काँग्रेसने बिहारमध्ये राजेश राम या दलित नेत्याला प्रदेशाध्यक्ष केलं. हे राम लालूप्रसाद यादव यांना राम राम करायला गेले नाहीत. बिहार काँग्रेसमधील नेते लालूंचा आशीर्वाद घ्यायला जातात असं म्हणतात. राम यांच्या आधी अखिलेश प्रसाद सिंह. हे लालूंचा आशीर्वाद घेऊन प्रदेश काँग्रेस चालवत असत असं सांगितलं जातं. ते लालूंचे काँग्रेसमधील निष्ठावान. या अखिलेश यांना बाजूला करून बिहारमध्ये रामाचं राज्य आलं. त्यामुळं अखिलेश नाराज झाले आहेत. काँग्रेसमध्ये वेगवेगळ्या राज्यांत कमी-अधिक फरकानं हेच चित्र दिसतं. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीवेळी मतदान होण्याआधीच नेत्यांना मुख्यमंत्री होण्याची स्वप्नं पडली होती. काही नेते फडणवीसांच्या खिशात आहेत असं उघडपणे बोललं गेलं. त्यांनी कशीबशी निवडणूक जिंकली. बिहारमध्येही अशाच अगदी शारीरिक पातळीवर मारामाऱ्या सुरू आहेत. पाटणा विमानतळावर काँग्रेस कार्यकर्ते भिडले त्यातील एक अखिलेश यांचा निष्ठावान मानला गेला. पप्पू यादव यांची स्वत:ची ताकद आहे. ते लालूंना नकोत. अखिलेश यांनाही ते फारसे पसंत नाहीत. पण, पप्पू यादव यांचा करिष्मा वेगळाच. त्यांना धक्का लावण्याची ताकद कोणातही नाही. कन्हैय्या कुमार हे नवे नवे बोलके नेते. ते भूमिहार. उच्चवर्णीय. त्यांना प्रदेश काँग्रेसमध्ये स्थान बनवता आलेलं नाही, ते तिथंच अस्त्तित्वासाठी संघर्ष करत आहेत. बिहारची सगळी सूत्रं राहुल गांधींचे विश्वासू कृष्णा अल्लावरू यांच्याकडे आहेत. ते थेट राहुल गांधींशी बोलतात आणि निर्णय घेतात असं म्हटलं जातं. बिहार काँग्रेसमध्ये सध्या वेगवेगळे नेते एकमेकांशी राजकीय मारामाऱ्या करत आहेत.

गुप्ताजी !

