महेश सरलष्कर

जनता दल (संयुक्त), तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचे नेते दिल्लीत येऊन भाजपला आव्हान देत असताना, भाजपने अवघड मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे..

करोनाच्या दोन वर्षांच्या काळात राजकीय समारंभ, चर्चासत्रे, पदयात्रा, मेळावे, अधिवेशन यापैकी काहीही होत नव्हते. पण, आता एकाच वेळी राजकीय कार्यक्रमांचा धुरळा उडू लागलेला आहे. त्यातच विरोधकांच्या एकजटीची जणू लाट आलेली आहे. गेल्या आठवडय़ामध्ये जनता दलाचे (सं) प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिल्लीचा दौरा करून राजधानीतील राजकीय वातावरण ढवळून काढले, हे मात्र खरे. त्यांनी दिल्लीत आल्यानंतर गाठीभेटीचा धडाकाच चालवलेला होता. नितीशकुमार यांना पंतप्रधान होण्याची संधी मिळेल की नाही हे माहिती नाही; पण त्यांच्या राजकीय खेळामुळे भाजपचे मन विचलित झालेले आहे. त्यामुळे बिहार ही भाजपसाठी रणभूमी होण्याची शक्यता दिसू लागली आहे.

नितीशकुमार दिल्लीतून परत जातात न जातात तोच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाची लगबग दिल्लीत  सुरू झाली. रविवारी झालेल्या या अधिवेशनामध्ये शरद पवार यांनी विरोधकांना भाजपविरोधाची हाक दिली. शनिवारी झालेल्या पक्षाच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीनंतर खासदार प्रफुल पटेल यांनी, आगामी लोकसभा निवडणुकीत शरद पवार अग्रणी भूमिका बजावतील, असे विधान केल्यामुळे पवारांच्या पंतप्रधान पदाच्या शक्यतेवर चर्चा सुरू झाली. पण  पटेल यांनीच  ही शक्यता फेटाळून लावली आणि पवार विरोधी एकजुटीसाठी ‘मध्यस्था’च्या भूमिकेत असतील असे सांगून हा मुद्दा सोडून दिला! कार्यकारिणीच्या बैठकीनंतर प्रफुल पटेल यांनी, विरोधकांमध्ये अंतर्विरोध असल्याची कबुली दिली होती. पण भाजपविरोधात एकत्र यायचे असेल तर मतभेद बाजूला ठेवावे लागतील असे त्यांनी सूचित केले होते. हाच मुद्दा शरद पवार यांनी अधिवेशनात मांडला.

राज्या-राज्यांमध्ये पक्ष मजबूत करताना, बिगरभाजप पक्षांशी सलोख्याने संबंध ठेवून विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तयारी लागा, असा स्पष्ट संदेश पवारांनी दिला आहे. हा धागा धरून मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांनी नितीशकुमार यांच्या भेटीनंतर भाष्य केले होते. विरोधकांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण हे आत्ता महत्त्वाचे नाही. ते ठरवण्याची वेळ तरी येऊ  द्या, असे येचुरी यांचे म्हणणे होते. ‘विरोधी ऐक्याबद्दल आणि कथित सत्तेच्या संधीबद्दल हवेतील गप्पा कशासाठी करायच्या’, असे अप्रत्यक्षपणे येचुरी सबुरीने बोलत होते.

नितीशकुमार यांच्या दिल्लीभेटीनंतर ‘तृणमूल काँग्रेस’च्या सर्वेसर्वा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी, ‘नितीशकुमार, अखिलेश यादव, चंद्रशेखर राव, स्टॅलिन असे आम्ही विरोधक एकत्र येऊ आणि भाजपला लोकसभा निवडणुकीत चपराक देऊ ’, असे  विधान केले. उत्तरेकडील राज्यांमध्ये भाजपची स्थिती मजबूत असली तरी, बिहार भाजपच्या हातून निसटले आहे. तिथे भाजपविरोधक सत्तेत आलेले असल्याने लोकसभेत जागा जिंकण्यासाठी भाजपला मोठा संघर्ष करावा लागेल. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस भक्कम असल्याने भाजपची डाळ शिजणार नाही. तेलंगणा आणि तामीळनाडूमध्ये भाजपने कितीही प्रयत्न केला तरी, दक्षिणेकडील राज्यांमध्ये भाजपला यश मिळण्याची शक्यता कमीच. उत्तर प्रदेशमध्ये भाजपची सत्ता असली तरी, विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने भाजपविरोधात तगडी लढत दिल्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा कमी करता येऊ शकतात, अशी समीकरणे बांधली जात आहेत.

