‘हे आपण करू शकतो’ हा विश्वास सुनील-कपिलच्या भारतीय संघांनी या देशात रुजवला; तर सचिनच्या खेळींमधून ‘येथे आपण जिंकलेच पाहिजे’ हा मंत्र कोटय़वधींना मिळत होता..
त्याच्याविषयीचे किस्से आणि आठवणी अगणित आहेत. पण नुकतीच एका मुलाखतीत त्याने सांगितलेली आठवण, सचिन रमेश तेंडुलकर या अद्वितीय क्रिकेटपटूच्या प्रदीर्घ यशोगाथेमागील रहस्य उलगडणारी ठरावी. सचिनचे कसोटी पदार्पण पाकिस्तानविरुद्ध कराची येथे झाले. षोडशवर्षीय आत्मविश्वासपूर्ण उत्साहात खेळत असताना त्याने सुरुवातीस दोन चौकार वगैरे लगावले. पण अल्पावधीतच तो त्रिफळाचीत होऊन परतला. ‘मी अजूनही बहुधा कसोटी दर्जाचा नसेन’ या कातर भावनेने मनात घर केले. तरीही एक निश्चय केला.. पुढील खेळीत धावफलकाऐवजी घडय़ाळाकडे पाहण्याचा! खरोखरच त्यानंतरच्या खेळीत सुरुवातीचा अर्धा तास सचिन केवळ घडय़ाळाकडे पाहात राहिला. खेळपट्टीवर टिकून राहण्यास प्राधान्य दिले. धावा होत राहिल्या, आत्मविश्वास वाढत गेला. धावांपेक्षाही घडय़ाळाकडे, म्हणजे काळाकडे पाहात वाटचाल करण्याचे ते तंत्र सचिनच्या कालजयी कारकीर्दीसाठी सुकाणू ठरले. आणखी एक प्रसंग. त्याच मालिकेच्या अखेरच्या सामन्यात एका वेगवान चेंडूने सचिनच्या नाकाचा वेध घेतला आणि रक्तपात झाला. सहकारी काळजीतून आणि प्रतिस्पर्धी कुत्सितपणे, सचिनला पॅव्हेलियनमध्ये जाऊन उपचार घेण्याविषयी सांगत होते. पण संघाला त्याची गरज होती. मनाचा निर्धार करून सचिन खेळत राहिला आणि भारताला तो सामना व ती मालिका अनिर्णीत राखता आली..
भारत-पाकिस्तान संबंध त्या काळात आजच्यापेक्षाही अधिक बिघडलेले होते. भारतविरोधाचे विष प्राशन करून आलेले प्रेक्षकांमध्ये असंख्य होते. कुठे ‘आझाद कश्मीर’चे झेंडे प्रेक्षकांतून उसळायचे, काहींनी ‘खलिस्तान’चे झेंडे आणलेले दिसायचे. याशिवाय नारेबाजी आणि हुल्लडबाजी सुरूच होती.. अर्थात तेवढेच एकमेव आव्हान नव्हते. पाकिस्तानच्या संघात उत्तमोत्तम खेळाडू होते. चार सामन्यांची ती मालिका पाकिस्तानचा कप्तान इम्रान खानला कोणत्याही परिस्थितीत जिंकायचीच होती. परदेशी दौऱ्यांवर भारतीय संघाचे हमखास आधारस्तंभ ठरणारे सुनील गावस्कर दोन वर्षांपूर्वी निवृत्त झालेले. भारतीय कर्णधार के. श्रीकांत यांना लय सापडत नव्हती. तेव्हा भारताचा मानहानिकारक पराभव करून वेगळय़ा प्रकारचे ‘धर्मयुद्ध’ जिंकण्यासाठी इम्रान आसुसला होता. अशा आव्हानांसमोर एखाद्या १६ वर्षीय कॉलेजकुमाराची मन:स्थिती कितपत विचलित होऊ शकते याची कल्पना करणे अवघड नाही. त्या परिस्थितीत अपयशी ठरूनही सचिनला पुढे संधी नक्कीच मिळत राहिली असती; कारण स्थानिक क्रिकेटमध्ये उत्तम खेळत होता. पण खुद्द सचिनला ही असली अनुदानात्मक सहानुभूती मंजूर नसावी. त्याच्या व्यक्तिमत्त्वाला ‘सन्मानाने पराभूत होणे’ वगैरे अजिबात मान्य नसावे. आव्हान कितीही मोठे असले, तरी ते तुमच्या निर्धारापेक्षा मोठे असू शकत नाही, असे मानणाऱ्यांपैकी तो एक.
