News Flash

६०. बीज

सुखी संतोष न यावें। दु:खीं विषादा न भजावें। सुखाने हुरळून जाऊ नका आणि दु:खानं विषण्ण होऊ नका. आता मुळात हे सुख-दु:ख का निर्माण होतं? आपण

| March 27, 2014 01:59 am

सुखी संतोष न यावें। दु:खीं विषादा न भजावें। सुखाने हुरळून जाऊ नका आणि दु:खानं विषण्ण होऊ नका. आता मुळात हे सुख-दु:ख का निर्माण होतं? आपण सत्, रज आणि तम या तीन गुणांच्या प्रभावात असतो आणि त्यातच सुख-दुख:चं मूळ आहे, खरं जे आत्मसुख आहे ते या तिन्ही गुणांच्या पलीकडे आहे, असं माउली सांगतात. (तूं गुणत्रयातें अव्हेरीं । मी माझें हें न करीं। एक आत्मसुख अंतरी। विसंब झणीं।। अध्याय २। ओवी २५९). आता हे तीन गुण काय आहेत? या तीन गुणांचा उगम कशात आहे? तर तो मायेत आहे. मायेमुळे जीव त्रिगुणांच्या प्रभावात आहे. तैं प्राणिये तंव स्वभावें। अनादिमायाप्रभावें। त्रिगुणाचेचि आघवे। वळिले आहाती।। (अ-१७। ओवी ५६). म्हणजे प्राणी तर स्वभावत: अनादि असलेल्या, जिचा आरंभ कधी झाला हे सांगता येत नाही अशा मायेच्या सामर्थ्यांने त्रिगुणांचेच बनले आहेत. आता माणूस जगतो कशासाठी? तर अर्थात सुखासाठी. स्वामींचे सद्गुरू श्रीगजानन महाराज (गुप्ते) म्हणतात, ‘या जगातील प्रत्येक मनुष्य सुख कसे मिळेल किंवा मिळालेल्या सुखाची वाढ कशी होईल किंवा दु:ख कसे टळेल अगर ते कमी कसे होईल, यासाठीच सदैव धडपडत असतो.’ (आत्मप्रभा, पृ. ४). आता ‘सुख’ म्हणजे काय, ‘दु:ख’ म्हणजे काय याकडे पाहण्याची माणसाची दृष्टी तसंच ते सुख मिळविण्याचा आणि दु:ख टाळण्याचा त्याचा मार्ग हा त्या तीन गुणांच्याच चौकटीनुसार ठरतो. आता माणूस तीन गुणांच्या प्रभावाखाली असला तरी त्याच्यात एक गुण सर्वात प्रभावी असतो. माउली सांगतात, ‘तेथेही दोन गुण खांचती। मग एक धरी उन्नती। तैं तैसियाचि होती वृत्ती। जीवांचिया।।’ त्या त्रिगुणातदेखील दोन गुण कमी होतात व एक वाढतो आणि त्या जिवाची वृत्ती त्या प्रधान गुणासारखी होते. तमोगुणी हा सुख मिळविण्यासाठी दुसऱ्याला प्रसंगी दु:ख द्यायलाच नव्हे तर त्याचा प्राणही घ्यायला मागे-पुढे पाहात नाही. तमोगुण माणसाला अत्यंत हीन पातळीवर नेतो. रजोगुणी हा सुख मिळविण्यासाठी स्वकर्तृत्वावर पूर्ण विसंबतो आणि अखंड कार्यमग्न राहतो. सत्त्वगुणी माणसाला सात्त्विकतेत सुख वाटतं. दुसऱ्याच्या सुखासाठीही तो धडपडतो. तेव्हा प्रत्येक जिवात तिन्ही गुण असतात, पण त्यातला एक प्रमुख होतो आणि त्यानुसार वृत्ती बनते. मग? ‘‘वृत्तीपेसें मन धरिती। मनाऐसी क्रिया करिती।  केलिया ऐसी वरिती। मरोनि देहें।।’’ म्हणजे माणूस मग त्याच्या वृत्तीनुसार संकल्प करतो, त्या संकल्पानुसार कर्म करतो आणि देह गेला तरी त्या संकल्पाचं बीज नष्ट होत नाही. ‘संकल्प’ म्हणजे तरी काय? ‘अमुक व्हावं’ ही इच्छाच ना? इच्छा होणं ही मनाचीच खूण आहे. आणि एकदा का इच्छेत मन गुंतलं की तिच्या पूर्तीसाठी ते देहाला कामाला जुंपतं. मग जन्म संपला पण इच्छा अपूर्ण राहिली तर त्या इच्छेच्या बीजातूनच पुन्हा जन्म होतो! ‘‘बीज मोडे झाड होये। झाड मोडे बीजीं सामाये। ऐसेनि कल्पकोडी जाये। परी जाति न नशे।।’’ म्हणजे बीज नाहीसे होऊन त्याचे झाड होते, झाड नाहीसे होऊनही त्याच्या बीजात ते असतेच! हा क्रम कोटय़वधी कल्पे चालला तरी झाडाची ती जात नष्ट होत नाही, त्याप्रमाणे देह नाहीसा होऊनही त्याच्या अपूर्त वासनांचं बीज राहतं आणि त्या बीजातच नव्या जन्माची सुरुवात असते. जन्म-मृत्यू-जन्माचं चक्र अर्थात सुख-दु:खाची आवर्तनं कधीच संपत नाहीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2014 1:59 am

Web Title: swarup chintan seed
Next Stories
1 अर्थहीन ओळखशून्य
2 शहरांचं प्रशासन, नियोजन..
3 उरले एक युग मागे..
Just Now!
X