ब्लॉकचेनसारखे तंत्रज्ञान अमेरिका केंद्रित अर्थव्यवस्थेच्या मुळावर हळूहळू घाव घालू लागले आहे आर्थिक व्यवहारांपलीकडे जाऊन जागतिक सत्तासंतुलनावर परिणाम करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे.
‘‘येत्या काही वर्षांत चीन अमेरिकेला दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत मागे टाकून कदाचित पुढे जाईल! मात्र जी व्यवस्था अमेरिकेने महायुद्धोत्तर जगात उभी केली आहे तिचा प्रभाव ओसरायला काही दशके उजाडतील. यत्रतत्र पसरलेल्या डॉलरकेंद्रित अर्थव्यवस्थेमुळे अमेरिकेचे जागतिक महासत्ता हे स्थान काही दशके वादातीत असेल’’, कार्निगी एंडोऊमेंटचे वरिष्ठ फेलो मायकल पेटिस यांचे हे निरीक्षण! आपण विविध तंत्रज्ञाने जागतिक सामर्थ्याच्या वाटपाला कशा प्रकारे धक्के देत आहेत याचा काही लेखांत आढावा घेतला. बाकी तंत्रज्ञाने कौशल्य अथवा संसाधनांच्या नियंत्रणावरून उलटापालट करत असताना ब्लॉकचेन तंत्रज्ञान अर्थव्यवस्था या महायुद्धोत्तर जगाचा शेवटचा चिरा उखडण्यासाठी सज्ज होत आहे.
ब्लॉकचेनची संकल्पना
ब्लॉकचेन हे एक विकेंद्रित डिजिटल खातेवहीसारखे तंत्रज्ञान आहे. ते कॉम्प्युटरच्या नेटवर्कमध्ये सुरक्षितपणे व्यवहार नोंदवून ठेवते. ब्लॉकचेनमधील ब्लॉक म्हणजे ठोकळ्याचे तीन घटक असतात. पहिला म्हणजे माहिती. म्हणजे एखादा व्यवहार, त्यामध्ये सहभागी असलेले वापरकर्ते, त्या व्यवहाराचे मूल्य वगैरेंचे संग्रहण इथे केले जाते. दुसरा घटक म्हणजे त्या ब्लॉकची ओळख (हॅश). सुलभतेसाठी आपण त्याची तुलना बोटांच्या ठशाशी करू. प्रत्येक माहितीची एक स्वतंत्र ओळख असते. त्यामध्ये बदल केल्यास त्याच्या हॅशमध्ये बदल होतो. ज्या प्रकारे एकसारखे बोटांचे दोन ठसे मिळणे अशक्य आहे तसेच दोन ब्लॉकची एकसारखी ओळख असणे अशक्य! तिसरी गोष्ट म्हणजे या ब्लॉकची पूर्वाश्रमीची ओळख.
हे म्हणजे एखाद्या व्यक्तीने ब्रेकअप करून नवीन नात्यामध्ये गेल्यासारखं! म्हणजे तिचा जोडीदार तर नवीन असतो मात्र पहिल्या नात्याचा परिणाम तिच्या मनावर झालेला असतो. म्हणजे समजा त्या व्यक्तीला काही मानसिक समस्या आल्यास मानसोपचार तज्ज्ञ तिच्या आयुष्यातील सर्व नात्यांचा संबंध उलगडत एक-एक करत पाठीमागे जातो आणि तिची आजची ओळख अथवा वर्तणूक मागील नात्यांवर अवलंबून आहे हे सिद्ध करतो. ते अनुभव तिच्या आजच्या अस्तित्वाचे अविभाज्य अंग आहेत. त्याचप्रमाणे ब्लॉकचेनमध्ये पूर्वाश्रमीची ओळख एखाद्या ब्लॉकच्या मूळ निर्मितीपर्यंत जायला मदत करते.
एखाद्या टप्प्यावर एखाद्या ब्लॉकच्या माहितीमध्ये बदल झाला तर तो कोणी केला हे या वैशिष्ट्यामुळे शोधून काढणे सोपे जाते. आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ब्लॉकच्या माहितीमध्ये बदल झाला तर त्याची मान्यता ही कोणत्याही केंद्रीकृत व्यवस्थेकडून न मिळता पीअर टू पीअर पद्धतीने होते. म्हणजेच त्या नेटवर्कचा सदस्य असणाऱ्या ५० टक्के सदस्यांकडून त्यास मान्यता मिळणे गरजेचे असते. अशा गुणधर्मांमुळे ब्लॉकचेन प्रणाली जगातील सर्वात सुरक्षित प्रणाली गणली जाते.
