भारतीय शेतीमध्ये घडलेला मोठा बदल म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘हरितक्रांती’मागे डॉ. एम. एस. स्वामिनाथन हे एकटेच होते, असं नाही. कोणताही प्रचंड बदल एकट्यादुकट्या माणसाकडून होत नसतो. तरीही स्वामिनाथन यांनाच हे श्रेय दिलं जातं, त्यामागे कारणं आहेत. ही क्रांती सन १९६५ मध्ये सुरू झाली आणि १९६८ पासून तिचे परिणाम दिसू लागले. तोवर भारतीयांना अमेरिकेकडून मिळणारा ‘पीएल-४८०’ (म्हणजे अमेरिकेच्या पब्लिक लॉ क्रमांक ४८० नुसार, गोरगरीब देशांना मदत म्हणून धाडला जाणारा) गहू खावा लागत होता.

‘जय जवान जय किसान’ ही नुसती घोषणाच न देता शेतीची आणि शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्याचा चंग आणि त्या वेळचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी बांधला होता. त्यासाठी नेहरूंच्या मंत्रिमंडळात पोलाद खातं सांभाळणारे सी. सुब्रमणियन यांना कृषिमंत्री होण्याची विनंती शास्त्री यांनी केली आणि सुब्रमणियन हेही, त्यानुसार कामाला लागले. म्हणजे, त्यांनी त्या वेळी दिल्लीतच भारतीय कृषी संशोधन संस्थेत ‘पेशीआनुवंशिकी वनस्पतीशास्त्रज्ञ’ म्हणून काम करणाऱ्या आणि अमेरिकेतून शिकून आलेल्या तमिळभाषक शास्त्रज्ञाला बोलावलं- स्वामिनाथन! त्यांनी, अमेरिकेतलं गहू उत्पादन इतकं कसं काय वाढू शकलं याची माहिती मंत्र्यांना दिली.

मग, पोलाद क्षेत्रात एकेकाळी जमशेटजी टाटांनी ‘विदेशी उत्पादन नव्हे, तंत्रज्ञान इथे आणून इथेच उत्पादन वाढवू’ असा मार्ग दाखवला होता, तोच इथं वापरायचाय, हे सुब्रमणियन यांना लक्षात आलं. अमेरिकेत गव्हाचं उत्पादन इतकं वाढलं, ते कशामुळे? कुठल्या संशोधनामुळे? कोणी केलं ते संशोधन? हे सगळं भारतात आणता येईल?

त्यासाठी नॉर्मन बोरलॉग यांना भारतात आणण्याची तयारी हवी, हे स्वामिनाथन यांनी सुचवलं. ते मान्यही झालं. या बोरलॉग यांच्याशी स्वामिनाथन यांचा संपर्क त्याहीआधी दहा वर्षं (१९५४ पासून) होता. बोरलॉग आले. आधीपासूनच पाण्याची उपलब्धता असलेल्या भागावर लक्ष केंद्रित करू, हे त्याआधीच ठरलं. त्यानुसार बोरलॉग पंजाबात अधिक फिरले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय कृषी संशोधन संस्थेनं काम करून गव्हाचे नवे वाण आणले. या सर्व प्रक्रियेत काहीही कमी पडू नये, हे पाहण्याची जबाबदारी केंद्रीय कृषी खात्याचे तत्कालीन सचिव बी. शिवरामन यांनी निभावली. (हे शिवरामन पुढे नियोजन आयोगाचे सदस्य झाले आणि त्याहीपुढे (१९७९) त्यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं राष्ट्रीय कृषी ग्रामीण वित्तपुरवठ्यासाठी रिझर्व्ह बँकेनंच निराळी संस्था उभारावी अशी शिफारस केली; ती संस्था म्हणजे आजची ‘नाबार्ड!).

हरितक्रांतीचा परिणाम दिसला तोवर शास्त्रीजी या जगात नव्हते, सी. सुब्रमणियन हे १९६७ ची निवडणूक हरल्यामुळे तेही दिल्लीत नव्हते. अथपासून इतिपर्यंत या क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यात सहभागी असलेली एकमेव व्यक्ती म्हणजे डॉ. स्वामिनाथन.

हा सहभाग कधीपासूनचा, याच्या उत्तरापासूनच प्रियंवदा जयकुमार यांनी लिहिलेलं ‘डॉ. एम. एस. स्वामिनाथन – द मॅन हू फेड इंडिया’ हे पुस्तक सुरू होतं. हार्पर कॉलिन्सतर्फे या ३६० पानी आणि ६९९ रुपये किमतीच्या पुस्तकात केवळ हरितक्रांतीचाच नव्हे, तर डॉ. स्वामिनाथन यांनी विदेशात केलेल्या कामाचाही आढावा आहे. डॉ. स्वामिनाथन यांच्या जन्मशताब्दीचं निमित्त या पुस्तकाला असल्यानं, त्यांच्या १०० व्या जयंतीदिनीच – ७ ऑगस्ट रोजी- या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दिल्लीत झाला. माजी राज्यपाल राजमोहन गांधी, अर्थतज्ज्ञ माँतेकसिंग अहलुवालिया, खासदार के. कनिमोळी आणि शशी थरूर यांचा सहभाग असलेला परिसंवाद, असं या सोहळ्याचं स्वरूप. त्यात हरितक्रांतीच्या दुष्परिणामांचा विषयही निघालाच.

तेव्हा अहलुवालियांनी, ‘विज्ञानाने काम चोख केले, पुढली धोरणे राजकीय असतात- राजकारणाचा दोष विज्ञानाला देऊ नका’ अशी स्पष्टोक्ती केली. पण धोरणांवरही डॉ. स्वामिनाथन प्रभाव पाडू शकले नसते का, ‘स्वामिनाथन समिती’च्या शिफारशी तंतोतंत राबवून दिलेला हमीभाव, हा गहू (किंवा ऊससुद्धा!) अधिक लावला जाण्यातून निर्माण झालेल्या समस्यांवर इलाज ठरू शकला असता का, या प्रश्नांचा वेध प्रियंवदा जयकुमार कुणाला यांच्या पुस्तकाच्या आधारे घेता येईल. या प्रश्नांची थेट उत्तरं पुस्तकात नाही. डॉ. स्वामिनाथन यांची कार्यमग्नता, कार्यशैली, व्यक्तित्व, जिथं गेले तिथं त्यांनी मिळवलेलं यश… या मुद्द्यांवर हे पुस्तक भर देतं. स्वामिनाथन यांच्या ऋजू स्वभावाचं दर्शन पुस्तकात घडतं. एकंदर पुस्तकाचं स्वरूप यशोगाथेसारखंच आहे. पण तरीही, स्वामिनाथन यांच्या ऐतिहासिक कार्याच्या मूल्यमापनासाठी अभ्यासकांना हा एक दस्तावेज प्रियंवदा जयकुमार यांच्या लिखाणामुळे मिळाला आहे.