संकेत कुलकर्णी

लंडनहून भारतात येणार असलेल्या वाघनखांबद्दल अनेक उल्लेख सापडतात, तरीही आणखी अभ्यास का हवा?

kolhapur lok sabha seat, sanjay mandlik, sanjay mandlik controversial statement, shahu maharaj, historians criticise sanjay mandlik, shivsena, bjp, congress, lok sabha 2024, election 2024, mahayuti, maha vikas aghadi, kolhapur politics, kolhapur shahu maharaj, controversial statment on shahu maharaj,
छत्रपतींच्या गादीचा मंडलिकांकडून अवमान; इतिहास संशोधकांनी व्यक्त केला निषेध
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Raj Thackerey teaser
VIDEO : राज ठाकरे- अमित शाह यांच्या बैठकीत काय ठरलं? शिवतीर्थवरून मिळणार उत्तर, पाहा पाडवा मेळाव्याचा टीझर!
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती

महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत नुकतेच म्हणजे ३ ऑक्टोबर रोजी लंडनमधल्या व्हिक्टोरिया आल्बर्ट म्युझियमशी सामंजस्य करार करण्यासाठी लंडनमध्ये आले होते. या वस्तुसंग्रहालयात असलेली वाघनखे नोव्हेंबर २०२३ ते नोव्हेंबर २०२६ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी भारतात आणण्याचे मान्य झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध करण्यासाठी वापरलेली ही वाघनखे जेम्स ग्रँट डफ या ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्याने महाराष्ट्रातून ब्रिटनमध्ये नेली. पुढे डफच्या वंशजांनी ती संबंधित म्युझियमला देऊन टाकली. जेम्स ग्रँट डफकडे ती कशी गेली, ती महाराजांचीच असल्याच्या दाव्यांत किती तथ्य असू शकते, याचा हा ऊहापोह.

हेही वाचा >>> आधुनिकता आली, समानता नाही!

जेम्स ग्रँट डफ वयाच्या १६व्या वर्षी म्हणजे १८०५-१८०६ मध्ये लष्करी सेवेसाठी मुंबईत आला. १८०७ मध्ये त्याची नेमणूक बॉम्बे नेटिव्ह इन्फन्ट्रीत करण्यात आली. त्याच काळात १८९१ मध्ये पुण्यात रेसिडेण्ट म्हणून आलेल्या माऊंटस्टुअर्ट एलफिन्स्टनने या जेम्स ग्रँटला कंपनीच्या प्रशासकीय सेवेत येण्याचे आमंत्रण दिले. हळूहळू ग्रँटचा समावेश एलफिन्स्टनच्या आतल्या गोटात झाला. सातारकर छत्रपती १८१८ मध्ये इंग्रजांच्या मदतीने तख्तावर आले होते. त्याच वर्षी, कॅप्टनपद मिळालेल्या जेम्सची ११ एप्रिल रोजी सातारचा रेसिडेंट म्हणून नियुक्ती झाली. त्याने मराठी कागदपत्रे अभ्यासून मराठय़ांचा इतिहास प्रकाशित केला. सातारकर छत्रपतींच्या वतीने इतर जहागीरदारांसोबत करार केले. १८२२ मध्ये त्याने सातारा सोडले तेव्हा किंवा १८१८ मध्ये साताऱ्यात तो नियुक्त होऊन आला तेव्हाच त्याला ही वाघनखे भेट मिळाल्याची शक्यता आहे. पण तसे काही निश्चित पुरावे नाहीत.

हेही वाचा >>>चतु:सूत्र : ‘न्यूजक्लिक’वरील धाडींच्या निमित्ताने..

