शीर्षस्थ पदांवरील व्यक्ती किती क्षुद्र, हिणकस राजकारण करू शकतात याचा प्रत्यय ट्रम्प यांनी प्रचारकाळात न्यूयॉर्कवासींना दिला…

अमेरिकेत आज इतिहास घडला. न्यूयॉर्क महापौरपदी झोहरान ममदानी आणि व्हर्जिनिया राज्याच्या लेफ्टनंट गव्हर्नरपदी गझाला हाशमी हे भरघोस मतांनी निवडून येणे हा केवळ तात्कालिक आणि स्थानिक राजकीय विजय नाही. तो समजून घ्यायला हवा. कारण अल्पमती आणि बहुमतलबी यांच्याकडून या विजयाचा ‘सोपा’ अर्थ अनेकांच्या डोक्यात भरवण्याचा घाऊक उद्याोग आता सुरू होईल.

हे दोन्ही उमेदवार डेमॉक्रॅटिक पक्षाचे आणि दोन्ही मुसलमान. न्यूयॉर्कच्या महापौरपदी प्रथमच एक मुसलमान व्यक्ती निवडली गेली आणि व्हर्जिनियाचे लेफ्टनंट गव्हर्नरपद पहिल्यांदाच एखाद्या महिलेकडे, आणि तेही मुसलमान, गेले. या दोन विजयी उमेदवारांचे मुसलमान असणे हा या दोन्ही विजयांचा अत्यंत सोपा अर्थ. या मुद्द्याचे मतलबी तुणतुणे आता अनेकांकडून वाजवले जाईल. ममदानी आणि त्यांच्या विजयाचे महत्त्व ते मुसलमान आहेत, स्थलांतरित आहेत, त्यांची आई भारतीय आणि वडील आफ्रिकी भारतीय मुसलमान आहेत, ते ‘डावे’ आहेत, ते इस्रायलचे नरसंहारी पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्यावर कठोर टीका करतात इत्यादी मुद्द्यांत नाही. हे मुद्दे महत्त्वाचे आहेतच. पण ममदानी आणि गझाला हाशमी यांच्या विजयात खरे महत्त्व आहे ते त्यांनी मांडलेल्या आर्थिक मुद्द्यांस. कोणत्याही अन्य निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत मतदारांसमोर दोन बाजू होत्या. एका बाजूस न्यूयॉर्क आणि एकूणच अमेरिकेतील वाढती विषमता, बेरोजगारी, कमालीची महागाई. आणि दुसरीकडे मूठभर धनाढ्यांची धन करणारा ‘धर्म’ -अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कमालीचे द्वेषमूलक राजकारण, आणि संकुचितवाद. अमेरिकेचे मोठेपण असे की तेथील मतदारांनी आर्थिक मुद्द्यांकडे पाहिले आणि ट्रम्प यांच्या धमक्यांस काडीचीही भीक न घालता ममदानी, गझाला यांना भरघोस पाठिंबा दिला.

अमेरिकेच्या आर्थिक आणि सामाजिक सौहार्द श्रीमंतीचे प्रतीक असलेल्या या शहराचे महापौरपद एखाद्या मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाइतकेच महत्त्वाचे. ते गेल्या जवळपास ४०० वर्षांत अनेक मान्यवरांनी भूषवले. यावेळी अवघ्या ३४ वर्षांचे तरुण झोहरान ममदानी, माजी गव्हर्नर आणि कोविडकाळातील या शहराचा चेहरा बनून गेले असे अॅण्ड्र्यू कुओमो हे एकमेकांसमोर होते. वास्तविक कुओमोदेखील डेमॉक्रॅटिक. पण उमेदवारी जिंकू न शकल्याने ते अपक्ष म्हणून उभे राहिले. खेरीज ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे कर्टिस स्लिव्हा हेदेखील रिंगणात होते. या तिरंगी लढतीत ममदानी यांनी आपल्या दोन्ही स्पर्धकांना चारी मुंड्या चीत केले. न्यूयॉर्की नागरिकांनी ममदानी यांस भरभरून मतभेट दिली. महापौरपदाच्या गेल्या काही निवडणुकांत मतदारांत उदासीनता होती. या निवडणुकीत मतदारांनी पारणे फेडले. अत्यंत उत्साही नागरिक बदलाच्या अपेक्षेने मतदान केंद्रावर रांगा लावून उभे आहेत हे पाहण्यासारखे सुख नाही. न्यूयॉर्क मतदारांनी ते भरभरून अनुभवले. आणखी एक सुखकारक बाब या निवडणुकांत दिसून आली. ती म्हणजे आर्थिक मुद्द्याचे राजकीय ऐरणीवरील पुनरागमन.

