाला लावण्यापेक्षा हितकारक आहे. युरोप, अमेरिकेतील जनतेची शिस्त, देशाभिमान- ‘ नियम पाळण्यासाठी असतात’ ही जाणीव हे सर्व कौतुकास्पद आहेच. नेमक्या त्याच देशांमध्ये जेनेरिक औषधांचा मोठय़ा प्रमाणावर उपयोग केला जातो. पण ‘हे फुकाचे सल्ले! आमच्या काय कामाचे?’ एवढाच ‘मथितार्थ’.
अनिल ओढेकर, ठाणे

गृहपाठ नाही?
राहुल गांधी यांच्या राष्ट्रीय चित्रपट व चित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) भेटीबद्दलचा अग्रलेख (३ ऑगस्ट) वाचला. तेथील विद्यार्थ्यांनी आपली भूमिका कैकवेळा जाहीरपणे व्यक्त केली आहे. मग प्रत्यक्ष तेथे येऊन त्यांचे प्रश्न समजून घेण्याचे राजकीय डावपेच कशासाठी? विद्यार्थ्यांनीही आमच्या प्रश्नाचा गृहपाठ करून ह्यावर तुम्ही काय उपाय केला आहे तो इथे आमच्या समोर सांगा असा घोषा लावायला हवा होता. म्हणजे तुमची भूमिका ह्या प्रश्नात राजकारण आणण्याची नाही हे देखील पर्यायाने सिद्ध झाले असते.
मोहन गद्रे,  कांदिवली (मुंबई)

माझे कच्चे मडके ..
माझ्या पत्रावरील प्रतिवादाचा हा प्रतिवाद.
मी माझ्या पत्रात चतन्य या शब्दाचा वापर एल्ली Energy  या अर्थाने केला होता. चतन्यांमधल्या घटकात जर समतुल्यता असेल तर शांतता असते, ही समतुल्यता बिघडली तर उत्पात होतात. उदा. विश्वाच्या मुळाशी असलेल्या एकलत्वात अशी परिस्थिती उद्भवली आणि त्यातून अमाप बळो Force  निर्माण होऊन विश्व अवतरले असे हल्लीचे प्रस्थापित विज्ञान म्हणते. (Standard Model) म्हणून चतन्य आणि बळो Force असे दोन शब्द मी वापरले होते. एकलत्वाला मी ब्रह्म हा शब्द वापरत नाही, कारण काही जण त्या शब्दामुळे दचकतात. या बलयुक्त व्यापाराला कर्म म्हटले आहे. उदा. ‘तरी कर्म म्हणजे स्वभावे । विश्वाकारु संभवे। ते आधीजाणावे॥’ (८९/४- ज्ञा.)  मूळच्या गीतेच्या श्लोकात हा मतलब नाही. (१७/४-गी) आणि पुढे ‘कधी कोणे एके काळी।  घनपटले उमटली नाना वर्णी॥’ या ओवीत हल्लीच्या पदार्थविज्ञानातले वायुमेघ आणि त्यातल्या वर्णमालांवर (Spectrum) उमगलेले आणि मग ठरलेले घटक पदार्थ यांचीही चाहूल लागते.
मडक्याच्या मातीच्या कवचात छिद्रे असतात, त्यामुळे होणाऱ्या बाष्पीभवनाच्या प्रक्रियेत पाण्यातील उष्णतेचे प्रमाण घटते आणि पाणी गार होते, या साध्या उदाहरणावरून सृष्टीमधील प्रवाहाची जाण व्हायला हरकत नसावी. सजीवांमध्ये तर आपण श्वासोच्छ्श्वास घेतो, त्वचेमध्ये अनेक जिवाणूंना सहजपणे बाळगतो असल्या उदाहरणांवरून आपले आसमंताशी असलेले क्रियाशील नाते सिद्ध होते.
मी वैद्यकीय शिक्षण घेत होतो तेव्हा थंड दूध जठरातील आम्लावर उपाय म्हणून वापरत. किंबहुना एका औषधाचे नाव मिलड्रीप असे होते. पुढे दुधामुळे आम्ल वाढते असे ठरले. अमिबायॉसिससाठी एक विशिष्ट औषध होते, त्यामुळे आम्ल वाढते असे सांगण्यात येत असे. पुढे जठरातल्या एका जिवाणूमुळे आम्ल होते, असे ठरले त्या शोधाला नोबेल पारितोषिक मिळाले आणि त्या जिवाणूंवरचा ‘अक्सीर इलाज’ हे अमिबायॉसिसवरचे आम्ल वाढवणारे औषध ठरले. सगळीच गंमत आहे.
मडक्यामधल्या आणि बाहेरच्या पोकळीचे उदाहरण दृष्टांत म्हणून दिले होते. तसे दृष्टांत सगळ्याच तत्त्वज्ञानात दिले जातात. (मायकल) फॅरॅडे एकदा म्हणाला होता, ही विलोभनीय पोकळी रिकामी कशी असेल?  पुढे (जेम्स)मॅक्सवेलने या पोकळीतले काटकोनाचा आकृतिबंध असलेले विद्युत चुंबकीय क्षेत्र किंवा प्रवाह म्हणजेच प्रकाश असे सिद्ध केले. अर्थात ज्यामुळे आपल्याला दिसते, तो प्रकाश आपल्या डोळ्यांवर पडेपर्यंत अदृश्यच असतो. यालाही एक ज्ञानेश्वरांचाच दृष्टांत आहे. त्यात वाऱ्याचे अस्तित्व पाने सळसळतात म्हणून कळते असे म्हटले आहे. हे सगळे वाचतो, अनुभवतो तेव्हा माझे मडके कच्चे आहे हे कळून चुकते.
 – रविन थत्ते , माहीम (मुंबई)

