|| डॉ. मनोज पाथरकर

सत्तास्पर्धेशी अपरिहार्यपणे संबंध आल्याने कट्टरतेकडे झुकणारा राष्ट्रवाद ‘सत्या’ची जाणीव बधिर करून माणसांचे माणूसपण हिरावून घेऊ  शकतो. या प्रक्रियेचे विश्लेषण जॉर्ज ऑर्वेलने १९४५ सालीच ‘नोट्स ऑन नॅशनॅलिझम’ या निबंधात केले होते. त्या निबंधाचा हा सारांशानुवाद..

NCP releases manifesto
भाजपला नकोसे मुद्दे राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात; जातनिहाय जनगणना, किमान आधार मूल्याचे अजित पवार गटाकडून आश्वासन
Actor Makrand Anaspure
महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर मकरंद अनासपुरेंचं परखड भाष्य, “आम्हा मतदारांची फसवणूक…”
Ramtek Lok Sabha
‘भाजपच्या ‘धृतराष्ट्र’ने नैतिकतेचे वस्त्रहरण निमूट बघितले’, कोणाला उद्देशून केला आरोप जाणून घ्या…
Bhiwandi lok sabha
महाविकास आघाडीत भिवंडीची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला ?

राष्ट्रवादाच्या विविध छटा लक्षात घ्यायच्या असतील तर हा शब्द थोडय़ा वेगळ्या अर्थाने वापरायला हवा. राष्ट्रवाद जसा विशिष्ट भौगोलिक परिसराशी जोडलेला असतो तसाच तो एखाद्या वंशाशी, धर्मपीठाशी अथवा वर्गाशीही जोडलेला असू शकतो. कधी कधी तो केवळ कशाच्या तरी विरोधात कार्यरत असतो. अशा ‘अतिराष्ट्रवादा’चे पहिले गृहीतक म्हणजे माणसांचे कीटकांप्रमाणे वर्गीकरण केले जाऊ  शकते आणि त्यांच्यावर एकगठ्ठा ‘चांगली’ अथवा ‘वाईट’ असा शिक्का मारला जाऊ  शकतो. इथे हे सांगायला हवे की, ‘राष्ट्रवाद’ आणि ‘देशभक्ती’ या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. देशभक्ती म्हणजे विशिष्ट प्रदेश व तिथली जीवनपद्धती यांच्याबद्दल मनापासून असलेली आस्था. जगात सर्वश्रेष्ठ वाटत असली तरी आपली जीवनपद्धती दुसऱ्यावर लादण्यात देशभक्ताला रस नसतो. म्हणजेच देशभक्ती सत्तेशी जोडलेली नसते; ती लष्करी आणि सांस्कृतिकदृष्टय़ा बचावात्मक असते. याउलट, राष्ट्रवाद सत्ताभिलाषेला कायम जोडलेला असतो. प्रत्येक राष्ट्रवाद्याचे अढळ उद्दिष्ट असते- आपल्या राष्ट्राला (वा गटाला)अधिकाधिक शक्तिशाली करणे, त्यास प्रतिष्ठा प्राप्त करून देणे.

अतिरेकी राष्ट्रवादाच्या वैशिष्टय़ांबद्दल आणखी बोलण्यापूर्वी काही गोष्टी अगोदरच स्पष्ट करणे योग्य होईल. प्रत्येक व्यक्ती राष्ट्रवादाच्या प्रभावाखाली नसते. राष्ट्रवादाशी संबंध नसलेल्या चांगल्या उद्दिष्टांसाठी राष्ट्रवादाचा स्वीकार केला जाऊ  शकतो. एकाच व्यक्तीत परस्परविरोधी राष्ट्रवादी विचार वास करीत असतात. आणि कुणीही सदासर्वदा या भावनेच्या प्रभावाखाली नसतो. मात्र, सुज्ञ व्यक्तीही एखाद्या गाफील क्षणी तिला निर्थक वाटणाऱ्या समजाला बळी पडू शकते. एखाद्या क्षुल्लक गोष्टीचा उल्लेख राष्ट्रवादाची तार छेडून जातो आणि खिलाडूवृत्तीच्या सुस्वभावी व्यक्तीही दुष्ट पक्षपाती माणसांचे रूप धारण करतात. त्यांचा वैचारिक सभ्यपणा गळून पडतो, ती भूतकाळ बदलू पाहतात आणि उघड सत्ये नाकारू लागतात. अशा अवस्थेत ती कोणताही वेडगळपणा पचवू शकतात. राष्ट्रवादाच्या अतिरेकातून येणाऱ्या भीती, असूया, सत्ताभिलाषा सत्याची जाणीव बोथट करतात आणि दयाभावना हद्दपार करतात.