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचं भाजपमधील वजन वाढलेलं आहे. त्या सध्या दिल्लीच्या त्यांच्या कारभारामुळंही चर्चेत असतात. केजरीवालांना जमलं नाही ते आपण करत आहोत असा त्या दावा करत असतात. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असतो. त्यांच्या वावरावरून भाजपमध्ये वरिष्ठ नेत्यांचा विश्वास त्यांनी मिळवला असावा. रेखा गुप्तांना बिहारमध्ये प्रचारासाठी पाठवण्यात आलेलं आहे. त्यांचा तारांकित प्रचारकांच्या यादीतही समावेश केलेला आहे. इतर राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील प्रचारामध्ये जाण्याची त्यांची पहिलीच वेळ असावी. त्यांचा चेहरा अलीकडच्या काळात मुख्यधारेतील प्रसारमाध्यमांमधून दिसत असल्यानं रेखा गुप्ता कोण हे आता लोकांना माहीत झालं आहे. शिवाय, बनिया समाज भाजपचा प्रमुख मतदार आहे, त्यामुळं कुठल्याही राज्यात या समाजाचं प्रतिनिधित्व करणारा मुख्यमंत्री प्रचारासाठी गेला तर भाजपला फायदाच होणार. त्यात बिहारमध्ये महिला मतदार एनडीएसाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळंही भाजपमधील चर्चेतील महिला नेत्याला प्रचारासाठी आघाडीवर पाठवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. मध्यंतरी रेखा गुप्ता वादात सापडल्या होत्या. कॅबिनेटच्या बैठकीला त्यांच्या शेजारी त्यांचे पती येऊन बसलेले होते. ग्रामपंचायतीच्या बैठकीत महिला सरपंचाचा नवरा येऊन बसतो आणि तिच्या वतीने तोच निर्णय घेतो, तसाच हा प्रकार होता. भाजपच्या नेतृत्वाने संबंधितांना समज दिली असावी असं दिसतंय. कारण हा प्रकार नंतर घडला नाही किंवा प्रसारमाध्यमांच्या तरी समोर आलेला नाही. हा वाद मिटेपर्यंत दुसरा वाद निर्माण झाला. रेखा गुप्तांना एका व्यक्तीने मारहाण केली. ही घटना रेखा गुप्तांच्या सुरक्षायंत्रणेतील त्रुटी दाखवून गेली हे खरंच. भाजपचे बहुतांश मुख्यमंत्री जनता दरबार भरवतात, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अशा दरबाराची अनेकदा चर्चा होते. तेही भाजपच्या दिल्लीतील नेत्यांप्रमाणे प्रसिद्धीच्या झोतात राहतात. त्याला प्रसारमाध्यमं जबाबदार आहेत, ते तरी काय करणार? तर, योगींप्रमाणे दिल्लीत रेखा गुप्तांनी जनता दरबार भरवला. तिथं त्यांच्यावर हल्ला केला गेला. पण, या घटनेचं एकही छायाचित्र वा दृश्य प्रसारमाध्यमांमध्ये दिसलं नाही. जे प्रसारमाध्यमांमध्ये येत नाही ते समाजमाध्यमांवर येतंच. त्याला कोणी अडवू शकत नाही. पण, या घटनेची दृश्ये समाजमाध्यमांवरही दिसली नाहीत. हे सगळं प्रकरण गुप्ताजींनी गुप्त ठेवलं. असं म्हणतात की, संबंधित व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला तेव्हा तिथं इतरही काही लोक होते, तेही मुख्यमंत्र्यांना आपली गाऱ्हाणी सांगायला आले होते. तिथं पत्रकार नव्हते. हल्लेखोरानं त्यांना मारहाण केली, त्याला ताब्यात घेतलं गेलं. त्यानंतर या प्रकाराची दृश्ये प्रसिद्ध होऊ शकतात हे संबंधितांच्या लक्षात आलं असावं. त्यांनी तातडीने सावध होत उपस्थितांना ‘विनंती’ केली, त्यांनीही ती मान्य केली असावी. कदाचित त्यांच्या फोनमध्ये ही दृश्ये कैद झालीही नसतील. आता कोणाकडे दृश्ये नसतील तर ती बाहेर येणार तरी कशी? सुषमा स्वराज यांच्यानंतर भाजपच्या रेखा गुप्ता पहिल्याच मुख्यमंत्री आहेत ज्या दिल्लीत राज्य करत आहेत. रेखा गुप्ता भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरील नेत्या अशी ओळख निर्माण करू पाहात आहेत. आत्ता भाजपचे योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस आणि हिमंत बिश्वा-शर्मा या तीनच मुख्यमंत्र्यांना राष्ट्रीय ओळख आहे. बाकी, मोहन यादव, भजनलाल शर्मा, भूपेंद्र पटेल, पुष्कर धामी अशा तमाम भाजप मुख्यमंत्र्यांना स्वत:चे राज्य सांभाळण्यासाठी दिल्लीचे बोट धरावे लागते. बिहारमध्ये इतर नेत्यांप्रमाणे गुप्ताजींच्या कामगिरीकडंही पाहिलं जातंय.

आवडीचे प्रचारक!

