साधासा शर्ट. शरीर प्रकृतीही तशी किरकोळ म्हणता येईल अशीच. उंचीही जेमतेमच. २३ – २४ वर्षे वयाचा तरुण हस्तांदोलन करत म्हणाला, ‘मी शाहीर शुभम केंद्रे.’ यातील शाहीर शब्दावरचा जोर त्याची ओळख अधोरेखित करणारा. घरात काका पखवाज वाजवायचे. त्यामुळे लहानपणापासून भजन, कीर्तन कानावर पडत शुभम मोठा झाला. संगीत विषय घेऊन पदवीचं शिक्षण घेतलं. ताल घरातील संस्काराचा भाग होता. पुढं लक्षात आलं की, आपल्याला संगीतामध्ये गती आहे. हळूहळू लोकगीतांचा अभ्यास वाढू लागला. महाविद्यालयीन दिवसांमध्ये युवा महोत्सव, राष्ट्र सेवा योजनांच्या शिबिरांमध्ये प्रबोधनपर गाणी म्हणणं वगैरे सारं काही चाललं होतं. पण या काळात लोकगीतांमध्ये होणारे बदल टिपायला हवेत, असं लक्षात आलं आणि या क्षेत्रात अभ्यास करण्याचा निर्णय त्याने घेतला. एका बाजूला हा असा संशोधनात्मक अभ्यास आणि दुसरीकडे त्याने शाहिरीचा मंच उभा केला. पोवाडे, भारुड, लोकगीतं सादर करू लागला. आता त्याच्या संचाला अनेक ठिकाणी मागणी असते. बऱ्यापैकी पैसे मिळत आहेत. शुभम यांचे गुरू आणि समव्यावसायिक अजिंक्य लिंगायत. चार-पाच वर्षांनी मोठा असेल. नुकत्याच झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रायगड येथील कार्यक्रमात अजिंक्यचा पोवाडा अनेकांच्या मोबाइलवर ‘व्हायरल’ झाला होता. तुमान, अंगरखा, शिवरायांचा मावळाच वाटावा अशी टोपी. हातात डफ घेऊन तो जेव्हा छत्रपतींचे पोवड्यातून वर्णन करतो तेव्हा मराठी माणसाला स्फुरण चढल्याशिवाय राहत नाही.

अजिंक्य लिंगायत यांच्या घरी तुकडोजी महाराज यांच्या विचार प्रचाराची परंपरा. मराठी विषयात पदवीचं शिक्षण घेतलं आणि पुढे लक्षात आलं की, सामाजिक काम करायचं असेल तर तेही शिक्षण हवं. मग एमएसडब्लू केलं. आता शासनाच्या योजनांच्या प्रचार प्रसारापासून ते महापुरुषांची महती पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्याचं काम हा शाहीर करतो. तिसरी भाषा म्हणून हिंदी अनिवार्य करण्यासाठी समिती नेमल्यानंतर भाषाविषयक दृष्टिकोन सांगणारं एक कवन अजिंक्य सहज म्हणून गेला – ‘मिसळ झाली मुंबई रं दादा.. मिसळ झाली, कर्ता – कर्म सारं इंग्रजी दिसलं, क्रियापदापुरती मराठी असलं, सब मिक्सर बन गयी रं…’ संयुक्त महाराष्ट्राची चळवळ या ज्या शाहिरांनी पुढे नेली, त्यांचं स्मरण ठेवणारी एक पिढी आता नव्या वळणावर पोहचली आहे. स्वातंत्र्य चळवळीत योगदान देणारे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लोकमानस घडविणाऱ्या शाहिरांचं स्मरण वगैरे तसं आता होत नाही. तरीही राज्यात फक्त शाहिरी करणारे दीड- दोन हजार तरुण असतील. यात मुलींचा सहभागही मोठा. यातील कोणी रसायनशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेणारं तर कोणी एखाद्या विषयात पीएचडी मिळविणारं. माध्यम हाताळणीचं तंत्रज्ञान सोपं झालं आणि प्रत्येक जिल्ह्यात परंपरा जपणाऱ्या शाहिरांची संख्या वाढली. मोठ्या शहरात आणि भोवताली प्रत्येक जिल्ह्यात ४० – ५० जण काम करू लागले आहेत. याचं मूळ त्याच्या अर्थकारणात आहे. आता या कार्यक्रमाची बिदागी लाखाच्या घरात गेली आहे. काही वर्षांपूर्वी वक्तृत्व स्पर्धांच्या बक्षिसांमधून मिळणाऱ्या मानधनावर दैनंदिन खर्च भागवणाऱ्यांची एक पिढी होती. पण भाषणातील नावीन्य आता फारसं उरलं नाही. रीलच्या जमान्यात शिवराळ बोलणाऱ्यांची चलती आहे. राजकीय नेते आता कॅमेऱ्यासमोर थुंकूनही दाखवतात. उक्ती आणि कृतीत पडलेलं अंतर लक्षात घेता भाषण करणाऱ्यांची संख्या कमी झाली. त्यामुळे गर्दीला एका बाजूने वळवायचं असेल तर शाहीर बरे पडतात, हे आता नेत्यांना कळू लागलं आहे. उजव्या बाजूने हिंदुत्ववादी महापुरुष रंगवायचा की जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन ती प्रतिमा बदलून सांगायची हेही शाहीर अगदी कमर्शिअली सहज करू लागले आहेत. पोवाड्यातून प्रबोधन करताना डावे – उजवे आणि ‘कमर्शिअल’ अशी विभागणी आता पूर्णत्वाकडे वेगाने जात आहे. भूमिका घेणारी मंडळी तशी हाताच्या बोटांवर मोजता येणारी.

