स्वामींनी ज्या दिवशी ‘अनंत निवासा’त पाऊल टाकलं तो क्षण वरकरणी फार सहज साधा होता. हवापालटासाठी म्हणून आपल्या बाबाचा हा सखा घरातले कर्ते पुरुष अण्णा यांच्या सांगण्यावरून आपल्या घरी आला आहे, काही दिवस राहून प्रकृती सुधारून आपल्या घरी परतणार आहे, अशा दृष्टीनंच घरातल्या लोकांनी या ‘गृहप्रवेशा’कडे पाहिलं असावं. अर्थात कोणतीही चिकित्सक वृत्तीचा किंवा नाराजीचा लेशमात्र स्पर्शदेखील घरातल्या कुणाच्या मनाला नव्हता. कणमात्र किंतुदेखील नव्हता. अण्णांची इच्छा आणि बाबांचं सख्यत्व एवढय़ा दोन गोष्टींचाच मूक प्रभाव असा होता की स्वामींना घरातल्या प्रत्येकानं अगदी आपलेपणानं स्वीकारलं. सत्पुरुष कधीच असत्य बोलत नाहीत. ‘प्रकृती सुधारायला म्हणून मी आलो आहे,’ असं स्वामी घरात पाऊल टाकताना म्हणाले आणि खरंच अखेपर्यंत आणि आजही भवरोगानं ग्रासलेल्या अनंत जडजिवांची आंतरिक प्रकृती सुधारण्याचं त्यांचं काम अखंड सुरूच आहे! कामारपुकुर या कुठल्याशा आडगावातल्या ‘गदाधर’ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या एका गरीब ब्राह्मणानं राणी रासमणिच्या दक्षिणेश्वरातील देवळात ‘पुजारीपणा’साठी म्हणून प्रवेश करावा, हे वरकरणी पाहता किती साधंसोपं निमित्त होतं! पण त्याच निमित्तयोगानं जगाला अंतर्बाह्य़ जागं करणारं मातेचं प्रेम बहाल करणारा परमहंस लाभला!! तसंच स्वामींचं ‘अनंत निवासा’तलं येणं हे निमित्तमात्र भासत असलं तरी तो एक मोठा मणिकांचन योग होता. स्वामींचा देसायांच्या घरातला वावर हा अगदी सहज असे. स्वामी सत्यदेवानंद लिहितात, ‘‘आपला कोणाला उपसर्ग होऊ नये असाच त्यांचा दिनक्रम होता. सकाळी घरालगत खोपटवजा जागेत आणि संध्याकाळी दूरवरच्या एखाद्या झाडाखाली वा मंदिरात भजनानंदात व ध्यानात त्यांचे तासन् तास सरत. सकाळी स्नानानंतर अनंत-निवासातील देवांची पूजा करीत असत. त्यांचा आहार अगदी मोजका असे. त्या कालखंडात स्वामीजींनी आपल्या पारमार्थिक योग्यतेचा घरात कोणाला पत्ता लागू दिला नाही.. स्वामींचे वागणे योग्याप्रमाणेच समतोल होते. त्यांनी कधी वायफळ बडबड केली नाही की मुद्दाम मौनही धारण केले नाही. साधनेसाठी अट्टहासाने रात्रीचा दिवस केला नाही तशीच दिवसा टर्र झोपही घेतली नाही. ‘ब्रह्मचर्या’चा अवास्तव बडेजाव त्यांच्या वर्तनात नसे, पण त्याचबरोबर घरातल्या बायकामंडळींशी कारणाखेरीज ते कधीच दोन-चार वाक्यांपेक्षा जास्त बोललेही नाहीत. लोकांच्या दिवसभराच्या परिश्रमातून व्यक्त होणाऱ्या अष्टौप्रहर बहिर्मुख व्यवहारांत ते समरस झाले नाहीत, पण केवळ आळसातही त्यांनी दिवस दवडला नाही! अमुक करावे किंवा करू नये, असा अनाहूत सल्ला त्यांनी कधी कोणाला दिला नाही, पण कोणी विचारल्यावरदेखील, ‘असे केल्यास बरे’ असाच अनाग्रही सल्ला मिळत असे. थोडक्यात म्हणजे प्रभाती शौचमुखमार्जनापासून ते रात्री निद्रावश होईपर्यंत स्वामींच्या कोणत्याही व्यवहारात आग्रह, अतिरेक, वेगळेपणा, क्रोधादिविकारवशता, विधिनिषेधांचा अट्टहास यांचा मागमूसही नसे.’’