राष्ट्रवादी नेहमीच स्पर्धात्मक प्रतिष्ठेच्या भावनेने विचार करतो. म्हणजे तो आपली भावनिक ऊर्जा एक तर एखाद्या गटाचा उदोउदो करण्यासाठी वापरतो, नाही तर दुसऱ्या एखाद्या गटाचा उपमर्द करण्यासाठी. त्याचे विचार नेहमी ‘विजय आणि पराभव’, ‘सन्मान आणि मानहानी’ अशा स्पर्धेच्या परिभाषेतच असतात. त्याच्या दृष्टीने इतिहास म्हणजे सत्तास्थानांच्या उदयास्ताची मालिका असतो. प्रत्येक घटना त्याच्यासाठी स्वत:ची बाजू उत्कर्षांकडे वाटचाल करीत असल्याचा आणि आपला स्पर्धक रसातळाकडे जात असल्याचा पुरावा असते. परंतु म्हणून तो अधिक शक्तिशाली पक्षाला जाऊन मिळतो असेही नाही. उलट, एखादा पक्ष घ्यायचा ठरविला की, तोच कसा शक्तिशाली आहे हे स्वत:ला पटवून देतो तो राष्ट्रवादी! त्याविरुद्ध कितीही पुरावा समोर दिसला तरी तो आपल्या विश्वासाला चिकटून राहू शकतो. तसेच महत्त्वाच्या जागतिक प्रश्नांची चर्चा राष्ट्रवादाच्या प्रभावाखाली होत असल्याने ती विवेकाने आणि तारतम्याने होईलच याची खात्री नसते.

अतिराष्ट्रवाद ही आत्मवंचनेच्या आवरणाखाली दडलेली सत्ताभिलाषाच! उघड अप्रामाणिकपणा करतानाही आपण बरोबर असल्याचा दृढ विश्वास त्यातूनच येतो. अशा राष्ट्रवाद्यांना राजकीय वा लष्करी विश्लेषकांकडून वास्तवाच्या मूल्यमापनाची अपेक्षा नसते. त्यांना हव्या असतात राष्ट्रनिष्ठा चेतविणाऱ्या गोष्टी. म्हणूनच विश्लेषकांनी वास्तव समजण्यात केलेल्या सर्व चुका ज्योतिषांप्रमाणे त्यांना माफ असतात. सर्व प्रकारचा राष्ट्रवाद सारखा नसतो; परंतु त्याच्या प्रत्येक प्रकाराला लागू होणारे काही नियम असतात. सर्व प्रकारच्या राष्ट्रवादांत दिसून येणारी वैशिष्टय़े पुढीलप्रमाणे सांगता येतील :

(१) पछाडलेला असणे – अतिराष्ट्रवाद्याचे लिहिणे, बोलणे आणि विचारदेखील आपल्या सत्तागटाच्या वर्चस्वाभोवती फिरत असतात. आपली निष्ठा लपविणे त्याला जवळजवळ अशक्य असते. आपल्या गटाच्या दोषांवर कुणी बोट ठेवलेले वा त्याचा अपमान केलेले त्याला आवडत नाही. प्रतिस्पर्धी गटाची अप्रत्यक्ष स्तुतीदेखील त्याला अस्वस्थ करते. एखादा प्रतिटोला हाणल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. त्याची निष्ठा जर एखाद्या ‘देशा’शी निगडित असेल तर हा देश लष्करी सामथ्र्य आणि राजकीय शुचिता यांबाबत श्रेष्ठ असल्याचा त्याचा दावा असतो. तो छातीठोकपणे सांगतो की- आपल्या देशातील साहित्य, कला, खेळ, भाषेची रचना, देशबांधवांचे शारीरिक सौंदर्य, इतकेच नव्हे तर देशाचे हवामान, निसर्गसौंदर्य आणि पाककलाही सर्वश्रेष्ठ आहेत!

(२) दृष्टिकोनातील अस्थैर्य – कितीही तीव्र असल्या तरी राष्ट्रवादी भावना एका गोष्टीकडून दुसऱ्या गोष्टीकडे वळू शकतात. वर्षांनुवर्षे पूजनीय असलेला देश अथवा गट अचानक तिरस्काराचा धनी होऊ  शकतो. मात्र, ही रिक्त जागा लगेच दुसऱ्या कशाने तरी भरली जाते. स्थिर असते ती राष्ट्रवाद्याची मनोवस्था; ज्या गोष्टीला ही मनोवस्था जोडलेली असते ती गोष्ट बदलू शकते. कधी कधी तर अशा गोष्टीचे अस्तित्व केवळ कल्पनेतच असते!

