‘हवेचा हवाला’ हे संपादकीय (२८ ऑक्टोबर) वाचले. मुंबई ठाण्यात दिसेल त्या जागेत बांधकामे सुरू आहेत. दहा वर्षांपूर्वी ‘उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी’ असे म्हणत मेट्रोसहित अनेक विकासकामे सुरू झाली. एका मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर दुसरे सुरू करायचे एवढा धीर कोणाकडे असणार? एकाच वेळी अनेक कामे सुरू झाली आहेत आणि ती नजीकच्या काळात पूर्ण होतील असे दिसत नाही. मुंबई-नाशिक महामार्ग क्र. तीन शहापूरनंतर चांगला होता. कुठे वाहनकोंडी होत नव्हती. शहापूर ते ठाणे एवढय़ाच पट्टय़ात वाहनकोंडी होत असे. आता तो रस्ता दहा ते पंधरा पदरी होत आहे. अनेक ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात येत आहेत. त्यासाठी अनेक तात्पुरती वळणे दिल्याने  ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. पूर्वी ठाणे ते नाशिक अंतर तीन तासात कापले जात असे त्याला आता पाच-साडेपाच तास लागतात. तीच अवस्था ठाण्यातील घोडबंदर रोडची. तिथे इतक्या गृहसंकुलांना परवानग्या दिल्या जात आहेत की रस्ता मोठा झाला तोही अपुरा पडू लागला. मग तिथे मेट्रोचे नियोजन केले. त्यासाठी लावलेले बॅरिकेड्स हटत नाहीत तोच, आता म्हणे कासारवडवली येथे उड्डाणपूल बांधण्यात येणार असल्यामुळे पुन्हा रस्त्यावर पत्रे लावून रस्ते  अरुंद करण्यात येणार आहेत. विकासकामांचा एवढा ध्यास लागल्यासारखे सरकार काम करत आहे. तो ध्यास पूर्ण होईपर्यंत पर्यावरणाचे व माणसाचे काय होईल सांगता येत नाही. दिनकर र. जाधव,  ठाणे

झाडांचे महत्त्व नाकारणारे सत्ताधारी..

‘हवेचा हवाला’ हे संपादकीय (२८ ऑक्टो.) व मीरा-भाईंदर तरण तलाव बांधण्यासाठी ३,२६७ झाडांची कत्तल करण्याच्या वादाची बातमीही (लोकसत्ता- २७ ऑक्टो) वाचली. पाण्याची नवीन टाकी बांधण्यासाठी ‘हँिगग गार्डन’वरील झाडांची अशीच कत्तल होणार होती, तो बेत तिथल्या रहिवाशांनी हाणून पाडला.  मेट्रो कार शेडसाठी रातोरात शेकडो झाडे तोडण्यात आली. विकासासाठी मुंबई भकास करताना सत्ताधाऱ्यांना जर कार्बन डायॉक्साइड शोषून शुद्ध प्राणवायू देणाऱ्या झाडांचे महत्त्वच कळत नसेल तर, ते प्रदूषणमुक्तीसाठी नियोजन, नियमन, अंमलबजावणी कशासाठी करतील?  सरकार, बिल्डर व नोकरशहा या सर्वाना फक्त नवनवीन प्रकल्प का हवे असतात हे  एव्हाना सर्वानाच माहीत आहे!  राजन र. म्हात्रे, वरळी (मुंबई)

अविचारी नेतृत्वालाच वारंवार संधी

‘हवेचा हवाला’ हे संपादकीय वाचले. अविचारी नेतृत्वालाच वारंवार संधी दिली जाते आहे, तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही.  ‘आपल्या शहरांना आणखी ओझे झेपणार नाही आणि महत्त्वाचे म्हणजे या शहरात बाहेरून येणाऱ्यांमुळे नवीन रस्ते, पूल, बांधकामे उभारताना मूळ नागरिकांना वाहतूक-कोंडी, प्रदूषण यांचा प्रचंड त्रास होतो. आता या मोठय़ा शहरांचा विकास आणि विस्तार थांबवून हाच विस्तार इतर ठिकाणी करणे गरजेचे आहे’ असे आवाहन अलीकडे राज ठाकरे यांनी पुण्यात केले, त्यावर महाराष्ट्राने विचार करणे आवश्यक आहे. रोहन कदम, लातूर

