भगवद्गीतेतील मथितार्थ मांडताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात : गीतेत खरा धर्म सांगितला आहे. आज धर्माच्या व्याख्या अत्यंत संकुचित करण्यात येतात. समाजात सुख -शांती निर्माण होण्यासाठी माणसाने माणसाशी कसे वागावे याचे जे शास्त्र तेच धर्मशास्त्र होय. समाजशास्त्राचा यात मार्मिक ऊहापोह केला आहे. तसेच जीवनातील सर्वागीण दृष्टीही त्यात आहे. समाजात अन्यायी प्रवृत्ती निर्माण झाली असता अन्यायाचा प्रतिकार करावा. तो निमूटपणे सहन करणे भ्याडपणाचे आहे. त्यात कोणत्याही प्रकारचा सात्त्विकपणा नाही, हाच गीतेचा संदेश आहे. ज्या काळात गीतेचा जन्म झाला त्या काळी दुर्योधनादी राजे सत्तेच्या उन्मादाने बेहोष झाले होते. ते धर्म पार विसरले होते. अशा काळात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला, त्याने गोपालांची संघटना करून असंतोषाचा अग्नी प्रज्वलित केला व अर्जुनासारखे वीर तयार करून त्याला खऱ्या धर्माची दीक्षा दिली. ही दीक्षा पुस्तकी विद्या शिकवून दिली नाही तर ती रणांगणात दिली. साम-दामादी उपाय थकल्यावरच युद्धाची नांदी झाली होती. पण या युद्धात दोन्ही सैन्ये समोरासमोर उभी झाल्यानंतर व आपल्यापुढे गुरुजन, काकेमामे, आजे उभे ठाकलेले पाहून अर्जुनाचे धनुष्य गळून पडले. तो शूर होता. पण रणमैदानावर युद्धास सज्ज झालेल्या स्नेही व गुरुजनांवर शस्त्र धरण्याची कल्पना त्याला अजब वाटली व या सर्वाचा नाश करून राज्याचा उपभोग घेणे त्याला त्याज्य वाटले. ही विमूढावस्था पाहून श्रीकृष्णाने त्याला खरा क्षात्रधर्म शिकवला. यावेळी श्रीकृष्णावर फारच मोठी जबाबदारी येऊन पडली होती. ती जबाबदारी त्यांनी फार कुशलतेने पार पाडली. यावेळी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे अर्जुना, अरे तुझ्यासमोर हे जे तुझे गुरुजन दिसतात हे सारे सत्ताधीन लोक आहेत. खाल्ल्या मिठाला जागावे हीच यांची वृत्ती आहे. वास्तविक दुर्योधनादी दुष्टांच्या लीला त्यांना खुपत नाहीत. तेव्हा या वेळी यांच्यावर शस्त्र धरणे हे काही पाप नाही. आणि हे सारे मेलेले लोक आहेत. मरण्याची प्रक्रिया ही जिवंतपणीच सुरू होत असते. माणूस हा आपल्या पापकर्माने प्रत्यही मरणाच्या मार्गास लागत असतो. तेव्हा तू फक्त निमित्तमात्र हो. एका फळामुळे जर शेकडो फळे खराब होत असतील तर सडके फळ काढून फेकावेच लागते.

याच संदर्भात, ‘आपला स्नेही मृत्यू पावल्याबद्दल माणूस शोक करतो. रडण्या-बोंबलण्याचीही विचित्र पद्धती आपल्या समाजात पडली आहे’ असे सांगून महाराज म्हणतात : वास्तविक या रडण्यामुळे मेलेल्या पुरुषाच्या आत्म्याला समाधान न लाभता यातना मात्र होतात. लोक रडतात, ते आपल्या स्वार्थासाठी. वास्तविक माणूस मेल्यानंतर त्याच्या आत्म्याला शांती लाभावी यासाठी सर्वानी प्रार्थना करावी व अत्यंत शांततेने त्याला निरोप द्यावा. अर्थात त्याविषयी दु:ख मानणे आसक्तीचे लक्षण आहे. रडण्याची परंपरा तर अतिशयच मूर्खपणाची व स्वार्थवृत्तीची, विचित्रपणाची द्योतक आहे. लोक तत्त्व विसरतात व बाह्य स्वरूपाला भलतेच महत्त्व देतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजेश बोबडे