ब्लॉकचेन आणि प्रशासन
१९९१ मध्ये ब्लॉकचेनची संकल्पनाच डिजिटल कागदपत्रांच्या विश्वासार्ह पडताळणीसाठी मांडली होती. त्याचाच विस्तार करताना सीएसआयएस या अमेरिकेच्या थिंक टॅंकने लोकशाहीसाठी बहुविध फायदे सांगितले आहेत. जगभरात १०० करोडपेक्षा अधिक लोक कागदपत्रे नसल्याने अथवा ओळखपत्र गहाळ झाल्यामुळे राजकीयदृष्ट्या अस्तित्वहीन आहेत. पुनर्वसन योजनांपासून रोजगारापर्यंतच्या समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा वेळी ब्लॉकचेनआधारित ओळखपत्र त्यांच्या अस्तित्वाचा कायमस्वरूपी पुरावा म्हणून महत्त्वाची भूमिका बजावू शकते. युद्ध, नैसर्गिक आपत्ती अशा परिस्थितीत कागदपत्रे नष्ट झाली तरी विश्वासार्ह डिजिटल ओळख पीडितांना ब्लॉकचेनच्या माध्यमातून पटवता येईल.
जमिनीच्या कागदपत्रांची क्लिष्टता, फेरफार आणि फसवणूक ही सामान्य गोष्ट आहे. सोव्हिएत विघटनानंतर स्वतंत्र झालेल्या जॉर्जियात सुरुवातीचे प्रशासन कणखर नव्हते. या दरम्यान जमिनीच्या कागदपत्रांमध्ये बेकायदेशीर फेरफार करण्यात आला. २०१८ पासून जॉर्जियामध्ये अंगीकारलेल्या ब्लॉकचेनआधारित भू-नोंदणी प्रक्रियेमुळे केवळ तीन मिनिटांमध्ये नोंदणीची प्रक्रिया होऊन प्रक्रिया सुटसुटीत होण्यास मदत झाली आहे. आर्थिक क्षेत्रात कूटचलनाव्यतिरिक्त (क्रिप्टोकरन्सी) ब्लॉकचेनचे नावीन्यपूर्ण उपयोग आहेत.
विकसनशील देशांमध्ये ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून विमा पॉलिसी जारी करणे, शेतकऱ्यांना योजनांचा हप्ता देणे, संस्थागत कर्जाचे सार्वत्रिकीकरण यावर अभ्यास होत आहे. मध्यस्थांची आवश्यकता नसल्याने बँकेचे व्यवहार शुल्करहित होऊन दुर्बल घटकांसाठी बँकिंग स्वस्त होऊ शकते. रवांडामधील एका प्रयोगात विमाधारित शेतकऱ्याच्या प्रदेशात अतिवृष्टी झाल्यास कोणत्याही प्रक्रियेविना स्वयंचलित पद्धतीने नुकसानभरपाई तत्काळ शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याच्या शक्यतेची चाचपणी केली जात आहे.
ब्लॉकचेन निवडणुका घेण्याच्या पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करू शकते. विशेषत: मतदानयंत्रांच्या विश्वासार्हतेवरून वाद होण्याच्या काळात पीअर टू पीअर पद्धतीमुळे ब्लॉकचेनआधारित मतदान आणि मतदार याद्या सुरक्षित आणि पारदर्शी होण्याकडे वाटचाल ठरू शकते. तसेच डिजिटल मतदानामुळे मतदानाची टक्केवारी प्रचंड वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारतासारख्या प्रचंड मतदारसंख्येच्या यंत्रणेमध्ये निवडणूक खर्चापासून निकालाच्या वेगापर्यंत ब्लॉकचेन भूमिका बजावून निवडणूक विश्वासार्ह बनवू शकतो. २०१८ मध्ये सिएरा लिओन या आफ्रिकेतील देशामध्ये ब्लॉकचेनचा जाणीवपूर्वक वापर करण्यामागे निर्वाचित सरकारची विश्वासार्हता वाढविणे हा महत्त्वाचा उद्देश होता.
आर्थिक साम्राज्याला आव्हान
युद्धकाळात डीप फेकसारख्या आव्हानांचा सामना करताना ब्लॉकचेनचा वापर करून वृत्तवाहिन्या त्यांचे वार्तांकन सुरक्षित आणि अधिकृत बनविण्याचा प्रयत्न करत आहेत. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने कॅनन या कॅमेरा उत्पादकाबरोबर भागीदारी करून एक व्यावसायिक कॅमेरा आणि इन-हाऊस वर्कफ्लो विकसित केला आहे. ही प्रणाली फोटो काढल्या क्षणीच त्या प्रतिमेचे पिक्सेल्स स्थिर करते आणि स्टॅम्प करते, तसेच ती फोटो आणि संबंधित तपशील सार्वजनिक ब्लॉकचेनवर नोंदवते. त्यामुळे तो फोटो अस्सल आहे की नाही हे ओळखण्यात अडचण येत नाही.
आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विचार केल्यास जगभरात शंभरहून अधिक देश सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (सीबीडीसी) सक्रियपणे विकसित करत आहेत. हे रोखीच्या व्यवहाराच्या समतुल्य आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय वित्त आणि व्यापाराच्या प्रस्थापित पद्धतीमध्ये मूलभूत बदल होऊ शकतो. चीन या क्षेत्रात अग्रगण्य आहे. तो आपल्या सीबीडीसीचा वापर विकसनशील जगाला ‘डी-डॉलरायझ’ करण्याचे साधन म्हणून करत आहे. हे यूएस डॉलरच्या जागतिक राखीव चलनाच्या स्थानाला थेट आव्हान आहे. चीनचा हा उद्देश यशस्वी ठरला, तर सीबीडीसीद्वारे पारंपरिक, डॉलरआधारित ‘स्विफ्ट’ प्रणालीच्या बाहेर जाऊन वेगवान, स्वस्त आणि थेट क्रॉस-बॉर्डर व्यवहार सुलभ होऊ शकतात.
स्विफ्ट प्रणाली सध्या आर्थिक आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी बँकांद्वारा वापरली जाते. यामुळे एक नवीन प्रकारची ‘चलन स्पर्धा’ निर्माण होऊन डिजिटल चलने आगामी काळात भूराजकीय प्रभावाची साधने बनतील. २०२१ मध्ये, एल साल्वाडोर हा बिटकॉइन हे कायदेशीर चलन म्हणून स्वीकारणारा पहिला देश ठरला. २०२३ मध्ये, झिम्बाब्वेने स्वत:च्या चलनाच्या अवनतीला पर्याय म्हणून सोन्यावर आधारित डिजिटल चलन सुरू केले. त्याचप्रमाणे, अर्जेंटिनामध्ये राष्ट्रपती झेव्हियर मिलेईच्या सुधारणा योजनेअंतर्गत प्रचंड महागाई आणि पेसोच्या अवमूल्यनापासून सुरक्षितता मिळवण्यासाठी नागरिकांमध्ये क्रिप्टोचा वापर वाढत आहे. नायजेरियामध्ये, जेथे यूएस डॉलरची उपलब्धता मर्यादित आहे, तेथे परदेशात राहणारे नागरिक मायदेशी परतावा पाठविण्यासाठी डॉलर्सऐवजी स्टेबलकॉइन्स या क्रिप्टोकरन्सीचा वापर करत आहेत.
आर्थिक निर्बंधांचे नाक दाबले की शांततापूर्ण वर्तणुकीचे तोंड उघडते हा जागतिक राजकारणाचा अनुभव! मात्र रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यानंतर क्रिप्टोकरन्सीचा व्हेंटिलेटर रशियाचे जगणे सुसह्य करत आहे. २०२४ मध्ये रशियन संसदेने क्रिप्टो मायनिंगला कायदेशीर करणारे विधेयक मंजूर केले आणि निवडक संस्थांना सीमापार आर्थिक व्यवहारांसाठी डिजिटल चलनाचा वापर करण्याची परवानगी दिली. रशियाच्या सर्वात कुख्यात क्रिप्टो एक्स्चेंज, ‘गॅरंटेक्स’ने २०२३ मध्ये एकूण जागतिक प्रतिबंधित संस्थांशी संबंधित व्यवहारांपैकी ८२ टक्के क्रिप्टो व्यवहार हाताळले. २० व्या शतकातील स्वीस बँकेचे कार्य आता ही कूटचलने करू लागली आहेत. कोणतेही केंद्रीकृत नियंत्रण नसल्याने दहशतवाद्यांना होणारा निधीचा पुरवठा, आर्थिक गैरव्यवहार (मनी लाँडरिंग) देखील बिनदिक्कतपणे चालू राहण्याचा धोका यामुळे नाकारता येत नाही.
एकूणच ब्लॉकचेनचा परिणाम म्हणजे ऊन-सावल्यांचा खेळ आहे. कधी प्रस्थापित डॉलरकेंद्रित अर्थव्यवस्थेच्या डेरेदार वृक्षाला बदलाचे चटके देणारा तर कधी बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांच्या विषवल्लीला शीतलता देणारा! मात्र या ऊन-सावल्यांना बळ देणारा सूर्य मानवी विवेकचाच आहे हे कटू सत्य आहे.
phanasepankaj@gmail.com
तंत्रज्ञान आणि राजकारण यांच्या अंत:संबंधाचे विद्यापीठीय संशोधक