काँग्रेसच्या धूसर आशा

दिल्लीमध्ये विरोधी पक्षांच्या गाठीभेटी होत असताना, काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्राही सुरू झालेली आहे. करेळ, तामीळनाडू, कर्नाटक या राज्यांमध्ये काँग्रेसच्या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणे अपेक्षित होते, त्याप्रमाणे तो मिळूही लागला आहे. लोकांचा प्रतिसाद किती कायम राहतो, यावर ‘भारत जोडो’  यात्रेचे यश अवलंबून असेल. आगामी काळात गुजरात, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यापैकी काँग्रेसने गेल्या विधानसभेच्या निवडणुकीप्रमाणे यंदाही लक्ष केंद्रित केले तर, भाजपला आव्हान दिले जाऊ  शकते. कर्नाटकमध्ये भाजपच्या नेतृत्वाच्या मुद्दय़ावरून संघर्ष सुरू असून त्याचा लाभ काँग्रेसला उठवता येऊ  शकतो, अशी चर्चा होत आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजपने सत्ता राखण्यासाठी नेतृत्वबदलाचे संकेत दिले आहेत. गेल्या वेळी मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे सरकार भाजपच्या ‘कमळ मोहिमे’ने जमीनदोस्त केले होते. पण मतदार कदाचित पुन्हा काँग्रेसला संधी देऊ शकतील अशी आशा काँग्रेसला वाटू लागली आहे. काँग्रेससाठी राजस्थान हे कळीचे राज्य असून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या पक्षाध्यक्षपदाच्या शक्यतेवर चर्चा केली जात आहे. पण या राज्यातील सत्ता काँग्रेस राखू शकेल का यावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या राज्यांमधील विधानसभा निवडणुकीतील यशाचा थेट परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर होऊ शकतो. भारतभर भ्रमण करून लोकांशी संवाद साधणाऱ्या राजकीय नेत्याला यश मिळते असे मानले जाते. त्यामुळे काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या यशावर विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे यशही अवलंबून असेल.

विरोधकांच्या भाजपविरोधी प्रयत्नांत आम आदमी पक्षाचे समांतर राजकीय आंदोलन सुरू आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी भारताला पहिल्या क्रमांकाचा देश बनवण्याचे स्वप्न बघितले आहे आणि त्यासाठी ते देशभर मोहीम चालवणार आहेत. दिल्ली, पंजाबप्रमाणे ‘आप’ला गुजरात, हिमाचल प्रदेश आणि आगामी काळात हरियाणामध्ये सत्ता मिळवायची आहे. पण, पहिले लक्ष्य आहे गुजरात विधानसभा निवडणूक. तिथे ‘आप’चा जोरदार प्रचार सुरू आहे. दिल्लीतील राजकीय भांडणे गुजरातमध्ये उकरून काढली जात आहेत. ‘आप’च्या दिल्ली सरकारला लक्ष्य करून भाजपला गुजरातमध्ये काँग्रेसविरोधात ‘आप’चा राजकीय वापर करायचा असल्याची चर्चा होत आहे. ‘आप’नेही गुजरातमध्ये शिक्षणाचा मुद्दा उपस्थित करून काँग्रेसवर आगपाखड केली आहे. देशात ७५ वर्षांत शिक्षणाची आबाळ झाल्याचा आरोप केजरीवाल यांनी अलीकडेच केला.

भाजपचे ‘मिशन-१४४’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा सगळ्या विरोधकांच्या राजकीय धुळवडीमध्ये भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी शांतपणे आखणी आणि अंमलबजावणी या दोन्हीलाही सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेविरोधात भाजप आRमक होऊ लागल्याचे दिसल्याने भाजपला या यात्रेचे महत्त्व कळले असावे असेही दिसते! २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ३०३ जागा जिंकून अभूतपूर्व यश मिळवले होते, आगामी लोकसभा निवडणुकीत त्यापेक्षाही अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे. पण, त्यासाठी भाजपला बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार रणनितीमध्ये बदल करावे लागणार आहेत. त्यादृष्टीने भाजपने लोकसभेसाठी अवघड ठरलेल्या १४४ जागाही मिळवण्याच्या  ‘मिशन—१४४’ची आखणी केली आहे. गेल्या आठवडाभर विरोधकांच्या एकजुटीच्या घडामोडी घडल्यामुळे भाजपने ‘मिशन—१४४’ला अचानक प्रसिद्धी देऊन विरोधकांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी भाजपने ‘मिशन—१४४’वर जाहीर भाष्य केले नव्हते. त्यामुळेच बारामती लोकसभा मतदारसंघाबाबतही चर्चा घडवून आणली जात आहे. लोकसभा निवडणुकीत बिहार, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये भाजपला जागांचा फटका बसला तर, ‘मिशन—१४४’ मधून काही जागा जिंकून  नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. २०१९ मध्ये कमी मताधिक्याने पराभूत झालेल्या जागा जिंकण्यावरही भाजपने भर दिलेला आहे. भाजपसाठी राजस्थान महत्त्वाचे असून तिथे लोकसभेआधी विधानसभेची निवडणूक होणार आहे.  हे राज्य ताब्यात आले तर आगामी लोकसभा निवडणुकीत मोठा लाभ मिळेल असे भाजपला वाटत असल्याने बिहारप्रमाणे राजस्थानकडे भाजपचे अधिक लक्ष असेल. विरोधकांकडून भाजपविरोधात राजकीय वातावरण निर्माण केले जात असले तरी, भाजपकडूनही शिस्तबद्ध आखणी केली जात आहे.