‘सावलीमिठीचे समाधान!’ हे संपादकीय वाचले. ‘संसदेने सर्वपक्षीय सहमतीद्वारे आरक्षणाची मर्यादा वाढवून घेणे आणि न्यायालयाकडून शिक्कामोर्तब मिळवणे,’ हा इलाज सुचविण्यात आला आहे. तो केला तर अनारक्षित जागा ५० टक्क्यांपेक्षा कमी होतील. एक खूपच मोठा गैरसमज असा आहे की अनारक्षित जागा या उच्चवर्णीय उच्चभ्रूंसाठी राखीव आहेत. पण प्रत्यक्षात अनारक्षित जागा या सर्वांसाठी खुल्या असतात. (त्यात आरक्षणाचा हक्क असलेले समाजही आले.) मागास समाजास अधिकची संधी म्हणून घटनेत राखीव जागांची तरतूद केली गेली. त्याच वेळी संपूर्ण समाजातील गुणवानांच्याही संधी कमी होऊ नयेत, म्हणून आरक्षणाला ५० टक्क्यांची मर्यादाही घातली गेली. घटनेतील हा न्याय्य विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी आरक्षित समाजांच्या तुलनात्मक मागासलेपणाचा अभ्यास ठरावीक अवधीनंतर करून आरक्षणाचे प्रमाण कमी-अधिक करणे, मात्र एकूण आरक्षण ५० टक्क्यांच्या आत ठेवणे अपेक्षित आहे. राजकारण्यांना एखाद्या समाजाला दुखावण्यापेक्षा आरक्षणाची मर्यादा वाढवणे सोपे वाटते. म्हणूनच तर काही मुरब्बी राजकारणी आरक्षणावरील मर्यादा वाढवण्याचा उपाय सुचवतात. पण एकूण आरक्षण ७० टक्के केले तर अनारक्षित जागा ३० टक्क्यांवर येतील. सध्या २० टक्के आरक्षण असणाऱ्यांसाठी आरक्षित २० टक्के आधिक खुल्या ५० टक्के अशा एकूण ७० टक्के जागा उपलब्ध असतात. आरक्षण ७० टक्क्यांवर गेल्यास त्या आरक्षित २० टक्के अधिक खुल्या ३० टक्के अशा ५० टक्केच जागा राहतील. हे एकूण समाजाच्या प्रगतीसाठी योग्य नाही.
● दीपक गोखले, पुणे</p>
पुरेशा आर्थिक संधी आहेत का?
‘सावलीमिठीचे समाधान!’ हा अग्रलेख (४ सप्टेंबर) वाचला. संसदेने आरक्षण मर्यादा वाढवणारा कायदा केला आणि न्यायालयाने तो मान्यही केला, तरी प्रश्न सुटेल का? लोकांना जगण्यासाठी पुरेशा आर्थिक संधी मिळत नाहीत, तेव्हाच आरक्षणाची मागणी होते. संधी कमी आणि लोकसंख्या प्रचंड, तिथे १०० टक्के आरक्षण दिले, तरी समस्या सुटत नाहीत. म्हणूनच ‘क्रीमी लेयर’ संकल्पना पुढे आली. समाजातील ज्यांना दोन-तीन पिढ्यांपासून आरक्षणाचा लाभ मिळाला आहे आणि जे आता आर्थिक-सामाजिकदृष्ट्या सक्षम झाले आहेत, त्यांनी हा लाभ सोडून खऱ्या वंचितांपर्यंत पोहोचू द्यावा, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात लाभ सोडण्यास फार कोणी तयार नाही. परिणामी समाजातील एक गट पुढे गेला आहे आणि दुसरा वंचितच आहे. त्यामुळे अर्थार्जनाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. अन्यथा वंचित वंचितच राहील!
● तुषार रहाटगावकर, डोंबिवली
यात आदिवासींचेही नुकसान!
जात प्रमाणपत्र देण्याची सध्याची प्रक्रिया काटेकोर असूनही आदिवासी, अनुसूचित जमातीचे खोटे दाखले देण्याचे प्रमाण वाढत आहे. बनावट प्रमाणपत्रधारकांना शासन करावे असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते, मात्र महाराष्ट्र शासनाने कोणतीही कारवाई केली नाही. आता मराठ्यांच्या दबावाने त्यांना जात प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ केल्यास अन्य जातीसमूहही अशीच पद्धत अवलंबण्याची मागणी करतील, ही शक्यता नाकारता येत नाही. आदिवासी- अनुसूचित जमातींमध्ये आधीच घुसखोरी झालेली आहे. धनगर संधी शोधत आहेत. बंजाराही हैदराबाद गॅझेटचा हवाला देऊन आम्हालाही आदिवासी- अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र द्या अशी पत्रके समाजमाध्यांतून प्रसारित करत आहेत. असे झाले तर आदिवासी व अनुसूचित जमातींचे, कातकरी, माडीया, कोलाम या आजही लाभांपासून दूर असलेल्या जमातींचे प्रचंड नुकसान होईल. हे टाळण्यासाठी आरक्षणाची मर्यादा वाढवणेच आवश्यक आहे.
● प्रभू राजगडकर, नागपूर</p>
पुरुषांचे प्रबोधन अधिक महत्त्वाचे
‘एज्युकेट गर्लला मॅगसेसे मिळाल्यानंतर थांबायचं नाही’ हा लेख (४ सप्टेंबर) वाचला. महिला सक्षमीकरणाच्या कोरड्या आरोळ्यांनी आणि स्वसंरक्षणाचे कामचलाऊ प्रशिक्षण देण्याने मुली सक्षम होणार नाहीत, दुर्गम भागातील मुलींच्या शिक्षणाचे प्रश्न सुटणार नाहीत. या प्रश्नाची पाळेमुळे पुरुषी पाशवी विचारांच्या चिखलात घट्ट रुतलेली आहेत. आजदेखील शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणापासून आपण शेकडो मैल दूर आहोत. प्राथमिक शाळेपासूनच अभ्यासक्रमात स्त्रीविषयक नवा दृष्टिकोन समाविष्ट करणे आवश्यक आहे. खरे तर स्त्रियांपेक्षा पुरुषांच्या मनात हा नवा विचार रुजावा यासाठी अधिक प्रयत्न होणे आवश्यक आहे. पुरुषांनी नव्या भूमिकेचा स्वीकार केला तर आपोआपच स्त्रियांची परिस्थिती सुधारेल.
● पंकज लोंढे, सातारा</p>