स्वत: मोठे होण्याऐवजी दुसऱ्याचा दु:स्वास करीत राहिल्यास सुडाचा आनंद मिळेल, प्रगती दूरच राहील- हे पाकिस्तानला कळायला हवे होते..

स्वातंत्र्य दिन साजरा करताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताविरोधात केलेली आगपाखड त्या देशाच्या कर्मदरिद्रीपणाशी सुसंगत म्हणावी लागेल. या आगपाखडीचा जागतिक परिणाम उलट पाकिस्तानविरोधातच होत असून तो देश एकटा पडू लागल्याचे दिसते. हे त्या देशाच्या कर्मदरिद्रीपणाचे फलित. हा कर्मदरिद्रीपणा त्या देशाच्या जन्मापासून पाचवीलाच पुजलेला आहे, हे आपण जाणतोच. त्या देशाच्या सगळ्या समस्यांचे मूळ या कर्मदरिद्रीपणात आहे, हेही आपण जाणतो. मात्र त्यामागील कारणाचा विचार आपल्या लोकानुनयी समाजजीवनात होताना दिसत नाही. तीन आठवडय़ांपूर्वी भारताचे चांद्रयान जेव्हा अवकाशात झेपावले; त्यावर भाष्य करताना पाकिस्तानातील ‘द डॉन’ या आघाडीच्या वर्तमानपत्रात प्रा. परवेझ हुडबॉय यांनी आपल्या मातृभूमीच्या दैनावस्थेविषयी परखड विवेचन केले, ते या संदर्भात दखलपात्र ठरते. त्यानंतर पाकिस्तानी दूरचित्रवाणीवरील चर्चेतील एका सहभागीने आपल्या देशाच्या धोरणाचे वाभाडे काढले. लोकशाही देशातील माध्यमे माना टाकत असताना लोकशाहीचा केवळ आभास असणाऱ्या पाकिस्तानातील माध्यमांचे हे संदर्भ हे सहोदरी दोन देश एका दिवसाच्या अंतराने आपापले स्वातंत्र्य दिन साजरे करताना महत्त्वाचे ठरतात.

‘द डॉन’मधील लेखात भारताच्या चांद्रमोहिमेच्या अनुषंगाने पाकिस्तानच्या या क्षेत्रातील ‘प्रगती’वर भाष्य करण्यात आले आहे. ‘चांद्रमोहिमेइतकी प्रगती हवी असेल तर पाकिस्तानने प्रथम भारतासारखे पंडित नेहरू घडवायला हवेत,’ असे हुडबॉय यांच्या लेखातील प्रतिपादन. लेखक इस्लामाबाद आणि लाहोर विद्यापीठांत भौतिकशास्त्र शिकवतात. त्यामुळे त्यांच्या लिखाणास एक शास्त्रीय आधार आहे. त्याचा प्रत्यय त्यांनी लेखात केलेल्या भारत आणि पाकिस्तानच्या अंतराळ संशोधन संस्थांच्या तुलनेतून येतो. भारताची इस्रो नवनवीन मोहिमा हाती घेत असताना पाकिस्तानची नॅशनल स्पेस एजन्सी सुपाकरे ही मात्र अमेरिका आणि चीनच्या मदतीने पाकिस्तानने कोणते उपग्रह सोडले वा क्षेपणास्त्रे डागली त्याचीच माहिती देण्यात धन्यता मानते, हे सदर लेखक दाखवून देतात. या पाक यंत्रणेचे सर्व प्रमुख हे लष्कराधिकारी आहेत. त्यांची शैक्षणिक पात्रता किती संकुचित आहे, याचाही तपशील या लेखात आढळतो. पाकिस्तानचा एके काळचा शास्त्रज्ञ धर्म-उपायांनी कर्करोग कसा बरा करता येईल यावर थोतांडी भाषणे देत हिंडतो, तर दुसरा एक महिलांना मासिक पाळीत काय काळजी घ्यावी यावर नैतिक उपदेश देतो. तिसऱ्या एका शास्त्रज्ञाची आर्थिक घोटाळ्याची चौकशी सुरू असल्याची माहिती वाचून त्या देशाच्या सद्य:स्थितीविषयी कीव येते.

‘भारताचे हे असे झाले नाही, कारण राजा राममोहन रॉय यांच्या सुधारणावादी धोरणाचे व्रत अज्ञेयवादी पं. नेहरू यांनी पुढे चालवले. पाकिस्तानला मात्र असे नेहरू लाभले नाहीत आणि जी काही सुधारणावादाची धुगधुगी सर सैयद अहमद यांनी दाखवली होती ती नतद्रष्ट पाक राजकारण्यांनी धर्मवाद्यांच्या नादी लागून विझवली,’ असे त्यांचे म्हणणे. ‘सुधारणावादी सर सैयद यांच्याऐवजी धर्मवादी इक्बाल यास प्राधान्य दिल्याने पाकिस्तानची वाताहत झाली,’ या त्यांच्या निष्कर्षांबाबत कोणाचे दुमत असणार नाही. तेव्हा भारतासारखी प्रगती साधावयाची असेल तर पाकिस्तानने प्रथम नेहरू यांच्यासारखे विज्ञानवादी नेतृत्व घडवायला हवे, असे त्यांच्या परखड लेखाचे सार.

