४०. प्रेमखूण

जीवन-मुक्ती म्हणजे जीवनापासून मुक्ती नव्हे.

जन्मल्यापासून आपण जगत आहोत, पण या जीवनात आपल्याला खरंच काय साधायचं आहे? आपल्याला या जगात, चारचौघांमध्ये प्रतिष्ठेनं जगता येईल, असं भौतिक वैभव प्राप्त करणं, हाच जीवनाचा हेतू आहे, असं आपण कळत्या वयापासून मानू लागतो. नव्हे तोच यशस्वी जीवनाचा मापदंडही असतो. साधनापथावर आल्यावर आणि थोडी प्रामाणिक वाटचाल सुरू झाल्यावर मात्र ‘जीवन्मुक्ती’ हाच जगण्याचा हेतू वा ध्येय असलं पाहिजे, ही जाणीव होऊ लागते. ही जीवन-मुक्ती म्हणजे जीवनापासून मुक्ती नव्हे. तर प्रत्यक्ष जगण्यातली मुक्ती आहे. जीवनाचं बाह्य़रूप बदलणार नाही, परिस्थितीतील सम-विषमता संपणार नाही, प्रपंचातला आपला वावर संपणार नाही, पण जगण्याबाबतची आंतरिक धारणा, आंतरिक दृष्टिकोन हा पूर्ण पालटला असेल. हे साध्य कशानं होईल? आणि हे साध्य झाल्यावर साधकाची आंतरिक स्थिती कशी असेल, हे तुकाराम महाराजांनी एका अभंगात फार मार्मिकपणे मांडलं आहे. अभंग असा आहे :

जाणोनी नेणते करी माझे मन।

तुझी प्रेमखूण देवोनिया॥ १॥

मग मी व्यवहारी असेन वर्तत।

जेवी जळा आत पद्मपत्र॥२॥

ऐकोनी नाईके निंदास्तुती कानी।

जैसा का उन्मनी योगीराज॥३॥

देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी।

स्वप्नीचिया सृष्टी चेइल्या जेवी॥४॥

तुका म्हणे ऐसे झालीयावाचून।

करणे तो शीण वाहतसे॥५॥

या संपूर्ण अभंगात अत्यंत महत्त्वाचा असा शब्द जर कोणता असेल, तर तो ‘प्रेमखूण’ हा आहे! ही प्रेमखूण जर मिळाली ना, तर साधकाच्या जीवनात अशक्य ते शक्य आणि अतक्र्य ते तक्र्य असं साधणार आहे. कोणत्या या अशक्य गोष्टी आहेत हो? तर व्यवहारात असूनही त्यापासून अलिप्त राहणं, िनदास्तुती कानावर पडूनही मनात तिचे पडसाद न उमटणं आणि प्रपंच हा स्वप्नवतच भासून मनानं त्यात न गुंतणं! सर्वसामान्य माणसाला या तिन्ही गोष्टी अशक्यच वाटतात. पण ‘तुझी प्रेमखूण’ मिळाली तर या गोष्टी साधणार आहेत, असं तकाराम महाराज सांगतात. आता ही प्रेमखूण म्हणजे काय हो? एक प्राचीन उदाहरण पाहू. जिचं सर्वस्व प्रभु रामच होते ती सीतामाई रावणाच्या अशोकवनात बंदी होती. बराच काळ लोटूनही, आपल्या सुटकेचा काही प्रयत्न प्रभु करीत आहेत का, आपण लंकेत आहोत, हे तरी त्यांना समजलं आहे का. याबाबत माता पूर्णपणे अनभिज्ञ होती. प्रभु आज ना उद्या येतीलच, हा ठाम आंतरिक विश्वास मात्र होताच. अशात एक दिवस हनुमानजी आले. आपलं बाह्यरूप पाहून मातेचा आपल्यावर विश्वास बसणार नाही, हे जाणून हनुमंतांनी प्रभुंची मुद्रिका मातेच्या दृष्टीस पडेल, अशी टाकली.  मग हनुमंतांनी समोर प्रकट होऊन आपण रामदूत आहोत, हे सांगितलं. लंकेवरच्या स्वारीची कल्पना दिली. तेव्हा ती मुद्रिका म्हणजे प्रभुंच्या प्रेमाची खूण ठरली. त्या प्रेमखुणेनं मातेचं मन प्रगाढ प्रेम, प्रगाढ विश्वास आणि धर्यानं भरून गेलं. रावणाच्या लंकेतही ती प्रेमखूण हाच तिच्या जगण्याचा आधार बनली. रावणाची लंका सोन्याची होती, पण त्या लंकेचा पाया.. लंकेचा अंतरात्मा अधर्माचा होता. फसवा होता. ठिसूळ होता. हे जग तसंच आहे. बाहेरून चकाकणारं आणि आतून काळवंडलेलं. अशाच या जगात वावरण्यासाठी तुकोबांनाही प्रेमखूण हवी आहे!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व चिंतनधारा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta chintan dhara part

ताज्या बातम्या