रविराज इळवे

महाराष्ट्र हे एक पुरोगामी राज्य म्हणून अग्रेसर झाले ते केवळ आपल्या राज्याला लाभलेल्या पुरोगामित्वाच्या वारशामुळे. हा वारसा ज्ञानोबा – तुकोबा परंपरेतील संत, शिवाजी महाराज – शाहू महाराज यांच्या सारखे राज्यकर्ते, फुले – आंबेडकर यांच्या सारखे सुधारक, विचारवंत, विविध सामाजिक राजकीय चळवळीत सहभागी झालेल्या आणि बलिदान दिलेल्या बुद्धिजीवी, श्रमजीवी, शेतकरी, कामगार अशा अनेक घटकांमध्ये आपल्याला सापडतो.

महाराष्ट्राला लाभलेल्या पुरोगामित्वाच्या वारशाचे प्रतिबिंब स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजेच मुंबई प्रांत असल्यापासून विविध सामाजिक – राजकीय चळवळींमध्ये आणि ओघानेच सरकारी धोरणांमध्ये उमटलेले दिसते. मुंबईत पहिली कापड गिरणी १८५४ मध्ये सुरू झाली आणि या गिरण्यांची संख्या १८७० पर्यंत १३ तर १८९५ पर्यंत अधिक वेगाने वाढत ८३ वर पोहोचली. या गिरण्यांमध्ये काम करण्यासाठी मोठ्या संख्येने कामगार येऊ लागले. मुंबई प्रांतात १८८० पासून कामगार विषयक सुधारणांसाठी आवाज उठवायला सुरुवात झाली, १८८४ मध्ये बॉम्बे मिल हॅन्ड्स असोसिएशन ही देशातील पहिली कामगार संघटना रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईत स्थापन केली. कामगारांना काही जुजबी सवलती देणारे आणि त्यांच्या शोषणावर जुजबी नियंत्रण आणणारे कायदे व्हायला सुरुवात झाली. १८९० पासून दर रविवारी आठवड्याची सुट्टी कामगारांना मिळू लागली.

मुंबईतील कापड गिरण्यांमध्ये राबणारा बहुतांश कामगार देशावरील आणि कोकणातील खेड्यांमधून येत होता, त्याला राहण्यासाठी पुरेशी जागा मिळत नव्हती. अशिक्षित, अल्पशिक्षित आणि बहुतेकदा कुटुंबाशिवाय मुंबईत एकटा राहणारा हा कामगार फावल्या वेळेतील सकारात्मक मनोरंजन साधनांच्या अनुपलब्धतेमुळे वाम मार्गाला लागत होता. दारूचे गुत्ते, कुंटणखाने, सावकार-पठाण यांच्या विळख्यातुन अशा कामगाराचा पगार कुटुंबापर्यंत पोहचत नव्हता. यातून कुटुंबाची ससेहोलपट तर होतच होती, त्यासोबतच कामगारांची कामावरील हजेरी आणि कार्यक्षमता कमी होऊन कापड गिरण्यांच्या उत्पादनावर देखील विपरीत परिणाम होत होता.

मुंबई प्रांतात पहिले लोकनियुक्त सरकार १९३७ साली स्थापन झाले. या सरकारने कारखान्यात आणि कारखान्याबाहेर या कामगारांच्या कल्याणासाठी काय योजना आखता येतील याचा अभ्यास केला. कामगारांचा फावला वेळ सत्कारणी लागावा, कामगारांना दर्जेदार करमणुकीची साधने मिळावीत, त्यांच्या सुप्त कला – क्रीडा गुणांना व्यासपीठ मिळावे यासाठी सुविधा आवश्यक असल्याचे समोर आले. या कामात पोद्दार मिलच्या मालकाने पुढाकार घेतला, पोद्दार मिलच्या माध्यमातून मुंबईत त्यावेळच्या डिलाईल रोड भागात कामगारांसाठी एक प्रशस्त असे रिक्रिएशन सेंटर उभारले आणि ते जागेसह तत्कालीन मुंबई प्रांत सरकारला देणगी स्वरूपात २२ नोव्हेंबर १९३८ रोजी हस्तांतरित केले. या केंद्रात कामगारांना वाचनासाठी दैनिक वृतपत्रे, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आवश्यक जागा, मैदानी व बैठ्या खेळांसाठी आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या. अशा रीतीने मुंबईच्या कामगार वस्तीत कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी कल्याणकारी सुविधा उपलब्ध करून देणारं देशातलं पहिलं सरकार संचलित कामगार कल्याण केंद्र सुरू झालं. या घटनेला २२ नोव्हेंबर २०२३ रोजी ८५ वर्षे पूर्ण होत आहेत.

