पैसा फिरवून सधन होणारे वित्तीय क्षेत्रातील गुणवंत जितके वाढले, तितके काही तरी निर्माण करून संपत्तीवृद्धी करणारे अत्कृष्ट अभियंते आपल्याकडे नाहीत…

इमारती का पडतात? पूल का कोसळतात? संसदेची नवी कोरी इमारत आणि अयोध्येतील राममंदिर एका पावसात का गळू लागते? भ्रष्टाचार या सार्वकालिक सत्याखेरीज या आणि अशा अन्य काही प्रश्नांच्या उत्तरात एक समान मुद्दा आहे- चांगल्या अभियंत्यांची वानवा. तो आताच निर्माण झालेला नाही. गेल्या काही वर्षांत आपल्या समाजधारणेत झालेल्या निश्चित बदलाचा हा परिणाम आहे आणि त्याचे गांभीर्य अद्यापही आपण लक्षात घेण्यास तयार नाही. शेती क्षेत्राकडून असलेल्या अवास्तव अपेक्षा, सेवा क्षेत्र- सर्व्हिस इंडस्ट्री- नामे मृगजळाचे वाढते आकर्षण आणि सरकारी नोकऱ्यांबाबत अजिबात कमी न झालेला हव्यास अशा काही कारणांचा एकत्रित परिपाक म्हणून आपल्या देशातली गुणवंत अभियंता निर्मिती जवळपास थांबलेली आहे. त्यातून सध्याची गंभीर अवस्था आपल्यासमोर ओढवलेली असून या परिस्थितीच्या निदानात अजूनही उत्तम अभियंत्यांची अनुपलब्धता हा मुद्दा आपण पुरेशा गांभीर्याने घेत असल्याचे दिसत नाही. पायाभूत सुविधा नामक स्वप्नांच्या पूर्ततेचा गजर आपल्याकडे सुरू असताना अभियंत्यांची वानवा या मुद्द्याकडे लक्ष वेधणे आवश्यक ठरते.

Loksatta editorial Election commission declare assembly poll in Jammu Kashmir and Haryana
अग्रलेख: ‘नायब’ निवृत्तीचा निर्णय
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
supreme court s verdict on sub classification of scs and sts
अग्रलेख : ‘जात’ककथा
rbi concerns decline in bank deposits marathi news
अग्रलेख: पिंजऱ्यातले पिंजऱ्यात…
Loksatta editorial on badlapur protest against school girl sexual abuse case
अग्रलेख: आत्ताच्या आत्ता…
independence day 2024
अग्रलेख: स्वातंत्र्य… आपले आणि त्यांचे!
loksatta editorial on president draupadi murmu
अग्रलेख: अब द्रौपदी प्रश्न न पूछेगी…
loksatta editorial shivaji maharaj statue collapse
अग्रलेख: पडलेल्या पुतळ्याचा प्रश्न!

आर्थिक उदारीकरणाचे वारे वाहू लागले नव्हते तोपर्यंत अभियांत्रिकीच्या तीन शाखांवर आपल्याकडे भर दिला जात असे. यांत्रिकी (मेकॅनिकल), विद्याुत (इलेक्ट्रिकल) आणि स्थापत्य (सिव्हिल) अभियांत्रिकी या तीन शाखांची विभागणीही गुणानुक्रमे होत असे. यापेक्षाही गुणवान ‘आयआयटी’त जात. त्याही काळात याद्वारे होणारी अभियंत्यांची निर्मिती पुरेशी नव्हतीच आणि होते त्यातील गुणवान परदेशी जाण्यात धन्यता मानत. ही अभियंत्यांची संख्या वाढवावी या वरकरणी आणि दिखाऊ हेतूने आणि स्वपक्षीय राजकारण्यांस धननिर्मितीचे सहज सोपे साधन निर्माण व्हावे या अंतस्थ आणि खऱ्या हेतूने तेव्हा खासगी अभियांत्रिकीची दुकाने आपण मोठ्या प्रमाणावर उघडली. एखादी नवी योजना हाती घेण्याआधी तिच्या अंमलबजावणीचा साकल्याने विचार आणि तशी तयारी न करण्याचा आपला ऐतिहासिक परिपाठ याबाबतही दिसून आला. या नव्या खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांकडे ना आवश्यक साधनसामग्री होती ना प्रशिक्षित अध्यापक. त्यात या संस्थांचे चालक पडले राजकारणी. त्यामुळे कोणत्याही दर्जा निश्चितीखेरीज पिठाच्या चक्क्यांप्रमाणे ही अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू केली गेली. स्वपक्षीय राजकारण्यांस सुखावण्यासाठी वा अन्यपक्षीय राजकारणी आपल्याकडे यावेत यासाठी या महाविद्यालयांचा खिरापतीप्रमाणे वापर झाला. ही महाविद्यालयांची संख्या इतकी वाढली की ती जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक विद्यार्थीही आपणास मिळेनासे झाले. ही धोक्याची पहिली घंटा.

