07 July 2020

News Flash

अस्मिता नव्हे, जातीय अहंकाराचे आव्हान

संविधानात अनुस्यूत आरक्षणाची तरतूद मूलत: न्यायाधारित समतेच्या तत्त्वावर उभी आहे. जाती आधारित शोषण, त्यातून जन्मलेले सामाजिक तथा शैक्षणिक मागासलेपण दूर करण्याचा तो एक प्रयोग मानला

| August 29, 2015 06:16 am

संविधानात अनुस्यूत आरक्षणाची तरतूद मूलत: न्यायाधारित समतेच्या तत्त्वावर उभी आहे. जाती आधारित शोषण, त्यातून जन्मलेले सामाजिक तथा शैक्षणिक मागासलेपण दूर करण्याचा तो एक प्रयोग मानला जातो. या प्रयोगामागची प्रेरणा, जातीय मानसिकता सोडून जातसमूहांनी वर्ग म्हणून उभे ठाकावे, असाही त्यात उद्देश होता असे मानले जाते; परंतु जातवास्तवावर आधारित समाज – त्याचे राजकारण यातून स्वजात वर्चस्व स्थापण्याचा प्रयत्न म्हणून आरक्षण संकल्पनेचा वापर होत असताना अनुभवास येतो आहे. जातीय मानसिकतेला कुरवाळून वर्ग बनण्याच्या व त्यातून संभाव्य जातिअंताच्या प्रयत्नाला यामुळे खीळ बसली आहे. एका बाजूला जातिश्रेष्ठतेचा अहंकार बाळगायचा आणि दुसरीकडे आरक्षणाच्या लाभासाठी स्वत:ला मागास म्हणवून घ्यायचे, हा शुद्ध दांभिकपणा होय. नव्या आíथक युगात सरकारी क्षेत्राचे होणारे आकुंचन पाहता या अपेक्षांची पूर्तता कशी होणार, हा कळीचा मुद्दा आहे. म्हणूनच जातसमूहाऐवजी जातीधारित आरक्षणाची आंदोलने हे केवळ अस्मितेचे नव्हे, तर ‘जातीय अहंकाराचे’ आव्हान आहे, असे नम्रपणे नमूद करावेसे वाटते.
प्रा. विजय माकणीकर, परभणी

आर्थिक मंदीमुळे पटेलांच्या नेतृत्वाला पाठिंबा?
‘आरक्षण अस्मितांचे आव्हान’ हा अग्रलेख (२७ ऑगस्ट) तसेच राजेश्वरी देशपांडे यांचा ‘पटेल उद्रेकापर्यंत का गेले?’ हा लेख वाचला. त्यात शेवटी काढलेला निष्कर्ष ‘आरक्षण ही समस्त पटेल समाजाची मागणी आहे’ मुळीच पटला नाही. मुळात जाट, गुज्जर, मराठा आणि आता पटेल आरक्षणाचे नेतृत्व हे त्या त्या समाजातील राजकीय असंतुष्ट कार्यकर्त्यांनी स्वत:चे दुर्लक्षित स्थान प्रकाशझोतात आणण्याकरिता वा राजकीय वाटचालीत इतर स्पर्धकांवर आघाडी मिळवण्याकरिता केलेला बनाव आहे. राजकीय कार्यकत्रे संधीच्या शोधात असतातच. सध्या भारत आíथक पेचप्रसंगातून जातो आहे. सर्वत्र आíथक मंदीमुळे -विशेषत: व्यापारी वर्गात- असंतोष वाढत आहे. याचा फायदा व्यापारात पुढे असलेल्या पटेल समाजातील नव्या महत्त्वाकांक्षा असलेल्या नेतृत्वाने उठवलेला आहे. जर सध्या आíथक तंगी नसती तर या आंदोलनाला सध्या मिळत आहे तसा पािठबा मिळाला असता का? राहिला तो प्रश्न म्हणजे, पंतप्रधान मोदींच्या ‘पुढारलेल्या आणि प्रगत’ गुजरातमध्ये हे आंदोलन एवढे का पेटले हा? माझ्या मतानुसार त्याचे कारण पुरुषी अहंकाराला न रुचलेले स्त्रीचे मुख्यमंत्रिपद किंवा राजेश्वरी देशपांडे लिहितात, त्याप्रमाणे नव्या आणि जुन्या स्थानिक नेतृत्वांचे निर्णय-प्रक्रियेत डावललेले स्थान यापकी एक वा दोनही असू शकते.
नरेंद्र थत्ते, अल खोबर, सौदी अरेबिया

ही फुटीर वृत्ती थांबवा!
‘आरक्षण अस्मितांचे आव्हान’ हा अग्रलेख वाचला. प्रत्येक जातीला वाटते आपण मागास आहोत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर फक्त २० वष्रे आरक्षणे ठेवायची होती. आता ६५ वष्रे उलटून गेली तरी ती अजून चालूच आहेत. जात जोपर्यंत आहे तोपर्यंत आरक्षण मागणे थांबणार नाही. हा भस्मासुर कधीच थंड होणार नाही. हे देशाचे विघटन आहे. गुजरात आरक्षणावरून (म्हणजे जातीवरून) पेटला, महाराष्ट्र पुरंदरे यांच्यावरून (म्हणजे जातीवरूनच) पेटवण्याचे प्रयत्न झाले. जे सत्तेत नाहीत ते ही पेटवापेटवी अशीच करणार, पुन्हा सत्तेत येणार. हे दुष्टचक्र जर थांबले नाही, तर देश सतत फुटीरतेच्या उंबरठय़ावर असणार. राजकारण्यांना हेच हवे आहे. म्हणून ही फुटीर वृत्ती थांबवणे गरजेचे आहे.
किसन गाडे, पुणे  