मुंबईत सुरू झालेल्या या कामगार कल्याण केंद्राची सिद्धता विचारात घेऊन मुंबई प्रांतातील अहमदाबाद, सोलापूर, इचलकरंजी अशा औद्योगिक शहरांमध्ये देखील ही केंद्रे सुरू केली गेली. ‘कामगार कल्याण’ हे मुंबई प्रांतीय सरकारच्या कामगार खात्याचे एक अविभाज्य अंग बनलं. कामगार खात्यात कामगार कल्याणाची एक स्वतंत्र शाखा उघडून, त्यात कामगार कल्याणाचा एकसूत्रीपणाने विचार सुरू झाला. त्या खात्यात कामगार उप-आयुक्ताचे एक स्वतंत्र पद निर्माण करण्यात आले आणि त्याच्याकडे कामगार कल्याणाचे संपूर्ण काम देण्यात आलं.

स्वातंत्र्योत्तर काळात, कामगार कल्याणच्या कामाची गती आणि पद्धती याला निर्णायक स्वरूप देण्याकरिता मुंबई सरकारने जून १९५३ मध्ये ‘मुंबई कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३’ मंजूर केला. राज्य सरकारच्या कामगार कल्याणाबाबत बदललेल्या धोरण विषयक विचारांना पूरक असा नियोजनबद्ध व एकत्रित कामगार कल्याणचा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी हा कायदा करण्यात आला. कामगारांच्या कल्याणासाठी स्वतंत्र कायदा करणारं, मुंबई हे देशातले पहिले राज्य राज्य ठरलं. या कायद्यानुसार दिनांक १ जुलै १९५३ रोजी वैधानिक व स्वायत्त अशा ‘मुंबई कामगार कल्याण मंडळा’ची स्थापना झाली. या अधिनियमांतर्गतच कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबवता याव्यात, याकरिता कामगार कल्याण निधीची तरतूद करण्यात आली. ३० जून १९५३ रोजी मंडळाने, शासन चालवत असलेल्या मुंबई राज्यातील सुरू असलेल्या एकूण ५४ केंद्रांचा कारभार हाती घेतला.

पुढे १ मे १९६० रोजी मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन स्वतंत्र राज्ये अस्तित्वात आली, काही भाग मैसूर राज्याला जोडला गेला. राज्याच्या पुनर्रचनेसह ‘मुंबई कामगार कल्याण मंडळा’ची मालमत्ता आणि दायित्वांचे दोन स्वतंत्र मंडळात विभाजन करण्यात आले. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर या मंडळाचे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ असे नामांतर झाले. २८ एप्रिल १९६० रोजीच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळांतर्गत एकूण ५४ पैकी ३८ कामगार कल्याण केंद्रे वर्ग होऊन काम सुरू झालं. ३ कामगार कल्याण केंद्रे त्यावेळच्या मैसूर राज्यात (आताचे कर्नाटक) आणि १३ कामगार कल्याण केंद्रे गुजरात मंडळाकडे वर्ग करण्यात आली.