भाजपच्या स्टार प्रचारकांमध्ये स्मृती इराणींचा समावेश झालेला आहे. लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्या राजकारणातून गायब झाल्यासारख्या होत्या. त्या अभिनयाच्या क्षेत्रात परत गेल्या असल्या तरी, पन्नाशीमध्ये कोणी राजकारणातून निवृत्त होत नाही. त्यांना पुन्हा सक्रिय व्हायचं आहे, बिहारमध्ये अभिनेते आणि अभिनेत्री यांना फार महत्त्व असतं. यावेळी तर भाजपची स्टार प्रचारकांची यादी पाहिली तर समजेलच. यात खरे स्टार आहेतच म्हणजे मोदी-शहा, योगी आदित्यनाथ वगैरे पण, भाजपच्या आसऱ्याला गेलेले चित्रपट उद्याोगातील स्टारही आहेत. एक ‘महान’ नाव म्हणजे पवन सिंह. ते भोजपुरी सिनेमात प्रचंड लोकप्रिय आहेत. पण, त्यांची लोकप्रियता त्यांच्या सिनेमाबाह्य कर्तृत्वामुळंही आहे. त्यांचं महिलांशी असणारं वर्तन हे जगजाहीर आहे. त्याबद्दल भाजप त्यांना जाब विचारत नाही. दोन-चार दिवसांपूर्वीच ते भाजपमध्ये आले. त्यांना निवडणुकीत उतरवायचं होतं पण, त्यांच्या घटस्फोट होऊ घातलेल्या पत्नीमुळं त्यांना माघार घ्यावी लागली. या पवन सिंह यांच्या पहिल्या पत्नीने आत्महत्या केली. दुसऱ्या पत्नीने शारीरिक छळ, मारहाणीचा आरोप केला. त्यांच्या घटस्फोटाचं प्रकरण न्यायालयात सुरू आहे. या अभिनेत्याने अलीकडेच भोजपुरी अभिनेत्रीशी बेताल वर्तन केलं. इतकं असूनही बिहारी जनतेत ही व्यक्ती लोकप्रिय आहे. भाजपलाही असे स्टार लागतात. मनोज तिवारी, रवी किशन हे तर माहीतच आहेत. दोन्ही खासदार, त्यांना किती गंभीर्याने घ्यावं हेही भाजपला माहीत आहे. त्यात आणखी एक वादग्रस्त नाव दिनेश लाल यादव ‘निरहुआ’. हे मुंबईत मराठी लोकांना आव्हान देतात. मराठीत बोलणार नाही, काय करायचं ते करा, अशी उर्मट भाषा वापरतात. ते भाजपमध्ये आहेत, केंद्रात सत्ता भाजपची, महाराष्ट्रात सत्ता भाजपची आणि बिहारमध्येही सत्तेवर भाजपच. असे हे दिवटे स्टार नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे या मराठी नेत्यांच्या बरोबर बिहारमध्ये प्रचार करणार आहेत!

प्रधानांचं प्राधान्य

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या तीन प्रमुख विश्वासू नेत्यांपैकी दोन बिहारमध्ये व्यस्त आहेत. एक, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि दुसरे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे. तावडे राज्य प्रभारी आहेत. प्रधान निवडणूक प्रभारी आहेत. तिसरे भूपेंद्र यादव यांच्याकडं पश्चिम बंगाल सोपवण्यात आलेलं आहे. बिहारनंतर या राज्याकडे भाजपचा मोर्चा वळेल. एनडीएचं जागावाटप होईपर्यंतच्या अखेरच्या दोन-तीन दिवसांमध्ये भाजपचे नेते तावडे, प्रधान आणि नड्डा यांच्या निवासस्थानांकडं धावत होते. मॅरेथॉनची स्पर्धाच जणू. मग, हे सगळे बिहारला गेले. तिथंही मॅरेनॉथ सुरू होती. त्यामध्ये धावता धावता प्रधानांनी आलोच असं म्हणत वाकडी वाट केली आणि ते दिल्लीत शालेय विद्यार्थ्यांच्या वर्गात जाऊन बसले! तिथं त्यांना थोडी विश्रांती मिळाली असावी. देशाच्या राजकारणाची गंमत अशी की, हेच प्रधान आधी पेट्रोलियममंत्री होते, मग, अचानक ते शिक्षणमंत्री झाले. दोन्ही विषय वेगवेगळे. ही मंत्रालयं हाताळण्यासाठी वेगवेगळी कौशल्यं लागतात. पण, बहुधा मंत्र्यांना काहीच करावं लागत नाही. पेट्रोलियमचे निर्णय कोणी अन्य घेत असावेत. मनमोहन सिंग यांच्या काळात जयपाल रेड्डी यांना एका रात्रीत पेट्रोलियम मंत्रालयातून जावं लागलं होतं, ते स्वत: निर्णय घेतात असा त्यांच्यावर आरोप होता. असो. प्रधानांना दोन्ही विषयाचं कदाचित सखोल ज्ञान असावं. अलीकडं देशाला लवकरात लवकर विकसित करण्याचं खूळ आलं आहे, त्यासाठी विकसित भारत बिल्डथॉन नावाची मोहीम आखली, त्यात विद्यार्थ्यांना नवनवे प्रयोग करण्याची संधी देण्यात आली. देशभरातील तीन लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. त्याच्या उद्घाटनासाठी प्रधान एका शाळेत जाऊन बसले. इथं ते शेवटच्या बाकावर बसले. वर्ग कसा चालतो हे त्यांनी पाहिलं. विद्यार्थ्यांनी केलेले प्रयोग पाहिले. आम्हीही काही तरी केलं असं मंत्रालयांना दाखवावं लागत असावं. त्यातून प्रधान दहा मिनिटांसाठी विद्यार्थी बनले होते.