तो काळ गंतागुंतीचा होता. देशांतर्गत आणि देशाबाहेर अशा काही घडामोडी घडत होत्या, ज्यामुळे जगाची दिशाच पुढील अनेक वर्षे कायमस्वरूपी बदलणार होती. भारतात मंडल-मंदिर वाद सुरू झाला होता. काँग्रेसेतर सरकारांचे प्रयोग नव्याने सुरू झाले होते. नजीकच्या काळातच अनेक कारणांस्तव अर्थव्यवस्था खुली करण्याचे धोरणात्मक पाऊल भारत सरकारला उचलावे लागले. राजीव गांधी यांची हत्या, दंगली, बाँबस्फोट, समाजांमधील दुभंगलेपण असा तो भीतिदायक काळ. त्या वेळी कित्येकांना आधार मिळायचा सचिनच्या खेळींमधून. सचिन तोवर भारतीय संघात स्थिरावलेला होता. पहिले अर्धशतक आणि पहिले शतक परकीय भूमीवर झळकावणारा तो एकमेव भारतीय. इंग्लंडमधील त्याचे ते पहिले शतक सामना वाचवणारे ठरले होते. पुढे लगेचच ऑस्ट्रेलियन भूमीवर शतक झळकावणारा तो सर्वात तरुण फलंदाज ठरला होता. हे सारे मासले सचिनचे चाहते आणि क्रिकेटचे अभ्यासक यांना मुखोद्गत आहेत. त्या खेळींची उजळणीदेखील असंख्य वेळा झालेली आहे. परंतु सचिनची ती कामगिरी भारताच्या दृष्टीने प्रतीकात्मक ठरली खास. निर्धार, सचोटी, सबुरी ही मूल्ये भारतवर्षांने सचिनकडून शिकण्याची वा घोटवण्याची गरज नव्हती. तरी परदेशी स्पर्धेचा मुकाबला धीराने करण्याचे आणि परदेशी परिप्रेक्ष्यातही स्वत:च्या क्षमतेविषयी विश्वास ढळू न देण्याचे गुण भारतातील जनता सचिनकडून, दोहोंच्या नकळत आत्मसात करत होती. ‘हे आपण करू शकतो’ हा विश्वास सुनील-कपिलच्या भारतीय संघांनी या देशात रुजवला. तर सचिनच्या खेळींमधून ‘येथे आपण जिंकलेच पाहिजे’ हा मंत्र कोटय़वधींना मिळत होता.
हा प्रवास बाजारभीरू ते बाजाराभिमुख अर्थव्यवस्थेचा होता आणि सचिन या मोहिमेचा अघोषित नायक होता. भारतासमोर नेहमीच कडवे आव्हान उभे करणारा पाकिस्तान आणि क्रिकेटविश्वात वेस्ट इंडिजच्या अस्तानंतर महासत्ता बनलेला ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध त्याने सातत्याने यशस्वी खेळी साकारल्या. एखाद्या दिग्विजयी वीराचा पराक्रम अनुकूल परिस्थितीत नव्हे, तर प्रतिकूल परिस्थितीमध्ये अधिक उजळतो, तसे हे. शेन वॉर्नच्या दु:स्वप्नांमध्ये सचिन यायचा, डॉन ब्रॅडमन यांना तर सचिनमध्येच स्वत:च्या शैलीचा आभास व्हायचा. पाकिस्तानमध्ये सचिन एकदिवसीय सामन्यात खेळणार नसल्याचे कळल्यावर प्रेक्षक नाराज व्हायचे. तेथील दूरचित्रवाणीवर क्रिकेटविषयक कार्यक्रमांमध्ये सचिनवर स्वतंत्र विभाग असायचा. ऑस्ट्रेलियातील खडूस प्रेक्षक सचिन फलंदाजीसाठी मैदानावर उतरला की आवर्जून उभे राहात. हे सारे भारतीय जनता पाहात