एखादा प्रकल्प एके ठिकाणी येणार याचा वास येताच सत्ताधीशांचे बगलबच्चे कामाला लागतात; तसे वाढवण बंदरासह चौथ्या मुंबईबाबत होऊ नये…
मुंबईत नव्या विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘चौथ्या मुंबई’चे सूतोवाच केले. त्याचे स्वागत. नवी मुंबईतील विमानतळामुळे त्या सगळ्या परिसराचा चेहरा-मोहरा बदलेल. या विमानतळाचे कंत्राट कसे आणि कोणास दिले गेले, त्याची प्रक्रिया आदींबाबत अनेकांस अनेक प्रश्न, भिन्न मते असतील. ते योग्यच. पण एकदा एखादा प्रकल्प सुरू केल्यावर तो अपेक्षेप्रमाणे तडीस कसा न्यावा याबाबत या सरकारकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे, हे त्यांचे विरोधकही मान्य करतील. नवी मुंबईतील हा विमानतळ अवघ्या चार वर्षांत आकारास आला. प्रकल्पाची आखणी, निधी उभारणी आणि पूर्तता इत्यादी मुद्दे गुंतवणूकदार आणि प्रकल्पामुळे होणारी संभाव्य प्रगती यासाठी कळीचे असतात. त्यामुळे विमानतळासारखा प्रकल्प वेळापत्रकानुसार होत असेल तर ती बाब आपल्या देशात कौतुकास्पद. या विधानावर अनेकांच्या भुवया उंचावतील. पण त्यामुळे वास्तव बदलणार नाही. या विमानतळासह किनारी महामार्ग (कोस्टल रोड), पूर्व मुक्त मार्ग (ईस्टर्न फ्री वे) इत्यादी प्रकल्पांची मुहूर्तमेढ काँग्रेसच्या काळात झाली हे त्रिवार सत्य. परंतु फ्री वे वगळता अन्य अनेक प्रकल्प त्यांच्या काळात रखडत गेले हेही तितकेच सत्य. त्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई विमानतळ ज्या गतीने आकारास आला त्यासाठी स्थानिक आणि केंद्र सरकार अभिनंदनास खचितच पात्र ठरते. ते केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात त्या चौथ्या मुंबईविषयी.
त्याआधी तिसऱ्या मुंबईविषयी. हा नवा विमानतळ विकसित झाल्यानंतर त्या परिसरात आकारास येईल ती मुंबई तिसरी. यातील ‘आकारास’ हा शब्द महत्त्वाचा. कारण आपल्याकडे आपोआप वाढणाऱ्या शहरांचे आकार किती बेढब असतात हे शालेय सत्य सर्व जाणतात. त्या सत्याच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या मुंबईच्या शेजारी असलेल्या दुसऱ्या मुंबईचा सुडौलपणा लक्षात घ्यायला हवा. दुसरी, म्हणजे नवी मुंबई, ही सुडौल/सुबक आहे कारण ती प्रयत्नपूर्वक नियोजनातून आकारास आली. अनेकांस ठाऊक असणार नाही; पण ठाणे खाडीच्या पलीकडे नवी मुंबई वसवायला हवी अशी पहिली सूचना देश स्वतंत्र होताना अमेरिकी शहर नियोजक अल्बर्ट मेयर आणि विख्यात अभियंता एन. व्ही. मोडक (वैतरणेचा मोडक सागर जलाशय ज्यांच्या नावे आहे ते) यांनी केली होती. पुढे ‘सिडको’च्या स्थापनेनंतर जेबी डिसूझा यांच्यासारख्या नेक अधिकाऱ्याकडे ही जबाबदारी दिली गेली आणि चार्ल्स कोरिआ ते नाटककार/लेखक विजय तेंडुलकर, डॉ. किरीट पारीख, माधवराव गोरे यांच्यासह अनेक तज्ज्ञांच्या सहभागाने प्रस्तावित शहराचा आराखडा आकारास आला. हा इतिहास मुद्दाम येथे देण्याचे कारण म्हणजे शहरे म्हणजे नुसत्या इमारती नव्हेत. शरीराच्या रक्ताभिसरणाप्रमाणे शहरे ही संस्कृती अभिसरणाचीही केंद्रे असतात. असा सर्वांगीण विचार झाल्यामुळे नवी मुंबई आखीव रेखीव राहिली. विद्यामान राजकारणी या शहराच्या सुडौलता भंगासाठी इमानेइतबारे प्रयत्न करत असले तरी मूळ रचनाच उत्तम असल्यामुळे तिचे विद्रूपीकरण अन्य शहरांप्रमाणे सहज शक्य झालेले नाही. या ‘सुंदर खाशी सुबक ठेंगणी’ अशा दुसऱ्या मुंबईच्या शेजारी तयार होणारी तिसरी मुंबई मात्र अशीच असेल किंवा काय याबाबत प्रश्न पडतो. शहरे आपोआप वाढत नाहीत. निगुतीने वाढवावी लागतात. आपोआप वाढतात ते उकिरडे. हे वास्तव तिसऱ्या मुंबईबाबत खरे होईल अशी भीती व्यक्त केली जात असताना चौथ्या मुंबईबाबत आवश्यक ती खबरदारी आणि जागरूकता दाखवण्याची गरज आहे.
