सोळाव्या शतकात दुल्ला भट्टी या नावाचा एक लोकनायक अकबराच्या सत्तेला ललकारतो. लगान वसुलीला विरोध करतो. त्याचं म्हणणं असं असतं की धरती आमची. घाम आम्ही गाळतो. तर मग शेतात लहरणाऱ्या पिकावर बादशहाची मालकी कशी. दिल्लीचे बुरूज उद्ध्वस्त करण्याची आकांक्षा बाळगून असलेल्या दुल्ला भट्टीच्या आव्हानाची धास्ती अकबर बादशहानेही घेतलेली असते. इकडे पंजाबात येतो तेव्हा मी क्रुद्ध होतो. स्वस्थ वाटत नाही. पंजाबचा मोठा भाग तर मला बादशहा म्हणून स्वीकारायलाच तयार नाही. ही त्याची सल असते. बादशहाच्या या अस्वस्थतेचे निराकरण करण्याचा प्रयत्न त्यावेळी केला जातो.

एक पादरी बादशहाला समजावून सांगण्याचे धाडस करतो. ‘‘तलवारीच्या टोकावर माणसाच्या केवळ शरीराला गुलाम करता येईल. त्याचं मन आणि आत्म्याला नाही. एखादा शहेनशहा साऱ्या पृथ्वीवर राज्य करेल. प्रजेवर आपली मालकी गाजवेल. याउलट एखादा बहाद्दर मात्र सत्तेला डोळा भिडवत लोकांच्या बाजूने उभा राहील. लोकांच्या अंत:करणात अशी एखादी भावना असते जी सत्तेला ललकारते.’’ लोकनायक दुल्ला भट्टी याचा गौरव करणाऱ्या अनेक लोककथा, लोकगीतं आजही पंजाबी लोकांच्या ओठांवर आहेत. बलदेव सिंह या लेखकाची ‘तोडूँ दिल्ली के कंगूरे’ या नावाची मोठी कादंबरी आहे. वरील प्रसंग या कादंबरीतला. अशी रग असणारं आणखीही काही साहित्य या भाषेत वाचायला मिळतं.

पंजाब म्हणजे सिंचनाखाली असलेला भूप्रदेश, वाऱ्यावर लहरणारी इथली हिरवीगार पिके, ट्रॅक्टर असलेला दणकट शेतकरी, असं एक चित्र उभं केलं जातं. तिथली आर्थिक विषमता, सरंजामी व्यवस्थेत पिचणारी श्रमिक जनता, अशा घटकांचे होणारे शोषण या बाबी तशा अपवादानेच साहित्याच्या पटलावर दिसतात. रोखठोक अशा समाजवास्तवाला पंजाबी भाषेत पहिल्यांदा कथा, कादंबऱ्यांमधून स्पर्श केला तो गुरदयाल सिंग यांनी. एक तर ते स्वत: कष्टकरी समाजातून आले होते. वडिलांचा व्यवसाय सुतारकाम करण्याचा. बालपणातच कष्ट अंगी मुरलेले. त्यातच शाळेकडे झालेले दुर्लक्ष. लेखणीऐवजी हातात करवत, खिळे, रंधा, हातोडा अशा कारागिरीच्या गोष्टी आल्या. शिक्षण सुटलेलंच होतं. बालपण करपून जात होतं. जगण्याच्या झोतभट्टीत आयुष्य तावूनसुलाखून निघालं होतं. पण एका गुरुजींनी पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणलं.

गुरदयाल सिंग लिहायला लागले तेव्हा पंजाबीत समाजातल्या खालच्या तळाचं दर्शन अभावानंच येत होतं. आपल्याकडे साहित्यात साठोत्तरी ही संकल्पना आहे. विविध सामाजिक पातळ्यांवरून नव्या जाणिवेचं साहित्य यायला या कालखंडात प्रारंभ झाला होता. तसं पंजाबातही १९६० नंतर गुरदयाल सिंग यांनी अलक्षित आणि परिघाबाहेरचं जगणं साहित्याच्या केंद्रस्थानी आणलं. १९६४ साली ‘मढी दा दिवा’ ही त्यांची पहिली कादंबरी आली. त्यावेळी ते ३१ वर्षांचे होते. त्याआधी पंजाबी भाषेत ऐतिहासिक, धार्मिक आणि सुधारणावादी असे विषय कथा- कादंबऱ्यांमधून आलेले होतेच. पण वर्गसंघर्ष, शोषणाचे स्तर, वंचितांच्या आयुष्यातली सुखदु:ख पहिल्यांदाच एवढ्या सामर्थ्याने आली ती गुरदयाल सिंग यांच्या कादंबऱ्यांमधून. ‘मढी दा दिवा’ या कादंबरीचा हिंदी, इंग्रजीत अनुवाद झालेला आहे. तसं पाहिलं तर ही एक प्रादेशिक कादंबरी. पंजाबातल्या माळवा भागात घडलेलं हे कथानक आहे. हरितक्रांतीच्या पाऊलखुणा नुकत्याच शेतीत दिसू लागल्या होत्या. यांत्रिकीकरण आलेलं होतं. सरंजामी अवशेष अजूनही शिल्लक होते. शेतीत मोठ्या प्रमाणात भांडवल ओतण्यास सुरुवात झाली होती. शेतमालक आणि सालदार यांच्यातल्या बदलत्या संबंधाला प्रारंभ झाला होता. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर या कादंबरीचं कथानक घडतं.