ही वाघनखे एका लाल कातडी पेटीत आहेत आणि त्यावर इंग्रजीत लिहिलेले आहे ‘The Wagnuck of Sivajee With Which He Killed the Moghul General. This Relic was given to Mr.  James Grant- Duff of Eden When he was Resident at Satara By the Prime Minister of the Peshwa of the Marathas’ या लिखाणात काही त्रुटी दिसतात. आदिलशाही सरदार अफजल खान हा काही मोगल नव्हता. पण इंग्रज कागदपत्रांत बरेचदा मुसलमान अधिकारी हे ‘मोगल’ असल्याचीच नोंद पाहायला मिळते. दुसरी गोष्ट ‘By the Prime Minister of the Peshwa of the Marathas या वाक्यरचनेबद्दल. ‘Prime Minister’ म्हणजेच पेशवा (पंतप्रधान) आणि पेशव्यांचे पुढे कुणीच ‘Prime Minister’ नव्हते. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांना छत्रपतींनी फेब्रुवारी १८१८ मध्ये पदच्युत केले होते. डफ एप्रिल १८१८ मध्ये साताऱ्यात आला. १८१८ नंतर सातारकर छत्रपतींच्या दरबारात पेशवा हे पदच नव्हते. त्यामुळे ही वाघनखे त्याला कोणत्याही पेशव्यांकडून मिळायची शक्यता जवळपास नाहीच. ती छत्रपतींतर्फे सातारा दरबारातल्या एखाद्या मंत्र्याने अथवा एखाद्या प्रधानाने दिली असावीत, पण याबद्दल काहीच पुरावे नाहीत.

१० नोव्हेंबर १६५९ (मार्गशीर्ष शुद्ध ७ गुरुवार) हा छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्या भेटीचा दिवस ठरला होता. या वेळी झालेल्या झटापटीत या वाघनखांचा उपयोग झाल्याचा तपशील आपल्याकडे काही साधनांमध्ये येतो. यातील निवडक उल्लेख पाहू :

(१) कृष्णाजी अनंत सभासद हा महाराजांना समकालीन होता. त्याने राजाराम महाराजांच्या आज्ञेवरून ‘शिवछत्रपतींचे चरित्र’ (सभासद बखर) १६९७ साली लिहून पूर्ण केले. त्यात या प्रसंगाविषयी तो म्हणतो- ‘..राजियानें भेटी देता खानानें राजियाची मुंडी कवटाळून खांकेखाले धरिली आणि हातींची जमदाड होती तिचे मेण टाकून कुशीस राजियाचे चालविली. तो अंगात जरीची कुडती होती त्यावरि खरखरली. आंगास लागली नाहीं. हे देखोन राजियांनी डावे हाताचे वाघनख होतें, तो हात पोटांत चालवला. खानाने अंगात झगाच घातला होता. वाघनखाचा मारा करितांच खानाची चरबी बाहेर आली. दुसरा हात, उजवे हातचे बिचवियाचा मारा चालविला..’

हेही वाचा >>> अन्वयार्थ : ठाकरे-फडणवीसांखेरीज सारेच गप्प?

(२) छत्रपती शिवाजी महाराजांचे एकनिष्ठ आणि शूर सरदार कान्होजी जेधे यांच्या घराण्यातील कागदपत्रांपैकी शकावली ‘जेधे शकावली’ म्हणून ओळखली जाते. त्यात उल्लेख येतो की ‘..भेटीचे समई अफजल खानाने राजश्री स्वामीची मान बगलेस धरिली तेव्हा राजश्री नी पंज्यास पोलादी वागनखे पंज्यास घातली होती त्याचा मारा करून आंतडी बाहेर काढिली..’

(३) अज्ञानदास नावाचा छत्रपती शिवाजी महाराजांना समकालीन एक शाहीर होता. महाराज पन्हाळगडावरून सुटून राजगडावर आल्यावर त्याने प्रत्यक्ष महाराजांच्या समोर हा अफजल खान वधाचा पोवाडा गायल्याचे उल्लेख आहेत. अज्ञानदास पोवाडय़ात म्हणतो, ‘कव मारिली अबदुल्याने सरजा गवसून धरला सारा॥ चालविली कटय़ार सीलवर मारा न चले जरा॥ सराईत शिवाजी। ज्याने बिचव्याचा मारा केला॥ उजवे हातीं बिचवा त्याला वाघनख सरज्याच्या पंजाला॥ उदरच फाडुनी खानाची। चरबी आणिली द्वारा॥..’

