पाठिंबा त्यांचा, विरोधही त्यांचाच!
शरद पवारांचा ‘भाजपला पािठबाही आणि विरोधही!’ ही बातमी (लोकसत्ता, ११ नोव्हेंबर) वाचली. शरद पवारांनी भाजपला एकतर्फी, न मागता पाठिंबा दिला तेव्हा त्यांची त्रेधातिरपीट झाल्याचे चित्र उभे केले गेले होते- नव्हे, महाराष्ट्रीय जनतेचा तसा पक्का समजच झाला होता! राष्ट्रवादी काँग्रेसवरील भ्रष्टाचाराचे नानाविध आरोप, भाजपच्या सत्तेवर आल्यावर महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करण्याविषयीच्या वल्गना आणि भाजपचे सत्तेवर येणे या सर्व घटनांनंतर जनतेची जणू खात्रीच पटली की भ्रष्टाचारी गजांआड जाणार आणि महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त होणार. पण झालं भलतच. शरद पवार तर चक्क पूर्वी कधी नव्हेत एव्हढे  शक्तिशाली झाल्याचे भासू लागले आहे.
ज्या वेळी त्यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हा तो त्यांच्या अगतिकतेचा आविष्कार वाटला. त्यांच्या धूर्त, कल्पक आणि राजकीयदृष्टय़ा प्रगल्भ स्ट्रॅटेजीचा (धोरणाचा) तो भाग असेल अशी कल्पना मुरब्बी राजकारण्यांनाही आली नव्हती. निकाल जाहीर झाल्यानंतर जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे त्यांच्या हाती लगाम असल्याचे अधिकच भासू लागले आहे. ‘भाजपला पािठबाही आणि विरोधही!’ ही बातमी त्याचाच पुरावा. यात त्यांनी ‘भ्रष्टाचारविरोधातल्या या चौकशा एकदाच्या उरकूनच घ्या’ असेही म्हटले आहे!
लढाई ही मदानावर सुरू होण्याच्या आधीच मुत्सद्दय़ांच्या मनात सुरू झालेली असते. शरद पवार यांच्या राजकीय चालींनी हा समज दृढ केला, इतकेच.
संजय जगताप, ठाणे

