बलाढय़ पाश्चात्त्य कंपन्या भारताकडे केवळ बाजारपेठ याच नजरेने पाहतात आणि त्यांना रोखण्याची बौद्धिक आणि धोरणात्मक ताकद आपल्या नेतृत्वाकडे नाही.

नवी वस्तू वा तंत्रज्ञान वापराआधी ते वापरण्याची शिस्त आधी अंगी बाणवणे आवश्यक असते. अशी शिस्त अंगी बाणलेल्या समाजात मग तशी संस्कृती विकसित होते आणि समाज त्याबाबत सुसंस्कृत होतो. आपल्याकडे हा प्रवास बरोबर उलटा. म्हणजे वाहनचालन संस्कृती विकसित होण्याआधीच खासगी मोटारींचे पेव फुटले आणि त्यातून सधन तरीही असंस्कृत वाहनचालकांच्या पिढय़ाच पिढय़ा आपल्याकडे रस्त्यांवर केकाटत राहिल्या. मोबाइल दूरध्वनीबाबतही तेच. असे फोन वापरण्याची किमान शिस्त, संस्कृती विकसित होण्याआधीच या मोबाइलधारकांच्या लाटा आपल्याकडे उसळल्या आणि मोबाइल करणाराच पलीकडच्यास ‘कोण बोलतोय’ असे विचारताना सर्रास कानी पडू लागले. त्यापुढचा प्रवास हा समाजमाध्यमांचा होता. व्यक्तीचे खासगी आयुष्य, तिचे अधिकार, समाजमाध्यमांतून व्यक्त होण्यासाठी आवश्यक किमान सभ्यता आणि शिस्त आदींचा लवलेशही विकसित व्हायच्या आधी या समाजमाध्यमांनी आपला समाज शब्दश: गिळंकृत केला. यानंतर काय घडले याची घाण फेसबुक कंपनीतील संबंधितांनीच चव्हाटय़ावर आणली असून ते पाहिल्यावर उकिरडय़ावर लोळण्यात आनंद मानणाऱ्या वराह वा गर्दभवंशीयाचीच आठवण व्हावी. याची दखल घ्यायला हवी याची प्रमुख कारणे दोन. एक म्हणजे, बलाढय़ पाश्चात्त्य कंपन्या भारताकडे केवळ बाजारपेठ याच नजरेने पाहतात आणि त्यांना रोखण्याची बौद्धिक आणि धोरणात्मक ताकद आपल्या नेतृत्वाकडे नाही. दुसरे म्हणजे मुळातच सारासार विचाराची कुवत नसलेला समाज कोणीही हव्या त्या दिशेने वाहवत नेऊ शकतो, हे यातून पुन्हा एकदा सिद्ध होते.

प्रथम यातील पहिल्या मुद्दय़ाविषयी. फेसबुक कंपनीनेच अधिकृतपणे सादर केलेल्या माहितीनुसार भारत ही त्या कंपनीची सर्वात झपाटय़ाने वाढणारी बाजारपेठ आहे. या एका देशातून फेसबुक आणि कंपनीचे ३४ कोटी इतके ग्राहक/वर्गणीदार आहेत. भारत आणि आफ्रिका या तिसऱ्या जगातील प्रांतात फेसबुक वाऱ्याच्या वेगाने वाढले. या तुलनेत प्रगत अमेरिका खंडात या समाजमाध्यमाचे फक्त १० टक्के इतकेच ग्राहक/वर्गणीदार. म्हणजे ज्या देशात हे दिवटे जन्मले त्या देशात त्यास फारशी मागणी आहे, असे नाही. असे असतानाही आपल्या महसुलातील तब्बल ८७ टक्के इतका वाटा फेसबुककडून एकटय़ा अमेरिका खंडात खर्च होतो. कशासाठी? तर फेसबुकचा गैरवापर तर होत नाही ना यावर लक्ष ठेवण्यासाठी. या तुलनेत फेसबुक स्वत:च ज्या देशांस ‘धोकादायक’ म्हणते त्या देशांवर फेसबुक करीत असलेला खर्च नगण्य म्हणावा असा. फेसबुकच्या मते असे कोणते ‘धोकादायक’? यात प्रमुख देश चार. पाकिस्तान, इराक, इथियोपिया आणि महासत्तापदाचे स्वप्न पाहणारा भारत. म्हणजे जगातील सर्वात मोठी वगैरे लोकशाही ही फेसबुकच्या मते अपयशी देशांच्याच मालिकेत. यात कळीचा मुद्दा धोकादायक या वर्गवारीचा. ती पाहिल्यावर भारत या धोकादायक गटात का, असा प्रश्न पडणे साहजिक.