धरमसिंग या नावाचा जमीनदार. त्याची बरड माळरानाची काही जमीन वहितीखाली आणण्यासाठी ठोला हा शेतमजूर जीवतोड राबलेला आहे. धरमसिंगच्या शेतात तो आपली बायको नंदी आणि मुलगा जगसीर यांच्यासोबत वर्षानुवर्षे राबतोय. या कष्टासाठी त्याला नाममात्र मोबदला मिळतो. संपूर्ण कुटुंबाचे अनेक वर्षांचे कष्ट लक्षात घेऊन ठोला यास धरमसिंग याच्याकडून जमिनीचा एक तुकडा बहाल केला जातो. ज्यावर हे कष्टकरी कुटुंब पोट भरतं. पुढे धरमसिंहाचा मुलगा बंता या कुटुंबाला त्या जमिनीवरून हुसकावून लावतो. दोन पिढ्यांपासून ज्या जमिनीत रक्त आणि घाम ओतला त्या जमिनीवरून विस्थापित व्हावं लागतं. या शेतमजूर कुटुंबातला तरुण मुलगा जगसीर याची शोकांतिका या कादंबरीत आहे. पंजाबी कथात्म साहित्यात जगसीर हा शोषित समाजातला पहिला नायक या कादंबरीच्या रूपाने अवतरला असंही मानलं जातं. अर्थात जगसीर हाही एक माणूस आहे. त्याला लेखकाने अगदीच आदर्शाचा पुतळा म्हणून चित्रित केलेलं नाही. आईच्या मृत्यूनंतर तो व्यसनात गुरफटतो. एकटा पडतो. अखेर त्याच्याही आयुष्याची वाताहत होते. कादंबरीच्या शेवटी तो काही कळीचे प्रश्न उपस्थित करतो. कर्मसिद्धांत, धर्म अशा गोष्टींची चिकित्सा करू पाहतो. या कादंबरीपासून पंजाबी कादंबरीचं नवयुग सुरू झालं असंही काही समीक्षकांनी नमूद केलं आहे. माळवा या प्रदेशातलं सांस्कृतिक समाजशास्त्र, जातीव्यवस्था, पंजाबातली बदलती कृषीव्यवस्था आणि समाजजीवन अशी आशयसूत्रे या कादंबरीची आहेत. गुरदयाल सिंग यांची बहुतांश पात्रे ही श्रमिकांच्या जगातून आलेली आहेत आणि ती व्यवस्थेशी द्रोह करू पाहतात. या संघर्षात ती स्वत:लासुद्धा शोधण्याचा प्रयत्न करतात.

‘अन्हे घोरे दा दान’ ही गुरदयाल सिंग यांची आणखी एक कादंबरी. ‘अंधे घोडे का दान’ या नावाने ती हिंदी भाषेत अनुवादित झाली. घर और रास्ता (१९६८), चांदणी रात (१९८३), पांचवा पहर (१९८८), सब देस पराया (१९९५) या त्यांच्या कादंबऱ्या अनुवादित स्वरूपात उपलब्ध आहेत. ‘मढी दा दिवा’ आणि ‘अन्हे घोरे दा दान’ या त्यांच्या दोन कादंबऱ्यांवर सिनेमेही निघाले आहेत. ‘अध चांदणी रात’ या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. १९९९ यावर्षीचं ज्ञानपीठ पारितोषिक गुरदयाल सिंह यांना होतं. जेव्हा भावभावनांचं कृतक असं नक्षीकाम करणारं भाबडं साहित्य पंजाबी भाषेत मोठ्या प्रमाणावर लिहिलं जात होतं तेव्हा या लेखकाने अगदीच तळाच्या समाजजीवनाची स्पंदने टिपली. सुरुवातीला मजूर, कारागीरनंतर प्राथमिक शिक्षक आणि पुढे विद्यापीठ पातळीवर अध्यापक म्हणून त्यांनी वेगवेगळ्या टप्प्यांवर काम केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंजाबी कादंबरी एकीकडे स्वप्नाळू अशा रम्यचित्रणात आणि दुसऱ्या बाजूने कृतक अशा आदर्शवादी रेखाटनात मग्न असताना गुरदयाल सिंग यांनी तिला जीवनसन्मुख अशा वास्तववादाच्या पटलावर आणून ठेवलं. त्यांच्या ‘अणहोए’ या कादंबरीचा बिशना हा नायक आयुष्यभर लढतो. सरकारकडून मदत घेऊन मी माझं स्वत्व विकणार नाही. असं स्वत्व विकणं म्हणजे स्वत:च्या स्वाभिमानाशी तडजोड करणं असं तो म्हणतो. एका मुलाखतीत गुरदयाल सिंग यांनी सांगितलंय की, अन्यायाविरुद्ध टोकाचा संघर्ष करताना जर चुकीच्या प्रवृत्तीची हत्या होणार असेल तर तीसुद्धा मी नैतिकच मानतो. जर तुम्ही अन्याय सहन करत जगत असाल तर हे जगणं दुबळं तर आहेच, पण ते माणूसपणालाच खाली आणणारं, अवमानित करणारं आहे. कोणत्याही लेखकासाठी महत्त्वाचा असतो तो त्याचा जीवनाबद्दलचा दृष्टिकोन. लेखकाच्या हाती असणाऱ्या एखाद्या दुर्बिणीसारखा तो असतो. त्याद्वारे त्याला दूरच्या गोष्टीही स्पष्टपणे दिसतात, मात्र तो जे काही पाहतो त्यात सखोलता आणि एकाग्रता हवी. जीवनासंबंधीचे असे सखोल चिंतन हे गुरदयाल सिंग यांच्या कथा, कादंबऱ्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यांची बहुतेक पात्रे प्रतिकाराचा जोरकस असा शब्द उच्चारतात, जो कुठल्याही काळात तेवढाच आश्वासक आणि अपरिहार्य वाटतो.
आसाराम लोमटे
(लेखक साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक आहेत.)
aasaramlomte@gmail.com