अध्यक्ष ट्रम्प उजव्या विचारांची धगधगती चूड घेऊन स्थलांतरित, इस्लामधर्मीय, कृष्णवर्णीय यांच्या अस्तित्वास आग लावत असताना ममदानी मात्र सर्वसमावेशकता, धार्मिक सहिष्णुता आणि आर्थिक विषमता हे मुद्दे घेऊन लढत होते. त्यांचे विशेष कौतुक अशासाठी की ही निवडणूक इस्लामविरोधात यहुदी, ख्रिाश्चन आणि हिंदू अशी व्हावी हा ट्रम्प यांचा प्रयत्न त्यांनी सातत्याने हाणून पाडला. ट्रम्प यांनी काय नाही केले? प्रथम ममदानी यांचा धर्म हा निवडणुकीचा विषय केला. एखादा मुसलमान या शहराचा महापौर कसा काय होऊ शकतो, असा प्रश्न मतदारांस विचारला आणि त्यास प्रतिसाद मिळत नाही हे लक्षात आल्यावर जागतिक भांडवलशाहीचे माहेरघर असलेल्या न्यूयॉर्करांच्या मनात ममदानींचे डावेपण भिनवण्याचा प्रयत्न केला आणि ते निवडून आल्यास या शहरातील धनाढ्य कसे न्यूयॉर्क सोडून जातील, अशी भीती निर्माण केली गेली. शीर्षस्थ पदांवरील व्यक्ती किती क्षुद्र, हिणकस राजकारण करू शकतात त्याचा प्रत्यय अलीकडे वारंवार येतो. ट्रम्प यांनी तो या महानगरवासीयांस दिला आणि ‘ममदानी निवडून आले तर आपण या शहराचा निधीपुरवठा बंद करू’ अशी धमकीही अखेर दिली. न्यूयॉर्करांनी ट्रम्प यांस शब्दश: खुंटीवर टांगले आणि ममदानी यांच्यावर विश्वास दर्शवला. त्यासाठी त्या शहरवासीयांचे अभिनंदन. ममदानी हे स्थलांतरित. त्यांच्यामुळे स्थलांतरितांचे कसे फावेल, हे सांगितले गेले. त्यांच्या विचारामुळे संपत्ती निर्मितीचे महत्त्व कसे धोक्यात येईल याचा बागुलबुवा निर्माण केला गेला. ममदानी हे कडवे नेतान्याहूविरोधी. धार्मिकतेच्या मुद्द्यावर त्यांचा यहुदींस विरोध नाही. तथापि इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्या वंशविच्छेदी युद्धास ममदानी कठोर विरोध करतात. न्यूयॉर्क ही अमेरिकेची आर्थिक राजधानी. जगातील बलाढ्य वित्तीय संस्थांची मुख्यालये त्या शहरात आहेत आणि त्यांचे नेतृत्व यहुदी व्यक्तींकडे आहे. असे असतानाही ममदानी यांनी आपली भूमिका बदलली नाही.

