scorecardresearch

अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४४. गफलत (उत्तरार्ध)

आपली सारी धडपड ही शाश्वतासाठीच सुरू असते पण शाश्वताबाबतच्या आपल्या आकलनातील गफलतीमुळे आपल्या शोधाची दिशा आणि प्रयत्न यात गफलत निर्माण होते. जे कायमचं टिकणारं नाही तेच मिळविण्यात, टिकवण्यात आपला सारा वेळ, सारी शक्ती, सारे प्रयत्न खर्ची होत असतात. कबीर म्हणतात, ‘‘कबीर थोडम जीवना, माँडे बहुत मँडान। सबहि उभा में लगि रहा, राव रंक सुल्तान।।’’ जीवन कोणत्या क्षणी नष्ट होईल, याचा भरवसा नाही. म्हणूनच जीवन क्षणभंगुर आहे, असं म्हणतात.

आपली सारी धडपड ही शाश्वतासाठीच सुरू असते पण शाश्वताबाबतच्या आपल्या आकलनातील गफलतीमुळे आपल्या शोधाची दिशा आणि प्रयत्न यात गफलत निर्माण होते. जे कायमचं टिकणारं नाही तेच मिळविण्यात, टिकवण्यात आपला सारा वेळ, सारी शक्ती, सारे प्रयत्न खर्ची होत असतात. कबीर म्हणतात, ‘‘कबीर थोडम जीवना, माँडे बहुत मँडान। सबहि उभा में लगि रहा, राव रंक सुल्तान।।’’ जीवन कोणत्या क्षणी नष्ट होईल, याचा भरवसा नाही. म्हणूनच जीवन क्षणभंगुर आहे, असं म्हणतात. तर अशा या अल्पकाळच्या जीवनात किती पसारा माणूस वाढवत राहातो! आपण मागेच पाहिलं ना? की जेवढा पसारा बाहेर दिसतो त्याच्यापेक्षा कितीतरी पसारा मनात असतो! आपण लहानशा घरात राहात असू तर आपल्या मनात मोठमोठय़ा घरांमध्ये राहाण्याच्या कल्पनांचा पसाराच पसारा असतो. कितीतरी गोष्टी करायच्या असतात, कितीतरी वस्तू विकत घ्यायच्या असतात, कितीतरी नाती निर्माण करायची असतात.. माणसाचं मन म्हणजे इच्छा, अपेक्षा, कल्पना यांच्या पसाऱ्यानं भरलेली अडगळीची खोलीच झालं असतं. त्यातला फार थोडा पसारा प्रत्यक्षात तो उभा करतो पण भौतिकाचा तेवढा पसाराही त्याला गुंतवून टाकण्यात समर्थ असतो. काळाच्या तोंडी असलेल्या या जीवनात किती पसारा मांडलाय. हा पसारा वाढविण्याची, टिकविण्याची चिंता सगळीकडे एकसारखीच आहे. या चिंतेच्या आगीत गरीब, श्रीमंत आणि राजेमहाराजेही होरपळतच आहेत. रस्त्यावर राहणाऱ्याला आपल्या बोचक्याची चिंता आहे तर प्रासादतुल्य घरात राहणाऱ्याला त्याच्या कोटय़वधी रुपयांच्या बोचक्याची चिंता आहेच. थोडक्यात ज्याचा पसारा जास्त तो जास्त सुखी असेही नाही किंवा ज्याचा पसारा कमी तो जास्त सुखी असेही नाही. दोघेही दुखीच, कारण आहे तो पसारा प्रत्येकालाच अपुरा वाटतो. नेमकं किती मिळालं म्हणजे मी सुखी होईन, हे माणसाला सांगता येत नसल्यानं कितीही मिळालं तरी तो सुखी होत नाही, असं श्रीगोंदवलेकर महाराजांचं मार्मिक वचन आहे. तेव्हा आहे ते माणसाला अपुरं वाटतं, जे अपुरं आहे त्यात त्याला सुख नाही. याचं कारण? अगदी खोलवर विचार केलात तर जाणवेल, कितीही मिळवा, मिळवायचं असं जगात राहूनच जातं. मग ते स्थूल भौतिक असो की सूक्ष्म ज्ञान असो! पूर्ण सुख, पूर्ण शक्ती, पूर्ण समाधान, पूर्ण ज्ञान मर्यादाबद्ध जिवाला मिळवता येत नाही. पण जन्मापासूनच माणसाची सारी धडपड पूर्ण सुखासाठीच सुरू असते कारण परमपूर्ण अशा परमतत्त्वातूनच हे चराचर निर्माण झालं आहे आणि त्या पूर्णाचाच अंश असलेल्या जिवाला आपली अपूर्णता सहन होत नाही. तेव्हा माणसाला जन्मापासूनच पूर्णत्वाची ओढ आहे फक्त खरं पूर्णत्व कशात आहे, याबाबतच्या त्याच्या आकलनात गफलत असल्यानं पूर्णत्वासाठीच्या त्याच्या शोधाची दिशा आणि शोधाचे प्रयत्न यात गफलत असते!

मराठीतील सर्व अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक ( Arupache-roop-sathyamargdarshak ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Arupache roop sathyamargdarshak

ताज्या बातम्या