आनंदें दाटली तिन्ही त्रिभुवनें। सर्वात्मकपणें भोग झाला! ‘आपुले मरण पाहिले म्या डोळा’ या अभंगाची ही फलश्रुती आहे. या अभंगात वर्णिलेली जी स्थिती आहे ती प्राप्त झाली आणि टिकली तर कोणतं फळ मिळतं, या अर्थानं ही फलश्रुती आहे. गद्यात या चरणाचा अर्थ सांगायचा तर, तिन्ही त्रिभुवनं आनंदानं भरून गेली आणि सर्वात्मकपणे त्या आनंदाचा भोग घेता आला. आता इथे नुसतं ‘त्रिभुवने’ म्हटलेलं नाही. ‘तिन्ही त्रिभुवने’ म्हटलं आहे. या शब्दयोजनेमागील गूढार्थाचा नंतर विचार करू. साधकाच्या दृष्टीने या फलश्रुतीचा अर्थ प्रथम जाणून घेऊ.  आपण या जगात जन्माला येतो आणि या जगात ठरावीक काळापर्यंतच आपण जगतो. आपल्याप्रमाणेच अनंत प्रकारचे पशु-पक्षी, जीव-जंतू या सृष्टीत जगत असतात. आपल्यालाच माणसाचा देह का मिळाला, याचा विचार मात्र आपण करीत नाही. वरकरणी पाहात सृष्टी आणि मी वेगवेगळे भासत असलो तरी प्रत्यक्षात मी या विराट सृष्टीचाच एक अत्यंत क्षुद्र घटक असतो. अर्थात या सृष्टीपासून मी अभिन्न असतो. जशी सृष्टी असते तशीच माझीही जडणघडण असते. ही सृष्टी कशी आहे? ती प्रकृतीच्या अधीन आहे. ही प्रकृती सत्, रज आणि तम या तीन गुणांनी बनलेली आहे. या तीन गुणांशिवाय प्रकृती नाहीच. या तीन गुणांचे तीन अधिपती आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश. या तिघांद्वारे या सृष्टीत उत्पत्ति, स्थिती आणि लय अर्थात निर्मिती, पालन आणि नाश असे कार्य चालते. आपलं संपूर्ण जगणंही सत्, रज आणि तम या तीन गुणांच्याच चौकटीत आहे. आपल्या जगण्यालाही उत्पत्ति, स्थिती आणि लय हा नियम लागू आहे. आता थोडं आणखी खोलात जाऊ. जग कसं आहे? आपण सहज म्हणू की जग हे जसं स्थूल आहे तसंच सूक्ष्मही आहे. दृश्य आहे, तितकंच अदृश्यही आहे. पण ते नुसतंच स्थूल आणि सूक्ष्न नाही. ते नुसतंच दृश्य आणि अदृश्य नाही. ते जसं स्थूल आहे, दृश्य आहे, सूक्ष्म आहे, अदृश्य आहे तसंच ते दिव्यही आहे! या जगात जन्मलेला आणि जीवन जगणारा जो ‘मी’ आहे तोही स्थूल आणि सूक्ष्म आहे. स्थूल आहे तो देह आणि सूक्ष्म आहे ते अंत:करण. आता मी केवळ देह आणि मन आहे का? नाही. जग जसं स्थूल, सूक्ष्म आणि दिव्यही आहे तसाच मीदेखील देह आणि मनापलीकडे असलेलं आत्मस्वरूप आहे. आज मला देह आणि मनाची जाणीव आहे पण आत्मस्वरूपाची नाही.
आज आपलं जगणं बहुतांश स्थूल पातळीवरच आहे. मनाच्या ओढींनुसार देहाला राबविण्यात, सजविण्यात, पोसण्यात, जपण्यातच आपण दंग आहोत. अशा स्थितीतल्या आपल्यासारख्या साधकाला तिन्ही त्रिभुवने आनंदाने दाटून सर्वात्मकपणे त्याचा भोग घेण्याचा मार्ग तुकाराम महाराज सांगतात, आपल्या देहबुद्धीच्या मरणाचा अनुपम सोहळा आपल्या डोळ्यांनी पहा! श्रीगोंदवलेकर महाराज हाच मार्ग वेगळ्या शब्दांत सांगतात.. ‘जो आपला हात माझ्या हातात देतो त्याचा हात रामाच्या हाती दिल्याशिवाय मी राहात नाही!’ ऐकायला छान वाटतं पण हात हाती देऊ लागताच त्रिभुवनाला हादरे बसू लागतात!