पर्यावरणाबद्दलची राजकीय अनास्था घातक

मुळात आता आपण विनाशाकडे वाटचाल करायला लागलो आहोत आणि तो विनाश अटळ आहे ही जाणीव होऊ लागली आहे. वाढत जाणारी लोकसंख्या आणि तिला तारण्यासाठी पुरेशा नैसर्गिक स्रोतांचा अभाव ही गंभीर बाब म्हणून बघण्याची गरज सर्वच स्तरातून निर्माण झाली आहे. आपल्याकडील राजकीय अनास्था एवढी आहे की अमुक एका पर्यावरणमंत्र्यांनी एखादे रास्त धोरण मांडले तरी दखल घेतली जात नाही. दुसरीकडे, पाच सिगारेटपेक्षा जास्त भरेल इतक्या प्रदूषित हवेमुळे दम्यासारखे आजार वाढल्याचे दिसून येत आहे. ही बाब आत्ताच गांभीर्याने घेतली नाही, तर अनर्थ अटळ. अभिजीत जैस्वाल, पुणे

परराष्ट्र खात्याने वर्षभर काय केले?

आखाती राष्ट्रांशी आपल्या देशाचे चांगले संबध असताना अचानक कतारने आठ नौदल अधिकाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावणे ही देशाकरिता सुन्न करणारी बातमी आहे. या आठ नौदल अधिकाऱ्याचं आणि इस्रायल आणि हमास युद्धाची पार्श्वभूमी असणे आणि त्याचा वापर करून कतारने त्या आठ निवृत्त नौदल अधिकाऱ्यांवर एकतर्फी कारवाई करणे अनपेक्षित आहे. कारण हे अधिकारी ‘अल दहरा’ कंपनीकरिता काम करत होते. त्यांच्या बरोबर या कंपनीच्या मालकालासुद्धा अटक झाली होती. मालक दोन महिन्यांत जामीन देऊन सुटला. आठ अधिकाऱ्यांना मात्र मृत्युदंडास सामोरे जावे लागत आहे. गेले वर्षभर हे प्रकरण चालू होते तर याला जेवढे गांभीर्याने घ्यावयास हवे होते तेवढे भारतीय परराष्ट्र खात्याने घेतले नव्हते काय? दत्तप्रसाद शिरोडकर, मुंबई

आरोग्यसेवेच्या अभावाचा ‘वितळता हिमनग’

‘नांदेड रुग्णालयातील मृत्यू : हिमनगाचे एक टोक’ हा लेख आरोग्यसेवेचे वास्तव सामोरे आणणारा आहे. कुठल्याही सरकारी रुग्णालयात क्षमतेच्या तिप्पट, चौपट रुग्णांचा भरणा दिसतो, कारण त्या रुग्णांना खासगी वैद्यकीय सेवा परवडत नाही. पण प्रत्यक्ष रुग्णालयात सर्वच बाजूंस फक्त आणि फक्त कमतरताच दिसून येते. कर्मचारी, डॉक्टर्स, स्पेशालिस्ट, उपकरणे सर्व काही कमी. त्यामुळे रुग्णांचे खूप हाल होतात. एन-आयसीयू कक्षात तान्ही बाळे असल्याने तो भाग महत्त्वाचा; पण तिथेही कारभार यथातथाच असतो. एकूणच मोठय़ा शहरांत पैसा टाकला तर(च) चांगली वैद्यकीय सेवा मिळू तरी शकते; पण ग्रामीण व निमशहरी भागांत वैद्यकीय सेवेला घरघर लागलेली आहे हेच कटू वास्तव आहे.   माया हेमंत भाटकर, चारकोप गाव (मुंबई)

