गोंधळ, जागरण, भारूड, तमाशा ही मराठी माणसाच्या धार्मिक मनोरंजनाची साधने. चित्रपट, चित्रवाणी आणि वृत्तपत्रे यांची विशेष जाणकारी असलेल्या राज ठाकरे यांना हे चांगलेच माहीत असल्याने राजकारणातही ते अधूनमधून हे प्रकार सादर करीत असतात. लोकसभा निवडणुकीत हाती भोपळा लागल्यानंतर राज यांनी तमाम महाराष्ट्राला ‘या, मला आपल्याशी काही बोलायचं आहे’ असे आवतण देऊन आपण निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर अनेकांना जागरण झाले. परवा नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेतही त्यांनी हेच केले. प्रश्न साधा होता. आपण म्हणजे राज ठाकरे निवडणूक लढविणार की नाही? त्यावर बोलताना राज यांनी ‘बघू’ असे म्हणत ठाकरे घराण्याच्या गुणसूत्रांचे भारूड लावले. ‘मी महाराष्ट्राचा आहे,’ असे त्यांनी नमनालाच सांगितले. या डोमिसाइल सर्टििफकेटात काहीही नवीन नव्हते. एरवीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ब्रीदवाक्यच आहे : मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा. त्यानंतर त्यांनी सांगितले, ‘मी कोणा एका मतदारसंघाचा नाही. शिवाय आमच्या परिवारात कोणीही निवडणूक लढली नाही. हा आमचा जेनेटिक प्रॉब्लेम आहे.’ याबाबत त्यांनी प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब यांची उदाहरणे दिली. या सर्व वक्तव्यातून कशाचे सूचन होते? हुशार हुशार वार्ताहरांच्या लक्षात ते बरोबर आले आणि लागलीच सर्वत्र ताज्या बातम्या झळकल्या, की राज ठाकरे निवडणूक लढविणार नाहीत. या बातम्यांनी एकच गोंधळ उडाला. त्यातही सर्वात जास्त गोंधळ मनसेच्या शाखा शाखांमध्ये उडाला. आपले सेनापती दर निवडणुकीत तोंडाच्या तोफा चालवत रणमदान गाजवतात. या वेळी ते ढाल-तलवार घेऊन थेट रणातच उतरणार म्हटल्यावर अनेकांना हुरूप चढला होता; पण सेनापतींनीच तुम्ही पुढे व्हा, मी मागून पाठीवरून थाप देतो, अशी भूमिका घेतल्यावर त्यांचे अवसानच गळाले. एकच हलकल्लोळ झाला. या घोषणेने शिवसेनेच्या गोटात मात्र अनेकांना हायसे वाटले असेल. शिवसेनेच्या हल्लीच्या अनेक भूमिका राजकारणकेंद्रित असण्याऐवजी विनाकारण राजकेंद्रित असतात. ही महाराष्ट्राचीच जेनेटिक समस्या आहे. भाऊबंदकी हे तिचे नाव. पण राज यांच्या आधीच्या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यापुढे रिमोट कंट्रोलच्या भूमिकेतून जबाबदारीच्या पदावर येण्याचे संकट निर्माण झाले होते. नागपुरातील वक्तव्याने ते दूर झाले. उद्धव यांना घोडय़ावर बसण्याची आवश्यकताच त्याने नाहीशी झाली. दुसरीकडे मोदीप्रेमात आकंठ बुडालेल्या इंटरनेट िहदू नामक जल्पकांच्या जमातीला पुन्हा एकदा खाद्य मिळाले. कोणी त्यांची केजरीवाल यांच्याशी तुलना केली, तर कोणी पळपुटय़ा भागूबाईशी; पण त्यांचे हे सुख काही तासच टिकले. राज यांनी दुसऱ्याच दिवशी खुलासा केला, की ‘मी तसे म्हणालोच नव्हतो. माध्यमांनी माझ्या बोलण्याचा विपर्यास केला.’ एखाद्या राजकीय नेत्याने या वाक्याचा स्वामित्व हक्क खरेदी केला, तर त्याच्या पुढच्या सात पिढय़ा बसून खातील एवढे पसे मिळतील. तेच पेटंट वाक्य उच्चारून राज यांनी पुन्हा एकदा गोंधळाचा प्रयोग लावला. या सर्व तमाशामध्ये राज लढणार की नुसतेच तोंडाने लढणार हे मात्र अस्पष्टच राहिले. हा सर्व राज यांचा मनोवैज्ञानिक खेळ दिसतो. त्यांचे लक्ष्य अर्थातच शिवसेना हेच आहे. कधी असे बोलून गोंधळ निर्माण करा, कधी भाजपच्या नेत्यांना चहाबिस्कुटे खाऊ घाला, असे करून शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांना टुकटुक करण्यात राज यांना मजा येत असावी. त्या हौसेतूनच हा सर्व गोंधळ निर्माण झालेला असावा. मात्र संशयकल्लोळाच्या या नाटकातून विश्वासार्हतेच्या वस्त्रहरणाचा प्रवेश येतो याचे भान राज यांना राहिलेले दिसत नाही. अन्यथा विपर्यास होऊ शकतो अशी वक्तव्ये करून त्यांनी या गंभीर विषयाची ‘ब्लू िपट्र’ तरी केली नसती!
संग्रहित लेख, दिनांक 26th Aug 2014 रोजी प्रकाशित
‘राज’कीय गोंधळाचे भारूड
गोंधळ, जागरण, भारूड, तमाशा ही मराठी माणसाच्या धार्मिक मनोरंजनाची साधने. चित्रपट, चित्रवाणी आणि वृत्तपत्रे यांची विशेष जाणकारी असलेल्या राज ठाकरे यांना हे चांगलेच माहीत असल्याने राजकारणातही ते अधूनमधून हे प्रकार सादर करीत असतात.
First published on: 26-08-2014 at 01:04 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray not to contest maharashtra assembly elections