आणखी एक महत्त्वाचे साधन आहे ‘श्रीशिवभारत’ हे संस्कृत काव्य. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारातील कविन्द्र परमानंद (नेवासकर) यांनी हे पद्यमय चरित्र लिहिले. मात्र त्यात वाघनखांचा उल्लेख नाही. या प्रसंगाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे : ‘‘..असे बोलून त्याने (अफजल खानाने) त्याची (महाराजांची) मान डाव्या हाताने धरून दुसऱ्या (उजव्या) हाताने त्याच्या (म्हणजे महाराजांच्या) कुशीत कटय़ार खुपसली. बाहुयुद्धनिपुण शिवाजी महाराजांनी लगेच त्याच्या हातातून मान सोडवून घेऊन अत्यंत गंभीर ध्वनीने दरी दुमदुमवून टाकली आणि गोंधळून न जाता आपले अंग किंचित आकुंचित करून शिवाजी महाराजांनी आपल्या पोटात घुसणारी ती कटय़ार स्वत: चुकविली. ‘हा वार तुला करतो तो घे, मला धर’ असे म्हणतच, सिंहासारखा स्वर, सिंहासारखी गती, सिंहासारखे शरीर, सिंहासारखी दृष्टी, सिंहासारखी मान असलेला व दोन्ही हातांनी फिरवलेल्या नागव्या तरवारीने शोभणारा तो धैर्यवान व कर्तृत्ववान करारी शिवाजी, त्या वैन्याचा सूड घेण्यास प्रवृत्त होऊन त्याने आपल्या (आखूड) तरवारीचे टोक त्याच्या (म्हणजे अफजल खानाच्या) पोटातच खुपसले. त्याने (म्हणजे महाराजांनी) शत्रूच्या (म्हणजे अफजल खानाच्या) पोटांत पाठीपर्यंत झटकन खुपसलेली ती (आखूड) तरवार सर्व आंतडी ओढून बाहेर पडली..’ (श्रीशिवभारत अध्याय २१ श्लोक ३४-४०)

हेही वाचा >>> मोदींमुळेच मतभेद सांधले जात आहेत…

अफजल खान वधानंतर दुसऱ्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज झपाटय़ाने विजापूर सरदारांनी कब्जा केलेला मुलूख जिंकायला निघून गेले. त्यामुळे ही शक्यता फारच कमी आहे की, अफजल खान वधासाठी वापरलेली हत्यारे (वाघनखे/ बिचवा वगैरे) त्यांनी खास कोणाला तरी जपून ठेवायला सांगितली असावीत. असे काही केल्याची त्या काळची तशी उदाहरणेही फारशी आढळत नाहीत. महाराजांच्या कुणी निकटवर्तीयांनी त्यांचे असे काही हत्यार जपून ठेवल्याचीही नोंद अजूनपर्यंत मिळालेली नाही..

