एके काळचा पत्रकार, पुढे पत्रकारितेच्याच अंगाने आणि त्याच हेतूने – म्हणजे ‘सत्य जगासमोर आणण्या’साठी लघुपट बनवू लागतो. एकविसावे शतक उजाडत असतानाच भारतात वृत्तवाहिन्यांना सत्यकथनात रस नाही, एखाद्या प्रसंगाच्या कारणांचा कसून शोध घेण्यात तर एकंदर कोणत्याही प्रसारमाध्यमांना रस नाही, याचा बाऊ न करता त्याने फक्त सांधा बदलला. स्वत:ची वाट शोधली. ही वाट आता कुठे रुंदावत असतानाच, वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला.
तो फार नावाजलेला होता, त्याला मिळालेले पुरस्कार मोठे प्रतिष्ठेचे होते, असे काही नाही. तो प्रामाणिकपणे काम करतो आहे, याची दाद मात्र त्याला नेहमीच मिळत राहिली होती. ही अशी दाद, कधी कुठल्याशा लघुपट-महोत्सवाच्या स्पर्धा-विभागातील ‘विशेष उल्लेख पुरस्कारा’च्या स्वरूपातही असायची इतकेच.
राज्यशास्त्रात पदवी आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात पदव्युत्तर पदवी घेतलेला शुभ्रदीप, पत्रकारितेचेही शिक्षण घेऊन पत्रकारितेच्या क्षेत्रात उमेदवारी करू लागला आणि फार तर ३० वर्षांचा होता, तेव्हा त्याने नोकरी सोडून हा निर्णय घेतला.. लघुपटकार होण्याचा. तोही, लघुपटांतून आपल्याला शोधपत्रकारिताच करायची आहे, हे ठरवून! पाच लघुपट झाल्यानंतर आता कुठे तो महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला असताना, मेंदूतील रक्तस्रावाचे निमित्त झाले आणि आयुष्यच संपले.
ही अल्पायुषी कारकीर्द सुरू होण्यास निमित्त झाले होते गोध्रा येथील रेल्वेडब्याच्या जळित-कांडाचे. जळालेले सर्व अनामिक जीव जर कारसेवक असल्याचे सांगितले जाते आहे, तर ते कुठकुठले होते, त्यांनी जाण्या-येण्याचा प्रवास कसा केला होता, याचा शोध घेण्याचा प्रयत्न शुभ्रदीप चक्रवर्तीच्या ‘गोध्रा तक’ (२००३) या लघुपटाने केला. त्यानंतरचा ‘एन्काउंटर्ड ऑन सॅफरॉन अजेंडा?’ (२००९) हा लघुपट २००२ ते २००५ या चारही वर्षांत गुजरातमध्ये घडलेल्या समीर पठाण, सादिक जमाल, इशरत जहाँ, सोहराबुद्दीन शेख या चकमकींचा वेध घेणारा होता. दहशतवादी ठरवले गेलेले अनेक जण न्यायालयात पुढे निदरेष ठरले आहेत. अशा माणसांचा दहशतवादी प्रेरणांशी तरी दूरान्वयाने तरी संबंध होता का, या प्रश्नाचा शोध त्यांनी ‘आफ्टर द स्टॉर्म’ (२०१२) या लघुपटातून घेतला होता. त्याच वर्षी ‘आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट’ या लघुपटातून तपासयंत्रणांवर होणारा घाईने तपासाचा आरोप आणि खटल्याची गती मंदावण्यामागे असलेली दबाव आदी कथित कारणे यांचा प्रश्न त्यांनी धसाला लावला. ‘इन दिनों मुजफ्फरनगर’ हा ताजा लघुपट सेन्सॉरने फेटाळला, त्याविरुद्ध न्यायालयीन लढा देत असतानाच शुभ्रदीपची प्राणज्योत मालवली.