भाषा हे त्याचे फेसबुकनेच दिलेले उत्तर. इंग्रजीपेक्षा अन्य भाषा ज्या देशांत प्रभावी आहेत त्या देशांत फेसबुकचा गैरवापर होण्याची शक्यता सर्वाधिक आहे असे स्वत: फेसबुकच मान्य करते. हा असा गैरवापर सर्रास होतो याचे कारण इंग्रजीतर भाषांत फेसबुकी सदस्य काय तारे तोडत आहेत हे जाणून घेण्याची क्षमताच या कंपनीकडे नाही. ती नाही कारण विविध भाषाकोविद सोडा, पण साध्या भाषिक तज्ज्ञांनाही फेसबुकने या देशांत सेवेत सामावून घेतलेले नाही. कारण ८७ टक्के इतका फेसबुकचा महसूल कायद्याचे राज्य जिथे कार्यक्षम अशा अमेरिकेतच खर्च होतो. फेसबुक एकूण १०० भाषांमध्ये वापरता येते. पण इंग्रजीतर भाषांसाठी तेथे पुरेसे संपादकच नाहीत. ‘फेसबुकवर प्रकाशित होणाऱ्या एकंदर ७० भाषांतील मजकुरांवर जगभरातील २० ठिकाणांहून १५ हजार तज्ज्ञ ‘लक्ष’ ठेवून असतात,’ असे फेसबुकच अधिकृतपणे नोंदते. याचाच अर्थ उर्वरित ३० भाषांतील फेसबुकवर प्रसवल्या जाणाऱ्या ‘मौलिक साहित्या’चा आस्वाद घेण्यासाठी फेसबुककडे आवश्यक कर्मचारीच नाहीत. या ३० दुर्लक्षित भाषांत सर्वाधिक भारतीय भाषा आहेत, हे ओघाने आलेच. या भाषांबाबत (पक्षी: भारताबाबत) फेसबुक इतके बेफिकीर आहे की या भाषांतील मजकुराचा यांत्रिक अनुवाद करण्यासाठीही या कंपनीने पुरेशी गुंतवणूक केलेली नाही. ‘जगातील सर्वात संवेदनशील प्रदेश हे भाषिक वैविध्याचे आहेत’ अशी कबुली फेसबुकच देते. या संदर्भात या कंपनीच्या फुटलेल्या अहवालात इथियोपियाचा दाखला देण्यात आला आहे. भारताप्रमाणेच ‘धोकादायक’ वर्गातील या देशात मोठय़ा प्रमाणावर अशांतता आहे आणि ती पसर(व)ण्यात फेसबुकवरील मजकुराचा मोठा वाटा आहे. म्हणूनच फेसबुकने अलीकडे आम्हारिक आणि ओरोमा या दोन भाषेतील तज्ज्ञांची इथियोपियासाठी नेमणूक केली. या दोन भाषा त्या देशात बोलल्या जातात.

