सुलभ, आवडती उत्तरे?

‘पोरकट आणि प्रौढ’ हा अग्रलेख (२१ ऑक्टोबर) वाचल्यावर समजले की, गेल्या काही दिवसांत ‘लोकसत्ता’चे बरेच मतपरिवर्तन होऊन भाजपचे नेते प्रौढ झाले आहेत, असे या वृत्तपत्राला वाटते आहे, हे लक्षणीय आहे.

‘पोरकट आणि प्रौढ’ हा अग्रलेख (२१ ऑक्टोबर) वाचल्यावर समजले की, गेल्या काही दिवसांत ‘लोकसत्ता’चे बरेच मतपरिवर्तन होऊन भाजपचे नेते प्रौढ झाले आहेत, असे या वृत्तपत्राला वाटते आहे, हे लक्षणीय आहे. ठाकरेंनी उर्मट, अशोभनीय भाषा वापरली हे तर खरेच; पण स्वराजबाई जे बोलल्या ते किंवा खडसे जे बोलले ते प्रौढ राजकारणाचे लक्षण आहे काय? काँग्रेसने यादरम्यान जी भाषा वापरली त्यात मला तरी काही आक्षेपार्ह (वा ‘पोरकट’) आढळले नाही. शिवसेना कायम शैशवात राहू पाहते आणि प्रौढ कधी होणारच नाही हे एकदम मान्य. राष्ट्रवादी सदस्य स्वघोषित टगे आहेत. गेल्या महिन्याभरात शिवसेनेने जी किरकिर केली त्याबद्दल आपण पुरेसा आणि योग्य समाचार घेतला आहेच. पण हे सगळे होत असताना भाजपचे विक्रयतंत्र जणू एवढे आवडल्याप्रमाणे ‘लोकसत्ता’ भाजपच्या परिपक्वतेबद्दल अचानक प्रमाणपत्रे देते, हे अनाकलनीय आहे. वास्तवात सध्या भाजपची सूत्रे ज्यांच्या हाती आहेत त्यांचे चरित्र आणि इतिहास ‘लोकसत्ता’ने पूर्वी वारंवार वर्णिला आहे.
अभूतपूर्व परिस्थिती आणि उत्तम विक्रय-तंत्र यापेक्षा अधिक काही भाजपने करून दाखविले नव्हते की जेणेकरून त्यांना लोकसभा आणि आता विधानसभेत बहुमत मिळावे. तरीही अग्रलेखांतून ‘महाराष्ट्रात सर्वत्र आíथक प्रगतीचे वारे वाहत आहेत’ यासारखे निष्कर्ष कोणत्या आधारावर काढले जातात हे नकळे. आजही ग्रामीण जनता त्याच जुन्या प्रश्नांची उत्तरे शोधीत असता, मोदी-विजय हा प्रगतीच्या आसेने झाला आहे हे म्हणणे म्हणजे सुलभ उत्तर आहे.
काँग्रेसचा ‘पोरकटपणा’ असे या अग्रलेखातून सुचवायचे आहे तेही अयोग्य वाटते. काँग्रेसकडे सध्या उत्तम नेतृत्वाचा अभाव आहे हे तर खरेच आहे, ते काही चुका करतात हेही खरे; पण म्हणून त्यांना अस्तंगत होणारा पक्ष म्हणून बघणे अतिरेकी विचार आहे. साधा नतिक विचार हा मराठी कपाळकरंटेपणा असेल तर तो असो, व्यवहारी तडजोडीत नतिक मूल्ये धाब्यावर बसविणे हे ‘लोकसत्ता’ला व्यवहार्य वाटत असेल तर ‘काळ बदलला’ एवढेच म्हणता येईल. परंतु समाजवादी, कल्याणकारी राज्यकर्त्यांची गरज सरलेली नाही, हे लोकांत मिसळतात त्यांना पटेल. तेव्हा २८ टक्के मते मिळवणारे सर्वप्रिय आहेत हा समज प्रथम दूर सारावा. उरलेले ७२ टक्के मतदार हे विकासाचे मॉडेल नाकारत आहेत हे विसरू नये.
लोकशाहीच्या प्रक्रियेने जे सरकार बनायचे ते बनेल, त्याच्याविषयी आकस ठेवण्याचे कारण नाही. मतदार केवळ एकाच उमेदवारास मतदान करीत असतात, शेजारील मतदारसंघात काय घडावे यावरही मतदाराचे नियंत्रण नसते, तेव्हा ‘प्रौढ राजकारणाच्या बाजूने कौल देणे’ वगरे..  स्वत:ला आवडेल असे उत्तर मिळविण्याचा विश्लेषक प्रकार वाटतो.  

