News Flash

प्रवृत्ती जिवंत आहे..

भारतीय जनता पक्षाची अवस्था ‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’ अशी झाली आहे. लोकसभा निवडणुकीत काहीही करून आपला विजय झाला पाहिजे, यासाठी काय वाट्टेल ते करण्याची घाई

| March 25, 2014 01:02 am

भारतीय जनता पक्षाची अवस्था ‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’ अशी झाली आहे. लोकसभा निवडणुकीत काहीही करून आपला विजय झाला पाहिजे, यासाठी काय वाट्टेल ते करण्याची घाई असणाऱ्या या पक्षातील उत्साही आणि मूर्ख कार्यकर्त्यांना आपल्या कृतीचे काय पडसाद उमटतील, याची कल्पना नसते. त्यांचे नेते सध्या अशा काही धुंदीत आहेत, की कार्यकर्त्यांकडे पाहण्यास त्यांना वेळ नाही. असे घडले, म्हणूनच बेंगळुरूमध्ये श्रीरामसेना या संघटनेचे नेते प्रमोद मुतालिक यांना पक्षात आणण्याचा घाट घालण्यात आला. जेव्हा गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनीच त्याला आक्षेप घेतला, तेव्हा पाच तासांच्या अवधीत याच मुतालिकांची पक्षातून हकालपट्टी करण्याची नामुष्की पक्षावर ओढवली. ‘याल तर तुमच्यासह’ अशी भाजपची सध्याची रणनीती आहे. येणाऱ्या प्रत्येकाचे नुसते तोंडभरले स्वागत करून हा पक्ष थांबत नाही, त्यांना हवी तेथे उमेदवारीही देतो. गेल्या काही दिवसांत ज्या प्रकारे तिकीटवाटपाचे प्रयोग रंगत आहेत, त्यावरून हे सहज लक्षात येते. एकचालकानुवर्तित्व हे रा. स्व. संघाचे वैशिष्टय़ आहे. भाजपमध्ये निर्माण करण्यात आलेली सामूहिक नेतृत्वाची परंपरा धाब्यावर बसवून सध्या पक्षांतर्गत सत्तेचे जे केंद्रीकरण सुरू आहे, ते पाहता काहीच काळात आपले सामान्य व्यवहारज्ञानही हा पक्ष विसरून जाईल. आत्तापासूनच सत्तेची स्वप्ने पाहू लागल्यामुळे, कार्यकर्त्यांना आपण काय करतो आहोत आणि त्याचे किती वाईट परिणाम होतील, याचे भान राहिलेले नाही. मुतालिक यांना पक्षात घेतल्यानंतर एका कार्यकर्त्यांने जी प्रतिक्रिया दिली, ती खूपच बोलकी होती. भाजपने हिंदुत्वाला जवळ करून अन्य धर्मीयांना आधीच दूर ठेवले आहे, आता पन्नास टक्के मतदार असलेल्या महिलांनाही दूर ठेवण्याच्या या प्रयत्नाबद्दल त्याने नेत्यांचे अभिनंदन केले. २००९ मध्ये मंगलोरमधील एका पबमध्ये महिलांवर हात टाकण्याचे धाडस दाखवणाऱ्या श्रीरामसेनेच्या कार्यकर्त्यांना आपण काही तरी मोठे कार्य करीत आहोत, असे वाटत होते. महिलांनी कसे वागावे, हे शिकवण्याचा अधिकार फक्त आपल्याला आहे, अशा भ्रमात राहिल्याने त्यांच्या अंगावर हात टाकतानाही या संघटनेच्या कार्यकर्त्यांना लाज वाटली नाही. त्याहून शरमेची बाब म्हणजे, या कृत्याचे त्यांनी केलेले समर्थन होते. कर्नाटकातीलच नव्हे, तर देशातील सर्व भागांत या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आणि त्याने या संघटनेची पुरती नाचक्की झाली. पडलो तरी नाक वर अशा थाटात वावरणाऱ्या आणि देशातील प्राचीन संस्कृतीचे आपणच ठेकेदार असल्याचा टेंभा मिरवणाऱ्या प्रमोद मुतालिक यांनी बऱ्याच काळानंतर या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले, तरी ती जखम भरून येणे शक्य नव्हते. पक्षात घेताना कर्नाटकातील भाजपच्या कुणाही राज्यस्तरीय नेत्याने सारासार विचार केला नाही की वरिष्ठांना विचारले नाही. त्यात काय विचारायचे, असेही त्या बालबुद्धींना वाटले असेल. पण या घटनेचे परिणाम देशभर होऊ शकतात, याची कल्पना त्यांना असणे शक्य नाही. हकालपट्टी केल्याने झालेली चूक सुधारली असे कदाचित नेत्यांना वाटू शकेल. पण अशा प्रकारे विचार करण्याची प्रवृत्ती या पक्षात अद्यापही जिवंत आहे, ही खूणगाठ मात्र लवकर पुसली जाणार नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष प्रल्हाद जोशी आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना मुतालिक यांच्यावर विविध प्रकारचे ४५ गुन्हे दाखल आहेत, हे माहीत असतानाही, त्यांनी असे जंगी स्वागत करणे नुसते अनुचित नाही, तर पक्षाची प्रतिमा ऐन निवडणुकीच्या तोंडावर मलिन करण्यासारखे आहे. निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर प्रत्येक कृती शंभरदा तपासण्याची आवश्यकता मुतालिक प्रकरणामुळे सिद्ध झाली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2014 1:02 am

Web Title: tendency is alive
Next Stories
1 बामियान जपायचे कसे?
2 अंतर आणि अंतराय!
3 साधू आणि संधिसाधू..
Just Now!
X