शाहीर सिद्राम मुचाटे धुळ्याचे. शाहिरी जगले. एवढी की अनेकदा इंग्रजांनी त्यांना तुरुंगात टाकले. स्वत:च्या मुलीच्या मुत्यूनंतर भेटायला जाऊ शकले नाहीत. त्यांच्या पत्नीने मुलांचा सांभाळ केला. पुढे क्षयरोग होऊन त्यांचा मृत्यू झाला. तेव्हा अंत्यसंस्कारासाठीही वर्गणी काढावी लागली. धुळे, अमळनेर परिसरात त्यांचे कार्यक्रम गाजत होते. १९३०, १९४२ मध्ये त्यांना अटक करण्यात आली. पण शाहिरीतून क्षोभ उभा करण्याची ताकद होती. लिहिणे, सादर करणे यात मुचाटे यांचा हातखंडा होता म्हणे. आता कोणाच्या आठवणीतही नाहीत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत योगदान देणारे शाहीर अमर शेख यांना पोलीस नोटीस काढायचे महेबूब हुसेन शेख नावाने. पण पुढे भालजी पेंढारकरांनी त्यांचं नाव बदलून अमर केलं. १९५७ साली प्र. के. अत्रे, एस. एम. जोशी, कॉ. डांगे यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत योगदान देणाऱ्या शाहीर अमर शेख यांनी दिल्लीतील मोर्चात ‘जागा मराठा आमजमाना बदलेगा’ अशी शाहिरी दिल्लीत ऐकवली होती. सांगण्याची ऊर्मी आणि उद्देश याचा मिलाफ करणारी मंडळी तशी कमीच. पण एक काळ होता जेव्हा कोणी तरी भाजीविक्री करायचा, कोणी संगमरवरी दगडावर नाव लिहून द्यायचा, कोणी कोळशाच्या खाणीत काम करायचा, मुंबईत चिक्की विकून शाहिरी लिहून रात्री डफ हाती घेणारे शाहीर महाराष्ट्रभर होते. भीमशाहिरीतून अर्थविचार मांडणाऱ्या या शाहिराने चार हजारांहून अधिक काव्यरचना केल्या.

शाहीर कृष्णराव साबळे यांनी लिहिलेलं ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत आजही आपल्या ओठी येतं. असे प्रयोग आज होत नाहीत, असं नाही. नवं प्रारूप, नवी मांडणी करणारे संभाजी भगत यांच्यासारखे शाहीर तसे कमीच. मांडणीतील प्रामाणिकपणा सादरीकरणात आला की कडुबाई खरात यांच्यासारखी बाबासाहेबांवर कवन करणारी महिला झपकन प्रकाशझोतात येऊन जाते. गुणवर्णनातील प्रमाणिकपणा जसाजसा झिरपत जातो तसतसं सादरीकरणाची मजा वाढते. स्वातंत्र्य चळवळीत आणि पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ती अधिक होती. आता लोककलांच्या अभ्यासक्रमांची आणि त्याला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढते आहे.