आपण आदिमानव नाही, दुटप्पी

‘आपण अजूनही आदिमानवच’ हा ‘समोरच्या बाकावरून’ या सदरातील लेख (२९ ऑक्टोबर) वाचला. भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्या एका व्यक्तीला कॅनडामध्ये मारण्यात भारताचा हात आहे असे वाटल्याने कॅनडा, अमेरिका व अन्य पाश्चात्त्य राष्ट्रे भारताला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे बोल लावत आहेत. परंतु इस्रायलने गाझामध्ये प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत हजारो निरपराध लोक मृत्युमुखी पडले तरी त्याला ते ‘इस्रायलचा स्वसंरक्षणाचा अधिकार’ मानतात! ‘वन-चायना’संबंधात अत्यंत टोकदार व तिखट भूमिका घेणारा चीन इस्रायल-पॅलेस्टाईन यांनी मात्र ‘शांततामय सहजीवन स्वीकारावे’ म्हणत द्विराष्ट्रवादाला पािठबा देतो! ब्रिटिशांनी भारतीयांवर ‘जालियनवालाबाग’सारखे नृशंस अत्याचार केले तरी त्यांना विरोध अिहसकच असावा म्हणून आग्रही असणारे भारतीय जन (व त्या अिहसेच्या तत्त्वज्ञानाचे कौतुक करणारे विदेशी जन) हमासने केलेल्या हिंसेबाबत मात्र ‘ती हिंसा काही निर्वात पोकळीत घडली नव्हती’ असा वेगळा सूर सहज लावतात! ‘जीवो जीवस्य जीवनम’ या तत्त्वानुसार आदिमानव भले हिंसक असेलही, पण त्याच्यात इतका निर्ढावलेला दुटप्पीपणा मात्र नक्कीच नसेल असे वाटते. ती हुशारी खास ‘विकसित’ मानवाचीच! प्रसाद दीक्षित, ठाणे</p>

बेदी यांचे फिरकीयुग अ-विस्मरणीयच!

सिद्धार्थ खांडेकर यांच्या ‘खेळ, खेळी खेळिया’ सदरातील ‘बिशनसिंग बेदींचे असणे- नसणे..’ हा लेख (२८ ऑक्टोबर) वाचला. १९७० ते १९८० या दशकात बोथम, लिली, गार्नर हे त्रिकूट वेगवान गोलंदाज म्हणून खोऱ्याने बळी मिळवत असत. पण भारताकडे वेगवान मारा अपवादानेच करणारे मात्र हमखास यश देतील असे जे चार गोलंदाज होते त्यांच्याबद्दल अभिमान वाटायचा. ते चौघे : बेदी, चंद्रा, प्रसन्ना आणि वेंकट खरोखर प्रतिस्पध्र्याना आपल्या फिरकीवर नाचवायचे त्यामुळे भले एखाददुसरा नसला तरी बेदी/ चंद्रा/ प्रसन्ना मात्र ‘आहेत की’, असा दिलासा असे! आज भारताकडे एकापेक्षा एक वेगवान आणि फिरकी गोलंदाज आहेत; पण त्या काळात मात्र केवळ ६७ कसोटींतील त्यांचे २६६ बळी हे आम्हा क्रिकेटरसिकांना आजही अभिमानाचे वाटतात. बेदींचे फिरकीयुग हे चिरस्मरणीय ठरते.   सुनील समडोळीकर, कोल्हापूर</p>

मानसिकतेला दाद दिली पाहिजे

‘कृषीमंत्री म्हणून शेतकऱ्यांसाठी काय केले?’ असा सवाल शिष्याने नाव न घेता शरद पवार यांना उद्देशून गुरुवारी शिर्डी दौऱ्यात केला होता. त्याला पवारांनी शनिवारी सविस्तर आणि दमदार प्रत्युत्तर दिले. हे शिष्य जेव्हा गुजरातच्या  मुख्यमंत्रीपदी होते तेव्हा ते गुरूंकडे शेतीविषयक मार्गदर्शनासाठी जात असत. शिष्य जेव्हा केंद्रात प्रमुखपदी आले तेव्हा शेतकऱ्यांविरोधात तीन काळे कायदे आणण्यात आले. त्याविरोधात वर्षभर तीव्र आंदोलन झाले, ते चिरडण्यासाठी  सरकारने जणू शेतकऱ्यांविरोधात युद्ध पुकारले. शेवटी हे काळे कायदे तात्पुरते मागे घेण्यात आले. या आंदोलनादरम्यान अनेक शेतकऱ्यांचा बळी गेला. शिष्याने याविषयी सहानुभूतीचे ट्वीट सोडा उलट तुच्छतादर्शक उद्गार काढले. इतके होऊनही विरोधकांवर आरोप करण्यासाठी जी मानसिकता लागते, तिला खरोखर दाद दिली पाहिजे.  प्रा. एम. ए. पवार, कल्याण</p>