पण हा प्रश्न उरतोच की मग काही साधनांत वाघनखांचे उल्लेखच का नाहीत? माझ्या मते एक शक्यता अशी की, महाराजांनी अफजल खानाच्या मगरमिठीतून सुटण्यासाठी फक्त एक धक्कातंत्र म्हणून वाघनखे अफजल खानाच्या पोटावर चालवली असावीत आणि नंतर मिठी सैल झाल्यावर मात्र हल्ल्यासाठी बिचवा किंवा ‘आखूड तलवार’ वगैरेंचा वापर केला असावा. त्यामुळेही काही साधनांत वाघनखांचा उल्लेख गाळलेला असू शकेल. मग जेम्स ग्रँट डफकडे आलेली वाघनखे नक्की कुणाची? आपल्याकडे कोणत्याही कागदपत्रांत, ही जपून ठेवलेली वाघनखे कशी होती, त्यांचा आकार कसा होता, नक्षीकाम होते का किंवा बाकी कोणत्याही प्रकारे हे निश्चितपणे ओळखण्याच्या खाणाखुणा वा तत्सम पुरावा नाही. पण ही वाघनखे लंडनमध्ये ‘शिवाजीची’ म्हणून प्रसिद्ध होती याचे मला लंडनमधल्या वर्तमानपत्रांत उल्लेख मिळालेत, जानेवारी १८६० मध्ये ‘ईस्ट इंडिया हाऊस’च्या पहिल्या मजल्यावर भरवल्या गेलेल्या प्रदर्शनात ही वाघनखे ठेवलेली होती आणि त्यात ती महाराजांची असल्याचे म्हटलेले आहे. ‘द होमवर्ड मेल’ नावाच्या इंग्रजी वर्तमानपत्राच्या २१ जानेवारी १८६०च्या अंकात पान १६ वर पुढील उल्लेख आहे .. …Beyond this is the celebrated waghnakh,  or tigerl s claws with which,  in October 1659,  SIVAJI murdered the Bijapur general,  AFZAL KHAN… लंडनमधल्या ‘इंडिया म्युझियम’मध्ये असलेली ही वाघनखे वापरून महाराजांनी अफजल खानाला मारल्याचा अनेक वर्तमानपत्रांत उल्लेख आहे. ५ एप्रिल १८७५ च्या ‘डंडी कुरियर’ या वृत्तपत्रात पान ३ वरचा उल्लेख  Sivajee’s claw of steel is less well known,  but not less interesting… असा आहे, तर १ ऑगस्ट १८९६च्या ‘पिअरसन्स वीकली’मध्ये पान ७ वर तर गुप्त शस्त्रांसंबंधीच्या लेखात महाराजांनी अफजल खानाचा वध वाघनखे वापरून केल्याचा उल्लेख (महाराज-अफजल खान भेटीच्या रेखाचित्रासह!) आहे – ‘… In the midst of the customary embrace Sivaji struck the bagh nakh into Afzal Khan…’

जेम्स ग्रँट डफ मराठय़ांच्या इतिहासाचा अभ्यासक आणि आद्य इतिहासकार. साताऱ्यात छत्रपतींच्या दरबारात होता. त्यामुळेच त्याला दरबाराकडून ही वाघनखे दिली गेल्याची शक्यता नाकारता येत नाही. या हत्याराचा अफजलवधाशी अजिबातच संबंध नाही, असेही नाही. त्यांचा आपल्या साधनांत उल्लेख आहे आणि ते मुठीत लपविण्याजोगे असल्याने ते स्वसंरक्षणासाठी महाराजांकडून वापरले गेल्याची शक्यताही आहे.

आजही जेम्स ग्रँट डफच्या बहुतांश अप्रकाशित डायऱ्या लंडनमध्ये ब्रिटिश लायब्ररीत संशोधकांच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातून या वाघनखांबद्दल काही तरी नवी माहिती किंवा एखादा दुवा मिळेल अशी शक्यता आहे. कदाचित महाराष्ट्रातील पुराभिलेखागारांतही भविष्यात एखादा असा कागद मिळू शकतो की ज्यात महाराजांनी ही वाघनखे जपून ठेवायला सांगितल्याचे उल्लेख असतील. अभ्यासकांनी या दृष्टीने शोध घ्यायला हवा. ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरल्याची गणितीय शक्यता आजच्या घडीला समजा अगदी नगण्य असली तरी ती साफ शून्य नाही हे लक्षात घेऊन या वाघनखांचे स्वागत व्हावे, ही माफक अपेक्षा!

लेखक लंडनस्थित इतिहास अभ्यासक आहेत.

sanket.s.kulkarni@gmail.com