चढवा सत्तेला ‘अभिसरणा’वर!
‘राष्ट्रवादीचे सहकार्य घेण्यात गर काय?’ या शीर्षकाचे पत्र (लोकमानस, २२ ऑक्टो.) वाचले. विचार, मनोरंजक आणि उपरोधिक वाटले.
 भाजप आणि राष्ट्रवादीची विचारधारा समान आहे, आíथक धोरणे समान, तसेच राज्यातील सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया अधिक व्यापक होईल, या दोघांच्या एकत्र येण्यामुळे हे विचार तर खरेच मोलाचे आहेत. शिवाय ‘लवासा’, सारखी शहरे विकसित करावीत अशी दोन्ही  पक्षांची भूमिका आहेच! आणि ‘वेगळ्या विदर्भालाही राष्ट्रवादीचा विरोध नाही.. मग आणखी काय पाहिजे ?’ हा युक्तिवाद खरेच बिनतोड आहे. मोदी सरकारचा गांधीवाद + पटेलवाद आणि शरद पवारांचा राष्ट्रवाद हे एकत्र आल्याने तर काय बहार होईल! खरे म्हणजे हे निवडणुकीपूर्वी आधीच कुणाच्या लक्षात कसे आले नसेल?
‘कार्यक्षम, निर्णयक्षम, परिणामकारक शासन देण्यासाठीही राष्ट्रवादीचा पाठिंबा भाजपला उपयोगाचा ठरेल,’ या विचाराला आणखी एक जोड देणे माझ्या मते उपकारक होईल – एवढे जर सारे विचार भाजप आणि राष्ट्रवादीचे एक आहेत, तर मग बाहेरून पाठिंबा देण्यापेक्षा, सरळ एकत्रितपणे सरकारच स्थापन करावे की! कोणी रोखले आहे?  
आणि आणखी एक करावे :  नितीन गडकरी मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री, अशी जोडी जमवावी; म्हणजे झाले! ओबीसी आणि मराठा हे दोन्ही समाज हे दोन पक्ष एकत्रित येण्यामुळे पाठीमागे राहतीलच. राष्ट्रवादीचे अनेक लोक हे आधीच भाजपच्या वळचणीला गेलेलेच आहेत. आता पुढची पाच वष्रे जनताही विचारणार नाही. ’दीर्घकालीन सामाजिक अभिसरणाची दिशा’ दाखविण्यासाठी पुलोदचा अनुभव गाठीशी असणारे शरद पवार आहेतच!
तेव्हा, हा सामाजिक अभिसरणाचा नवीन प्रयोग एकदा होऊनच जाऊ द्या!
– अ‍ॅड. प्रभाकर येरोळकर, लातूर

