लेखक- दिग्दर्शकाच्या कल्पनेतली व्यक्तिरेखा समजून घेऊन समोरच्या कलाकाराच्या चेहऱ्यात आणि मनात ती उतरवणे ही किमया सहजपणे साधणारी व्यक्ती खरोखरच जादूगार म्हणायला हवी. रंगभूषाकार ते रंगभूषा रचनाकार हा खूप मोठा पैस गाठलेल्या विक्रम गायकवाड यांच्या हातात ती जादू होती. कलाकाराचे मूळ अस्तित्व सपशेल लपवून लेखक- दिग्दर्शकाने त्याला ज्या पात्रासाठी निवडले आहे त्याचे रूप देण्याची रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांची हातोटी विलक्षण होती.

जब्बार पटेल दिग्दर्शित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेते मामूटी यांना दिलेले बाबासाहेबांचे रूप, कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात श्याम बेनेगल यांच्या ‘सरदार’ या चित्रपटात चरित्र अभिनेते परेश रावल यांना सरदार वल्लभभाई पटेल म्हणून प्रेक्षकांसमोर उभे करण्याची त्यांनी साधलेली किमया अफाट होती. ‘मी सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारखा दिसू शकतो यावर माझा विश्वास नव्हता. त्या वेळी अनेक अनुभवी, नावाजलेल्या रंगभूषाकारांनी माझ्या चेहऱ्यावर काम करून पाहिले. कोणालाच ते जमेना… गर्दीत उभ्या असलेल्या पोरसवदा विक्रमने मात्र मला सरदारांचे रूप दिले’, ही परेश रावल यांनी त्यांच्याविषयी सांगितलेली आठवण त्यांचे रंगभूषेचे कौशल्य काय होते हे कळण्यासाठी पुरेशी आहे. अभिनेता आमिर खान यानेही ‘दंगल’, ‘पीके’, ‘रंग दे बसंती’सारख्या चित्रपटांसाठी विक्रम गायकवाड यांनी त्याला दिलेले रूप आणि त्यातून ती व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मिळालेला आत्मविश्वास याबद्दल या अवलिया कलाकाराचे आभार मानले आहेत.

आपल्याला रंगभूषेविषयी विशेष ओढ आहे, हे विक्रम यांना स्वत:लाच लहानपणी लक्षात आले होते. एका बालनाट्यासाठी ज्येष्ठ रंगभूषाकार बबनराव शिंदे यांच्यासह काम करत असताना ज्या कुशलतेने ते चेहऱ्याला रंगरंगोटी करतात, मुलांचे रूपच पालटतात हे विक्रम यांना भावले. बारावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ रंगभूषाच करायची हे ठरवून बबनराव यांच्याकडे काम सुरू केले. पुढे एफटीआयआयमध्ये त्यांचे दुसरे गुरू आंजी बाबू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रॉस्थेटिक मेकअपसह वेगवेगळी तंत्रे समजून घेत अनुभव गोळा केला. अंगभूत कौशल्याची नेमकी जाण आणि बदलत्या काळानुसार त्या त्या कलेतील नवे तंत्र शिकण्याची गरज या दोन्हींचा मेळ त्यांनी साधला. त्यांची निरीक्षणशक्ती अफाट होती. मी माझ्या डोक्यात ‘कॅरेक्टर बँक’ तयार केली आहे, असे ते म्हणत असत. अगदी सेटवर काम करताना, कुठे फिरताना दिसणाऱ्या असंख्य व्यक्ती, त्यांच्या त्वचेचा रंग, पोत हा अभ्यास त्यांनी पक्का केला होता. चित्रपटाचा छायालेखक (सिनेमॅटोग्राफर) कशा पद्धतीने प्रकाश वापरतो आणि त्याचा कलाकाराच्या चेहऱ्यावर होणारा परिणाम काय याचाही त्यांनी बारकाईने अभ्यास केला होता. प्रॉस्थेटिक मेकअपचा वापर चित्रपट क्षेत्रात राजरोस सुरू झाल्यावर त्यांनी खास न्यू यॉर्क येथे रंगभूषेचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण, अनुभव, निरीक्षण आणि सातत्याने रंगभूषा कलेतील बदलांविषयी ठेवलेल्या नोंदी, अभ्यास या सगळ्याचे प्रतिबिंब त्यांच्या कामातून उमटत गेले. विनम्र-सोज्वळ व्यक्तिमत्त्व आणि समर्पित कलाकार या दोहोंचा त्यांच्यात असलेला संगम समोरच्याला आश्वस्त करत असे. त्यांच्या रंगभूषेने अनेक कलाकारांना अविस्मरणीय व्यक्तिरेखा दिल्या. त्यामुळे त्यांच्या जाण्याने रंगभूषा कलेतील एक पर्व अस्ताला गेले आहे असेच म्हणावे लागेल.