स्वत:च्या कलागुणांनी आणि बौद्धिक ताकदीने डॉ. वसंतराव देशपांडे यांनी आपली खास गायनशैली विकसित केली होती. ऐकायला अतिशय वेगळी, तरतरीत आणि काही वेळा अचानकतेचा सुगंध असणारी ही गायकी आत्मसात करायला मात्र अतिशय अवघड अशी. पद्माकर कुलकर्णी यांनी ते आव्हान स्वीकारायचे ठरवले आणि पेलले. वसंतरावांनीही पद्माकर कुलकर्णीसारख्या अनेक शिष्यांना हातचे काही न राखता भरभरून कला दिली, प्रोत्साहन दिले आणि दिशादर्शनही केले.
पद्माकर कुलकर्णीना भारतातील सगळ्यात मानाच्या समजल्या जाणाऱ्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवात आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. त्यामुळे अनेक ठिकाणी त्यांना बोलवणी येऊ लागली. नोकरी सांभाळून पद्माकरजींनी आपले गायन फुलवण्याचा सतत प्रयत्न केला. अध्यापक म्हणून ते विद्यार्थिप्रिय होते, याचे मुख्य कारण त्यांच्यामध्ये कलावंतपण होते, त्याबरोबर येणारे सर्जनाचे गुणधर्म होते. परिस्थितीमुळे म्हणा किंवा हेतुत: पद्माकरजींनी पूर्ण वेळ गायन करण्याचा विचार अनेकदा केला व सोडून दिला. जगण्याचे पहिले प्रेम संगीतच असल्याने त्याकडे फार वेगळ्या नजरेने पाहण्याची एकही संधी सोडली नाही. संगीत हेच आपले सर्वस्व असल्याने पद्माकरजींनी पिंपरी-चिंचवडसारख्या उद्योगनगरीलाही संगीताची गोडी लावली. ज्या शहरात केवळ भोंगा एवढाच काय तो स्वर ऐकला जात असे, तेथे अभिजात संगीताचा प्रसार करणे हे काम फार अवघड आणि नेटाचे. पद्माकर कुलकर्णी यांनी ते निष्ठेने केले. आपल्या गुरूंच्या नावाने स्थापन केलेल्या डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने तेथे छोटय़ा कार्यक्रमांचे आयोजन सुरू केले. अनेक वर्षांच्या या तपश्चर्येनंतर त्या शहराला अर्थभानाच्या बरोबरीने कलाभानही मिळवून देण्यात या कार्यक्रमांचा खूप मोठा वाटा आहे. गेल्या काही वर्षांत पिंपरी-चिंचवडमध्ये कलारसिकांची संख्या वाढल्याचे दिसते, याचे श्रेय पद्माकरजींना द्यायला हवे.
वसंतराव देशपांडे हे जसे एक हरहुन्नरी कलावंत होते, तसेच पद्माकरजीही वेगवेगळ्या गुणांनी मंडित होते. त्यांचे भाषेवरील प्रभुत्व लक्षात येण्यासारखे होते. त्यामुळेच सवाई गंधर्वमधील निवेदनाची जबाबदारी त्यांनी अतिशय चोखपणे पार पाडली. गायन आणि भाषण या दोन्ही क्षेत्रांत पुणेकर रसिकांची दुहेरी दाद मिळवणारे पद्माकर कुलकर्णी यांना रसिकांचे भरपूर प्रेमही मिळाले. कलावंत म्हणून पद्माकरजींना इच्छेप्रमाणे विहार करता आला नाही, याचा जराही खेद न बाळगता, संगीताच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी केलेले काम अतिशय मोलाचे आहे, यात शंका नाही. त्यांच्या निधनाने संगीतातील एक कलावंत कार्यकर्ता हरपला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jan 2015 रोजी प्रकाशित
पद्माकर कुलकर्णी
स्वत:च्या कलागुणांनी आणि बौद्धिक ताकदीने डॉ. वसंतराव देशपांडे यांनी आपली खास गायनशैली विकसित केली होती.

First published on: 07-01-2015 at 01:19 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Padmakar kulkarni profiles