उत्तर प्रदेशातल्या तलवार परिवारातल्या अरुषीचा ज्या अमानुषपणे प्रत्यक्ष तिच्या सुशिक्षित मात्या-पित्याकडूनच झालेल्या खुनाचा जितका निषेध करावा तितका थोडाच आहे. या माणुसकीला काळे फासणाऱ्या कृत्याचे परखड विश्लेषण अन्वयार्थ (२६ नोव्हेंबर) मधून केले हे फारच समयोचित आहे. आरुषीचा पिता उच्चशिक्षित व प्रतिष्ठा प्राप्त. त्याच्या मुलीचा -आरुषीचा घरातील नोकर हेमराज याच्याशी अनतिक संबंध असल्याच्या संशयावरून तलवार दाम्पत्याने पोटाच्या गोळ्याचा अमानुष खून केला. या प्रकरणात क्षणभर असे गृहीत धरू की नोकराशी त्या कोवळ्या मुलीचे अनतिक संबंध होते; पण अन्वयार्थात स्पष्ट केल्याप्रमाणे याच्या पाठीमागे प्रत्यक्ष बापाचेही अन्य महिलेशी विवाहबाह्य संबंध असल्याचे त्या मुलीला दिसत होते म्हणूनच घरचे ढळढळीत उदाहरण समोर असल्याने तिचे फार काही चुकले असे म्हणता येणार नाही. अपले घाणेरडे कृत्य उघड होऊ नये म्हणून बापाने तिचा खून केला पण जन्मदात्या आईने यात मुलीला सांभाळून न घेता घाणेरडय़ा वर्तनाच्या पतीला सहकार्य केले हे अत्यंत वाईट झाले.  याचा निषेध करावा तितका थोडा आहे. सीबीआयने अथक परिश्रम घेऊन हे प्रकरण मार्गी लावले हे कौतुकास्पद आहे.
श्रीनिवास जोशी, डोंबिवली (पूर्व)

हे संस्कार पालकांचे होते?
आरुषी खून खटल्याचा निकाल लागल्यानंतरचा ‘विकृत मनोवृत्तीचे प्रतीक’ हा अन्वयार्थ (२६ नोव्हेंबर) वाचला. यात नूपुर व राजेश या तलवार दाम्पत्याने गुन्हा केला असे गृहीत धरले तर त्यांच्या कृत्याचे कोणीही समर्थन करणार नाही; पण ज्या कोवळय़ा वयात निरागसपणे भातुकलीचे खेळ खेळायचे, त्या वयात निरागसपणा सोडून कामक्रीडेचे संस्कार तर माता-पित्यांनी दिलेले नव्हते.
तिच्या पालकांनी केलेल्या अपेक्षांचा विचार तिने केला नाही तर पालकांकडून चांगल्या वागण्याची अपेक्षा ती कशी करू शकते? पालकांच्या भावनांचाही विचार करायला हवा. ज्या मुलीला इतक्या प्रेमाने वाढविले त्याच मुलीला मारायला ते का तयार होत असतील, याचा विचार करायला हवा. फक्त भारतीय मानसिकता म्हणून प्रश्न मिटणार नाही. कोणत्याही परिस्थितीत पुरुषप्रधान संस्कृतीलाच दोषी ठरविण्याचा जो अट्टहास या अन्वयार्थातही अध्याहृत आहे, तो टाळायला हवा. एकांगी विचार थांबवायला पाहिजे.
मनोज राठोड

एरवी दखलही न घेणाऱ्यांची आताची विश्लेषणेही वायफळच
विश्वनाथन आनंदच्या देहबोलीचे विश्लेषण केल्यास आत्मविश्वासाच्या अभावाचा निष्कर्ष काढता येईल, असे मत केतनकुमार पाटील यांच्या पत्रात (लोकमानस, २६ नोव्हेंबर) आहे. पण आनंदला खेळताना किंवा त्याच्या पत्रकार परिषदा, मुलाखती ज्यांनी पाहिल्या आहेत त्यांना काही नवीन नव्हते. पटावरील स्थिती कशीही असो, तो जिंको वा हरो; तो नेहमीच थोडासा दबलेला असतो.. अगदी त्याने एखादा सामना, डाव, वा स्पर्धा जिंकली तरी. (जिज्ञासूंनी युटय़ूबवर त्याच्या मुलाखती पाहाव्यात).
किंबहुना त्याच्या पूर्वीच्या चाचरत दिलेल्या मुलाखतींशी तुलना करता आनंद या लढतीत कमालीचा नििश्चत वाटत होता. एलो रेटिंगमध्ये मागील तीन वष्रे सातत्याने आनंदपेक्षा १०० हून अधिक गुणांची आघाडी बाळगून असणारा, जागतिक क्रमवारीत सातत्याने अग्रकम बाळगणारा कार्लसन विजेता होणार हे कदाचित आनंददेखील मनोमन जाणून होता, अन म्हणून तो एक प्रकारे नििश्चत असावा हे तो जितक्या सहजतेने प्रत्येक डावानंतरच्या पत्रकार परिषदेत हास्यविनोद करत होता त्यावरून वाटते. उदा. : कास्पारोव्ह स्पर्धास्थळी उपस्थित आहे या प्रश्नाला त्याने ‘इज ही द न्यू एल्व्हिस’,  किंवा सचिनच्या निवृत्तीबद्दल विचारल्यावर  ‘आय हॅव अदर थिंग्ज ऑन माय माइंड’ असे मिश्कील उत्तर दिले. मागील दहा-बारा वर्षांमध्ये इतका नििश्चत आनंद कधीच पाहिला नव्हता. ही लढत भारतात नसती अन त्याच्या पूर्वीच्या लढतींप्रमाणे जर परदेशात असती तर प्रसारमाध्यमे व सर्वसामान्य जनतेमध्ये सध्या चालू आहे तितका खल नक्कीच झाला नसता.
थोडक्यात स्पर्धा संपली, निकाल बुद्धिबळप्रेमींना अपेक्षितच लागला. क्रिकेट व्यतिरिक्त इतर कोणत्याच खेळांची दखल न घेणारी प्रसारमाध्यमे, अन् जनतेने आता उगीच देहबोली, कम्प्युटर्सचा वापर, वाढत्या वयाचा परिणाम आदी वायफळ कवित्व करू नये असे प्रामाणिकपणे वाटते.
क्रिकेटव्यतिरिक्त अन्य खेळ आपल्या कधीच खिजगणतीतही नसतात. तेव्हा ऑलंपिक, जागतिक स्पर्धा आदींच्या पुढे पाठी उगीच पोकळ सल्ले अन् टीका करण्याचा विशेष हक्क ना प्रसारमाध्यमांना उरतो ना जनतेला. अन्य खेळांतील खेळाडू, आपल्या व आपल्या प्रायोजकांच्या (सुदैवाने मिळाले तर) खिशाला खार लावून देशाचे प्रतिनिधित्व करतात, अन् अत्यंत बिकट परिस्थितीवर मात करून देशाची शान वाढवतात अन् आम्ही त्यांना उदाहरण देतो एका खासगी संस्थेसाठी खेळणाऱ्या मस्तवाल कंत्राटी खोण्डांचे.     
महेश परब

