आज ‘मी’ प्रपंचात पूर्ण आसक्त आहे. प्रपंच हा ‘मी’चा प्राणवायू आहे. जन्मापासून प्रपंच आपला सोबती आहे. ज्याची सोबत आहे त्याची सवय जडते. प्रपंचाची सवय आपल्याला जडते आणि नडतेदेखील. त्यामुळे प्रपंचात राहतानाही परमार्थाची सोबत पाहिजे. श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात, ‘‘पाच जणांपासून सुख मिळविण्याचा मार्ग म्हणजे प्रपंच आणि एकापासून सुख मिळविण्याचा मार्ग म्हणजे परमार्थ होय’’ (चरित्रातील व्याख्याविषयक वचने, क्र. २२१). ‘पाच जणांपासून’ म्हणजे पाच ज्ञानेंद्रियं आणि पाच कर्मेद्रियं यांच्यापासून. या पाचांच्या आधारे बाह्य़ जगातून सुख मिळविण्याची अव्याहत धडपड हाच प्रपंच आहे. आपण मागेच पाहिल्याप्रमाणे पाच ज्ञानेंद्रियं आणि पाच कर्मेद्रियं ही साधनमात्र आहेत. त्यांच्या आधारावर बाह्य़ातून सुख मिळविण्याची खरी आस केवळ ‘मी’लाच आहे आणि गेल्या भागात पाहिल्याप्रमाणे या धडपडीची अखेर असमाधानातच आहे. ‘बंगला बांधावा’ या इच्छेनं माणूस बंगला बांधेलही, पण तेवढय़ानं तो पूर्ण समाधानी होईल, याची हमी देता येत नाही. आज ‘मी’ जे आनंदाचं मानीन, कदाचित उद्या तेच दु:खाचंही मानू शकतो. आज मला जे हवंसं वाटतं तेच उद्या नकोसंही वाटू शकतं. आज मला जे मिळालं की पुरेसं होईल, असं वाटतं तेच उद्या अपुरंही वाटू शकतं. तेव्हा या ‘मी’च्या खोडय़ात अडकून पाचांपासून बाह्य़ातून सुख मिळविण्याची धडपड करण्यापेक्षा, ती धडपड सुरू असतानाच त्या एका परमात्म्याचा आधार मिळविण्याचा आणि टिकविण्याचा प्रयत्न मी सुरू केला पाहिजे, असं संतांचं सांगणं आहे. ‘मी’, ‘माझी’ माणसं, ‘माझे’ भौतिकातले आधार यांच्यातला भ्रामकपणा, कच्चेपणा मला कित्येकदा अनुभवाला येत असतानाही मला ‘माझं’ हे बाह्य़ भौतिक जग सच्चं वाटतं, खरं वाटतं, अस्सल वाटतं. परमात्म्याच्या अस्तित्वाबाबत तो सच्चेपणा नसतो. ‘भगवंत आहे’, अशी पारंपरिक श्रद्धा असते, पण ‘भगवंत आहेच’ हा पक्का अनुभव नसतो. तो होण्यासाठीचा प्रयत्न हाच अभ्यास, हीच साधना, हीच तपश्चर्या. ‘मी’ आणि भगवंत एकच आहोत, ही भावना म्हणजे अद्वैत नव्हे. मी नव्हे तूच आहेस, ही दृढ भावना हेच खरं अद्वैत आहे. ती भावना ‘मी’ या एकाच्या अंताशिवाय अर्थात खऱ्या एकांताशिवाय साधणार नाही. हा एकांत साधायचा तर एका परमात्म्याशीच ऐक्य साधून त्यातच मिसळून जावं लागेल. त्यासाठी अनुसंधान आणि नामस्मरण हाच उपाय आहे. जगात वावरताना क्षणोक्षणी देहाच्या जपणुकीची सुप्त जाणीव मनाला व्यापून असते. हे देहाचं अनुसंधान आहे. जगात वावरताना आणि उपासना करतानादेखील स्वसुखाबद्दलचीच चिंता आणि चिंतन अव्याहत मनात सुरू असतं, हे प्रपंचाचंच अनुसंधान आहे. त्याप्रमाणे जगात वावरताना व प्रपंचातली सर्व कर्तव्यं पार पाडत असतानाही सद्गुरूंचं अर्थात परमात्म्याचं सततच स्मरण हे परमात्म्याचं अनुसंधान आहे. आज परमात्म्याचं पूर्ण विस्मरण झालं आहे. त्याचं स्मरण व्हावं, वाढावं आणि तीच सहजवृत्ती व्हावी, यासाठी नामस्मरण हाच एकमेव आधार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Dec 2013 रोजी प्रकाशित
२४७. खरं अद्वैत
आज ‘मी’ प्रपंचात पूर्ण आसक्त आहे. प्रपंच हा ‘मी’चा प्राणवायू आहे. जन्मापासून प्रपंच आपला सोबती आहे. ज्याची सोबत आहे त्याची सवय जडते.
First published on: 19-12-2013 at 12:04 IST
मराठीतील सर्व चैतन्य चिंतन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaitanya chintan in fact