मोसमी पावसाबद्दल (मान्सून) आज आपल्याला जितके काही माहीत आहे, तितके चार-पाच दशकांपूर्वी माहीत नव्हते. मान्सूनची परिवर्तनशीलता आणि भौतिकशास्त्राचा अभ्यास करून त्याविषयीचे आकलन, समज वाढवण्याचे श्रेय आहे प्रा. सुलोचना गाडगीळ यांचे! त्यांनी पाच दशकांच्या संशोधनातून महत्त्वपूर्ण संशोधन केले. त्यांनी शास्त्रज्ञ म्हणून काम केलेल्या काळात संशोधन क्षेत्रात, त्यातही हवामानासारख्या क्षेत्रात तर महिलांची संख्या अत्यल्प होती हीदेखील लक्षात घेण्यासारखी गोष्ट.
प्रा. सुलोचना गाडगीळ यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांना तीन बहिणी. चारही मुलींना शिक्षणासाठी त्यांच्या पालकांनी प्रोत्साहन दिले. लहानपणापासूनच त्यांना गणितामध्ये विशेष रस आणि गती होती. त्यामुळे शालेय शिक्षणानंतर त्यांनी तत्कालीन पुणे विद्यापीठातून उपयोजित गणित या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली. महाविद्यालयीन काळातच त्यांचे डॉ. माधव गाडगीळ यांच्याशी सूर जुळले. १९७३ मध्ये त्यांना मिळालेल्या शिष्यवृत्तीमुळे हार्वर्ड विद्यापीठात येथील डॉक्टरेट आणि मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील पोस्ट-डॉक्टरेटपर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. त्यानंतर त्या भारतात परतल्या. ‘महाराष्ट्रातील १९७२ चा दुष्काळ- १९७३ मध्ये चांगला पाऊस’ या घटनांमागची कारणे त्यांनी सुरुवातीच्या काळात, अभ्यासक म्हणून उलगडून दाखवली.
भारतीय ऊष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेत (आयआयटीएम) सीएसआयआर पूल ऑफिसर म्हणून रुजू होऊन त्यांनी दोन वर्षे काम केले. प्रख्यात शास्त्रज्ञ व माजी संचालक प्रा. आर. अनंतकृष्णन आणि डी.आर. सिक्का हे त्यांचे मार्गदर्शक ठरले. इथे त्यांनी मान्सूनच्या परिवर्तनशीलतेचा अभ्यास केला. पावसाच्या परिवर्तनशीलतेच्या ज्ञानाचा आणि अंदाजाचा उपयोग शेती धोरणांसाठी आणि पर्यावरणीय तसेच उत्क्रांतीविषयक घटनांचे प्रारूप करण्यासाठी पद्धतीच्या सूत्रीकरणावर काम केले. त्यासाठी त्यांनी पारंपरिक आणि उपग्रह विदाचे विश्लेषण केले, विविध स्तरांच्या जटिलतेच्या प्रारूपांद्वारे महत्त्वाच्या घटनांसाठी जबाबदार यंत्रणांचा शोध घेतला. त्यांच्या अभ्यासातून मान्सूनचे अनेक नवे पैलू स्पष्ट झाले. ‘एल निनो आणि ला निना’ पेक्षाही, भारतीय मोसमी पावसावर ‘विषुववृत्तीय हिंद महासागरी वातावरणीय दोलने’ (इक्विनू) अधिक परिणाम करतात, हे त्यांनी सिद्ध केले. उपग्रह-विदेचा अभ्यास करणाऱ्या पहिल्या काही शास्त्रज्ञांपैकी त्या होत्या. त्यांच्या अभ्यासातून १९८० च्या दशकात, ‘सागरपृष्ठीय तापमान (एसएसटी) किमान २८ अंश सेल्सियस असल्याखेरीज मोसमी पावसाचे ढग निर्माण होत नाहीत’ या अर्थाचा निष्कर्ष निघाला, तो पुढल्या अभ्यासांतही उपयुक्त ठरत असून आता सागरपृष्ठाची तापमानवाढ आणि बिगरमोसमी (अवकाळी) पाऊस यांच्या संबंधांविषयीचे अभ्यासही त्याआधारे होत आहेत.
त्यांनी बंगळूरुच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये ‘वातावरण आणि समुद्र विज्ञान विभाग’ स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्या आयआयटीएमच्या शास्त्रज्ञांशी सतत संपर्कात राहिल्या आणि त्यांच्यासह विविध संशोधन विषयांवर सक्रिय सहकार्य केले. अलीकडेच त्या आयआयटीएमच्या मान्सून मिशनच्या वैज्ञानिक पुनरावलोकन आणि निरीक्षण समिती, स्वतंत्र समकक्ष पुनरावलोकन समिती, यांसारख्या उच्चस्तरीय समित्यांमध्ये कार्यरत होत्या.