९०च्या दशकानंतर..
पालक आणि मुले यांच्यातील दुरावा वाढला म्हणजे किती, हे आरुषीच्या खुनातून दिसले होते. सुशिक्षित भारतीयांच्या कुटुंबसंस्थेची ही मान खाली घालायला लावणारी बाजू निकालाने स्पष्ट केली. झालेली शिक्षा योग्य आहेच, पण काळजी वाटते ती लहान वयातच भरपूर कळू लागलेली मुले आणि त्यांच्यावर वचक नसलेले आईवडील, या स्थितीची. अगदी १९९० च्या दशकापर्यंत ही स्थिती नव्हती.
मितेश सावंत, पुणे  

प्रधान समितीला अधिकार हवे होते
‘बेदखल सुरक्षेची पाच वष्रे’ हा २६/११च्या दहशतवाद्यांच्या हल्ल्याला पाच वष्रे झाल्याच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’त आलेला विशेष विभाग वाचला. या घटनेची चौकशी करणारे राम प्रधान यांची मुलाखत तर या सर्व अनास्थेवर विदारक प्रकाश टाकणारी आहे.  
माझ्या मते, ही समिती चौकशी कायद्यान्वये नेमली नाही यातूनच सरकारची या प्रकरणातील अनास्था समजते. त्या कायद्यान्वये समिती नेमली असती तर तिला न्यायालयाचे अधिकार मिळून सत्याच्या आणखी जवळ जात आले असते. सत्ताधारी पक्षाला एरवी धारेवर धरणाऱ्या विरोधी पक्षांनीही आणि स्वयंसेवी संघटनांनीसुद्धा या महत्त्वाच्या त्रुटीविरुद्ध आवाज न करता, आपणही या प्रकरणी गंभीर नाही आणि या देशाच्या सुरक्षेला धोका असणाऱ्या घटनेचाही फक्त राजकीय लाभ घेण्यासाठी आणि हिशेब मिटवण्यासाठीच उपयोग करतो हेच सिद्ध केले.
राम ना. गोगटे, वांद्रे पूर्व.     

स्वाभिमानाचे जतन आपलेच!
‘राजस्थानप्रमाणे आपण काही करणार की नाही’ प्रतिक्रिया वाचली. ढासळणाऱ्या किल्ल्यांना सरकार दरबारची अनास्था कारणीभूत आहे या मताशी पूर्ण सहमती असली, तरीही राजस्थानातील आणि महाराष्ट्रातील किल्ल्यांची, संस्कृतीची आणि इतिहासाची केलेली तुलना खटकते. मुळातच महाराष्ट्रातील किल्ल्यात गिरिदुर्ग जास्त आहेत आणि बहुतेक सर्व किल्ल्यांची रचना संरक्षणासाठी केली होती.. राजेशाहीचा आब मिरवण्यासाठी नव्हे. ज्या जोधपूरच्या महाराजगडाची ‘प्रशंसा’ आजचे पर्यटक करतात, त्या संस्थानाचा मोगल दरबारातील इतिहास सर्वश्रुत आहे.
 महाराष्ट्राने स्वाभिमान कधी मोगलांच्या दावणीला बांधला नव्हता. जरीपटका फडकणाऱ्या महाराष्ट्रातील कोणत्याही किल्ल्यावर जा, इतिहास आठवा ‘स्वाभिमानाने’ ऊर भरून येईल.. ही भावना राजस्थानातील किल्ल्यांवर सापडेल का?
– प्रमोद तुपे, भोर (पुणे)