दिल्ली विधानसभेच्या माध्यमातून देशभर पोहोचलेला व राजकीय बजबजपुरीला ठोस पर्याय ठरू पाहणारा आम आदमी पक्ष अल्पावधीत जनमानसातून उतरू लागला आहे. कोणताही ठोस कार्यक्रम नाही, भूमिकेतील धरसोडपणा, निधीची वानवा अशा अनेक कारणांच्या मुळाशी या पक्षाच्या नेतृत्वाची एककल्ली वृत्ती कारणीभूत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आम आदमी पक्षाला फटका बसल्यास त्याला सर्वस्वी अरविंद केजरीवाल हेच जबाबदार असतील.
‘आप’मध्ये आफत

दिल्ली विधानसभा निवडणुकीत जनमानसाची नाडी ओळखण्यात कमालीचे यशस्वी झालेल्या आम आदमी पक्षाला लोकसभा निवडणुकीतदेखील नरेंद्र मोदींचे नेतृत्व मान्य नसलेला व काँग्रेसविरोधातील मतदार लाटेवर स्वार होऊन आपल्याला मतदान करेल, अशी आशा आहे. या आशेपायी स्थानिक नेते-कार्यकर्त्यांवर दिल्लीची जबाबदारी सोपवून ‘आप’ नेते अरविंद केजरीवाल देशभर दौरा करीत आहेत. त्यांच्या प्रचारसभा कधी शाईफेक; कधी वाराणसीच्या स्थानमाहात्म्यामुळे गाजल्या. दिल्लीकरांच्या स्मरणात राहील अशी एकही सभा अरविंद केजरीवाल यांची अद्याप तरी झाली नाही. विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत प्रचारादरम्यान काहीसे ढिसाळ नियोजन आम आदमी पक्षाचे आहे. ज्या दिल्लीकरांनी उत्स्फूर्तपणे विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मत दिले, त्यांच्या मनात संभ्रम निर्माण करण्यात भारतीय जनता पक्षाला यश आले आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाच्या जनआवाहनामध्ये विधानसभेइतकी आर्तता नाही. सामूहिक प्रचाराऐवजी उमेदवारकेंद्रित प्रचार केल्याने आम आदमी पक्षाचे एकसंध दिसणारे स्वरूप या निवडणुकीत दुर्मीळ झाले आहे.
अरविंद केजरीवाल वाराणसीत, प्रा. योगेंद्र यादव हरियाणात, तर कुमार विश्वास अमेठी/ रायबरेलीत अडकून पडले. केजरीवाल सातत्याने अंबानींचे नाव घेऊन काँग्रेस-भाजपवर टीका करतात. राहुल गांधी व नरेंद्र मोदी या ‘सॉफ्ट टार्गेट’मुळे काँग्रेस व भाजपमधील इतर नेत्यांकडे अरविंद केजरीवाल व त्यांच्या सहकाऱ्यांनी हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले. काँग्रेसकडून दिल्लीच्या चाँदनी चौक लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरलेले केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांच्याविरोधात केजरीवाल यांचा आवाज क्षीण झाला आहे. एरव्ही मनीष तिवारी, कपिल सिब्बल, शीला दीक्षित यांच्याविरोधात आम आदमी पक्षाचे नेते दिवसरात्र जप करीत असत. अधूनमधून केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावरही आपच्या नेत्यांनी तोंडसुख घेतले. विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या चळवळीचे केंद्र जंतर मंतर होते. याच जंतर मंतरवर सध्या आम आदमी पक्षात दुहीची बीजे पेरली जात आहेत.