(३) वास्तवाबद्दलची उदासीनता – एकाच प्रकारच्या तथ्यांमधील साम्य पाहू न शकण्याची ‘दिव्यशक्ती’ प्रत्येक अतिराष्ट्रवाद्याला लाभलेली असते! अतिराष्ट्रवाद्यांसाठी कोणतेही कृत्य चांगले अथवा वाईट हे घडणाऱ्या घटनेवरून नाही, तर ते कृत्य ‘कुणी’ केलेले आहे यावरून ठरते. कोणतीही धक्कादायक गोष्ट- शारीरिक छळ, ओलिसांचा वापर, सक्तीचे श्रम, जथ्याने हद्दपारी, खटल्याशिवाय तुरुंगवास, बनावट कागदपत्रे, हत्या किंवा नि:शस्त्र जनांवरील बॉम्बहल्ले – ‘आपल्या’ लोकांनी केलेली असल्यास स्पृहणीय ठरते. मात्र इतरांनी केल्यास ती तिरस्करणीय ठरते. हे केवळ वर्तमानालाच नव्हे, तर इतिहासालाही लागू असते. कारण इतिहासाचा विचार बहुधा राष्ट्रवादी दृष्टिकोनातूनच केला जातो. राष्ट्रवादी विचारांतील काही तथ्ये एकाच वेळी खरी आणि खोटी, ज्ञात आणि अज्ञात असतात. अस असलेले ज्ञात सत्य मनातून काढून टाकावे लागते. मात्र, त्याच वेळी हे सत्य प्रत्येक डावपेचात आणि समीकरणात गृहीत धरायचे असते.

‘इतिहास बदलला जाऊ  शकतो’ या भावनेने प्रत्येक अतिराष्ट्रवादी झपाटलेला असतो! आपला बराच काळ तो काल्पनिक जगात वावरत असतो. या कल्पित जगातील घटना त्याला हव्या तशा घडत असतात. या काल्पनिक जगाचे तुकडे इतिहासाच्या पुस्तकांत घुसडले जातात. आजच्या काळातील बरेचसे प्रचारकी लिखाण खोटय़ा कागदपत्रांवर बेतलेले असते. उघड तथ्ये लपविली जातात, तारखा बदलल्या जातात, अवतरणे संदर्भापासून तोडून अशा रीतीने वापरली जातात, की त्यांचा अर्थच बदलून जावा. ज्या घटना घडायलाच नको होत्या असे राष्ट्रवादी मनाला वाटते त्यांचा उल्लेख टाळून त्यांचे अस्तित्वच नाकारले जाते. समकालीनांच्या मतांवर प्रभाव टाकण्याच्या दृष्टीने इतिहासाचे हवे तसे पुनर्लेखन केले जाते. हे करताना आपण वास्तविक तथ्ये इतिहासाला परत करीत आहोत असा दावा केला जातो.

काही ऐतिहासिक घटनांबद्दलचा कोणताही दावा अंतिमत: सिद्ध न होणारा किंवा पूर्णपणे खोडलाही जाऊ  न शकणारा असतो. याचा फायदा घेऊन बेमुर्वतपणे (उपलब्ध) तथ्ये नाकारली जातात. तसाही सत्ता, विजयश्री, पराभव, सूड, इत्यादींच्या विचारात मग्न असलेला राष्ट्रवादी खरोखर काय घडते आहे, हे जाणून घेण्यास फारसा उत्सुक नसतो. तथ्ये आपल्या बाजूने आहेत की नाही, हे पडताळून पाहण्यापेक्षा विरोधकाला चूक ठरविणे जास्त सोपे असते! यांपैकी काही मंडळी वास्तव जगाशी अर्थाअर्थी संबंध नसणाऱ्या दिग्विजयाच्या स्वप्नांमध्ये वावरत असतात. परस्परांना छेद देणाऱ्या अशा अनेक भ्रमांनी आणि द्वेषांनी हे जग ग्रस्त आहे.

अतिरेकी राष्ट्रवादी निष्ठा व त्यातून जन्मलेल्या द्वेषभावना आपल्या सर्वाच्याच जडणघडणीचा भाग झालेल्या आहेत. त्यांच्यापासून पूर्ण मुक्ती शक्य आहे की नाही, हे सांगणे अवघड आहे. परंतु त्यांच्याशी लढा निश्चितच दिला जाऊ  शकतो. आपण काय आहोत, आपल्या भावना कोणत्या बाजूला झुकलेल्या आहेत हे प्रथम ध्यानात घ्यायला हवे. कुणाबद्दल आपल्या मनात द्वेष अथवा भीती आहे, कोणत्या गटाला आपण कमी लेखतो, हेही लक्षात घ्यायला हवे. या भावनांचे मनातील अस्तित्व मान्य केल्यानंतरच आपण आपली विचारप्रक्रिया त्यांच्यामुळे दूषित होणे टाळू शकतो. परंतु यासाठी स्वत:शीच नैतिक लढा देण्याची तयारी हवी.

manojrm074@gmail.com