26 February 2021

News Flash

स्वप्रेम भेट!

स्वप्रतिमेच्याच प्रेमात पडल्याबद्दल एकटय़ा नरेंद्र दामोदरदास मोदींनाच बोल लावता येणार नाही.. मायावती यांनी स्वत:च्या पुतळय़ांचे अनावरण अनेकदा केलेच आहे

| February 21, 2015 02:47 am

स्वप्रतिमेच्याच प्रेमात पडल्याबद्दल एकटय़ा नरेंद्र दामोदरदास मोदींनाच बोल लावता येणार नाही.. मायावती यांनी स्वत:च्या पुतळय़ांचे अनावरण अनेकदा केलेच आहे आणि आपले वैज्ञानिक तसेच अर्थतज्ज्ञदेखील स्वप्रेमाच्या परिघाबाहेर नाहीत..

प्रेम कोणावर करावे हा प्रश्न तसा एकदम साधा वगरे वाटत असला तरी आहे जरा तात्त्विक. त्यामुळे गोंधळात पाडणारा. अर्थात कविकुलगुरू कुसुमाग्रजांनी आपला तो त्रास वाचविला आहे. त्यांनी या प्रश्नाला केव्हाच उत्तर देऊन ठेवले आहे की, प्रेम कोणावरही करावे. म्हणजे अगदी राधेच्या वत्सल स्तनांपासून कुब्जेच्या कुबडापर्यंत आणि काळजाच्या नात्यापासून खड्गाच्या पात्यावर कोणावरही प्रेम करावे असे त्यांनी सांगून ठेवले आहे. या कवितेत त्यांनी दोन नावेही घेतली आहेत. सुदामा नावाचा भटजी आणि अर्जुन नावाचा राजेंद्र. खरे तर ही नावे घेण्याची गरजच नव्हती. या लोकांवर लोक न सांगताच प्रेम करतात. त्यातही साधारणत: सुदामा हा डाव्यांचा प्रेमविषय असतो आणि राजेंद्र हा उजव्यांचा. तर प्रेमाचे हे मंगल, अमंगल असे सारे विषय मांडताना त्यांचे एक सांगायचे मात्र राहूनच गेले, की प्रत्येकाचा ‘स्व’ हाही प्रेमाचा एक विषय आहे. अर्थात ते न सांगितल्याने काहीच बिघडत नाही. आपण आपले स्वत:वर प्रेम करीतच असतो. तसे नसते तर दुनियेतील तमाम गंधपावडर आणि लालीचे कारखाने बंद पडले असते. आपण सारेच आपादमस्तक स्वप्रेमात बुडालेलो असतो. अन्यथा आपण जगूच शकणार नाही. आपल्या अस्तित्वावरच आपले प्रेम नसेल तर ते जगणे नसते. जिवंत मरणे असते. जीवनात यशस्वी होण्यासाठीही स्वप्रेम आवश्यकच असते. अखेर वर, वर, अधिक वर जाण्यासाठी जी ऊर्जा लागते ती काही आकाशातून पडत नसते. ती ईर्षां, कांक्षा माणसाच्या अंगी येते ती स्वत:वरील प्रेमातूनच. स्वत:ला अहम् ब्रह्मास्मि वगरे बजावून सांगितल्याशिवाय ते बळ अंगी येतच नसते. हे सर्वानाच लागू आहे. आता लाभाविण प्रीती करणारी कळवळ्याची जाती असते असे म्हणतात. पण ती प्रीती जरा खरवडून पाहिली तर आत स्वप्रेमाचीच झळाळी दिसून येईल. अखेर जो स्वत:वर प्रेम करीत नाही, तो इतरांवर काय प्रेम करणार हा सवाल आहेच. तेव्हा गोरगरिबांविषयी, समाजाविषयी प्रेम वाटते म्हणून आम्ही समाजसेवा करतो, लोकांचे जीवनमान सुधारावे म्हणून कारखाने काढतो किंवा लोकांची सेवा करण्यासाठी सत्तेवर येतो असे म्हणणे ही दांभिकताच. मालकाचे बरे चालावे म्हणून मी त्याच्याकडे नोकरी करतो असे एखाद्या कामगाराने म्हणणे जेवढे खोटे तेवढेच हेही खोटे. याचा अर्थ ती लोकसेवेची भावना खोटी नसते. ती खरीच असते. तिची प्रेरणा मात्र आत्मसमाधान, स्वप्रेम हे असते. यालाच कोणी स्वार्थ म्हणतात. आता आपल्याकडची समस्या अशी आहे की स्वार्थ म्हणजे पापच असे आपण परंपरेने मानतो आणि परमार्थ हाच जीवनहेतू समजतो. वास्तविक इतरांच्या स्वार्थाआड आपला स्वार्थ येऊ न देणे हा परमार्थ असतो. यात पुन्हा सारे चराचर स्व-अर्थी असते हेच आपण लक्षात घेत नाही. पण ते नीट समजून घेतले की मग आपले प्रधानसेवक नरेंद्र दामोदरदास मोदी धरून समाजातील साऱ्यांच्याच वर्तनाचा अर्थ लावणे सोपे जाते. मोदींच्या नौलख्खा कोटाचेही गूढ मग आपोआपच उलगडते.