१९६२ ते ७२ या कालखंडात झालेले मंडळाचे सर्वात मोठे काम म्हणजे मुंबईत कामगारांसाठी तत्कालीन एल्फिन्स्टन स्टेशनच्या पश्चिमेला बांधण्यात आलेले स्वतंत्र स्टेडियम! खास कामगारांसाठी उभारण्यात आलेले हे देशातील पहिलेच स्टेडियम होते. या स्टेडियमचे नियोजन आणि बांधणी सर्वस्वी कामगार आणि त्यांचे कुटुंबीय डोळ्यांसमोर ठेवून करण्यात आली होती. ‘मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या स्टेडियमचे उद्घाटन १८ ऑगस्ट १९७१ रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या हस्ते झाले होते. मुंबई शहर, महाराष्ट्र सरकार आणि गिरणी कामगार यांना अभिमान वाटेल अशी आणि त्यांच्या शिरपेचात शोभेल अशीच ही मानाची वास्तू तेव्हा उभी राहिली. या प्रकल्पानंतर मंडळाने १९९३ मध्ये नागपुरात राजे रघुजी नगर येथे आणि २००६ मध्ये पुण्यातील सहकार नगर येथे कामगार कल्याण भवन प्रकल्प उभारले. या भव्य प्रकल्पांमध्ये कामगार आणि कामगार कुटुंबीयांसाठी जलतरण तलाव, व्यायामशाळा, बॅडमिंटन, टेबल टेनिस, इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या. सध्या मंडळाची राज्यात ३ कामगार क्रीडा भवने (प्रकल्प), १५ कामगार कल्याण भवने, २१ ललित कला भवने, तर कामगार कल्याण केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण केंद्र अशी मिळून २१० केंद्रे आहेत. याशिवाय प्रशासकीय कामकाजासाठी मुंबई येथील मुख्य कार्यालयासह, मंडळाची ७ विभागीय कार्यालये व १९ गट कार्यालये आहेत.

१९३८ साली डिलाईल रोड येथील पहिल्या कामगार कल्याण केंद्राच्या माध्यमातून मुंबई प्रांतीय सरकारने लावलेल्या रोपट्याला १९५३ मध्ये मुंबई राज्याच्या सरकारने कामगार कल्याणासाठी स्वतंत्र कायदा करून खतपाणी घातले. १९६० मध्ये महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर या रोपट्याची अधिक जोमाने वाढ झाली आणि महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नावाचा एक डेरेदार वटवृक्ष उभा राहिला. या वटवृक्षाच्या कला, क्रीडा, नाटक, साहित्य, कौशल्य, शिक्षण अशा अनेक पारंब्या विकसित झाल्या.

सांस्कृतिक क्षेत्रात मंडळाने मोठे कार्य केले आहे. कामगारांच्या नाट्यस्पर्धा गेल्या ७० वर्षे म्हणजे मंडळाच्या स्थापनेपासूनच (सन १९५३) अखंडपणे सुरू आहेत. नटवर्य नानासाहेब फाटक, मास्टर दत्ताराम यांसारख्या मराठी रंगभूमीवरील मान्यवरांच्या दिग्दर्शनाखाली ही नाट्यस्पर्धा उत्तरोत्तर बहरलेली आहे. यशवंत दत्त, रमेश भाटकर, मोहन जोशी, रोहिणी हट्टंगडी, अलका कुबल, निर्मिती सावंत, आदेश बांदेकर, विजय खानविलकर, ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांसारख्या मान्यवरांनी कामगार रंगभूमी अनुभवलेली आहे, समृद्ध केली आहे.

