तसे गणांबरोबर गणंगांचेही प्रमाण वाढले असणे शक्य आहे… पण हे उत्सव जर नसते तर इतक्या साऱ्या रिकामटेकड्या जनतेने काय बरे केले असते?

गणराया… आपले स्वागत असो. वेलकम. नेमचि येतो मग पावसाळा… हे सृष्टीचे कौतुक आम्हा मर्त्य मानवांस रस्त्यातील खड्डे, माती-पाणी चिखलाचा रबरबाट, डेंग्यू-चिकनगुन्या यांच्या साथी यामुळे अधिक जाणवते. बघता बघता आषाढ संपून श्रावण लागतो आणि मग तुमच्याइतकेच ज्याच्या बालरूपाचे कौतुक त्या कृष्णाच्या नावे होणारी हुल्लडबाजी आटोपली की मागोमाग तुमच्या येण्याची वर्दी मिळते. रस्त्यात वाहतुकीची कोंडी करून उभे राहणारे मंडप, डोळ्यातला प्रकाश मिटवून टाकतील अशा रोषणाया आणि कानातील जिवाचा कायमचा बंदोबस्त होईल असा ढणढणाट जाणवू लागला की समजावे… आपण येणार! पूर्वी बरे होते. कारण थेट गणेश चतुर्थीलाच आपण यायचात. आता तितक्याने आमच्या भाईलोकांचे सॅटिसफॅक्शन होत नाही.

म्हणून आधी हल्ली तुमच्या मंडपाच्या भूमिपूजनाचा (वास्तविक बेकायदा उभ्या केल्या जाणाऱ्या मंडपाचे भूमिपूजन म्हणजे अनौरस संततीच्या नामकरणास गावजेवण घालण्यासारखे असे काही म्हणतील. म्हणू देत. पण शेवटी अनौरस झाला तरी जीव आहे आणि बेकायदा असला तरी तो मंडपच आहे. अनौरस असणे, बेकायदा असणे हा काय त्यांचा दोष?) सोहळा करतो. मग पाद्यापूजेचा सोहळा. मग काय मुखदर्शन. काही ना काही निमित्ताने गर्दी जमली, ढामढुम करून शांतता ढवळून निघाली, वाहतुकीचा खेळखंडोबा झाला म्हणजे झाले. त्याशिवाय सणउत्साह अंगी भिनत नाही आणि साजरा झाल्यासारखे वाटतच नाही. काही ना काही निमित्ताने मिरवणुका निघाल्या की सोहळा सार्थक होतो. आता या मिरवणुकांत काही अक्कलशून्य गोष्टी घडतात अशी टीका होते. म्हणजे बुद्धीच्या देवतेचा उत्सव निर्बुद्ध गोष्टींनी कसा काय साजरा करता वगैरे विचारतात काही. आम्ही अशा बुद्धिवाद्यांचा आदरच करतो. या बुद्धिवाद्यांना प्रश्न विचारू देणाऱ्या लोकशाहीचाही आम्ही सन्मान करतो. तसे आम्ही कधीकधी लोकशाहीवादीच. तीच लोकशाही आम्हाला अशा बुद्धिवादी म्हणवून घेणाऱ्यांकडे दुर्लक्ष करायला शिकवते. आम्हाला असे विचारणारे हे बुद्धिवादी कोरडे. कडेकडेने राहणारे. आम्ही तसे नाही. आम्ही प्रवाहातले. पट्टीचे पोहणारे. आम्ही ऑर्वेलियन बुद्धिवादी. जॉर्ज ऑर्वेल यांस आम्ही फार म्हणजे फार मानतो. तो आमचा कुलगुरूच म्हणा ना. त्यामुळे गोंगाट म्हणजे शांतता, झगझगाट म्हणजे अंधार, तुंबलेली वाहतूक हीच सुरक्षित वाहतूक असे आम्ही मानतो. आता आमच्या उत्सवामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो असे काही विद्वान म्हणतात. विद्वानच ते. काही ना काही म्हणण्यासाठीच त्यांचा जन्म. पण या वाहतूक खोळंब्यामुळेच वेगात वाहन चालवून होणारे अपघात टळतात हे या विद्वानांस कसे कळत नाही? मोटारींना वेगच घेता आला नाही की अपघातही होत नाहीत आणि मोटारीचे टायर झिजून पर्यावरणास धोकाही उत्पन्न होत नाही. म्हणून गणेशोत्सवाच्या काळात रस्त्यावरील अपघातात किती घट होते ते पाहा. रस्तेच ठेवले नाहीत तर वाहतूक होणार नाही आणि वाहतूकच नसेल तर वाहतुकीचे अपघात होणार तरी कसे? या सकारात्मक मुद्द्यांकडे हे बुद्धिवादी दुर्लक्ष करतात याचे आमच्यासारख्यांस फार दु:ख होते. पण ठीकाय. आम्ही काय जास्त फील करून घेत नाही. हळूहळू होईल त्या सर्वांना या सगळ्याची सवय; याची आम्हाला खात्री आहे. सतत अत्याचार करत राहिले की अत्याचारांची पण सवय होते, नंतर नंतर ते अत्याचार वाटतच नाहीत असे आमचे ऑर्वेल गुरुजी म्हणून गेलेत ते काय उगाच नाही.