विधानसभा निवडणुकीत दिल्लीच्या मेट्रोपासून ते चौकनाक्यांपर्यंत आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते प्रचार करीत होते. काँग्रेस-भाजपविरोधात तेव्हा आपची हवा होती. दिल्लीत सध्या हीच हवा असली तरी त्याचा लाभ आम आदमी पक्षाला होईल अथवा नाही याविषयी कुणीही छातीठोकपणे सांगू शकणार नाही. कोणतीही निवडणूक पैशांशिवाय लढविता येत नाही. हे कटू असले तरी सत्य आहे. याची पूर्ण जाणीव अरविंद केजरीवाल यांना आहे. म्हणून तर आम आदमी पक्षाचे लोकसभा निवडणुकीसाठी एकूण ‘बजेट’ दोनशे कोटी रुपयांचे आहे. नरेंद्र मोदींविरोधात निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यावर मोठय़ा प्रमाणावर आर्थिक निधी मिळण्याची केजरीवाल यांना आशा होती, परंतु मार्चअखेरीस आम आदमी पक्षाला सतरा कोटी ४१ लाख रुपयांपर्यंत देणगी मिळाली. त्यापैकी सर्वाधिक पासष्ट लाख रुपये केजरीवाल यांना हाँगकाँगस्थित एका भारतीय उद्योजकाने दिले. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर आम आदमी पक्षाला सर्वाधिक देणग्या महाराष्ट्रातून मिळाल्या. त्याखालोखाल दिल्लीकरांनी आपला भरभरून निधी दिला. परंतु हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, झारखंड, छत्तीसगढमधून आम आदमी पक्षाच्या आर्थिक निधीच्या आवाहनाला अत्यंत कमी प्रतिसाद मिळाला. विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला वीस कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. शेवटी केजरीवाल यांनाच आता बास (!) म्हणण्याची पाळी आली होती. सध्या मात्र अशी परिस्थिती नाही.
आम आदमी पक्षातील उमेदवारी वाटपाचे कवतिक अद्याप सुरू आहे. अनेक ठिकाणी उमेदवारांनी स्वत:हून माघार घेतली. देशभरातून अद्याप पन्नासेक उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यासाठी कोणतेही कारण ना पक्षाने दिले, ना संबंधित उमेदवारांनी. सीताराम केसरी काँग्रेस अध्यक्ष असताना एक म्हण दिल्लीत प्रचलित होती. ‘ना खाता ना बही- जो केसरी कहे वो सही’. ही म्हण नव्याने प्रचारात आली आहे. ‘ना खाता ना बही- जो केजरी कहे वो सही’. जालंधरमधून राजेश पद्म यांना उमेदवारी देण्याचा आग्रह अरविंद केजरीवाल यांचाच होता. पद्म यांच्याविरोधात रॉकेलचा काळाबाजार केल्याचा आरोप आहे. या आरोपांमुळे आपच्या स्थानिक नेत्या-कार्यकर्त्यांनी राजेश पद्म यांचा प्रचार करण्यास नकार दिला. जेव्हा प्रकरण हाताबाहेर गेले तेव्हा प्रा. योगेंद्र यादव व मनीष सिसोदिया यांना पुढे करून केजरीवाल यांनी पद्म यांची उमेदवारी रद्द करण्याचा आदेश काढला. पण त्यापूर्वीच पद्म यांनी उमेदवारी रद्द करण्याची घोषणा केली. त्याचे पडसाद अजूनही जालंधरमधून उमटत आहेत. देशव्यापी प्रचारामुळे केजरीवाल यांची दमछाक होते. त्यांच्या जोडीला मनीष सिसोदिया तग धरून आहेत. कुमार विश्वास यांनी एक बाजू सांभाळली आहे. मात्र, प्रचाराच्या पातळीवर केजरीवाल खूप मागे आहेत. एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत प्रचार अभियान सुरू केले. जाहीर सभा घेण्याऐवजी रोड शो, नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम, मोलमजुरी करणाऱ्यांचे संमेलन असे केजरीवाल यांचे प्रचार अभियान आहे. भाजप व काँग्रेस नको म्हणून आम्हाला मत द्या, असे आवाहन केजरीवाल यांनी दिल्लीकरांना केले आहे; पण मत मागताना ना ठोस आश्वासन, ना समस्यांवर ठोस उपाय केजरीवाल यांच्याकडे आहेत. अंबानी समूहावर टीका केल्याने केजरीवाल रातोरात हिरो झालेत. धनदांडग्यांना प्रश्न विचारू शकणारा कुणी तरी ‘प्रेषित’ आला असल्याची आवई उठली; पण धनदांडग्यांना प्रश्न विचारताना देशातील उद्योगधंद्यांचे धोरण काय असावे याचे उत्तर केजरीवाल यांच्याकडे नाही. त्यामुळे मुंबईत उद्योजकांशी झालेल्या चर्चेदरम्यान केजरीवाल स्वत:ची मर्यादा बोलून गेले. दिल्लीतदेखील उद्योजकांच्या मेळाव्यात आपचे औद्योगिक धोरण ‘आम आदमी’ ठरवणार, असे बिनदिक्कतपणे केजरीवाल यांनी ठोकून दिले. त्यावर मेळाव्यात जमलेल्या शंभरेक लहान-मोठय़ा उद्योजकांनी तेथून काढता पाय घेतला. आम आदमी पक्षाच्या नेत्यांना हाच प्रश्न विचारल्यावर तेदेखील हेच उत्तर देतात.