क्रीडा स्पर्धांमध्ये औद्योगिक व व्यावसायिक कामगारांसाठी गेल्या २७ वर्षांपासून आणि महिलांसाठी २१ वर्षांपासून खुली कबड्डी स्पर्धाही आयोजित केली जात आहे. मंडळाच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत दरवर्षी तब्बल एक हजारपेक्षा जास्त खेळाडू सहभागी होतात. मंडळाच्या वतीने कामगार केसरी व कुमार केसरी कुस्ती स्पर्धाही भरवल्या जातात आणि या स्पर्धांतही कामगारांचा मोठा सहभाग असतो. यासोबतच पॉवरलिफ्टिंग, वेटलिफ्टिंग, टेबलटेनिस, बॅडमिंटन अशा खेळांत राज्य आणि केंद्र शासनाचे पुरस्कार मिळवणारे अनेक खेळाडूही मंडळाच्या केंद्रांत सराव करतात. त्यात राष्ट्रीय मास्टर किताब विजेते प्रकाश केळकर (टेबल टेनिस), शिवछत्रपती पुरस्कार विजेते महेंद्र चिपळूणकर (टेबल टेनिस), शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या रक्षा महाराव (वेटलिफ्टिंग), पद्मश्री पुरस्कार विजेते तारानाथ शेणॉय (जलतरण) अशा मान्यवरांचा समावेश आहे. त्याशिवाय आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत पारितोषिक मिळवणारी सुचिता तेंडुलकर, ऋत्विका सरदेसाई, भक्ती आंब्रे… या मंडळाच्या केंद्रातील सभासद खेळाडूही आहेत. या व्यतिरिक्त मंडळाच्या क्रीडा सुविधांचा वापर करणारे अनेक कामगार आणि इतर खेळाडू राज्य शासनाच्या शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित झाले आहेत.

विशेष म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या धर्तीवर कामगार साहित्य संमेलनाचे आयोजन मंडळाकडून केले जाते. कोकणातील पारंपरिक लोककला प्रकार असलेल्या दशावताराचा नाट्य महोत्सवही मंडळ आयोजित करते. तसेच गेल्या १५ वर्षांपासून औद्योगिक आणि व्यावसायिक कामगारांसाठी मंडळाने स्वतंत्र नाट्य स्पर्धा घ्यायलाही सुरुवात केली. याशिवाय गेली २७ वर्षे राज्यस्तरीय पुरुष कामगार भजन स्पर्धा आणि गेल्या १७ वर्षांपासून महिला भजन स्पर्धा आयोजित केली जात आहेत. या विविध सांस्कृतिक उपक्रमांसोबतच समरगीत स्पर्धा, बाल नाट्य स्पर्धा, महिला नाट्य स्पर्धा, लोकनृत्य स्पर्धा, भजन प्रशिक्षण शिबीर… यांसारखे कार्यक्रम नियमितपणे आयोजित केले जातात.

कामगार कल्याण केंद्रामध्ये जागेच्या उपलब्धतेनुसार शिशुमंदिर, पाळणागृहे, शिवणवर्ग, हस्तकला वर्ग, वाचनालय, ग्रंथालय, अभ्यासिका, व्यायामशाळा, योगा वर्ग, नृत्य प्रशिक्षण वर्ग, कराटे प्रशिक्षण वर्ग, संगणक प्रशिक्षण वर्ग, टेबलटेनिस, बॅडमिंटन कोर्ट, जलतरण तलाव, जिम्नॅस्टिक वर्ग, संगीत वर्ग असे विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांना त्या त्या परिसरातील कामगार आणि कुटुंबियांचा उत्तम प्रतिसाद मिळत आला आहे.

मंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांमध्ये प्रामुख्याने- कामगार पाल्यांना इयत्ता दहावीपासून दिली जाणारी सर्वसाधारण शिष्यवृत्ती, परदेशातील उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती, क्रीडा शिष्यवृत्ती, पाठ्यपुस्तक खरेदीसाठी अर्थसहाय्य, एमएससीआयटी अर्थसहाय्य, कामगार लेखकांना स्वलिखित पुस्तक प्रकाशनासाठी अर्थसहाय्य, गंभीर आजाराच्या उपचारासाठी अर्थसहाय्य, शिवण मशिन खरेदीसाठी अर्थसहाय्य… अशा विविध आर्थिक लाभाच्या योजनांचा समावेश आहे. तथापि, कामगार विश्वात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आर्थिक लाभाच्या योजनांपेक्षा कार्यक्रम आणि उपक्रमांसाठीच अधिक ओळखले जाते. मंडळाकडून यापूर्वी राबविण्यात आलेल्या कार्यक्रम / उपक्रमांमध्ये मागील दोन तीन वर्षात भर घातली आहे व बंद पडलेले काही कार्यक्रमही पुन्हा नव्याने सुरू केले आहेत.