मंत्री आणि जाकिटे
कालपरवापर्यंत आपल्यासारखी शर्ट-पॅँट, फार तर झब्बा घालणारी मंडळी मंत्री झाल्यावर एकदम वेगळेपण मिरवत जाकिटात स्वत:ला बंद का करून घेतात हे कळत नाही. आम आदमीतून खास आदमीत पदोन्नती झाल्याचे तर द्योतक नसेल? की भारतीय संविधानात मंत्र्याचा ड्रेस कोड असा सांगितला आहे? कारण मंत्रिपद गेलेल्यांचे बंद कोट सत्तेसारखेच त्यांच्यापासून दुरावलेले दिसतात. सत्तेच्या माध्यमातून चांगली कामे केली,  तर जाकीट न घालताही जनता जनार्दन कौतुक करून तुमचे वेगळे मोठेपण जपेल असे वाटते. पूर्वी मधु दंडवते, जॉर्ज फर्नाडिस किंवा आता मनोहर पर्रिकर, सुरेश प्रभू यांच्यासारख्या सामान्य वेशातील मंत्रिगणांचा आदर्श ठेवणे आवश्यक आहे. म्हणजे पाच वर्षांनी बंद जाकिटे बासनात गुंडाळून ठेवण्याची पाळी येणार नाही.
नितीन गांगल, रसायनी

भावानेही बहिणीला राखी बांधावी!
हिंदू धर्मात सणांची खूप मोठी परंपरा आहे. त्यामध्ये राखी पोर्णिमा वा रक्षाबंधन हा भावा-बहिणीच्या नात्याला दृढ करणारा पवित्र दिवस आहे. पूर्वीच्या काळी भारतासह जगभरात पुरुष प्रधानसंस्कृती अस्तित्वात होती. साहजिकच स्त्रियांच्या संरक्षणाची जबाबदारी पुरुषांवर होती. चूल आणि मूल या पलीकडे स्त्रियांना समाजात स्थान नव्हते. जन्मल्यानंतर वडिलांवर, लग्नानंतर पतीवर, पुत्रप्राप्तीनंतर मुलावर संरक्षणासाठी अवलंबून राहावे लागत असे. त्यामध्ये भाऊ हा समवयस्क आणि लहानपणासून एकत्र असल्यामुळे भावनिकदृष्टय़ा जवळचा वाटणे साहजिकच आहे. त्यामुळे बहीण आपल्या भावाला राखी बांधून संरक्षणाची याचना करीत असे. आज शिक्षणामुळे स्त्रिया मोठय़ा प्रमाणात प्रगती करीत आहेत. मुलांपेक्षाही पुढे जात आहेत. आजची स्त्री स्वत:चे संरक्षण करण्यास समर्थ आहे. त्यामुळे एका मोठय़ा कमावत्या बहिणीला लहान असणाऱ्या भावाला राखी बांधून संरक्षणाची भीक का मागावी लागते? त्याउलट त्या लहान भावानेच मोठय़ा बहिणीला राखी बांधून संरक्षण मागितले पाहिजे. तो खरा बहिणीचा आदर समजला जाईल. काळानुसार बदल केला नाही तर आपल्या परंपरा फेकून द्यायच्या लायकीच्या देखील राहणार नाहीत.
विशाल भुसारे, मु.पो. मालेगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर

होरपळतो फक्त शेतकरीच!
ओला दुष्काळ पडू दे की सुका दुष्काळ, आपल्याकडे होरपळतो फक्त शेतकरी आणि सामान्य माणूस. आतासुद्धा कांद्याचे भाव गगनाला भिडल्यावर होरपळला सामान्य माणूस आणि कांद्याचे भाव गडगडल्यावर होरपळला शेतकरी. अशा परिस्थितीने गांजलेला शेतकरी मग आत्महत्या करतो; पण या सर्वाच्या मध्ये असलेला दलाल कधी होरपळलेला किंवा त्याने कधी आत्महत्या केल्याचे कोणी ऐकले आहे का? सुका दुष्काळ असो वा ओला दुष्काळ, शेतमालाचे भाव गडगडू देत वा चढू देत, दलाल आपला फायदा बरोबर वसूल करतो. मग हा फायदा शेतकऱ्याला व सामान्य जनतेला का होत नाही, असा प्रश्न पडला आहे. सर्वाचा फायदा होईल असा सुवर्णमध्य अजून का साधला गेला नाही, याचे उत्तर मात्र कोणाकडेच नाही.
– रवींद्र गुरव, विरार (पालघर)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2015 6:16 am

Web Title: letter to editor 32
Next Stories
1 शिवाजी महाराजांच्या बदनामीचा निषेध सर्वप्रथम बाबासाहेबांनीच केला होता!
2 ‘वैचारिक मागासलेपणा’च्या प्रदेशातील भ्रम आणि भीती..
3 मध्यमवर्गाने ‘मंदीतही संधी’ शोधावी
Just Now!
X