दिल्लीच्या सातही लोकसभा मतदारसंघांतील आम आदमी पक्षाचे उमेदवार सामूहिक प्रचार करताना दिसत नाहीत. प्रत्येक उमेदवार प्रचारासाठी सक्षम असल्याने आपच्या पहिल्या फळीतल्या नेत्यांना प्रचारादरम्यान फारसे बोलावले जात नाही. अरविंद केजरीवाल यांचे छायाचित्र असलेले पत्रक घराघरांत वाटले जाते. एकीकडे उमेदवाराचे छायाचित्र, तर दुसरीकडे केजरीवाल यांचे. याशिवाय अन्य कुणाचेही छायाचित्र आपच्या पत्रकावर नाही. अरविंद केजरीवाल हेच आम आदमी पक्षाचे सर्वोच्च नेते असल्याचा संदेश मतदारांवर बिंबवला जातो. त्यातून पक्षांतर्गत केजरीवाल यांची हाजी-हाजी करणारा एक मोठा गट उदयास आला आहे. कुमार विश्वास हे या गटाचे आद्य प्रवर्तक आहेत. भाजप व काँग्रेसचे जे सध्याचे रूप आहे, त्याचेच छोटेसे प्रतिबिंब सध्याच्या आम आदमी पक्षात उमटलेले दिसते.
दिल्लीतील मतदानाबाबत वरकरणी पाहता केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष काहीशा अतिउत्साहात आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान अरविंद केजरीवाल जनतेला प्रश्न विचारीत असत. ‘तुम्हाला कोणता पक्ष हवा, भ्रष्टाचारी की प्रामाणिक? ‘सत्तापिपासू की तुमच्या समस्या समजून घेणारा?’.. अशा घोषणांसोबत ‘निकालाच्या दिवशी आम आदमी पक्ष सर्वाधिक जागा जिंकणार’, अशी भाकिते केजरीवाल वर्तवीत असत. ‘आम आदमी’चे सरकार स्थापण्यासाठी झाडूला मतदान करण्याचे आवाहन केजरीवाल करीत असत. हा जोश दिल्लीत सध्या दिसत नाही. आम आदमीचा आवाज काहीसा क्षीण झाला आहे. ल्युटन्स झोनमधील अतिमहत्त्वाचे मंत्री, नेते, अधिकाऱ्यांकडे काम करणाऱ्यांनी केजरीवाल यांना भरभरून मतदान दिले. सर्व्हट क्वार्टरमध्ये राहणारा हा कामगारवर्ग राजकीयदृष्टय़ा अत्यंत परिपक्व आहे. दिल्लीत, शिवाय सत्ताकेंद्राच्या जवळ असणाऱ्यांच्या जवळचा हा वर्ग असल्याने या वर्गाचे राजकीय भान जागरूक आहे. हा वर्गदेखील केजरीवाल यांच्या बदललेल्या भूमिकेविषयी साशंक आहे. ठोस कार्यक्रम न घेता केवळ इतरांची उणीदुणी काढत राहिल्याचा फटका आम आदमी पक्षाला दिल्लीत बसल्यास सर्वस्वी अरविंद केजरीवाल हेच जबाबदार राहतील. विधानसभा निवडणुकीत केजरीवाल यांच्या व्यासपीठावर अधूनमधून चमकणारे प्रशांत भूषण कोणत्याही कार्यक्रमात दिसत नाहीत. दोन-चार जणांना नेतृत्व बहाल करून केजरीवाल स्वत: ‘हायकमांड’ झाले आहेत. त्यातून येणारा गाफीलपणा हा सर्वात घातक असतो. या गाफीलपणामुळेच दोन महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीसाठी दिल्लीत सर्वाधिक पसंती असलेला आम आदमी पक्ष आता दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. प्रस्थापित पक्षाविरोधात ‘आव्वाज’ उठवून केजरीवाल यांनी जनमानसावर मोहिनी घातली. ही मोहिनी कितपत कायम आहे, हे अर्थात निकालानंतरच दिसून येईल. मात्र, शेअर निर्देशांक जसा खाली-वर होत असतो तसाच आम आदमी पक्षाच्या लोकप्रियतेचा निर्देशांकदेखील वर-खाली होतो आहे. उच्चांक व नीचांक यांच्यात सुवर्णमध्य न साधल्यास आम आदमी पक्ष लोकसभा निवडणुकीनंतर केवळ चर्चेपुरताच शिल्लक राहील.