पोवाडा म्हणजे काय? – वीरांच्या पराक्रमाचे आणि विद्वानांच्या बुद्धिमत्तेचे, सामर्थ्याचे, गुण आणि कौशल्याचे काव्यात्मक वर्णन ही महाराष्ट्र शब्दकोशातील व्याख्या. प्र अधिक वद् म्हणजे स्तुती असा या शब्दाच्या व्युत्पत्तीचा स्राोत. चांगल्या कामाची स्तुती करण्याचे प्रकार अगदी वैदिक काळापासून सुरू आहेत. गाथा यातून पुढे सुरू झाल्या. महापुरुषांच्या आयुष्यातले महत्त्वाचे प्रसंग, दानशूरता, आदींवर अनेक पोवाडे रचले गेले. इ.स. १०व्या शतकापासून हिंदीत किंवा तत्सम भाषांत अशा गीतांना ‘रासो’ असे म्हटले जात. पृथ्वीराजांचे रासो काव्य म्हणजे त्यांच्यावरचा पोवाडाच. यादव काळात भाट बिरुदगायन करत. पूर्वीच्या काळी पोवाडे रचणे आणि ते सदरेवर म्हणून दाखवणे हे काम गोंधळी करत. पुढे पेशवाईत तमाशाचे स्वतंत्र फड निघाले. त्यातील अनेकांनी मग पुन्हा पोवाडे रचणं सुरू केलं. पोवाड्यांची रचना आणि भाषा तशी ओबडधोबडच. त्यात वीररस ठासून भरलेला. वीर पुरुषांच्या लढाया आणि राजकीय घटना घडामोडींवर रचलेलं काव्य असल्याने एका अर्थाने जेत्याची स्तुती असे या कवनाचे स्वरूप. शिवाजी महाराज ते शाहू महाराज यांच्या कालावधीमध्ये केवळ सात पोवाडे होते. पेशव्यांच्या काळात ही संख्या १५० होती. अफझलखानाचा वध, तानाजी आणि बाजी पासलकर हे तीनच पोवाडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील होते. १८१८ मध्ये पेशवाई बुडाली. स्वराज्य गेल्यानंतरची हळहळ व्यक्त करून झाल्यावर इंग्रजी अमलाची छाप जाणवू लागली. इंग्रजी शिस्तीची भुरळ पेशवाईतील प्रभाकर आणि परशुराम या दोन शाहिरांना पडली. त्यांनी चरितार्थ चालविण्यासाठी लुंग्यासुंग्यांवर पोवाडे रचले. तरीही शाहिरांच्या रचना तशा परप्रेरित असतात. आत्मनिष्ठ काव्याचे वैशिष्ट्य पोवाड्यात फारसे डोकावत नाही. समकालीनांच्या भावनांशी समरस होऊन शाहिरांनी विषय मांडल्याने तत्कालीन मराठी जीवनाचे चित्र त्यातून मनात चितारता येऊ शकते. वि. का. राजवाडेंसारखे इतिहासतज्ज्ञ बखरीपेक्षा प्रमाण पोवाड्याच्या रचनांना वरचा दर्जा देत होते.

पोवाडा, फटका, ओवी, गोंधळ, छक्कड, लावणी असे काव्य आणि गद्या दोन्ही प्रकार हाताळणाऱ्या शाहिरांची मुख्य प्रेरणा स्वातंत्र्य ही होती. प्रबोधन कशाचे करायचे, शाहिरी का मांडायची याची जाण नसानसांत भिनली होती. भोवताल वर्णन करण्याची अजब हातोटी होती. तेव्हा शाहिरीला इंग्रजरूपी खलनायक होता. पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहीर अण्णा भाऊ साठे, अमर शेख यांच्यासह अनेकांनी गावोगावी प्रबोधन केले. तेव्हा ‘कितीही कोंबडे झाका सरकारा, संयुक्त महाराष्ट्र होणार’ असे ठणकावून सांगितले जात होते. मराठवाड्यातही निमाजाच्या विरोधात आवाज उंचावणारी प्रभाकरराव वाईकर यांच्यासारखी मंडळी होती.

प्रबोधनाची चळवळ करणाऱ्या आणि आपली भावना कधी तरलपणे तर कधी थेट प्रश्नाच्या रूपाने मांडणाऱ्यांची मोठी परंपरा महाराष्ट्रात होती ती आजही आहे. शाहू -फुले- आंबेडकर यांच्या विचारांबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडे आणि रचना ऐकल्या जातात. पण नव्या जमान्यात समाज माध्यमांच्या नव्या बाजारू व्यवस्थेतून समूहमन निर्माण होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शाहीर वाढले तरी ते केवळ ‘रिल्स’पर्यंत राहतील. फार तर एखादा तिकीट लावून लोकपरंपरांचा कार्यक्रमही होईल, पण ते त्या पुढे जाणार नाहीत, याची काळजी बाजार घेईलच.