आज महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाशी राज्यभरातील सुमारे १ लाख ६० हजार कारखाने, औद्योगिक व व्यापारी आस्थापना, बँका आणि त्यातील ५७ लाख कामगार / कर्मचारी जोडलेले आहेत. नोंदीत मालक आस्थापना आणि कामगारांची ही मंडळाच्या इतिहासातील सर्वाधिक संख्या आहे. मंडळाच्या कामकाजाचे संगणकीकरण करून आस्थापना नोंदणी, अंशदान भरणा, लाभार्थी नोंदणी आणि योजनांचा लाभ यासाठी आस्थापना आणि कामगारांना ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली असून श्रमकल्याण युग हे मंडळाचे बंद पडलेले मुखपत्र मासिक स्वरूपात सुरू केले. त्यामुळे मागील दोन अडीच वर्षापासून मंडळाच्या कामाचा प्रभावी पद्धतीने प्रचार प्रसार झाल्याने मंडळाच्या लाभार्थी संख्येत व मंडळात नोंदीत आस्थापना आणि कामगार संख्येत भरीव वाढ होत आहे.

२०२१-२२ या वर्षात युनिसेफ – युवाच्या माध्यमातून कामगार व कामगार कुटुंबियांसाठी कौशल्य विकास व रोजगाराचा पथदर्शी / प्रायोगिक उपक्रम राबवविला असून यातून सुमारे साडेतीन हजार उमेदवारांना रोजगार मिळवून देता आला. युनिसेफसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मंडळास प्रथमच या उपक्रमातून सहकार्य प्राप्त झाले.

कामगार साहित्य संमेलन हा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा एक महत्वाचा आणि मानाचा कार्यक्रम! मंडळाने पहिले कामगार साहित्य संमेलन १९९२ साली पुण्यात आयोजित केले होते व संमेलनाध्यक्ष होते पद्मश्री नारायण सुर्वे. त्यानंतर झालेल्या १५ कामगार साहित्य संमेलनांना अनुक्रमे बाबुराव बागूल, डॉ आनंद यादव, डॉ. सदा कऱ्हाडे, अरुण साधू, उत्तम बंडू तुपे, शिवाजी सावंत, पद्मश्री नामदेव ढसाळ, मधू मंगेश कर्णिक, प्रा. केशव मेश्राम, डॉ. अनिल अवचट, उत्तम कांबळे, फ.मुं शिंदे, डॉ. रूपा कुलकर्णी, रामदास फुटाणे असे दिग्गज साहित्यिक संमेलनाध्यक्ष म्हणून लाभले होते. रामदास फुटाणे यांच्या अध्यक्षतेखाली सातारा येथे २०११ साली संपन्न झालेल्या १६ व्या कामगार साहित्य संमेलनानंतर हा मानाचा कार्यक्रम तब्बल १२ वर्षे होऊ शकला नव्हता याचे प्रमुख कारण होते नियोजन आणि आयोजनात येणाऱ्या अडचणी आणि त्यातील किचकटपणा, परंतु हे आव्हान मंडळाने कामगार विभागाच्या पाठबळावर पेलेले आणि तब्बल १२ वर्षांच्या खंडानंतर १७ वे कामगार साहित्य संमेलन मिरज येथे जेष्ठ साहित्यिक डॉ. तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली फेब्रुवारी २०२३ मध्ये झाले.