या पार्श्वभूमीवर फेसबुकने भारतात केलल्या प्रयोगांच्या चाचण्या विचारशक्ती शाबूत असणाऱ्यांची झोप उडवतील. त्यातील एका प्रयोगात फेसबुकच्या संशोधकाने केरळातून फेसबुकवर खाते उघडले. त्या खात्यात येऊन पडणाऱ्या मजकुरास ‘लाइक’ करण्यापलीकडे संबंधिताने काही वेगळे केले नाही. महिन्याभराने या खात्याचा आढावा घेतला गेला असता प्रचारकी आणि खोटय़ा बातम्यांचा पाऊस या खात्यात पडल्याचे संबंधितांस आढळले. या खोटय़ा बातम्या अर्थातच कथित धार्मिक तणावाच्या आणि त्यातही एका समाजावर कसा अन्याय होत आहे याच्या प्रक्षोभक वदंता पसरवणाऱ्या होत्या. तसेच अन्य प्रयोगात विशिष्ट राजकीय पक्षाशी संबंधित बनावट तसेच यांत्रिक (बॉट्स) खात्यातून विशिष्ट धर्मीयांविरोधात कुभांड रचणाऱ्या खोटय़ा, प्रचारकी बातम्या पसरवल्या जात असल्याचे यात आढळून आले. फेसबुकने आपल्या मंचाचा दुरुपयोग होणार नाही यासाठीच्या उपायांवर आतापर्यंत १३०० कोटी डॉलर्स खर्च केले आहेत. पण यातील सर्वाधिक रक्कम अमेरिका आणि त्या खंडासाठी खर्च झाली आहे. गेल्या वर्षांत या कंपनीचा महसूल होता ८५०० कोटी डॉलर्स इतका आणि त्यातील २९०० कोटी डॉलर्स इतका वट्ट नफा होता. या संख्येवरून या कंपनीच्या अवाढव्यतेची कल्पना यावी.

आता मुद्दा क्रमांक दोन. भारतात ८० कोटींहून अधिक इंटरनेट वापरकर्ते आहेत. फेसबुक ही इंटरनेट जोडणीची अंकलिपी आहे. म्हणजे बाकी काही येवो अथवा न येवो, फेसबुक वापरणे किमान अक्षरओळख आहे त्या सर्वास जमते. त्यामुळे भारत हा फेसबुकची सर्वात मोठी बाजारपेठ आहे यात आश्चर्य ते काय? तरीही हिंदी आणि बंगाली या फेसबुकवर सर्वाधिक अनियंत्रित भाषा आहेत असे खुद्द फेसबुकच  मान्य करते.  पण यात आपल्यासाठी सर्वात लाजिरवाणी बाब ही नाही. या सर्व तपशिलास वाचा कशी फुटली ही यातील आपल्यासाठी सर्वात शरमेची बाब. फेसबुकमध्येच काम करणाऱ्या फ्रान्सेस हॉगेन या विदा-अभियंता तरुणीने ‘जागली’ची भूमिका जागवत फेसबुकच्या या निष्क्रियतेस वाचा फोडली म्हणून हे सर्व सत्य बाहेर आले. त्याआधी अमेरिकी प्रतिनिधीगृहात अनेक सदस्यांनी फेसबुकविरोधात मोर्चेबांधणी केली आणि आत्मनिर्भरतेची चिंता न करता या स्वदेशी कंपनीची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगली. त्याच वेळी आपले शीर्षस्थ नेते मात्र अमेरिकाभेटीत मार्क झकेरबर्ग यास मिठी मारण्यात धन्यता मानतात हा विरोधाभास भारत फक्त बाजारपेठच का, याचे उत्तर देतो. आपल्याकडे केवळ पुस्तकी जगणाऱ्याची संभावना ‘पुस्तकी किडा’ अशी केली जाते. ते एक वेळ बरे. कारण त्यांच्यामुळे इतरांस धोका असतोच असे नाही. पण या फेसबुकी किडय़ांचे मात्र असे नाही. ते इतरांच्या जिवास नख लावत असून अमेरिकी सरकारप्रमाणे त्याविरोधात भूमिका घेण्याची हिंमत भारत सरकारने दाखवायला हवी. अन्यथा ही फेसबुकी कीड आपले समाजजीवन कुरतडल्याखेरीज राहणार नाही.