तीकडे दुर्लक्ष केल्याने परिस्थिती सुधारण्याऐवजी अधिकच बिघडत गेली. ती आणखी रसातळाला नेण्यात महत्त्वाचा वाटा उचलला नव्याने उदयास आलेल्या संगणकीय विद्याशाखेने. त्यातही बाजारपेठी आकर्षणास बळी पडून घरोघरी आपल्या लेक/लेकीस ‘‘तू हार्डवेअरपेक्षा ‘सॉफ्टवेअर’ला जा’’ असे सल्ले मुबलक पालक देत. त्यामुळे अमूर्त अशा या विद्याशाखेत भरती होणारे वाढत गेले. त्यातील बहुसंख्य हे ‘संगणकीय टंकलेखक’ या दर्जाचे होते हे नाकारणे अवघड. यांचीही संख्या अखेर इतकी वाढली की बरकत असूनही सॉफ्टवेअर उद्याोगावर त्यांना दरवाजाबाहेर बाकांवरच बसवण्याची वेळ आली. मागणीपेक्षा पुरवठा अधिक झाला- आणि तोही कमअस्सल दर्जाचा- की यापेक्षा आणखी काय होणार? संगणक अभियंते वाढले म्हणून भारतीयांनी काही संगणकीय उत्पादनांची निर्मिती केली म्हणावे तर त्याबाबतही बोंब. या क्षेत्रातील जे गुणवान होते त्यांनी अमेरिकेचा रस्ता धरला आणि गूगल, अॅपल, अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट आदी क्रियाशीलांची सेवा करण्यात धन्यता मानली. हे कमी म्हणून की काय या काळात एका नव्याच क्षेत्राचा उदय झाला.

