scorecardresearch

फरक काय पडणार?

मुंबईत फक्त २६/११च काय पण त्याआधी आणखीही काही घातपाती कारवाया घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न होता

David Headley,डेव्हिड हेडलीची चौकशी
डेव्हिड हेडलीची चौकशी

दाऊद गिलानी ऊर्फ डेव्हिड हेडली याच्या ताज्या कबुलीजवाबामुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमे हर्षवायू झाल्यासारखी वागत असली तरी हे हर्षांचे भरते अगदीच कुचकामी आणि अस्थानी आहे. याचे कारण या हेडलीने ताज्या कबुलीजवाबात नवीन असे काय सांगितले? आपण पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणेच्या इशाऱ्यावरून जे काही करायचे ते करीत होतो, लष्कर-ए-तय्यबाशी आपला संबंध होता, मुंबईत फक्त २६/११च काय पण त्याआधी आणखीही काही घातपाती कारवाया घडवून आणण्याचा आमचा प्रयत्न होता, आपल्याला दिली गेलेली शस्त्रे पाक लष्कर आणि संबंधितांनी पुरवलेली होती, माझे मूळचे नाव दाऊद गिलानी पण भारतात येणे सुकर व्हावे म्हणून आपण डेव्हिड हेडली असे नाव घेतले, माझे खरे नाव आणि नामांतर हा तपशील पाकिस्तानी आयएसआयला ठाऊक होता वगरे पोपटपंची अमेरिकेच्या सुखासीन िपजऱ्यात बसून या हेडली याने केली आणि तितक्याच उत्साहात जणू काही नवीन काही माहिती हाती गवसली आहे, अशा थाटात उज्ज्वल निकम यांनी ही पोपटपंची माध्यमांसमोर केली; परंतु प्रश्न हा की यातील काय नक्की आपल्याला माहीत नव्हते? आणि या पोपटपंचीत साजरे करण्यासारखे काय? अमेरिकेने यास आपल्या हाती दिले असते आणि आपण त्यास मुंबईत आणू शकलो असतो तर ही हेडली वचने साजरी करणे एक वेळ समर्थनीय ठरले असते. पण तसे काही झालेले नाही. अमेरिकी सरकारचा आणि त्याहीपेक्षा मुख्य म्हणजे अमेरिकी गुप्तहेर यंत्रणेचा- सीआयएचा- पाहुणा म्हणून हेडली सुखात अमेरिकी तुरुंगात आहे. त्याला पाकिस्तान आणि भारत या दोघांपासून वाचवण्याची जबाबदारी अमेरिकी यंत्रणा चोखपणे पार पाडत आहेत. त्यांच्या या कर्तव्यात आपण कितीही डोके आपटले तरी कसूर होण्याची शक्यता नाही. त्यांची आपल्यावर त्यातल्या मेहेरबानी इतकीच की निदान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तरी त्याची जबानी नोंदवण्याचा विशेषाधिकार भारतीय यंत्रणेला अमेरिकेने दिला. तेव्हा यात आपण हुरळून जावे असे काहीही नाही. त्याच्या या ताज्या जबानीमुळे पाकमध्ये सरकारपुरस्कृत आणि सरकारबाह्य दहशतवाद असे काहीही नाही, जे काही आहे, ते सर्व सरकार पुरस्कृतच याचाही साक्षात्कार आपल्याकडे झाला. पण ही बाबदेखील नवीन मानावयाची काय? पाकिस्तानच्या अध्यक्षपदी जनरल झिया उल हक आल्यापासून पाकिस्तानची आयएसआय ही गुप्तहेर संघटना अन्य एखाद्या दहशतवादी संघटनेसारखीच वागत होती ही बाब आता चावून चोथा होईल इतकी चघळली गेली आहे. तेव्हा त्यातही काही नवीन नाही. हेडलीच्या ताज्या जबानीमुळे पाकिस्तानचा कसा २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यांमागे होता, हे आता पुन्हा सिद्ध होईल असेही काही तज्ज्ञ म्हणतात. ते ठीक. पण त्यामुळे काय फरक पडणार हा प्रश्न आहे. भारतात जमेल त्या मार्गानी जमेल तितकी अस्थिरता माजवणे हा पाकिस्तानचा एकपात्री कार्यक्रम आहे यात आता काहीही नवीन नाही. तेव्हा हेडली असो की आणखी कोणी. ते त्याबरहुकूम उचापत्या करीत राहणार हे उघड आहे. तेव्हा प्रश्न ते काय करणार हा नाही, तर त्यांनी वाटेल ते करूनही आपण काय करणार हा आहे. तेव्हा हेडलीच्या ताज्या जबानीला उगा महत्त्व देण्याचे काहीही कारण नाही. ‘उससे क्या होगा’ हा उर्मट प्रतिप्रश्न आपल्याला विचारला जाण्याआधीच आपण सावध असायला हवे.

मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-02-2016 at 01:29 IST

संबंधित बातम्या