कुंपणावरची शाही कला आणि त्यातली दोन घराणी
शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांचं जे कुंपणी ख्यालगायन गेले काही दिवस जनतेला ऐकायला मिळत आहे त्याने जनतेचे कान तृप्त झाले आहेत असं म्हटलं तर योग्य ठरेल. या कलेत तरबेज असलेलं आद्य घराणं शरद पवारांचं. एकाच पक्षाला पािठबा देऊन अपेक्षित आणि निश्चित ‘फलश्रुती’ होईपर्यंत अधूनमधून त्या पक्षाला पाठ दाखवत राहणं ही शैली पवारांनी कलात्मकतेच्या अशा काही उच्च पातळीवर नेऊन ठेवली आहे की भल्याभल्या उस्तादांनी तोंडात बोटं घालावी. आणि गेली कित्येक र्वष या शैलीचा वापर करून त्यांनी आपली यशाची कमान सतत उंच ठेवली आहे. दरम्यानच्या काळात शासनं आली आणि गेली; पण पवारांना फरक पडला नाही. पवारांच्या तोंडून धर्मनिरपेक्षता वगरे शब्द अधूनमधून आणि योग्य वेळी ऐकू यायचे, पण असल्या कल्पना ते वेळ पाहून बाजूलाही ठेवायचे. सातत्य हा गाढवांचा गुणधर्म आहे हे पवारांना अचूक माहीत आहे; त्यामुळे त्या वाटेला ते कधी फिरकले नाही. त्यांच्या निष्ठा किती गुंतागुंतीच्या असतात हे आपण जाणतो. आतादेखील भाजपला ‘बाहेरून पािठबा’ देण्याची त्यांची कृती म्हणजे पुढची पाच र्वष आपण ठामपणे विचलनशील असल्याचा भक्कम पुरावाच.
अशा या प्रवाही कलाप्रकारात उद्धव ठाकरेंनी नव्याने उडी घेतली आहे. पण उद्धवजींचं घराणं वेगळं आहे. ‘होय म्हणजे नाही; अमुक अमुक असेल तर होय; अन्यथा नाही, नाही म्हणजे होय असा अर्थ होतो’ अशा तऱ्हेच्या अनेक गुंतागुंतीच्या- पण जनतेच्या डोक्यावरून जाणाऱ्या- गानक्रीडांतून त्यांनी आपल्या घराण्याचा वेगळा बाज सिद्ध केला आहे. त्याला काही नतद्रष्ट ‘दोन्ही दगडांवर पाय ठेवणं’ असंही म्हणू शकतात. त्यात उद्धवजींनी पवार यांना एकप्रकारे विरोधही केला आहे आणि त्यांच्या शैलीला कुíनसातही केला आहे. भाजप जर राष्ट्रवादीचा पािठबा घेणार असेल तर आम्ही तुमच्यात नाही असं म्हणून पवारांच्या असण्याला विरोध आहे तर दुसरीकडे दैनंदिन विचलनशीलता हीच आपली रोजची शैली असल्याचं ते रोज सांगत आहेत. ‘शासनाचा आकार छोटा हवा पण प्रभाव अत्युच्च हवा’ हे मोदीवचन मान्य केलं तर अशा प्रभावी शासनासाठी निर्णय कमीत कमी वेळेत घ्यायला हवेत हे तत्त्व आपल्याला लागू नाही असं ‘बाणेदार’ उद्धवजींना वाटत असावं. ‘आपल्याला मानाने मिळालं तरच काही हवं आहे, अन्यथा नको’ असं म्हणणं हा त्या ‘बाणेदारपणा’चा आविष्कार नव्हे काय?
यात जनता कुठे आहे हा प्रश्न आता पुढच्या निवडणुकीपर्यंत कोणी विचारणार नसल्याने तिचे प्रश्न या झुंजीत समोर येणं अप्रस्तुत आहे हे दोन्ही घराण्यांना चांगलं ठाऊक आहे. फळ हाताला लागेपर्यंत गाणं विलंबित लयीत आणि शाही थाटात चालणार आहे.
अशोक राजवाडे, मालाड (मुंबई)

अर्थहीन हिरवी निदर्शने
राज्यातील एक मंत्री एकनाथ खडसे यांनी मराठी शाळेत उर्दू शिकण्यासाठी पर्याय उपलब्ध करण्यात येईल, असे निवेदन दिले व त्यावर सध्या युतीत भांडणे असल्याने अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेच्या दिवाकर रावते यांनी हिरवी टोपी खडसे यांना देऊ केल्याचे दाखवत निदर्शने केली.
वास्तविक शाळेत इतर भाषाही शिकविल्या जातात आणि इंग्रजीदेखील परकीय भाषा आहे (ज्यांच्या गुलामीत आपण १५० वष्रे होतो) हे शिवसेनेने आठवावे आणि उर्दू कुठून आली हेही तपासावे. लोकसभेत चरणसिंग यांनी उर्दू ही िहदुस्तानी भाषाच आहे असे सांगितले होते व तसे पुरावेही दिले होते. केवळ ती मुस्लीमधर्मीय वापरतात म्हणून तिला विरोध चुकीचाच आहे. दुसरी गोष्ट कुठलाही शिवसनिक आपल्या घरात हिरवा रंग वापरत नाही? घरातील लग्नात एकही साडी हिरवी नसते?  तिरंग्यातही हिरवा आहेच ना? मग त्याला एवढा विरोध का?
कुमार करकरे, पुणे

