परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या चार वाणींपैकी आपला घनिष्ठ परिचय असतो तो वैखरीशी. त्यामुळे, मौनाचा प्रश्न आला की आपल्यासमोर उभी राहते ती मुख्यत: वैखरीच. साहजिकच, ‘तोंडाने न बोलणे’ असा मौनाचा साधा व सरळ अर्थ आपण आपल्या मनाशी योजून मोकळे होतो. नेमके इथेच आपण चुकतो आणि पूर्णपणे चकतोही! ‘मौन’ या वास्तवातील कमालीच्या सखोल संकल्पनेचा औरसचौरस विस्तार आणि सघन आशय आपल्या ध्यानी आणून देतात सोपानदेव. संतांची मांदियाळी सोपानदेवांचा निर्देश ‘सोपानकाका’ अशा आदरार्थी संबोधनाने का करते, याचा उलगडा आपल्याला घडावा सोपानदेवांच्या अल्पसंख्य परंतु आशयबहुल अभंगसंपदेचे अंतरंग हळुवार संवेदनशीलतेने आकळण्याचा प्रयत्न केला तरच. चारही वाणी मौन्यावस्थेमध्ये विसावणे हा ‘मौन’ या संज्ञा-संकल्पनेचा अर्थ अभिप्रेत आहे सोपानकाकांना. मौन्य परे मिठी पश्यंतीसी नुठी। मध्यमेच्या बेटी खुंटे तारू  ही सोपानदेवांची साक्ष विलक्षण मार्मिक शाबीत होते या संदर्भात. परावाणीला पडलेली मौन्याची दृढ मिठी सैलावण्याचे कोणतेच चिन्ह पश्यंतीमध्येही दिसत नव्हते. मोठ्या निर्धाराने तिथून निघालेल्या शब्दरूपी तारवाची गती, सोपानदेवांच्या अनुभूतीनुसार, मध्यमेच्या बेटाला टेकेपर्यंत पारच खुंटली. चारही वाणींमध्ये जिचा जोर सर्वांना भारी ठरतो त्या वैखरीमध्येही, अखेर, बिंबले ते मौन्यच असा निर्वाळा सोपान वैखरी देहामाजी भारी। पूर्ण तो श्रीहरी बिंबी बिंब अशा साक्षात्कारी शब्दकळेद्वारे प्रगट करतात सोपानदेव. ‘मौन्य’ हा मोठा गोड शब्द होय. जितका गोड तितकाच अर्थपूर्णही. ‘शांतता’ हा आहे ‘मौन्य’ या शब्दाचा अर्थ. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या चारही वाणी शांत होणे म्हणजे ‘मौन’ हे गाभासूत्र निर्देशित करतात सोपानदेव इथे. वाणी मौनावते, वाणीचे शांतवन होते म्हणजे वास्तवात वाणी अप्रस्तुत ठरते. बोलण्यासारखे काही उरलेलेच नसल्याने वाणीची गरजच भासत नाही. त्या अ-साधारण अनुभवाचे प्रत्ययकारी वर्णन करतेवेळी तुकोबांची एक ‘गौळण’ मुखर करते नेमके हेच सारभूत वास्तव. काही कामासाठी गोकुळ-वृंदावनाच्या परिसरातील वनामध्ये आलेल्या त्या गोपिकेची गाठ अवचितच पडते नंदनंदनाशी. कृष्णस्वरूप परतत्त्वाशी प्रसंगवशात झालेल्या त्या अकस्मात भेटीसरशी आपली झालेली अवस्था ती गोपीबाळा गेलें होउनि न चले आतां कांहीं। साद घालितां जवळी दुजें नाहीं। अंगीं जडला मग उरलें तें काई। आतां राखतां गुमान भलें बाई वो अशा भावभरित शब्दांत वर्णन करते. हे यथार्थ वर्णन होय साक्षात्काराचे. बिंबामध्ये प्रतिबिंब विरघळून जावे तशी अवस्था होते परतत्त्वाशी भेट झाल्यानंतर साधकाची. ‘मी-तू’पण हरपल्याने बोलण्यासाठी ‘दुसरा’ कोणी उरतच नाही आसमंतात आणि साहजिकच मग गरजच भासत नाही वाणीची. केवळ ‘गुमान’ बसणे, एवढेच काय ते हातात उरते त्या साक्षात्कारी उपासकाच्या. चैतन्याशी घडून आलेल्या सामरस्याचे वर्णन शब्दांत करताच येत नसल्याने वाणी ठरते पूर्ण अप्रस्तुत. मनाचे ‘मनपण’च लयाला जाऊ न तिथे प्रस्थापित होते प्रगाढ मौन्य. सोपान तिष्ठत रामनामीं लीन। मन तेथें मौन्य एकपणें हे सोपानकाकांचे उद्गार म्हणजे त्याच अ-लौकिक अवस्थेचे सम्यक् शब्दांकन. – अभय टिळक

agtilak@gmail.com