होती. आपल्यातील एका जेमतेम पाच फूट पाच इंच उंचीच्या युवकाला गोरे जगत कुर्निसात करते, ‘शत्रूदेशा’ला त्याची भीती वाटते याचे येथील जनतेला प्रचंड कौतुक होते. सचिन हा भारतीय राष्ट्रमानसाचा हुंकार ठरला होता, आणि बाजारातील खणखणीत नाणे. त्याच्या कारकीर्दीच्या अगदी सुरुवातीला सचिनला यॉर्कशायर या अस्सल इंग्लिश पण बऱ्याचशा आशियाईद्वेष्टय़ा कौंटीने करारबद्ध केले. त्याच्या नावाची पाटी असलेली मोटारही त्याला दिली गेली. यॉर्कशायरमध्ये तोवर एकाही गौरेतर परदेशी खेळाडूला करारबद्ध केले गेले नव्हते. इंग्लिश व्यवस्थेने त्याच्यात विजेता पाहिला आणि व्यापारउदिमात नफा मिळवता येऊ शकेल, अशी नाममुद्रा.
त्याच्यावरील प्रेमाची जागा अल्पावधीतच स्वार्थी आणि अनाठायी अपेक्षांनी घेतली. एखाद्या सामन्यात सचिन बाद म्हणजे जगबुडी, अशा भावनेने येथे राष्ट्रीय शोक प्रकट होऊ लागला. ‘सचिनने केलेचि पाहिजे’ असा दुराग्रह भारतीय क्रिकेटरसिकांना बेभान करत होता. या अवास्तव अपेक्षावर्षांवातही सचिन अविचल राहिला, हे त्याचे सर्वात ठळक मोठेपण. क्रिकेटवरील प्रेम आणि मैदानावरील भक्ती तसूभरही ढळली नाही. त्याची कारकीर्द म्हणजे केवळ यशोगाथांचा ग्रंथ नव्हे. यात अनेक प्रकरणे दु:खद अपयशांची आणि पराभवांची आहेत. असे कितीतरी टप्पे, क्षण त्याच्या आयुष्यात आले असतील ज्यावेळी ‘बस्स.. येथे थांबावे’ असे कदाचित त्याला वाटले असेल. तरी सचिनच्या व्यक्तिमत्त्वातील उत्साही, निर्विष मूल रसरशीत राहिले. कित्येकांच्या आयुष्याला कोमेजलेपण येते, ते स्वत:मधील मूल हरवल्यामुळे. त्या मुलाची जागा पोक्त प्रौढत्व घेते आणि ते आपल्या व्यक्तिमत्त्वालाच पोखरून टाकते. तसे सचिनच्या बाबतीत झाले नाही. त्यामुळे कोटय़वधी भारतीयांच्या नजरेतून तो कुरळय़ा केसांचा सचिन अजून तसाच आहे. त्यांच्यात अजूनही सचिनरूपी मूल जिवंत आहे. त्यामुळेच तो अजून काय करतो, याविषयी त्यांना उत्सुकता असते. खुद्द सचिनच्या मनातून क्रिकेट संपलेले नाही. आजही फलंदाजी आणि गोलंदाजी यांच्यातील समतोल सध्याच्या दे-मार क्रिकेटमध्ये कसा निर्माण होईल याविषयी आग्रही मते तो मांडतच असतो. हे प्रेम, हा उत्साह अक्षय आहे. नि म्हणून अनुकरणीय आहे. सचिन आज, २४ एप्रिल रोजी पन्नास वर्षांचा होत आहे. त्याच्यासारख्या शतकसम्राटाला अर्धशतकाचे मोल किती, असा प्रश्न सहज पडू शकतो. भारताच्या दृष्टीने मात्र सचिन तेंडुलकर ही एक अविरत अक्षयगाथा आहे. तिला विविध टप्पे आहेत, मात्र अंत नाही. ‘लोकसत्ता’ परिवाराच्या वतीने या महान क्रिकेटपटूला शुभेच्छा!