मोदी हे स्वत:च स्वत:चे व्हॅलेन्टाइन आहेत हे काही लपून राहिलेले नाही. ते स्वत:वर बेहद्द खूश आहेत. त्यांचा पंतप्रधानपदापर्यंतचा राजकीय प्रवास हे त्या प्रेमाचेच फलित आहे. मोठय़ा मेहनतीने त्यांनी स्वप्रतिमा उजळवली. त्यातील त्यांचे कलाकसब वाखाणण्यासारखेच आहे. त्यावर आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही. मोदीभक्त तो घेणारच नाहीत. इतरांनी घेण्याचे कारण नाही. पण माणूस सतत स्वत:लाच शीळ घालत फिरू लागला तर? स्वनामांकित कोट घालून मोदी नवलक्षकोटनारायण बनले, हा मोदीभक्तांस निश्चितच नव नवल नयनोत्सव वाटला असेल. परंतु ते मोदींचे स्वत:ला शीळ घालणेच होते. आक्षेप आहे तो त्याला. एरवी लोकांनी मोदींच्या वेशभूषेविषयीच्या जाणिवेची तारीफच केली आहे. त्यांचे नमोकुत्रे तर आज वेशभूषेतील शैलीविधान बनले आहेत. परंतु सामाजिक वर्तनाचे काही परंपरेने आलेले संकेत असतात. त्यांची अवहेलना करणे यास सुसंस्कृतता म्हणत नाहीत. हा कोट मोदी यांना एका गुर्जर व्यापाऱ्याने भेट म्हणून दिल्याचे सांगण्यात येते. एवढी महागडी भेट देण्या-घेण्यामागील प्रेरणा प्रेमाची आहे, असे त्याचे म्हणणे आहे. येथे ते स्व-प्रेम आहे की काय या खोलात जाण्याचे किंवा त्या कोटाच्या लिलावाच्या लीलांमध्येही पडण्याचे कारण नाही.
मात्र एकटय़ा मोदींनाच अशा वर्तनविकाराबद्दल बोल लावता येणार नाही. त्या आजाराने आपल्याकडील अनेक राजकीय नेत्यांना ग्रासले आहे. बहन मायावती या तर त्यातील पट्टीच्या रुग्ण. आपल्याच हयातीत आपलेच पुतळे उभारून आपल्याच हाताने त्याचे अनावरण करणे याला स्वत:वरील अनावर प्रेमाशिवाय दुसरे कोणतेही कारण असूच शकत नाही. मायावती हे एक टोकाचे उदाहरण झाले. पण असे अनेक नेते आहेत. पण स्वत:च्या प्रेमात केवळ राजकारणीच असतात असे नाही. विविध क्षेत्रांत तसे नमुने आहेत. अगदी विज्ञान संशोधनाच्या क्षेत्रातही. त्यातील एक धक्कादायक उदाहरण म्हणजे भारतरत्न सीएनआर राव यांचे. ते जगातील अनेक प्रतिष्ठित वैज्ञानिक संस्थांचे फेलो आहेत. देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराचे मानकरी आहेत. काही वर्षांपूर्वी ते संचालक असलेल्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स या संस्थेबाहेरील चौकास त्यांचे नाव देण्यात आले. आणि ते रावसाहेबांच्या उपस्थितीत झाले. आता आपल्याकडे रस्ते आणि चौकांच्या बारशांची एक पद्धत आहे. म्हणजे त्यांना हयात व्यक्तींची नावे दिली जात नाहीत. पण त्या थोर शास्त्रज्ञास त्यात काहीही गैर वाटले नाही. हीच गोष्ट आपल्या रघुनाथराव माशेलकरांची. त्यांचेही स्वत:वर एवढे प्रेम की अलीकडेच करंट सायन्स या दर्जेदार मासिकात लिहिलेल्या एका लेखात त्यांनी अनेक शब्द केवळ आपल्या महत्तेचे विवरण करण्यावरच खर्च केले. मोठय़ा माणसांकडून याची अपेक्षा नसते. विज्ञानाप्रमाणेच अर्थशास्त्राच्या क्षेत्रातही अशी दोन मोठी उदाहरणे दिसतात : अमर्त्य सेन आणि जगदीश भगवती. दोघेही परस्परांचे विरोधक. साम्य मात्र स्वप्रेमाचे. कोलंबिया विद्यापीठातील राजकीय अर्थशास्त्र अध्यासनाला भगवतींचे नाव देण्यात आले आहे. त्या अध्यासनाचे काम पाहत त्यांचे प्रिय शिष्य अरविंद पानगढिया. अमर्त्य सेन यांच्या नावे तर इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च- म्हणजे आयसीएसएसआरतर्फे एक पारितोषिकच दिले जाते आणि तेही त्यांच्याच हस्ते. अध्यासन वा पारितोषिक यांना ही नावे संस्थांनी दिली आहेत हे खरे, परंतु हयात थोरांनी ती देऊ दिली, हा संकेतभंग झाला. यावर इतिहासकार आणि लेखक रामचंद्र गुहा यांनी टीका केल्यानंतर उलट गुहांनाच नावे ठेवणारे लोक निघाले.
थोरांनी संकेतभंग केले, सुसंस्कृत म्हणता येणार नाही असे वर्तन केले तरीही ते गोड मानून घेण्याची प्रवृत्ती आपल्याकडे हल्ली बरीच बळावली आहे. तिचे नाव व्यक्तिपूजा. एकीकडे थोरामोठय़ांचे हे अति-स्वप्रेम आणि दुसरीकडे त्यांच्या अनुयायांची आंधळी व्यक्तिपूजा यात समाजाचेच नुकसान होत असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून अनेक विचारवंतांनी या धोक्याची जाणीव आपल्याला करून दिली आहे. पण ते लक्षात कोण घेतो? सगळेच थोरांच्या या स्वप्रेम भेटीने भारावलेले..!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2015 2:47 am

Web Title: pm modi mayawati scientist cnr rao all are own valentines
टॅग : Mayawati
Next Stories
1 दांभिक विरुद्ध दुष्ट
2 ..दोन घरे मागे
3 मैत्रिपालाची मैत्री
Just Now!
X