याशिवाय राज्यातील प्रत्येक कामगाराने, आदर्श कामगार व नागरिक व्हावे, त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची दखल घ्यावी व त्यांना प्रोत्साहन द्यावे, या उद्देशाने मंडळाकडून सन १९७९ पासून गुणवंत कामगार पुरस्कार देण्यात येतात. कामगार क्षेत्रातील अतिशय प्रतिष्ठेच्या असलेल्या या पुरस्कारांची सन २०१५-१६ पासून ठप्प झालेली प्रक्रिया पुन्हा सुरू करून प्रदीर्घकाळ प्रलंबित पुरस्कारांचे वितरण मागील दोन अडीच वर्षात करता आले याचा विशेष आनंद आहे. सन २०२१-२२ या वर्षाचे हे पुरस्कार महाराष्ट्राचे सन्माननीय राज्यपाल यांच्या हस्ते व कामगार मंत्री आणि मुंबई शहराचे पालक मंत्री यांच्या उपस्थितीत ३० ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबईत वितरित करण्यात आले आहेत.

मंडळाच्या प्रभादेवी येथील हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवनातील टेबल टेनिस अकादमीचे सन २०२१ मध्ये नूतनीकरण करून अद्ययावत सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. येथील जुन्या ७० आसनी अभ्यासिकेचे नूतनीकरण करून १४४ आसन क्षमतेची अद्ययावत अशी अभ्यासिका सन २०२२ मध्ये उभारण्यात आली आहे. या वर्षी सन २०२३ मध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील एक मोठी आणि ऑलिंपिक दर्जाची १० मीटर शूटिंग रेंज तसेच ७० मीटर आर्चरी रेंज येथे उभारण्यात आली आहे. या क्रीडा भवनातील ही आर्चरी रेंज मुंबईतील एकमेव रेंज असून या खेळातील ऑलिंपिक दर्जाची ही सुविधा महाराष्ट्रात केवळ ५ ठिकाणी आहे. याशिवाय येथील जलतरण तलावाचे जिल्हा नियोजन समिती, मुंबई शहर जिल्हा यांच्या माध्यमातून आधुनिकीकरण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. सन १९७१ साली तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या कामगार क्रीडा भवनाचे नूतनीकरण देखील मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून होत असून हे काम अंतिम टप्प्यात आहे. हुतात्मा बाबू गेनू मुंबई गिरणी कामगार क्रीडा भवन म्हणजे मंडळाचा मानबिंदू! ही वास्तु पुन्हा एकदा कात टाकून दिमाखात मिरवण्याच्या तयारीत आहे.

राज्यातील लहान मोठ्या शहरात नोकरीसाठी येणाऱ्या कुटुंबातील पती पत्नी दोघांनाही नोकरी करणे बऱ्याचदा भाग पडते. त्यामुळे त्यांच्या लहानग्या/ तान्ह्या मुलांचा सांभाळ आणि शाळा कॉलेजात जाणाऱ्या कामगारांच्या मुलांना अभ्यासासाठी छोट्या घरात वेगळी जागा या प्रमुख दोन समस्या अशा कामगारांसमोर उद्भवतात. आजचे कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या या गरजा विचारात घेऊन नजीकच्या काळात विविध ठिकाणी पाळणाघरे आणि अभ्यासिका सुरू करण्याचा मंडळाचा विचार आहे.

‘महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ’ हे राज्यातील कामगारांच्या जीवनात आनंद फुलविणारे आणि त्यांच्यात सकारात्मक बदल घडविणारे एक हक्काचे व्यासपीठ म्हणून प्रस्थापित झालेले आहे. मंडळ आणि कामगारांच्या परस्पर विश्वास आणि सौहार्दातून ही प्रक्रिया ८५ वर्षांपासून सुरू झालेली असून या प्रक्रियेला अतिशय उत्तुंग अशी परंपरा आहे. या उत्तुंग परंपरेचा भाग होणे ही देखील एक अतिशय विलक्षण अनुभूती आहे. शिस्त, सेवा, सुधार आणि समृद्धी या चतुसूत्रीचा अवलंब करीत महाराष्ट्रातील कामगार कल्याणाचे प्रशासन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून संचलित होत आहे.

लेखक महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कामगार कल्याण आयुक्त आहेत.