मूळ लिखाण सोपे!
‘लोकसत्ता’च्या ३१ जुल व १ ऑगस्टच्या अंकांमधील अनुक्रमे रविन थत्ते व राजीव जोशी यांची शरद बेडेकर यांच्या लेखांकांवरील पत्रं (लोकमानस) वाचली. वाचून मौज वाटली. त्यांच्या पत्रांतील विवेचनाचा परामर्श घेणे हा माझ्या या पत्राचा उद्देश नाही. मला एवढेच म्हणायचे आहे की बोडेकरांचे विवेचन हे शब्दच्छल करीत व शब्दांचे फुलोरे फुलवीत बुद्धिप्रदर्शन करणाऱ्या विद्वानांसाठी मुळीच नसते. बेडेकर अगदी सोप्या भाषेत व सुबोध शैलीत सर्वसामान्यांना सहज आकलन होईल, अशा पद्धतीने विवेचन करीत असतात. सर्वसामान्य जनांना विस्ताराने माहिती उपलब्ध करून देणे व त्या आधारावर त्यांना विवेकवादी बनविणे हा बेडेकरांचा स्वच्छ हेतू दिसतो, व त्यात ते पूर्णपणे यशस्वीही होत आहेत. समाज विवेकवादी होणे ही काळाची गरज आहे. बेडेकरांनी ती ओळखली असल्याचे जाणवते.
भालचंद्र काळीकर, पुणे

काटजूंवर कारवाई नाहीच?
‘त्या रजिस्ट्रारवर कारवाईची शक्यता?’ ही बातमी आणि ‘काटजू यांचे तर्कट’ हा अन्वयार्थ (दोन्ही ३ ऑगस्टच्या अंकात) वाचले. जर ‘त्या’ रजिस्ट्रारवर न्यायालयाच्या अवमानाबद्दल कारवाई होऊ शकते तर काटजू यांचे काय, ते तर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश, म्हणजे जबाबदार व्यक्ती, त्यांचे वक्तव्य नक्कीच आक्षेपार्ह आहे.
– प्रफुल्लचंद्र नारायण पुरंदरे, वर्सोवा, मुंबई

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2015 4:59 am

Web Title: letter to editor 27
Next Stories
1 धर्मद्वेषाची लागण देशाच्या एकात्मतेसाठी धोकादायक
2 टाटांचा अनुल्लेख खटकला
3 २०१० मधील विधानांना मुख्यमंत्री जागतील?
Just Now!
X