म्हणून चौथ्या मुंबईची मुहूर्तमेढही रोवली जाण्याआधी ज्याप्रमाणे दुसरीचे- नवी मुंबईचे- नियोजन झाले त्याप्रमाणे आतापासूनच प्रयत्न हवेत. त्यासाठी या संभाव्य महानगराच्या नियोजनाचे अधिकार फडणवीस यांनी खुद्द स्वत:कडे वा श्रीकर परदेशी यांच्यासारख्या अधिकाऱ्याकडे राहतील याची खबरदारी घ्यायला हवी. ती घेतली नाही तर नवी मुंबईतील पाणथळी, फ्लेमिंगोंचे तलाव बुजवण्याचा प्रयत्न ज्याप्रमाणे सुरू आहे तसेच काही होणार नाही, असे नाही. तसेही वाढवण बंदराच्या परिसरातील जमिनी सत्ताधीशांशी संबंधित अनेकांनी आपल्या आपल्यात कशा ‘वाटून’ घेतल्या याची चर्चा सुरू आहेच. तिचे वास्तवात रूपांतर होण्यास फार वेळ लागणार नाही. एखादा प्रकल्प एके ठिकाणी येणार याचा वास आल्या आल्या सत्ताधीशांचे बगलबच्चे संभाव्य पक्ष फोडाफोडीसाठी निधी जमवण्याच्या कामी इमानेइतबारे लागतात. त्यात जमिनींचा वाटा मोठा असतो. हे सर्व वास्तव फडणवीस यांस ठाऊक नाही, असे नाही. त्याचा पुन:प्रत्यय चौथ्या मुंबईबाबतही येऊ नये याची खबरदारी मुख्यमंत्र्यांस घ्यावी लागेल. तशी ती त्यांनी घेतल्यानंतर पुढील मुद्दा शहर नियोजनाचा.
त्यात केंद्रस्थानी असेल ते वाढवण हे बंदर. त्याचे महत्त्व लक्षात घेण्यासाठी मुंबई आणि बंदर यांचे नाते लक्षात घ्यायला हवे. मुंबई, कोलकाता, लंडन, न्यूयॉर्क, न्यूजर्सी आदी शहरांचे महानगरपण हे त्या शहरांच्या बंदरांत आहे. बंदरे होती/ आहेत म्हणून ही शहरे त्यांचे आजचे स्थान मिळवून/ राखून आहेत. मुंबईस महानगरपण मिळाले ते मुंबई पोर्ट ट्रस्टमुळे. तथापि कालौघात आणि युनियनबाजीत अडकल्याने या बंदराचा विकास थांबला आणि या मरणासन्न बंदरामुळे मुंबईदेखील मंदावली. मुंबईच्या बंदरांचे व्यापकपण गुजरातकडे सरकले. गुजरातच्या भरभराटीमागील हे एक कारण. तेव्हा मुंबईस आपले मोठेपण राखावयाचे असेल तर वाढवणसारख्या महाबंदरास पर्याय नाही. या बंदरास जवळपास ६० फुटांची खोली लाभेल. इतके खोल बंदर आपल्या देशात अन्य नाही. त्यामुळे आज देशातील अन्य कोणत्याही बंदरात येऊ शकत नाहीत अशी अवाढव्य जहाजे वाढवणच्या धक्क्यास सहज लागू शकतील. ‘लोकसत्ता’ने कायमच हे बंदर, कोकणातील तेलशुद्धीकरण प्रकल्प आदींचा पुरस्कार केला आहे. वाढवण येथे संभाव्य बंदराच्या विकासानंतर त्या परिसराचे रूपांतरही शहरात होणार असल्याने या आगामी शहराच्या नियोजनाचा विचार आताच होणार असेल तर त्याचे स्वागत अत्यावश्यक ठरते. या नव्या महानगरात आणखी एका विमानतळाचीही उभारणी अपेक्षित आहे. यावरही काही नाके मुरडली जातील. पण अशांस हे माहीत नसेल की इतक्या ढोलगजरानंतरही आपल्याकडील विमानतळांस धावपट्ट्या असून असून आहेत/असतील जेमतेम दोन. परंतु अॅमस्टरडॅमसारख्या मूठभर आकाराच्या शहरातील विमानतळास तब्बल सहा धावपट्ट्या आहेत आणि शिकागो विमानतळास तर आठ. अॅमस्टरडॅमचा शिफॉल विमानतळ समुद्रसपाटीपेक्षा खाली असल्याने अभियांत्रिकी कौशल्याचा नमुना मानला जातो, ही बाब वेगळी. तेव्हा जेमतेम एका धावपट्टीवर आला दिवस ढकलणारा मुंबईचा विमानतळ केवळ लोकसंख्या हाताळणीच्या मुद्द्यावर ‘भव्य’ असेल. पण यात इतरांनी मोठेपणा मिरवावा असे फार काही नाही.
अशा वेळी चौथ्या मुंबईसाठी तिसऱ्या विमानतळाची योजना फडणवीस आखत असतील तर मुरडल्या जाणाऱ्या नाकांची पर्वा न करता त्याचा पाठपुरावा व्हायला हवा. त्यासमवेत चौथ्या मुंबईसाठी योग्य ते आगाऊ नियोजन केले जावे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा. अर्थातच पर्यावरण. भव्य प्रकल्प आणि पर्यावरण यांचे नाते साप-मुंगुसाप्रमाणेच असल्यासारखे आपले शासकीय-सामाजिक वर्तन. अनेक पाश्चात्त्य देशांनी भव्य प्रकल्प उभारलेच; पण पर्यावरणही राखले. फुलवले. आजही न्यू यॉर्क, बर्लिन आदी शहरांच्या मध्यभागी घनदाट जंगले आहेत. आपल्या बोरिवलीतील संजय गांधी उद्यानाप्रमाणे त्या शहरांतील उद्यानांचे लचके तोडले जात नाहीत. अशी जागरूकता दाखवली गेली तरच दुसरीसारखी चौथी मुंबईदेखील सुनियोजित होऊ शकेल. एरवी बकालपणाची हमी आहेच.