अस्मिता कालबाह्य होत नसते
‘पोरकट आणि प्रौढ’ (२१ ऑक्टो.) हा अग्रलेख आणि त्यावरील चच्रेमधील मराठी अस्मिता कालबाह्य़ झाली असल्याचा सूर हे वाचून आश्चर्य वाटले. माणसाच्या मनातील अभिमान आणि अस्मिता या गोष्टी कधी तरी कालबाह्य होतील काय? भारतीयाला भारताबद्दल, अमेरिकन माणसाला अमेरिकेबद्दल, चिनी माणसाला चीनबद्दल आणि बांगलादेशी माणसाला बांगलादेशाबद्दल अभिमान आणि अस्मिता असणे हे आपल्याला कालबाह्य वाटत नाही. इतकेच नव्हे तर बंगाली, तमिळ, कानडी, बिहारी माणसांनी स्वभाषा आणि स्वसंस्कृतीबद्दल अस्मिता आणि अभिमान बाळगणे यातदेखील आपल्याला काही वावगे वाटत नाही. मात्र मराठी माणसांनी तशाच भावना बाळगणे हे मराठी माणसालाच कालबाह्य व संकुचितपणाचे लक्षण वाटावे, याचे मला आश्चर्य वाटते. मराठीच्या अस्मितेला कालबाह्य म्हणणारे पत्र, (२२ ऑक्टो.) यामुळेच पटत नाही.
 बांगलादेशाचे स्वातंत्र्य, रशियाची शकले, स्कॉटलंडची थोडक्यात हुकलेली स्वातंत्र्याची मागणी अशा विविध घटना प्रादेशिक स्वाभिमान आणि अस्मितेच्या भावनांमधूनच जन्माला येत असतात. माणूस हा मुळातच समाजप्रिय असतो आणि कुटुंब, गाव, जिल्हा, राज्य, देश, जग, विश्व अशा सामाजिक सर्व पातळ्यांवर अस्मिता आणि स्वाभिमान वाटणे ही समाजप्रिय मानवाची नसíगक भावना असते. जगातील सर्व देशांत आणि भारतातील सर्व राज्यांत ती स्पष्टपणे दिसून येते. थोडक्यात म्हणजे माणसाची अस्मितेची आणि स्वाभिमानाची भावना कालबाह्य होऊच शकत नाही. राजकीय स्वार्थासाठी काही पक्ष तिला भडकवतात तर इतर काही पक्ष तिला नाकारून दुर्बळ करू पाहतात. हा संघर्ष चालूच राहील.
महाराष्ट्रात पोटापाण्यासाठी येऊन स्थायिक झालेल्या लोकांना जशी मुंबई वेगळी काढायची आहे, तसेच महाराष्ट्राची मुंबईही करायची आहे. अस्मितेचे खच्चीकरण ही त्यासाठीच्या प्रचाराची प्राथमिक पायरी आहे. अशा प्रचाराला स्वाभिमानी मराठी माणसांनी आणि विचारवंतांनी बळी पडू नये.
– सलील कुळकर्णी, कोथरूड (पुणे)

गेली लक्ष्मी कुणाकुणाकडे..
‘थांब लक्ष्मी..’  (२३ ऑक्टो.) या अग्रलेखात, ऐन सणासुदीच्या काळात लक्ष्मीची घेतलेली चौफेर झाडाझडती वाचली. ‘बळीच्या तावडीतून लक्ष्मीची सुटका’ व्हायला यावर्षी तरी दसऱ्याच्या आधीपासून सुरवात झाली असणार. जेव्हा मध्यमवर्गीय ‘आपटय़ाचं सोनं’ वाटत होते तेव्हाच आपटाआपटीसाठी किती सोनं (चंचल लक्ष्मीचं मोहक अन शाश्वत रुपडं! ) चलनात आणायचं याचे आडाखे बांधले गेले असणारच ! उगाच  नाही चारचाकीच्या रथातून लक्ष्मी चहुदिशांना चौखूर दौडत होती. तिचा वरदहस्त पडून कितीएक मालामाल झाले असणार. साक्षात अनेक मतदार लाभान्वित झाले तर काही मध्यस्थही महालाभान्वित झाले असणार. ‘पाण्यातला मासा पाणी केव्हा पितो हे  जसं कळत नाही तसा लालची अधिकारी लाच (पुन्हा लक्ष्मीच) केव्हा घेतो हे समजत नाही’ असं चाणक्यांनी नमूद केलं होतं. याच्या जोडीला कालमानानुसार अनेक आले त्यात काही मतदारांचा समावेश करावा  लागेल! पसा ( लक्ष्मी) कधीच लपून बसत नाही. तो घरापासून दारापर्यंत, छतापासून तळापर्यंत अन गळ्यापासून ‘गाळ्यां’पर्यंत अत्रतत्रसर्वत्र धुमाकूळ घालतो, हेही हा अग्रलेख सांगतो!
– विजय काचरे, कोथरुड, पुणे.

‘लक्ष्मीपूजन’ पर्यावरणस्नेही हवे!
संपत्ती निर्माण करताना श्रीमंतीचे ध्येय ठेवणे वाईट नाही, हे ‘थांब लक्ष्मी..’ या अग्रलेखात (२३ ऑक्टो.) उल्लेख झालेले तत्त्व मान्य केले, तरी असे करताना पर्यावरणाचा समतोल कुठल्याही प्रकारे ढासळणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. परंतु, या महत्त्वपूर्ण गोष्टीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे निसर्गाची हानी झाली आहे हे मान्य केलेच पाहिजे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत तापमानात विलक्षण बदल अनुभवण्यास येत आहेत असे तज्ज्ञमंडळी आपणास सांगत आहेतच.
– केतन र. मेहेर, विरार (पूर्व)
 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Answer to loksatta editorial on 21 october

ताज्या बातम्या