दुसरा मुद्दा. या मिरवणुकीतील गोंगाटामुळे मिरवणुकीच्या मार्गावरील निवासींची झोपमोड होते अशीही तक्रार येते. योग्य. पण त्यामुळे त्यांच्या आरोग्यास किती फायदा होतो? आमच्या मिरवणुकांच्या दणदणाटामुळे या मध्यमवर्गीयांची दुपारची झोप चुकते, डोळ्याला डोळा लागू शकत नाही याचा फायदा त्यांना रात्री लवकर झोप लागण्यात होतो तो कोण मोजणार? असेही दुपारी न झोपल्याने रक्तातली साखर नियंत्रणात राहते आणि रात्री लवकर झोपल्याने रक्तदाबही आटोक्यात राहातो. ‘‘लवकर निजे, लवकर उठे…’’ असे म्हटलेलेच आहे. असो. जेवढा गोंगाट अधिक तितके हे फायदे अधिक. तेव्हा आमच्या या असल्या उत्सवामागे हे लोककारण आहे हे आपणास लक्षात आले असेलच ! आपण मनकवडे. आपण परमेश्वर. तेव्हा आपणास हे कळले नसणे अशक्यच. आपण गणांचे देव. म्हणून गणपती. या गणांमधे काळाच्या ओघात काही गणंग शिरले नसतीलच असे नाही. काही ठिकाणी गणांपेक्षा गणंगांची संख्या जास्त असेही झाले असेल. पण हे असे होणार. काळाच्या ओघात अस्सलाबरोबर कमअस्सल, नअस्सल यांचीही वाढ होणार. पाणकमळांपेक्षा पाणशेवाळ अधिक जोमाने वाढणार. फोफावणार. पण म्हणून पाण्यास दोष देऊन कसे चालेल? तसे गणांबरोबर गणंगांचेही प्रमाण वाढले असणे शक्य आहे असेच आम्ही मानतो. पण म्हणून याचे खापर आमच्या उत्सवी प्रवृत्तीवर फोडून कसे चालेल? हे उत्सव जर नसतील तर इतक्या साऱ्या रिकामटेकड्या जनतेने काय बरे केले असते याचा विचार तरी आम्हास नाके मुरडणारे करतात काय? पूर्वी गावाकडे शेती होती. खाणारी तोंडे कमी होती. वाढली तर ते चार पैसे कमाईस शहरांत जात. आता कुटुंबे वाढली तशी शेते कमी झाली. शहरांत येणारे वाढले. त्यांच्या हातांस काम देणारे उद्याोग कमी झाले. अशावेळी रिकाम्या हातांना आणि काही प्रमाणात डोक्यांनाही हे उत्सव हा केवढा आधार हे आमच्यावर टीका करणाऱ्यांना कसे कळणार?

यानिमित्ताने चार पैसे काढायला गल्लीतला रामजी-शामजी नाही म्हणत नाही… गल्लीतलेच भाई/ दादा/भाऊ/ अण्णा त्यांच्या वरच्या भाईसाहेब/ दादासाहेब/ भाऊसाहेब/ अण्णासाहेब यांच्याकडून मुबलक ‘आशीर्वाद’ आणतात…कार्यकर्त्यांना टीशर्ट वाटतात… त्यांच्या वडापावची व्यवस्था करतात… उत्सवानंतर श्रमपरिहार पाजतात… रस्त्यावरच्या खांबावर आकडा टाकून वीज घ्यायला वीज कंपनीतले ‘आपल्या’पैकी लोक मदत करतात… चौकीतले हवालदार काणाडोळा करतात… दर्शनाला रांगा लावून गर्दी करणाऱ्यांसमोर व्हालंटीरगिरी करण्याची शिस्त अनेकांना लागते… पालकमंत्री, आमचे लोकप्रतिनिधी दर्शनाला येऊन जातात. त्यानिमित्ताने निवडणुका नसतानाही त्यांचे पाय या परिसराला लागतात… असे किती काय काय सकारात्मक घडते या काळात! उत्सव नसते तर हे सगळे कसे काय झाले असते? शिवाय आमच्यासारखे या अशा उत्सवांसाठी कष्ट घेतात म्हणून अर्थव्यवस्थेचे चक्र फिरू लागते. त्याचा फायदा गरीब, तळागाळातल्यांना किती होतो ते वेगळेच. अर्थमंत्री आणि हे रिकामटेकडे बुद्धिवादी ज्यावर चर्चा करण्यात वेळ घालवतात तो अर्थसंकल्प यातून जे साधत नाही ते अर्थव्यवस्थेला गती देण्याचे काम या उत्सवांमुळे होते. तेव्हा या उत्सवांचे फायदे, त्यांची उपयुक्तता सांगावी तितकी थोडी ! या अशा आनंदी वातावरणास गालबोट लागते ते एकाच गोष्टीचे.

ती म्हणजे आरती. गणराया… तुमच्यामुळे इतके काही चांगले होते आणि तरी त्यास ‘‘वार्ता विघ्नाची’’ असे म्हणणे काय पटत नाय? सुखकर्ता, दु:खहर्ता आणि मग वार्ता विघ्नाची…! सकाळ-संध्याकाळ आरती बोलताना डोक्यात जातात हे शब्द! सामान्य गणांच्या अधिपतीच्या उत्सवास ‘वार्ता विघ्नाची’ बोलणे हा उच्चवर्णीयांनी केलेला उत्सवप्रेमी समाजाचा अपमान आहे. ते काय नाय! दहीहंडीत आयटेम डान्ससाठी गाणी लिहिणाऱ्याला सांगायलाच पायजेल या ‘वार्ता विघ्नाची’च्या जागी मीटरमध्ये कायतरी घालायला…! पण तोपर्यंत बोला… गणपत्ती बाप्पा…