कोण हे कल्याण बॅनर्जी? त्यांची हिंमत होतेच कशी नकला करण्याची? दुसऱ्या क्रमांकाच्या महामहिमांच्या वर्तनशैलीवर बोट ठेवून आपण देशाला अमृतकाळाकडे नेण्यासाठी भरकस प्रयत्न (म्हणजे निलंबन वगैरे) करणाऱ्या महनीयांचा अपमान करतोय याची कल्पना तरी आहे का यांना? असतील जुन्या काळी विदूषक वगैरे. राजांची व्यंग व नकलेतून दाखवणारे, त्यांना वाईट वाटू नये म्हणून मेलेला पोपट डोळे उघडत नाही असे सांगणारे. आता अशांची गरज नाही हे कळत नाही का या दोन पानवाल्या प्रतिनिधींना? असेल तुमची बंगभूमी कलेचा आदर करणारी पण ही दिल्ली आहे व इथे फक्त एकाच्याच कलेची मक्तेदारी चालते .लोकशाहीचे मंदिर म्हणजे काय गंमत वाटली की काय? केवळ गर्भगृह नाही तर त्याच्या पायऱ्याही तेवढय़ाच पवित्र याची जाणीव न ठेवता हे सारे त्या बॅनर्जीच्या नकलेवर टाळय़ा कुटत होते. असे ‘चाळे’ करणाऱ्याला आवरायचे सोडून ते पप्पूमहाशय ‘शूट’ करत होते.
मग आमच्या स्मृतीताईंना बॅनर्जीऐवजी त्याचाच जास्त राग आला तर गैर काय? आणखी किती काळ हा पप्पू ‘पोरखेळ’ करत राहणार? अरे, निलंबित केले तर रडा, दुर्मुखलेला चेहरा करून धरणे द्या, आर्जवे करा, लोकशाहीची बूज राखण्यासाठी सारे आयुष्य ‘खपवणाऱ्या’ नेत्याला साकडे घाला, मिनतवारी करा, महनीयांचे मन द्रवेल अशी कृती करा. ते सोडून नकला काय करता? आमच्या कृतीचे गांभीर्य ठेवाल की नाही? सारे हसण्यावारी नेण्याची तुमची कृतीच बेकायदा. इतक्या पोटतिडकीने गर्भगृहाचे संचालन करणारे महामहीम तुम्हाला काय सिनेमात नकला करणारे जगदीप वाटले की काय? हो, आहेत ते राजस्थानच्या झुंझनूचे, म्हणून काय त्यांचा ‘झुनझुना’ करायचे ठरवले काय तुम्ही? गेल्या तीस वर्षांत बदलले असतील त्यांनी चार पक्ष पण आज ते मोठय़ा पदावर आहेत हे विसरून असले विदूषकी चाळे करायचे? परमपूज्य विश्वगुरूंनी ज्या पायऱ्यांना नमन करून आत प्रवेश केला त्याच पायऱ्यांवर बसून अशी नक्कल करण्याची तुमची प्राज्ञा होतेच कशी? त्यांनाही गेली वीस वर्षे असेच छळलेत तुम्ही? जनमानसावर मोहिनी घातलेल्या त्यांच्या आवाजाची कधी नक्कल कर तर कधी त्यांच्या लाखोंच्या कपडय़ावरून हिणव. काय हे? निवडून आले तरी पदाचा मान राखता येत नाही तुम्हाला? अलीकडच्या काळात बाहेरच्या नकलाकारांना आम्ही जसे वठणीवर आणले तसे तुम्हालाही आणू. आम्ही काय लोकच तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील. देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी अहोरात्र झटणारे हे सारे मान्यवर सर्वज्ञानी आहेत. ते कधी चुकतच नाहीत, त्यामुळे व्यंगातून का होईना पण त्यांच्या न झालेल्या चुका दाखवण्याची गरजच नाही. तरीही नकलेची हौस भागवायची असेल तर एखाद्या ‘कॉमेडी शो’मध्ये जा ना! भारतमातेच्या अस्तित्वाचा दरवळ असलेल्या या मंदिरात कशाला असे रिकामटेकडे उद्योग करता? या देशातील सामान्य जनतेला विनोद नाही तर विकास हवाय. त्यासाठी आम्ही गांभीर्यपूर्वक झटत असताना कशाला मध्ये असे नकलेचे अडथळे निर्माण करता? आता तर आम्ही केवळ उभे राहून महामहिमांविषयी आदर व्यक्त केला. जास्तच नाटके कराल तर भविष्यात गर्भगृहातले तुमचे अस्तित्वच मिटेल अशी तजवीज करू हे ध्यानात ठेवा!