‘द क्राउन प्रिन्स, द ग्लॅडिएटर अँड द होप’ अशा लांबलचक नावाचं पुस्तक २०१४ च्या लोकसभा निवडणुकांबद्दल माजी टीव्ही-पत्रकार आणि आता ‘आम आदमी पक्षा’चे आमदार आशुतोष यांनी लिहिलं आहे. या पुस्तकाचं प्रकाशन चालू महिन्यातच झालं. दिल्लीच्या जागतिक पुस्तक-मेळय़ात या नव्या पुस्तकानिमित्तानं लेखक-भेटीचा कार्यक्रमही झाला. प्रश्नोत्तरांसाठी वेळ खुला झाला आणि दिल्लीतून राजकारणाचा रागरंगच पालटू पाहणारा तरुण नेमका कसा आहे, हे प्रश्नांमधून अधिकच दिसत गेलं!
‘तुम्ही झोपडपट्टय़ांना काय बंगल्यासारख्या सुविधा देणार का?’, ‘तुमचेही आठ-नऊ महिने भरतीलच की नाही मोदींप्रमाणे? तेव्हा तुम्ही जमिनीवर याल का?’, ‘राजकारण राहू दे बाजूला, निवडणुकीत ‘आप’च्या सर्वच कार्यकर्त्यांना हसू आलं असेल, असा एखादा झक्कास विनोदी किस्सा सांगा बघू..’ असे एकेक प्रश्न विचारणारे चेहरे तरुणांचेच होते. लुधियानाहून पुस्तकांसाठी दिल्लीत आलेला एक तरुण सरदार आशुतोषना विचारत होता, ‘आता पंजाबात जिंकावं ही माझी सदिच्छा, पण तिथं दिल्लीसारखी व्यूहरचना नाही चालणार, मग कुठली चालेल? केलाय विचार?’
हे सारे प्रश्न पुस्तकाबाहेरचे होते. आशुतोष यांनी या सर्वच प्रश्नांना उत्तरं दिली, ‘विनोदी किस्सा’ म्हणून त्यांनी ‘भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार’ म्हणून जगदीश मुखी यांचं नाव (किरण बेदींना भाजपनं पुढे करण्याआधी) ‘आप’नेच कसं पुढे आणलं आणि जणू त्याच्या परिणामीच भाजपला चेहरा द्यावा लागला, हा किस्सा सांगितला, त्याला कमी प्रतिसाद मिळाला. पण बाकीच्या सर्व उत्तरांना टाळय़ा, हशा यांची दाद मिळत होती.
आशुतोष यांच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरल्या शब्दांदरम्यान राहुल गांधी (युवराज) नरेंद्र मोदी (योद्धा) आणि ‘आम आदमी’ यांची छोटी छायाचित्रं आहेत. त्यावरून पुस्तक किती ‘आप’च्याच दृष्टिकोनातून लिहिलं गेलं असणार, याची कल्पना करता येते. आशुतोष मात्र हे पुस्तक म्हणजे राजकारणाच्या नव्या दिशेचा शोध घेताना आलेल्या अनुभवांची गाथा आहे, असं सांगत होते.
‘वाराणसीच्या एका खेडय़ात, एका वृद्धेनं मला दार उघडलं.. मी सांगितलं आपकडून आलोय वगैरे. तर तिनं सरळ विचारलं- ‘हमका का दैबो’. मी म्हणालो, पारदर्शक प्रशासन! त्यावर ती म्हणाली, मुलीचं लग्न करायचंय यंदा.. आम्हाला काय देणार बोला. मतदारांची अशी हलाखी भारतात आहे, हे माहीत होतं; पण अनुभवातून अस्वस्थ झालो.. पुढे काय हे पुस्तकात वाचा..’ असं सांगत आशुतोष पुन्हा पुस्तकबाह्य प्रश्नांमध्येच अधिक रमले!