नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी मालिकांमधून १९९० साली दूर गेल्यावर गेली ३५ वर्षे प्रसिद्धीच्या झोतापासून दुरावलेल्या गुणी अभिनेत्री दया डोंगरे काल कालवश झाल्या. पण त्यांनी एकेकाळी आपल्या अभिनयाचा जो ठसा रसिकांच्या मनावर उमटवला होता, तो आजही कायम होता. ‘लेकुरे उदंड जाली’ या नाटकात खरे तर त्या बदली कलाकार म्हणून आल्या होत्या. त्याअगोदर कल्पना देशपांडे या देखण्या, अभिनयसंपन्न आणि चांगला गाता गळा असलेल्या अभिनेत्रीने ‘लेकुरे’मध्ये अप्रतिम भूमिका साकारली; पण काही कारणाने हे नाटक सोडले होते. दया डोंगरे यांनी बदली भूमिकेतही अशी छाप सोडली की, आजही ‘लेकुरे’ म्हणताच श्रीकांत मोघे आणि दया डोंगरे हीच जोडी अनेकांना आठवते.

अमरावतीत जन्मलेल्या दया मोडक- डोंगरे यांचे वडिलांच्या नोकरीमुळे धारवाडात शालेय शिक्षणासाठी वास्तव्य होते. आई यमुनाबाई मोडक आणि गायिका-अभिनेत्री आत्या शांता मोडक यांच्याकडूनच त्यांना कलेचा वारसा लाभला. त्यांनी शास्त्रीय संगीत व नाट्यसंगीताचे प्रशिक्षण घेतले होते. वयाच्या १२ व्या वर्षी आकाशवाणी धारवाड केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी त्या गायल्या होत्या. पुढे पुण्यात, फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धांत त्या चमकल्या आणि मो. ग. रांगणेकरांच्या ‘रंभा’ नाटकातून व्यावसायिक रंगभूमीवर आल्या. तिथे कौतुक झाल्याने अभिनयाची ओढ लागली. ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये त्यांनी प्रवेश घेतला. या दिल्लीच्या वास्तव्यातच त्या सई परांजपे आणि अरुण जोगळेकर यांच्या नाट्यसंस्थेशी जोडल्या गेल्या आणि ‘नांदा सौख्यभरे’सारख्या नाटकांतून कामे करू लागल्या. मुंबईत परतल्यावर गोवा हिंदु असोसिएशनच्या नाटकांतून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करत्या झाल्या. इथे दामू केंकरे यांच्या दिग्दर्शनाखाली त्यांनी अनेक नाटके केली. दामू केंकरे यांच्या पत्नी कधी कधी थट्टेत म्हणतही, ‘केंकरेंच्या नाटकात दया असणारच. बाकी मग कुणीही असतील.’ त्यांनी ‘अखेरचा सवाल’, ‘मंतरलेली चैत्रवेल’, ‘दिसतं तसं नसतं’, ‘तुझी माझी जोडी जमली रे’, ‘याचसाठी केला होता अट्टहास’, ‘इडा पिडा टळो’, ‘संकेत मीलनाचा’, ‘बिऱ्हाड बाजलं’, ‘माणसाला डंख मातीचा’, ‘माता द्रौपदी’ अशा अनेक नाटकांतून रसरशीत भूमिका साकारल्या. ‘मंतरलेली चैत्रवेल’च्या बसला झालेल्या अपघातात शांता जोग, जयराम हर्डीकरांसारखे कलाकार गेले. मात्र दया डोंगरे या अपघातातून बचावल्या. माहेर व सासरही संपन्न असल्याने उदरनिर्वाह वा करीअरसाठी म्हणून त्यांनी कधीच नाटकांतून कामे केली नाहीत. त्यांनी ‘गजरा’ या दूरदर्शनवरील कार्यक्रमानंतर पुढे अनेक मालिकांतून कामे केली. चित्रपट क्षेत्रही त्यांनी व्यर्ज मानले नाही. ‘उंबरठा’, ‘मायबाप’, ‘आत्मविश्वास’आदी मराठी; तर ‘नकाब’, ‘आश्रय’, ‘जुंबिश’, ‘नामचीन’, ‘दौलत की जंग’सारख्या हिंदी चित्रपटांतूनही त्यांनी आपल्या अभिनयाचे नानाविध पैलू दाखवले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील उपजत करारीपणा आणि नजरेतील जरब यामुळे बहुश: खलभूमिका त्यांच्या वाट्याला आल्या. खाष्ट सासू ही त्यांची प्रतिमा रसिकमनावर कोरली गेली. ‘मायबाप’ आणि ‘खट्याळ सासू, नाठाळ सून’मधील भूमिकांसाठी त्यांना अभिनयासाठी राज्य पुरस्कारही मिळाले. अलीकडेच २०१९ मध्ये त्यांना नाट्य परिषदेचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ही देण्यात आला. डोळ्यांच्या समस्येमुळे तसेच अन्य कारणांनी पुढे त्यांना अभिनय कारकीर्द आटोपती घ्यावी लागली होती. मात्र, करारी व्यक्तिमत्त्वाच्या या गुणी अभिनेत्रीला रसिकांच्या मनात कायमच स्थान होते.