त्याहीपेक्षा परखड होती ती पाक दूरचित्रवाणीवरील चर्चा. त्यातील एका सहभागीने पाकिस्तानला उद्देशून ‘तुम्ही या जगाला दिले आहे तरी काय,’ असा थेट सवाल केला आणि त्याचे उत्तरही देण्याचा प्रयत्न केला. ‘आपण या जगाला ना एखादा शास्त्रज्ञ देऊ  शकलो ना अर्थशास्त्री. ना कोणी तत्त्ववेत्ता पाकिस्तानने जगाला दिला ना कोणी तंत्रज्ञ. साधे बॉलपेन वा मोटारीच्या काचा पुसणारी यंत्रणाही आपण देऊ  शकलेलो नाही. एक साधी लोकशाही आपण देऊ  शकलेलो नाही,’ इतके कठोर आत्मपरीक्षण या चर्चेत झाले.

हे शब्दश: खरे म्हणता येईल. श्रीनिवास रामानुजन, सी. व्ही. रामन, होमी भाभा, सत्येंद्रनाथ बोस, मेघनाद साहा, एस. एस. अभ्यंकर वा अन्य कोणाइतका शास्त्रज्ञ वा वैज्ञानिक पाकिस्तानने दिलेला नाही. खरे तर बिस्मिल्ला खान नामक एक जागतिक कीर्तीचा शहेनाईवादक त्यांना मिळू शकला असता. पण त्या देशात ‘विश्वनाथजी कहाँ है,’ असे विचारत त्याने तेथे न जाता गंगाकिनारी काशीविश्वेश्वराच्या बनारसलाच आपले घर मानले. त्यामुळे पाकिस्तानची ती संधीही हुकली. धनंजयराव गाडगीळ, अमर्त्य सेन वा रघुराम राजन असा कोणी अर्थशास्त्री, सरकारने आपली कंपनी ताब्यात घेण्याचा अन्याय सहन करूनही देशत्याग न करता आपला उद्योगविस्तार करणारा जेआरडी टाटा यांच्यासारखा उद्योगपती किंवा जगातील अनेक महत्त्वाच्या कंपन्या, औद्योगिक आस्थापने यांचे नेतृत्व करणाऱ्या नामांकितांत कोणी पाकिस्तानी शोधूनही सापडणार नाहीत. कारण ते अस्तित्वात नाहीत. ते अस्तित्वात नाहीत, कारण आयआयटी वा आयआयएमसारख्या शैक्षणिक संस्था जन्माला घालणारे राजकीय नेतृत्वच पाकिस्तानात तयार झाले नाही. ते तयार झाले नाही याचे कारण स्वातंत्र्यानंतर आधुनिक दृष्टिकोनाचा अंगीकार न करता धर्माच्या आधारे देश चालवण्यात त्या देशाने धन्यता मानली. वास्तविक पाकिस्तान, एक दिवसाने का असेना, पण आपल्याआधी स्वतंत्र झाला.

पण आज तो आपल्यापेक्षा कित्येक योजने मागे आहे. या काळात पाकिस्तानने आपली देशउभारणी करण्याऐवजी भारताचे नाक कसे कापता येईल, असाच प्रयत्न केला. स्वत: मोठे होण्याचा मार्ग न पत्करता दुसऱ्याचा दु:स्वास इतकाच एखाद्याचा कार्यक्रम असेल तर त्यातून सुडाचा आनंद मिळू शकतो. पण तो अगदीच तात्कालिक असतो. तो संपुष्टात आला की पुन्हा मग आपल्यासमोरील अंधाराची जाणीव होते आणि अशा वेळी आत्मपरीक्षण करून मार्गबदलाचा शहाणपणा न दाखवल्यास सुडाच्या क्षणिक डोळे दिपवणाऱ्या उपायांची निवड केली की हे दुष्टचक्र तसेच सुरू राहते. पाकिस्तानला आता याची जाणीव होत असेल. काश्मीरच्या मुद्दय़ावर जागतिक पातळीवरील एकही देश उघडपणे आपल्या पाठीशी उभा नाही हे पाहून पाक पंतप्रधान इम्रान खान यांचा संताप होत असेल. पाक स्वातंत्र्य दिनाच्या त्यांच्या भाषणातून याचेच दर्शन झाले. सौदी अरेबिया आदी इस्लामी देशांनीही पाकिस्तानची तळी उचलण्याचे नाकारले हे पाहून तरी आपल्या देशाचे हे असे का झाले, हा प्रश्न त्यांना पडायला हवा.

काश्मीरच्या प्रश्नावर इस्लामी देशदेखील पाकिस्तानच्या पाठीशी नाहीत, याचा अर्थ त्यांना भारताची कृती मान्य आहे, असा होत नाही हे खरे. पाकिस्तानला पाठिंबा न देणाऱ्या या देशांना मोह आणि महत्त्व आहे ते भारताच्या बाजारपेठेचे. ६५ कोटी मध्यमवर्गाची ही बाजारपेठ भारतात विकसित होऊ  शकली, कारण भारताने सुरुवातीपासून अंगीकारलेला सुधारणावादी दृष्टिकोन आणि त्यातून साध्य झालेली देशाची आर्थिक प्रगती.

आणि या सगळ्याउपर धर्मनिरपेक्ष संविधान भारत आपल्या नागरिकांस देऊ  शकला. पाकिस्तानी नागरिक याबाबत अभागीच. हे सख्खे शेजारी देश स्वातंत्र्य दिन साजरा करीत असताना संविधान असणे आणि ते नसणे यातील फरक उठून दिसणारा आहे. डॉ. दुष्यंतकुमार यांच्यासारखा कवी लिहून जातो त्याप्रमाणे..

‘सामान कुछ नही है फटेहाल है मगर

झोले में उसके पास कोई संविधान है’

तेव्हा या संविधानाचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी लक्षात घेणे म्हणजे खरे ध्वजवंदन.