संसदेवरील हल्ल्यापासून मुंबईवरील हल्ल्यापर्यंत प्रत्येक दहशतवादी कारवाईतील म्होरके हाती लागूनही त्यांच्यावर कठोर कारवाई कधी होणार या प्रश्नाभोवती दीर्घकाळ रेंगाळणारा भूतकाळ अचानक स्तब्ध व्हावा आणि वर्तमानानेही अचंबितपणे पाहात राहावे, असे- केंद्र सरकारमधील मरगळलेल्या मानसिकतेला धक्का देणारे, काहीसे एकामागून एक घडत आहे. हे कर्तृत्व धोरणलकव्याने हैराण झालेल्या सरकारचे की सुरक्षा यंत्रणांचे यावर वाद होत राहतील; पण केंद्र सरकारची यच्चयावत खाती वेगवेगळ्या वादांच्या भोवऱ्यांत गटांगळ्या खात असताना आणि जनतेच्या क्षोभाचे धनी होऊ लागलेले असताना, केंद्रीय गृहखाते मात्र, प्रशंसेचे धनी होऊ लागले आहे. संसदेवर हल्ला करून देशाच्या सर्वोच्च प्रतिष्ठेला आव्हान देणाऱ्या अफझल गुरूला फासावर लटकवावे, या मागणीसाठी विरोधकांनी जंगजंग पछाडले. इतकेच नाही, रालोआतील शिवसेनेने याच मागणीसाठी काँग्रेसच्या प्रतिभा पाटील यांना राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीस पाठिंबा दिला. पण आपल्या कारकिर्दीत प्रतिभा पाटील ही मागणी पूर्ण करू शकल्या नाहीत. त्यामुळे, हे क्रूरकर्मा गुन्हेगार तुरुंगात पाहुणचार झोडणारे सरकारचे जावई असल्याची टोकाची टीका होऊ लागली. त्यातच, भ्रष्टाचाराच्या असंख्य प्रकरणांनी घेरलेल्या सरकारची प्रतिमा ढासळू लागल्याने पानिपत अटळ असल्याची भाकिते उमटू लागली आणि अचानक सुशीलकुमार शिंदे हे संकटमोचकासारखे योगायोगाने सरकारच्या मदतीला धावून आले. खरे म्हणजे, कणखर, कठोर अशा गृहमंत्र्यांच्या प्रतिमेत चपखल बसावा असा शिंदे यांचा स्वभाव नाही. गृहमंत्री म्हणून ते सक्षम ठरतील की नाही याबद्दलही शंका व्यक्त होत होत्या. मात्र, एका पहाटे अचानक अफझल गुरूला फासावर लटकावले गेले आणि विरोधकांवर तोंडात बोटे घालण्याची वेळ आली. क्रूर दहशतवादी टुंडा यास जेरबंद करण्यात आल्याची बातमी हवेत विरते न विरते तोच, खतरनाक यासिन भटकळदेखील हाती लागला. आता ‘लष्कर’चा कमांडर मन्सूर ऊर्फ शम्सभाई जेरबंद झाला. गृहखात्याच्या कर्तबगारीत असे यशाचे तुरे खोवले जात असताना, केंद्र सरकारची अन्य खाती मात्र आरोपांच्या फैरी झेलत गलितगात्रपणे दिवस ढकलत असल्याने, या यशाची चमक वाढली आहे. केंद्रात सातत्याने महत्त्वाच्या पदांवर राहिलेले सुशीलकुमार शिंदे हे नेहरू-गांधी घराण्याचे निष्ठावान पाईक मानले जातात. केवळ गांधी-नेहरू घराण्यावरील निष्ठेमुळेच आपल्यासारख्या सामान्य दलित कार्यकर्त्यांला महत्त्वाची पदे मिळाली, असे सुशीलकुमार शिंदे यांनी जेव्हा जेव्हा स्वत:च आवर्जून नमूद केले, तेव्हा साहजिकच त्यांच्या कर्तबगारीचा लेखाजोखा मांडला गेला आणि केवळ स्वामिनिष्ठा हेच कारण असल्याचा निष्कर्ष आजवर अनेकदा काढला गेला. आता मात्र, अफझल गुरू आणि कसाबची फाशी, भटकळ आणि शम्सभाईची अटक यामुळे शिंदे यांच्या अस्तित्वाला कर्तबगारीची झालर लागली आहे. आपल्या दहशतवादी आणि गुन्हेगारी कारवायांनी उभ्या देशाला सतत वेठीला धरणाऱ्या दाऊद इब्राहिम या कुख्यात गुन्हेगारास पाकिस्तानातून भारतात आणण्याच्या वल्गना करणाऱ्या भल्याभल्यांना त्यात यश आले नाही. आता, सुशीलकुमार शिंदे यांनी हा विडा उचलल्याचे दिसते. अमेरिकेची मदत घेऊन हे काम त्यांच्या कारकिर्दीत फत्ते झाले, तर शिंदे यांचे गृहमंत्रिपद आणि काँग्रेसच्या आघाडी सरकारचा लकवा भरलेला कार्यकाळ, या दोहोंची इतिहासात नोंद होईल.
संग्रहित लेख, दिनांक 11th Sep 2013 रोजी प्रकाशित
धोरणलकव्यावर ‘सुशील’ मालीश..
संसदेवरील हल्ल्यापासून मुंबईवरील हल्ल्यापर्यंत प्रत्येक दहशतवादी कारवाईतील म्होरके हाती लागूनही त्यांच्यावर कठोर कारवाई कधी होणार
First published on: 11-09-2013 at 01:03 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Troubleshooter sushil kumar shinde