ठेवींच्या काळजीसाठी..
‘बँकेतील ठेवींची काळजी आपणच घ्यावी’ या शीर्षकाचे पत्र (लोकमानस, १० नोव्हेंबर) वाचले. म्हणणे पटले. खरे पाहता आपण आपले पसे बँकेत गुंतवत आहोत, तर ते किती गुंतवले आहेत, रक्कम किती, व्याज किती, ते कधी मिळते, सदर रक्कम कधी देय (डय़ू) आहे, वारसदार कोण आहे इत्यादी तपशील प्रत्येकाने आपल्या संगणकावर अथवा नोंदवहीत नोंदवून ठेवायला हवी. हल्ली तर ज्येष्ठ नागरिकांसकट सगळ्यांकडे मोबाइल असतो; त्यावरील ‘रिमाइण्डर’ ही सुविधा उत्तम आहे, ती वापरावी म्हणजे विसरण्याचा प्रश्न येणार नाही. आपल्या नोंदी दर महिन्यातून एकदा पाहाव्यात आणि आवश्यक असेल तेव्हा रिमाइंडर लावून योग्य ती कार्यवाही करावी. पत्रलेखक म्हणतात त्याप्रमाणे मुदत ठेवीची मुदत संपल्यानंतर ती आपोआप बचत खात्यात जमा करण्याचीही सोय संगणकीय प्रणालीमुळे सहज शक्य झाली आहे.
मी एका राष्ट्रीयीकृत बँकेत काम करत असताना एका विशिष्ट समाजाचे लोक ‘मुदत ठेव संपली तरी आमच्या घरी पत्र पाठवू नका’ असे आग्रहाने सांगायचे! आजही असे ठेवीदार असतील. दावा न केली गेलेली रक्कम वाढण्यास अशाही गोष्टींमुळे हातभार लागतो.
अभय दातार, ऑपेरा हाउस, मुंबई

ही संधीच!
‘रिपाइंकडून भाजपचा निषेध’ ही बातमी (लोकसत्ता, १० नोव्हें.) वाचून आशा वाटली की, रामदास आठवले यांना महायुतीतून बाहेर पडण्याची संधी आली आहे!
ज्या पक्षाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा वारसा लाभला आहे, त्याच पक्षाच्या नेत्याने  समाजसेवेच्या नावाखाली पदासाठी हात पसरायचे, यात कसले सामाजिक भान? कार्यकर्त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, भाजपकडून अपमान सहन करण्यापेक्षा महायुतीतून बाहेर पडावे.. हा विचार आठवले यांना कधीतरी करावाच लागणार आहे. अनेक कार्यकर्ते आपणास अजूनही ‘नेता’ मानतात, हे आठवले यांनी लक्षात ठेवावे.
मारोती संग्राम गायकवाड, नांदेड

टोलवाटोलवी पुरे
निवडणूकपूर्व काळापासून ते आता मंत्रिमंडळ स्थापन झाले तरी भाजप आणि शिवसेनेतला घोळ काही संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. या सर्व ‘तळ्यात आणि मळ्यात’ प्रकारावरून िहदीतील प्रसिद्ध हास्य व्यंगकवी ओमप्रकाश ‘आदित्य’ यांची एक कविता आठवली..   त्या कवितेत एका लग्न वरातीमध्ये नवरदेव घोडीवर बसताक्षणी घोडी बिथरली आणि उधळली. काही केल्या आवरेना! आता घोडी बिचारी विचार करीत होती की हा पोरगा उतरला तर मी थांबेन आणि नवरदेव विचार करीत होता की घोडी जर शांत उभी राहिली तर मी उतरेन. या दोघांच्या ‘पहले आप’मध्ये लग्नाला आलेल्या पाहुण्यांची मात्र पाचावर धारण बसली होती.
सध्या राज्यातील राजकारणातही, जणू काही टक लावून बघण्याच्या शर्यतीत प्रथम कोणाचा डोळा लवतो, किंवा टोलवाटोलवीच्या सामन्यात चेंडू कोणाचा पडतो याची दुसरा पक्ष वाट बघतो आहे. या दोन्ही पक्षांनी दूरगामी विचार करून जर सामंजस्य दाखविले तर तिढा सुटू शकतो. अन्यथा राज्यातील जनतेची परिस्थिती ‘आदित्य’ यांच्या हिंदी कवितेतील पाहुण्यांप्रमाणे झाली आहेच.
हर्षवर्धन दातार, ठाणे</p>