त्यांचे यश आहे ते ट्रम्प यांच्या कारकीर्दीत फोफावत असलेल्या धनदांडग्यांना लक्ष्य करण्यात. इंग्रजीत ‘ओलिगोपोली’ असा शब्द आहे. म्हणजे काही निवडक, सत्ताधारी धार्जिण्यांच्या हाती सर्व अर्थाधिकार एकवटणे. अलीकडे अनेक देशांत असे होताना दिसते. अमेरिकेत ते अधिक खुपते. कारण तो देश मुक्त स्पर्धा, मुक्त अर्थविचार यांचा पुरस्कर्ताच नव्हे, तर रक्षणकर्ताही. ट्रम्प यांच्या धोरणांनी त्यास तडा गेला. त्यांना रोखणे गरजेचे होते. ममदानी यांच्या यशाचे महत्त्व ते जिंकले इतकेच नाही. तर अशा धनदांडग्या, धर्मदांडग्यांस रोखायचे कसे याचा त्यांनी घालून दिलेला वस्तुपाठ अनेकांस प्रेरणादायी ठरेल. या प्रवासात अमेरिकेतील बर्नी सँडर्स यांच्यासारखा जुनाजाणता समाजवाद समर्थक ममदानी यांच्या मागे उभा राहिला, हे महत्त्वाचे. कारण सँडर्स हे पोथीबंद समाजवादाचे प्रतिनिधी नाहीत. तेही मुक्त अर्थव्यवस्थेचे पुरस्कर्ते. तथापि मुक्त अर्थव्यवस्था म्हणजे काही निवडकांस मोकाट सोडणे नव्हे. संपत्ती निर्मितीचे सर्वाधिकार काही मूठभरांहाती राहून काही निवडकांचेच भले होत असेल तर तो माजवाद. समाजवाद नव्हे. यास ममदानी यांनी ललकारले. न्यूयॉर्कवासी महिलांचे प्रश्न, स्थलांतरितांचे भणंग जिणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा, ढासळते नगर प्रशासन इत्यादी दैनंदिन जगण्यातील मुद्दे त्यांनी हाती घेतले आणि आपल्या चतुर, श्रोता-स्नेही वक्तृत्वाने मोठा हलकल्लोळ केला. इतका की जागतिक माध्यमांसही या नवख्याची दखल घ्यावी लागली. सर्व धार्मिक अतिरेकी, आर्थिक अतिरेकी अशा सगळ्यांना त्यांनी आपल्या राजकीय भूमिकेत लक्ष्य केले. त्यांच्या या भूमिकेस प्रचंड प्रतिसाद मिळत होता. आज जगातील अनेक देशांत दहा टक्के धनवान हे उरलेल्या ९० टक्क्यांपेक्षाही अधिक कमावताना दिसतात. त्यांच्यासाठीच जणू सरकारची धोरणे असतात. ममदानी यांनी याविरोधात आवाज उठवला आणि किमान वेतनावर जगावे लागणाऱ्यांच्या व्यथांस वाचा फोडली. त्यातही तरुण, मूळचे अ-अमेरिकी आणि त्या शहरातील अल्पसंख्य हे त्यांच्या सभांस तुफान गर्दी करत. याचीच दखल घेत निवडणुकीतील त्यांच्या विजयाचे भाकीत आणि भविष्य यावर ‘लोकसत्ता’ने ‘उद्याचे ओबामा’ (२७ जून) या शीर्षकाचे संपादकीय लिहिले.

धनाढ्य आणि धर्मांध यांची अभद्र युती सर्वत्र सत्ताकेंद्रे काबीज करत असताना ममदानी यांचा विजय महत्त्वाचा. तो मिळाल्यानंतरच्या पहिल्याच भाषणात त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांस उद्धृत केले. स्वातंत्र्याची पहाट उगवत असताना १४ ऑगस्ट १९४७ रोजी पं. नेहरू यांनी भारतीयांस ‘नियतीशी करारा’ची आठवण दिली होती, तसा हा क्षण असल्याचे ममदानी म्हणाले. ही सूचक बाब येथील सर्वसमन्वयवादी, धर्मनिरपेक्षांस आणि मुख्य म्हणजे शुद्ध लोकशाहीवाद्यांस सुखावणारी खरीच. पं. नेहरू यांच्यामुळे धर्म आणि धन यांची अभद्र युती भारतात काही काळ का असेना टळली. तिचे स्मरण करून द्यावे असे ममदानी यांस वाटले. त्यांचा विजय धनाढ्य आणि धर्मांध यांच्या युतीस धक्का देतो. म्हणून त्याचे मोल.