ते म्हणजे सेवा क्षेत्र. कुणीतरी घरे बांधायची आणि इतरांनी ती सांभाळायची, घरात काही हवे-नको ते पाहायचे आणि लागेल तेव्हा हरकामास दाराशी सेवेस सादर व्हायचे म्हणजे ‘सर्व्हिस इंडस्ट्री’. कितीही उदात्तीकरणाचा प्रयत्न केला तरी सेवा क्षेत्र म्हणजे अखेरीस यापेक्षा अधिक काही नाही. इंटरनेट महाजालाच्या प्रसार- प्रभावामुळे दूरदेशीच्या आस्थापनांचे पगार काढणे, कर्मचारी व्यवस्थापन, दूरध्वनीवरून माहिती देणे इत्यादी उद्याोग येथे बसून करण्याची सुविधा मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने आणि त्या प्रमाणात त्या क्षेत्रात रोजगारनिर्मितीही मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्याने आपल्याकडे तरुणांच्या झुंडीच्या झुंडी त्या क्षेत्रात दाखल होऊ लागल्या. इतके दिवस अमेरिका, युरोप आदी विकसित देशांतील नोकरीच्या उच्चमध्यमवर्गीयांपुरत्याच उपलब्ध असलेल्या संधी या सेवा क्षेत्राच्या विस्ताराने बहुजन समाजातील तरुणांसही सहज मिळू लागल्या आणि पुणे, पार्ले, डोंबिवली आदी शहरांची मक्तेदारी पिंपरी-चिंचवड, परभणी आणि डिग्रस आदींनी मोडून काढली. यास जोड मिळाली ती वाढत्या वित्तीय (फायनान्स) आणि नंतर वित्त-तंत्र (फिनटेक) या क्षेत्रांची. कमी कष्टात अधिक पैसा कसा मिळवता येतो हे पहिल्याने दाखवून दिले आणि या दुसऱ्याने या वित्तक्षेत्रास सेवेची जोड दिली. अभियंते होऊन स्वत:स कष्टवण्यापेक्षा भांडवली बाजारात पैसे फिरवत अधिक नफा मिळवून देणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या या काळात अतोनात वाढली. परदेशी गुंतवणूकदारांस या काळात दोन पर्याय होते. चीन आणि भारत. यातील पहिला पर्याय निवडणाऱ्यांस चिनी राज्यकर्त्यांनी कारखानदारीत गुंतवणूक करणे भाग पाडले आणि दुसऱ्या पर्यायात भारतात फक्त पैसा आला. गुंतवणूक नाही. हा नवा जागतिक गुंतवणूकदारांचा वर्ग ‘परदेशी वित्त संस्था’ (फॉरीन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर) अशा नावाने ओळखला जातो. या वर्गाने भांडवली बाजारात अमाप पैसा ओतला आणि दोनाचे चार, प्रसंगी सहा करून तो काढून घेतला. असे करताना भांडवली बाजाराचा निर्देशांक तळपता राहिल्याने आपण त्यावर खूश राहिलो. पण यातून भरीव, दीर्घकालीन, जमिनीवरची गुंतवणूक असलेली कारखानदारी काही वाढली नाही आणि परिणामी अभियंत्यांच्या निर्मितीकडे आपण लक्ष दिले नाही.

पैसा फिरवून सधन होणारे आणि काही तरी निर्माण करून संपत्तीवृद्धी करणारे हा फरक वित्तीय क्षेत्रातील गुणवंत आणि अभियंते यांच्यात आहे. अभियंता हा प्रत्यक्ष काही उत्पादन करत असतो. ते करताना एक सशक्त निर्मितीचक्र फिरते राहील याची खबरदारी घेत असतो. पण उत्पादक क्षेत्राकडेच आपण दुर्लक्ष केल्याने अभियंत्यांची गरजही वाटेनाशी झाली आणि संपत्ती निर्मितीचे सर्वांस सामावून घेणारे चक्रही थांबले. याचा थेट परिणाम असा की संपत्ती काही मूठभरांच्या हातीच राहू लागली आणि मग या मूठभरांभोवतीच सारी व्यवस्था फिरू लागली. आज त्यामुळे रोजगाराच्या क्षेत्रात काय दिसते? एका बाजूने वित्त/ वित्तसेवा केंद्रातल्या सूटबूटधाऱ्यांची वाढती संख्या. दुसरीकडे अमाप संख्येने असलेले अकुशल कामगार, अशी अकुशल कामे करता करता अनुभवातून मुकादमपदापर्यंत गेलेले काही मोजके आणि त्याहूनही मोजके असे गुणवंत अभियंते.

पायाभूत सोयीसुविधा बडेजाव वाहून नेण्यासाठी हे इतकेच पुरेसे नाही. प्रचंड संख्येने पूल बांधले जाणार; पण त्यात संबंधित शाखेच्या अभियंत्यांची वानवा. इमारती वाऱ्याच्या वेगाने उभ्या राहणार आणि त्याच वाऱ्याच्या वेगाने पडणार. कारण चांगल्या स्थापत्य अभियंत्यांचा तुटवडा. कारखानदारीचा विस्तार मंदावलेला. म्हणून यांत्रिकी अभियंत्यांची संख्या रोडावलेली आणि म्हणून यांत्रिकी अभियंते होऊन विक्रीकलेत धन्यता मानणाऱ्यांची संख्या वाढलेली. हे नाही म्हणून विद्याुत अभियंत्यांची निर्मितीही रोडावलेली. तेव्हा २०४७ साली विकसित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणायचे असेल तर तातडीने अभियांत्रिकी शाखेत युद्धपातळीवर सुधारणा कराव्या लागतील. अन्यथा आपणास अभियंत्यांचा अभिशाप अटळ असेल.